२९ डिसेंबर २०१० अश्विनीमामी गटग, पुणे

Submitted by आशूडी on 30 December, 2010 - 03:38

हैद्राबादहून मायबोलीकर अश्विनी खाडिलकर (अश्विनीमामी, अमा) पुण्यात येणार असल्याने चिनूक्सने २९ डिसेंबरला म्हात्रेपुलाजवळ मल्टिस्पाईस इथे संध्याकाळी गटग आयोजित केले. त्याबद्दल "सारखं सारखं मल्टिस्पाईसच का?" याचं उत्तर त्याने शिताफीने न देऊन गटग तेथेच होणार असल्याचे पक्के केले. थोर माणसांच्या यशाचे गमक नंतरच उमगते. उद्योजक गटग '५ ते ७' होऊन निरुद्योजक (!?) नको, उद्योजकांचे आधारस्तंभ (!) गटग मात्र '७ पासून पुढे' ठेवण्यात आले होते. या अमर्यादित वेळेवरुन नोकरदारांची मुस्कटदाबी कशी होत असेल हे सूज्ञांच्या लक्षात येईलच. तरी कुणीही तक्रार न करता दिलेल्या वेळेच्या पुढे मागे नोंदवलेले सारे उपस्थित राहीले. आपली तक्रार, सूचना कुणीही ऐकत नाही हे अंगवळणी पडल्याचे लक्षण.
प्रचंड मायबोलीसमुदाय जमलेला पाहून मल्टिस्पाईसच्या वेटर्सना धडकी भरली. आमचे आवाज ऐकून, आवेश पाहून ते एकमेकांशीही बोलत नव्हते म्हणून आमची ऑर्डर त्यांनी घेतली आहे का, कधी येणारे काही विचारायची सोय नव्हती. शेवटी ती धुरा आम्ही चिनूक्स व कार्याध्यक्ष मयूरेश यांच्या समर्थ खांद्यांवर सोपवली आणि आम्ही निश्चिंत झालो. सुरुवातीला नक्की किती कृपावान अवतीर्ण होणार आहेत याची खात्री नसल्याने चिनूक्स ऑर्डर द्यायला बिचकत होता. तो सारखा 'खूप लोक येणार आहेत' असे म्हणत असल्याने मला आणि साजिर्‍याला तो नजीकच्या भविष्यात श्याम मनोहरांचे 'खूप लोक आहेत' वाचणार असल्याची कुणकुण लागली. 'खूप लोक आले तरी आपण सूप प्यायला काय हरकत आहे?' असा रोकडा सवाल करुन मी कार्याध्यक्षांना सूपची ऑर्डर द्यायला लावली. तोपर्यंत सचिन, स्वाती, साजिरा, मी, चिनूक्स, देवा, शरद,मयूरेश, रुमा,अश्विनी,पल्ली, लिंबूटिंबू, ऋयाम यांच्या अंतरसापेक्ष गप्पा सुरु झाल्या. सचिनचे आगमन चिनूक्सने गुलदस्त्यात ठेवून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पण आम्ही मात्र त्याला ओळख परेड करायला लावून त्याच्या मायबोली ज्ञानाचे अनेक धक्कादायक धक्के दिले. सर्वांचे फोटो काढत असतानाच नीरजा व संदीप आले. तिने मला मागून येऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि पातालविजयम मधल्या राक्षसासारखी हॉ हॉ हॉ करुन हसत असतानाच मी तिचा फोटो काढला. खरंतर, तोच जास्त घाबरणेबल आहे असे वाटून तिला तो प्रोफाईलला लावण्याचे फु स मिळाले. रामाने मल्टिस्पाईसलोकी अवतार घेतला. आणि सर्वांना कॅडबरी वाटून दोन मिनिटे शांतता पाळून (ती श्रध्दांजली नसून 'नॉनव्हेज, रंपाविरहित गटगस्थान' यासाठी घेतलेलं मौनव्रत होतं हे नंतर कळाले.) अंतर्धान पावला. या सीतालक्ष्मणाविना रामाला पूर आलेला रस्ता पार करुन पलीकडे हार्वेस्ट क्लबात सोडणारा नाविक मिळाला का याबद्दल खात्रीलायक पुरावे अजून मिळायचेत.
