हरिश्चंद्रगड आणि ३१ डिसेंबरची 'ती' रात्र ... !

Submitted by सेनापती... on 24 December, 2010 - 18:10

३१ डिसेंबर जवळ यायला लागला की प्रत्येक जण आपले प्लान ठरवायला लागतो. कुठे जायचे, काय करायचे वगैरे. डोंगरी आणि भटके सुद्धा शहरी गजबजाटापासून दूर शांत अश्या निसर्गाच्या सानिध्यात एखादा गड-किल्ला बघून आपले ट्रेक प्लान तयार करतात. पण सध्या इतके ट्रेक ग्रुप झालेत की विचारायला नको. मुळात त्यातील प्रत्येकजण ट्रेकर किंवा हायकर श्रेणीत येतो का हा देखील प्रश्नच असतो... हौशी मौजी कलाकारांची आपल्याकडे काही कमी नाही.. अश्याच काही हौशी लोकांबाबतचा एक डोंगरातला अनुभव मी आज तुमच्या सोबत वाटणार आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट.. वर्ष नक्की लक्ष्यात येत नाहीये. पण बहुदा २००३.. . ३१ डिसेंबरला कुठे जायचे म्हणून आम्ही सर्वजण एखादा गड-किल्ला विचारात घेत होतो. शिवाय आम्ही मोजून ४-५ जण जायला तयार. अखेर हो-नाही करता करता हरिश्चंद्रगड नक्की झाला. ३० तारखेला ठाण्याहून रात्रीच्या शेवटच्या नारायणपूर एस.टी.ने खुबी फाट्याला पहाटे ३ वाजता पोचायचे आणि उजाडता-उजाडता खिरेश्वर गाठत ट्रेक सुरू करायचा. ३१ ची रात्र गडावर. १ तारखेला संध्याकाळपर्यंत घरी परत. असा साधा सोपा प्लान. पण २ दिवस आधी बाकीचे भिडू रद्द झाले आणि उरलो फक्त मी आणि शमिका. जायचे की नाही काहीच ठरत नव्हते. आम्ही दोघेच असे कधी ट्रेकला गेलो नव्हतो. एखाद्या रिसोर्ट किंवा हॉटेलवर जाणे ह्यापेक्षा ट्रेकला जाणे ह्यात खूपच फरक पडतो त्यामुळे काही निर्णय होईना. अखेर हो नाही करत करत 'आपण जाउया ना..' असे शमीने सांगितल्याने मी तयार झालो. थोडे खायचे सामान घेतले आणि दोघांमिळून एकच सॅक पॅक केली.

३० तारखेला रात्री ठाण्याचा वंदना एस.टी. स्टॅंड गाठला. परेलवरून निघणारी नारायणपूर गाडी रात्री बरोबर ११:३० वाजता इथे पकडता येते. हीच गाडी कल्याणला रात्री १२ वाजता सुद्धा मिळते. आम्हा दोघांनाही बऱ्यापैकी मागे बसायला जागा मिळाली. मुरबाड - माळशेज मार्गे पहाटे २:३० वाजता एस.ते. खुबीला पोचली देखील. रस्त्याला एक रिकामी दुकान होते त्यात जाऊन बसलो. शेवजी एक टपरी सुरू होती. तिथे काही लोक उभे-बसलेले होते. तिथून चहा आणला आणि आम्ही गप्पा मारत बसलो.

मी घरून निघतानाच कमरेच्या पाऊचमध्ये एक सुरा ठेवला होता. शिवाय एक कुकरी सॅकमध्ये वरती होतीच. पहाट होत आली तसे आम्ही खिरेश्वरच्या दिशेने निघालो. धरणाच्या भिंतीवरून तास-दीड तास चाल मारल्यानंतर खिरेश्वर गावात पोचलो. पहिल्यांदा इथे आलो होतो तेंव्हा फार काही नव्हते इथे पण आता १-२ हॉटेल सुरू झाली आहेत. आता तर रस्ता देखील डांबरी झाला आहे. धरणाच्या भिंतीवरून चालायच्या ऐवजी तुम्ही गाडीने येऊ शकता. इथे एक बोर्ड लिहिलेला होता. बिबट्यापासून सावधान.. शक्यतो एकटे जंगलात जाऊ नका. पहाटे लवकर आणि रात्री उशिराने जंगलात जाणे टाळा. अश्या सूचना वन विभागाने लिहिलेल्या होत्या. माझा एक हात नकळत कमरेवरच्या चाकुवर गेला. हातात अजून काहीतरी असावे म्हणून एक जाडजूड काठी घेतली. शमी पुढे आणि मी मागे असे चालू लागलो. मी शमीला जरी काही बोललो नसलो तरी तिला अंदाज आला होता. मी तिला डोळ्यानेच खूण करून 'चल. काळजी नको करूस' असे सांगितले. आम्ही आता गावाच्या बाहेरूनच हरीश्चंद्रगडकडे जायची वाट पकडली. डावीकडे दिसणारे नेढे आणि समोर दिसणारा डोंगर ह्याच्या बरोबर मधल्या खिंडीमधून वर चढत गेले की तोलारखिंड लागते. साधारण ३०-४० मिनिटात इथे पोचलो. वाट रुंद आणि मोकळी आहे. आजूबाजूला झाडी असली तरी तितकासा धोका वाटत नाही. पाउण तासाने आम्ही खिंडीखाली पोचलो. या ठिकाणी वाघजाईचे एक छोटेसे मंदिर आहे. समोरची वाट जाते 'कोथळे'मार्गे 'कोतूळ'कडे. आपण मात्र डावीकडे वळून वर चढत खिंडीच्या वर पोचायचे. हा प्रस्तर टप्पा तसा फारसा अवघड नाही.५-७ मिनिटात तो पार करून आपण वरच्या धारेवर लागतो.