एव्हाना पूनम,मिल्या, मीनू, अतुल, केपी, नेहा आणि मुले (मीनूला आणिनंतर वाचले तरी चालेल.)आले. पौर्णिमा(पूनम), मी आणि मीनू हा बर्म्युडा ट्रँगल बनण्यापासून वाचवता वाचवता पूनम, मी ,नीधप आणि मीनू असा चौकस चौरस तयार झालेला पाहून साजिरा आणि देवा यांचे चेहरे चौकोनी झाले. एव्हाना सूप, मिक्स पकोडे, फ्रेंच फ्राईज, मसाला पापड अशी 'दमदार' कॅलरीड सुरुवात झालेली होती. अश्विनीमामींनी खास आणलेले अत्तर सर्वांच्या हातावर लावून मल्टिस्पाईसचे विश्व सुगंधी करुन दिले. इकडे पूनमने शरद यांची 'सीएस : एक आव्हान' याविषयी मुलाखत घेतली. ती झाल्यावर मी 'सीएस: एक व्यापक क्षेत्र' अशी तिची मुलाखत घेतली. यात तिने सांगितलेली कंपनी व बाहेरील जग यांच्या मधला दुवा म्हणजे कंपनी सेक्रेटरी अशी व्याख्या आम्ही लिहून घेत असतानाच नचिकेतने "आई, सूप कधी येणारे?" विचारताच "थांब हा विचारुन सांगते" असे तत्पर उत्तर देताच, पूनम तिची सीएस ही भूमिका अक्षरशः जगते आहे अशी ग्वाही मी दिली. याबद्दल तिने माझे शक्य तेवढे धन्यवाद मानले आहेत.
तोवर जीएस, मयुरेश चव्हाण, बेफिकीर व त्यांची पत्नी यांनीही हजेरी लावली. येथील वेटर्सच्या ड्रेसवर मागे मसाल्याच्या पदार्थांची नावे लिहीली आहेत, हे मीनूने निदर्शनास आणताच तसेच त्यांचे अर्थही सांगताच तिची सूक्ष्मनिरीक्षणशक्ती पाहून व अन्नं वै प्राणा: ची आठवण येऊन मी तिला 'मिनूक्ष' म्हणायचे ठरवले आहे. सचिनची कार्यालयीन (होतकरु वाले नाही ओ, कामगार वर्गवाले (हे पण पांशायुक्त. पर्यायी शब्द सुचवा)) चौकशी, अश्विनीमामी यांच्या दौर्‍याविषयी विचारपूस झाली. माहीत असलेल्या गोष्टी सांगताच सचिन 'तुला कसे माहीत?' असे विचारायचा व माहित नसलेल्या गोष्टी विचारताच 'तुला माहीत कसे नाही?' असे विचारायचा. याबद्दल त्याला पूनम, स्वाती व मी अशांसमोर (तिघींना वर्णन करु शकणारे विशेषण शोधू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने डायल करा. ) इंटरव्ह्यू द्यावा लागला. तोवर 'गरीबांना अन्नवाटप' सुरु झाले होते. मी अमांना प्रश्न विचारला, की तुम्हाला आम्हाला भेटून कसे वाटले? यावर त्यांनी खूप छान हसून खूप छान असेही सांगितले. मायबोलीवरची प्रतिमा व प्रत्यक्ष भेट यात फरक वाटतो का? असे विचारता त्यांनी 'तुझ्याबद्दल अजिबात नाही' असे सांगताच मी (बाकीच्यांबाबत) पुढचे ऐकू शकले नाही. पण तेवढ्यात सचिनने 'तू आजकाल फार भावनिक लिहीतेस म्हणे' असे आठवून देऊन हसता हसता माझ्या डोळ्यात 'टचकन पाणी आणून' 'रडवलं हो'.