आता पुढची चाल मात्र बरीच कंटाळवाणी आहे. तोलारखिंडीपासून हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत चांगला ५-६ किमी. रस्ता तुडवावा लागतो. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात. त्या पार करत मुख्य वाट न सोडता छोट्या-छोट्या टेकड्या पार करून मंदिर गाठायचे. वाट संपता संपत नाही. अक्षरश: अंत पाहते. तुम्ही कधी गेलात तर ह्या वाटेवर दुपार टाळा. घसा सुकून जीव जाईल पण वाट संपणार नाही. एकदाचे मंदिरापाशी पोचलो. देवळासमोर हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. पहिल्यांदा आम्ही सर्वजण आलो होतो तेंव्हा दुसऱ्या लेण्यात राहिलो होतो. त्या शेजारच्या म्हणजे तिसऱ्या लेण्यात प्रवेश करतानाच चांगली २ मीटर उंचीची एक कोरीव गणेशमूर्ती आहे. त्यामुळे त्याला 'गणेशगुहा' असे ही म्हणतात. आम्ही ह्यावेळी इतके राहायचा निर्णय घेतला. गुहा १ आणि २ आधीच भरलेल्या होत्या. आणि तिथून येणारा गोंगाट बघता किती हौशी लोक आत भरलेत ह्याचा मला अंदाज आला. साधारण १० वाजत आले होते. मी गुहा थोडी साफ करून घेतली. बहुदा रात्री इथे एखादे गाय-बैल येत असावे असा मला अंदाज आला होता. नंतर आम्ही सोबत आणलेला नाश्ता करून घेतला आणि गड्फेरीला निघालो. मंदिर, पुष्करणी, केदारेश्वर लेणे आणि आसपासचा परिसर बघून आम्ही बाळूकडे जेवायला गेलो. पिठलं-भाकरी आणि सोबत कांदा-चटणी असा मस्त मेनू होता. त्याच्याकडून कळले की पहिल्या गुहेत कोणी विहिंपचे लोक आहेत. पण त्यांचे वागणे ठीक नाही. 'तुम्ही एकटे आणि त्यात बाई माणूस आणायला नाही पाहिजे होते' बाळूने त्याचे प्रांजळ मत व्यक्त केले. मी काही बोललो नाही. त्याला रात्रीचे जेवण बनवायला सांगितले आणि आम्ही कोकण कड्याच्या दिशेने निघालो. दुपार टाळून गेली होती. सूर्यास्त बघावा तर तो कड्यावरूनच.. अ..प्र..ती..म.. असे ह्या जगात जे काही आहे त्यात कोकणकड्याच्या सुर्यास्ताचा बराच वरचा क्रमांक लागेल.

अंधार पडता पडता पुन्हा गुहेकडे परतलो. पूर्ण वेळ माझ्याबरोबर कुकरी आणि ती लठ्ठ काठी होतीच. परत आलो तेंव्हा कळले की त्या विहिंपच्या लोकांनी दंगा-मस्ती केली आणि वरती बाळूला मारहाण सुद्धा केली. (मला ही नाही वाटत की ती विहींपची होती. दादागिरी करायची म्हणून त्यांनी तशी बतावणी केलेली असणार.) तो गड सोडून कुठेतरी खाली निघून गेला होता. आम्ही गुहेत येऊन गप्पा मारत बसलो. शेजारच्या गुहेतून दंग-मस्तीचे खूपच आवाज येत होते. आम्ही दोघे ३१ डिसेंबर साजरी करायला आलो होतो पण मनासारख्या गप्पा मारत नव्हतो. एक दडपण सतत मनावर येत होते. मला सारखी शामिकाची चिंता लागून राहिली होती. आणि तिला ही ते समजले होते. रात्रीच्या जेवणाची आधीच वाट लागलेली होती. बाळूच नव्हता तर जेवण कुठले??? आम्ही सोबत असलेले थोडे खाल्ले आणि पुन्हा गप्पा मारत पडलो. रात्री १० च्या सुमारास अचानक मोठ्याने आवाज येऊ लागला. खूप लोक होते वाटते.'काढा रे यांना बाहेर. गडावर येऊन दारू पितात. दंगा करतात. झोडून काढा. ह्या थंडीत चामडी सोलटवून काढा.' मी उठून बाहेर जाऊन बघणार इतक्यात शमिने मला थांबवले. 'जाऊ नकोस जरा थांब. आधी बघुया काय होतंय'. २-३ मिनिटात गुहेच्या बाहेरून आवाज आला. इथे आत कोण आहे. मी आतून ओ दिला. बाहेरचा आवाज मला विचारात होता. 'तुमच्याकडे दारू, मांस-मच्छी असे काही असेल तर बाहेर या.' मी नाही म्हणून बाहेर आलो. तो संघ कार्यकर्ता होता. त्याने आम्हाला सांगितले की 'ह्या लोकांना आता देवळाच्या इथे सामुहिक शिक्षा करणार आहोत आम्ही तेंव्हा तुम्ही पण बाहेर या. तुमच्या सोबत तुमच्या सौ आहेत हे मला बाळूने सांगितलेले आहे. त्यांना काही भीती ठेवायचे कारण नाही. उलट इथे त्या एकट्या नकोत म्हणून सोबत घ्या' असे बोलून तो निघून गेला. जाणे तर भाग होते. मी पुन्हा कुकरी आणि काठी उचलली आणि शमी बरोबर बाहेर पडलो. तिने माझा हात गच्च पकडला होता आणि मी कुकरीवरचा. पुढच्या क्षणाला काय होईल ह्याबाबत माझ्या मनात विचित्र विचारचक्र सुरू झाल्याने मी काहीही करायच्या तयारीत होतो. देवळासमोर बाळूच्या पदवी शेजारी जाऊन पोचलो. बघतो तर १०० हून अधिक लोकांचा जमाव होता. त्या अख्या लोकांत शमी एकटीच महिला. बाकी सर्व पुरुष. आम्ही एका बाजूला जाऊन बसलो. खूप थंडी होती. बहुदा ९-१० डिग्री असेल. समोर बघतो तर संघाचा कोणी प्रमुख उभा होता आणि त्याने ह्या १०-१२ लोकांना त्या थंडीत फक्त अर्ध्या चड्डीवर बसवले होते. आधीच १०-१२ बसलेल्या आहेत असे सर्वांचे चेहरे झालेले होते.

तो संघ कार्यकर्ता त्या १०-१२ लोकांना बोलू लागला. "आम्ही तुम्हाला मारणार नाही आहोत. तुम्हीच प्रत्येकाने तुमच्या बाकी मित्रांना मारायचे आहे. प्रत्येकाने बाकीच्या ११ जणांना मारायचे. पण असे मारायचे की ते तुम्हाला आयुष्भर लक्ष्यात राहील आणि अशी चूक तुम्ही पुन्हा करणार नाही. मारले की त्याचा आवाज घुमला पहिले आणि ज्याला मारले त्याला असे लागले पहिले की त्याचा आवाज पण घुमला पहिले... नाही घुमला तर मग आम्ही मारायला सुरवात करू."

मग सुरू झाला तो मारामारीचा कार्यक्रम. प्रत्येकजण आपल्या बाकीच्या मित्रांना केलेल्या चुकीची शिक्षा देऊ लागला. इतक्या जोरात की त्याचे आवाज गुहेमधून प्रतिध्वनित व्हावेत. मारण्याचे आवाज आणि त्यांच्या विव्हळण्याचे आवाज ह्याने तो गड भरून गेला होता. मला ते असे मारणे थोडे विचित्र वाटत होते. पण बरोबरही वाटत होते. मी मात्र वेगळ्या चिंतेत होतो. अर्ध्यातासाने तो स्व-मारामारीचा कार्यक्रम संपला. आता काय!!! त्या लोकांना गडावर राहायची परवानगी नव्हती. तशाच अर्ध्या चड्डीमध्ये त्या संघवाल्यांनी त्यांना पाचनईच्या दिशेने पिटाळले. कपडे, सामान सर्व मागे गडावरच.