तिकडे अरभाट, नी, मीनू, श्रेयस, चिनूक्स यांची जोरदार बॅटिंग सुरु होती. पांशा असावी बहुधा कारण मीनू आणि नी बेफाम हसत होत्या आणि बाकी सारे 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' आठवत होते. मीनूला किती हाका मारल्या तरी कळेना तेव्हा 'मीनू बोलत असताना तिचे कान बंद असतात' हे माझे वाक्य देवाने विकीपेडियावर 'तुम्हाला माहित आहे का?' या सदरात द्यायचे कबूल केले. एव्हाना 'माहेर' चा अंक सगळीकडे फिरत होता, कौतुक होत होते. पण साजिर्‍याच्या फोटोवरुन झालेली चर्चा पाहून तू माहेरकडून वाढीव खपाचे कमिशन घ्यायला हवेस असे मी त्याला सुचवले. इतक्या दंगामस्तीत केपीचे लक्ष मात्र टीव्हीमधल्या कॉग्निझंटच्या बिल्डींगीकडे असल्याचे कळताच मी आणि पूनमने 'कुठं म्हणून न्यायची सोय नाही' वाला जगप्रसिध्द तुक फेकला.
कॅमेर्‍यावर यथेच्छ ताव मारुन व जेवणावर हास्य, बडबडीचा क्लिकक्लिकाट करुन एकदाचे बिल आले. हुशार कार्याध्यक्षांनी हिशोब करुन पर हेड खर्च सांगताच 'पर हेड म्हणजे पर फॅमिली का? ' असा कठीण कठीण प्रश्न किती अर्थातच मीन्वाज्जींनी विचारला. यावर फॅमिलीला एकच हेड असतो/ते हे सत्य अधोरेखित झाले. उठून बाहेर पडताना, हसता हसता साजिरा शेजारच्या टेबलावरच्या काकांच्या अंगावर पडणार तेवढयात नीरजाने त्याला 'आपली (झालेली, केलेली)माती , आपली (झालेली, केलेली)माणसं इकडे आहेत' असे सांगितले त्याच त्या 'कु म्ह न्या सो ना' वा ज तु क सह! बिल देऊन बाहेर आल्यावर हृद्य हसत एकमेकांचा निरोप समारंभ सुरु झाला. तेव्हा सर्वांचा एक ग्रुप फोटो काढण्यासाठी एकमेकांना ढकलत सावरत सारे गोळा झाले. केपीकाका फोटो काढायला धावल्यावर मी त्यांना 'हे उद्या प्रचि१, प्रचि२ असे टाकू नका ओ' 'फोटो आहिस्ता निकालो के सारे बडे भावुक हुए है' असे निक्षून सांगितले. त्यावरचे बघण्यालायक चेहरे त्यांनी फ्रेमीत बंदिस्त केले आहेतच. आज पारण फिटण्यानिमित्त निमंत्रितांना त्याचे प्रसादवाटप केले जाईल.
थोडक्यात, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे गटग म्हणजे नुसती धमाल. अश्विनीमामी, तुम्हाला भेटून खूप छान वाटले. पुढच्या वर्षी लवकर या.
***
तटी : टेबलाच्या उजव्या बाजूस मी असल्याने साहजिकच डाव्या बाजूचा वृ मला लिहीता आला नाही. ती जबाबदारी ऋयामवर आहे. यात काही डावेउजवे डावपेच नाहीत. वृत्तांत लिहायचा असेल तर जेवणभत्ता मिळेल का? असा नम्र प्रश्न कार्याध्यक्ष व इतर मान्यवरांना विचारुन मी माझे घरंगळणारे शब्द आवरते. काय राहिलंय ते सांगत बसण्यापेक्षा स्वतः लिहा. आधी करावे, मग सांगावे.
Proud Light 1

गुलमोहर: 

आशुडी छानच गं धम्माल आली एकूण वृत्तांत वाचून फोटु टाका ना ..
मामी तुमचे निमित्त साधून सगळ्यांनी धमाल केली...पण माझे यायचे मनात असूनही येऊ शकले नाही (आज नवर्‍याला बोलणी खावी लागणार आहेत...त्याच्यामुळेच मिसंलं मी हे गटग..असो)
समयसे पहले और भाग्यसे अधिक...म्हणतात ना ते हेच!!

मस्त सही वृत्तांत.

फोटो काढताना जीएसने माझा हातात हात घेऊन एक फोटो काढायचा निष्फळ प्रयत्न केला. त्याच्या म्हणण्यानुसार मी गटगकरताच अमेरीकेला चाललो आहे व फावल्या वेळात काम करीन असे वाटते.

सिध्दार्थ व नचि जाम खुष होते. नचि ऋषीकपुरसारख्या स्वेटरमधे हँडसम दिसत होता. अनेक वर्षांनी श्रेयस वल्द राकु यांना पाहुन हर्ष द्विगुणीत झाला. त्याला कुठल्याही मुलीने फचिन, चिनुक्ष व सरांसारखे तुझा नंबर कधी हे विचारले नाही हे दुर्देव. का ते देवालाच ठाऊक असे म्हणणार होतो पण त्या लिस्टीत देवाचाच अनुल्लेख झाला होता.

ऊसगावकर नात्या पण पुण्यात आहे. त्याचा काल नंबर नव्हता पण आज संपर्क झाल्याने तु एक मेगा जीटीजी कसे मिसलेस हे मी त्याला पटवुन दिले.

नुतनीकरणानिमीत्त साजिरा यांच पूर्ण केस असलेला फोटो त्यांनी माहेरातुन आणला होता. आम्हाला उगाच त्यांनी प्लँटेशन केले की काय अशी शंका आली होती. मधेच रामाने चिनुक्षाला पाठवलेला एक खलिता साजिर्‍याच्या मोबाइलवर अवतिर्ण झाल्यावर बहुदा तो हार्वेस्ट क्लबमधे पोचला व अरुणराव त्याला गुपचुप भेटले की काय अशी एक शंका मनात चमकुन गेली व अनेक बुधवारकरांनी चुळबुळ केली.

लिंबुटींबुने मला परदेशी चिल्लर मागण्याचा प्रयत्न मी यशस्वीरीत्या हाणुन पाडला. बालगंधर्वच्या बोधीवृक्षाच्या ढोलीत मिळतील असे बाणेदार उत्तर द्यायला विसरलो नाही. मागे मी देतो असे म्हणले होते पण त्याचा पडद्यामागचा आयडी तेव्हा प्रगट झाला नव्हता. त्याची शिक्षा.

मीनुने माझा व नेहाचा फोटो काढताना कारे नेहासोबत फोटो काढते म्हणुन पळुन चालला होतास ना? असा खडा सवाल केला त्यावर मी आमचा वॉरंटी पिरीएड संपला आहे असे सांगीतले. अतुलच्या चेहेर्‍यावर 'आमचा कधीच संपला असल्याने आम्ही लांबच बसलो आहे व मला शिक्षा म्हणुन लिंब्याशेजारी बसवले आहे' हा मनातला विचार मी शिताफीने वाचुन घेतला.

मामींने लावलेले अत्तर व ऑर्डर दिलेले सूप, मिक्स पकोडे, फ्रेंच फ्राईज, मसाला पापड हे कुठे होते हे शेवटपर्यंत कळले नाही. राम्याने दिलेली चॉकलेट्स मात्र त्या अंधारतही ऋयाम व सरांच्या हातातुन मी शोधुन काढली.

Happy

सर्व एकाच मल्टी स्पाइस मध्ये बसलोय आणि एकाच गटग ला जमलोय असं वाटायला लागलं होतं. एकाच टेबलाचे ३ तट पडले होते. डावा, ऊजवा आणि मध्यवर्ती तट. मध्यवर्ती तटात अधुन मधुन डाव्या उजव्या आघाडीचे लोक्स येत होते, मुळात मिक्स भज्यांची डीश मध्ये आहे त्यामुळे कदाचित त्यामुळे हा फॉर अ चेंज बदल झाला असावा असे वाटले. (अर्थातच मला) बरेचदा बरेच लोक्स अदृश्य आहेत असेच काही जण वावरत होते... पूनम खास करुन 'फक्त' रुयामशी बोलायला आली, तेव्हा रुयाम 'हे राम' आय डी घेइल की काय असा चेहरा करुन हसत होता. मिल्या छत्रे कितीही जोक्स मारत होते तरी मला त्यांच्या गजलांवरच्या प्रभुत्वाचीच इतकी आठवण होत होती की मी आत्यंतीक आदराने पहात होते आणि काय जोक झाला तेच न समजल्याने अ‍ॅज युज्वल 'यप्पड' चेहरा करुन बसले होते. असो, पण हळुहळु मैफिलीला जो काही रंग चढलाय की यंव रे यंव.
रुमा आणि मी सतत आपली चिंटुकली पिंटुकली कुठे आहेत ह्याचेच अधिक अवलोकन करत होतो.
मी आणि लिंबू बराच वेळ अत्यंत गंभीर प्रश्नांवर चर्चा करुन मग 'अरेच्या, आपण तर गटग ला अलोय न' ह्याची आठवण येउन अचानक माणसात आलो. दीड तास जीएस शी बोललेली असुनही हा कोण ? असा ज्वलंत प्रश्न मी रुमाला विचारला. आणि कर्म धर्म संयोगाने त्याच वेळी तोच प्रश्न जीएस ने मयुरेश ला विचारला असे मला कळाले. 'उफ्फ! काय हा योगायोग!'
डाव्या भागात कोण येउन बसलं, कोण निघुन गेलं काहीच कळाल नाही. उलगडा व्हायच्या आत ती व्यक्ती निघुन गेलेली होती :(. उजव्या भागात काय चर्चा चालुय त्याचा आम्हा पामर मायबोलीकरांना उलगडा होत नव्हता. काय हे कमनशिबी आम्ही! बरेचदा गटग आशुडी, पूनम, मिनु ह्यांचेच आहे आणि आपण पाहुणे म्हणुन आलोय असंही वाटलं. मग जेव्हा नी आली, आणखी इतर आले. तेव्हा रंग चढायला लागला (अर्थातच माझ्या चेहर्‍यावर). समोर अरभाट आणि जीएस जेवायला बसले होते. जमेल तेवढे अरभाटला पिडले आणि चक्क तो पिडला गेला. त्याच्या शेजारी बसलेल्या चिनूक्स च्या चेहर्‍यावर थंडीतले वेगळेच तेज होते. ज्ञानी माणसा, ह्याचे काय रहस्य आहे ते कृपया कळवणे. साजिर्‍या जाण-कार वगैरे वगैरे बरीच सामान्य ज्ञानात भर घालणारी माहिती मिळाली आणि पुढच्या गटगला येण्याची हिम्मतही.
गोडसर आलेल्या भाजीला 'ती खिर दे रे' म्हणणार्‍या जीएस ला तितक्याच आत्मियतेने ती खिर-भाजी वाढणारा अरभाट पाहून मन भरुन आले. मध्यवर्ती भागात अत्यंत सस्मित, प्रसन्न बसलेली एकमेव व्यक्ती म्हणजे नीरजाचे अहो. सुरुवातीपासून अखेर पर्यंत परफेक्ट स्माइल पोझ मेंटेन केली होती त्यांनी.
मिनु, नी ह्यांच्या बहुगुणी गप्पा आय मीन अरभाट ला करण्यात आलेल्या प्रश्नांच्या संस्करणाने मला म्हणजे पल्लीला किल्ली बसली (नी च्या भाषेत). आणि मग मीही एक दोन अप प्रश्न विचारुन लाज आणवली, अर्थातच समोरच्यांना Proud आयडींच्या संदर्भात चूक झाली असल्यास क्षमस्व. पण मज्जा महत्वाची. बाकी आयडीत काय आहे!

खुसखुशीत वृत्तांत..... Happy

जमलेल्या इतरांनी आपआपले वृत्तांत जोडा बरं .. Happy

वा.. भारी वृत्तांत...
आशू.. चिन्मयने उत्तर दिलं होतं की.. मला डायरेक्ट दिलं नसलं तरी केपीला दिलेलं.. बाफ वाचून ये.. Happy

कंपनी सेक्रेटरी संदर्भातली मौलिक चर्चा मी मिसली... अरेरे!
नंतरच्या शेपूट गटगचा(कावा मधल्या) वृत्तान्त लिहायचा नाहीये ना रे देवा, क्सा, सर, श्रेयस, ऋयाम, जीएस??

मी न शशांक(प्रतापवार) हाटेलात पोहचलो तेव्हा कळेनाच नक्की ही मंडळी कुठेयत अन् नेमका गटग कुठेय?(अर्थात पहीला गटग असल्याने)
इतक्यात चिनुक्स यांनी थोडी ओळखीची थोडी अनोळखी नजर दिल्याने वाटले हेच ते तथाकथीत माबोकर! तसे संपुर्ण हाटेलात इतरांहुन वेगळे असल्याची यांनी जाणीव करुन दिली असल्याने तेवढा फरक कळणे शक्य होते म्हणा!
पुढे होऊन आपणहून चिनुक्स आले न स्वतःची ओळख देऊन काही क्षण शांतच. पण आपणच या कार्यक्रमाचे सुत्रधार वगैरे असल्याची जाणीव होताच त्यांनी ओळख परेड सुरु केली न मला अन् शशाला जरा हायसे वाटले.
सुरूवातीलाच मामींची ओळख करून दिली तेव्हा मामींनी "तुमचा पत्ता लिहा तुम्हास अत्तर पाठवणार आहे घरपोच" असे सांगीतले.
इतक्यात नीधप यांना मीच आपणहून विचारले आपण नीधप ना.. मी मयुरेश वै.
मग एकेकांची ओळख झाली. ऋयाम, साजीरा, कांपो, मिल्या वै. त्यानंतर मीच पुन्हा इतरांस विचारून लिंबुटिंबू कोण हे विचारले व त्यांना जाऊन भेटलो; पण शशांक व लिंबु यांचे गूरु एक असल्याने त्यांच्या चर्चेत मुक साक्षिदार होण्यापलीकडे फार काही जमले नाही.
त्यानंतर आरभाट यांच आगमन व त्यांच्याशी विंग्रजी संगीतातल्या ब्रँन्ड पासून मराठी साहित्य विश्वापर्यंत अनेक गप्पा मारून किमान अर्धा-पाऊण तासात तिथून कलटी मारली.
जाताना नीधप यांनी आवर्जून संदीप सांवत यांची ओळख करून दिली.. नी, खरंच आभार!
एकंदरीत पुणे गटग झक्कास!

लय भारी वृत्तांत एकेक.

रैना, लाजले होऽ सर.
जंगल मे मोर नाचा.. मैने देखा :p

> जाताना नीधप यांनी आवर्जून संदीप सांवत यांची ओळख करून दिली..
हे लै भारी. बघितलं मीही Happy

Pages