नमस्कार चौधरी. मी शिशिर जाधव. संघ कार्यकर्ता. इथला विभाग प्रमुख आहे. तुम्ही आता तुमच्या राहत्या गुहेत जाऊ शकता. सहकार्याबदल धन्यवाद. तो आवाज बोलत होता. अंधारात आता थोडे दिसायला लागले होते. मी फार न बोलता त्याचा निरोप घेतला आणि पुन्हा गुहेत येऊन बसलो. सर्व काही सुरळीत पार पडल्याचा निश्वास सोडला. १२ वाजून गेले होते. कसले सेलेब्रेशन.. आम्ही गुपचूप झोपून गेलो. अचानक..........

काही मिनिटातच गुहेच्या तोंडाशी कसलीशी हालचाल जाणवायला लागली. एका हाताने मी उशाशी असलेली टोर्च आणि डाव्या हाताने ती कुकरी पुन्हा हाताशी धरली. आवाजसा येत होता पण काही दिसत नव्हते. मी जरा बाहेर जाऊन बघू लागलो. बघतो तर काय.. एक भली मोठी आकृती माझ्याकडे टक लावून बघतेय. मी मात्र त्याला पाहून पुन्हा निश्चिंत झालो. एक बैल गुहेमध्ये निवाऱ्याला आला होता. सकाळीच त्याची गुहा मी स्वच्छ केली होती ना!!! बैल मात्र मूर्ती शेजारी गुहेच्या दाराशीच बसला. आता तो दाराशी असताना अजून कोणी आत शिरणे शक्य नव्हते. मी पण निवांतपणे झोपू शकत होतो आता. इतका वेळ येणारे सर्व विचार झटकून आम्ही दोघेपण गुडूप झालो.

१ जानेवारीला सकाळी पुन्हा बळूकडे नाश्ता केला. रात्री झाल्या प्रकाराबद्दल तो आमची माफी मागत होता. आम्हाला उगाच संकोचल्यासारखे झाले. असू दे रे. होते. मी बोलून गेलो. शमी मात्र काही बोलली नाही. नाश्ता करून आम्ही गड सोडला. तोलारखिंडीमार्गे पुन्हा घरी परतण्यासाठी...

पण ३१ डिसेंबरचा हा अनुभव मी तरी कधी विसरू शकणार नाही... त्यानंतर मी आणि शमिका असे फक्त दोघे कधीच ट्रेकला गेलो नाही. पुन्हा तिला अश्या विचित्र परिस्थिती मध्ये टाकायला मी काय वेडा होतो!!!
.
.
नोंद : गडावर असलेल्या त्या १०-१२ लोकांनी आम्ही विहिंपचे आहोत अशी बतावणी केली होती की ते खरच विहिंपचे होते ते ठावूक नाही. हा फक्त एक अनुभव आहे. ह्यातून कोणाचाही / कुठल्याही संस्थेचा अपमान करण्याचा उद्देश नाही. जे घडले ते मांडलेले आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला भारीच केले संघाच्या कार्यकर्त्यांनी...
या लोकांना अशीच जरब बसवली पाहिजे....किल्ले म्हणजे पिकनिक आणि दारू पिण्याचा अड्डा बनवून टाकला आहे...
आणि एकट्या-दुकट्या ट्रेकर्सना ऐकत नाहीत अजिबात...
माझी अनेक जणांबरोबर भांडणे झाली आहेत...

बाप्रे! कसली भिती वाटली असेल ना.
ती शिक्षा मात्र जबरी आवडली ! डोळ्यांसमोर आलं, सगळे एकमेकांना 'आवाज घुमेपर्यंत' मारतायेत. Lol
असंच करायला पाहिजे.

बापरे! किती विचित्र अनुभव! सर्व चित्र डोळ्यास्मोर उभं रहिले. पण ती शिक्षा मात्र आवडलि बरं का!

काय जबरदस्त अनुभव आहे रे ! त्या बाळूनेच खाली जाऊन तक्रार केली असाणार. बाकी विहिपचे लोक असले काही प्रकार करतील असे वाटत नाही.

शिक्षा आवडली. मला एकदा कधीतरी पावसाळ्यात रविवारी माळशेज घाटात जाऊन तिथे धबधब्यात दारू पिउन दंगा करणार्‍या आणि रस्त्यावरून जाणारी वहाने अडवून त्यातील महिलांची खुशाल छेड काढणार्‍यांना तिथे जाऊन चोप द्यायची इच्छा आहे Happy

फारच थरारक अनुभव होता तुमचा, खरच वाचून किंचीतशी भीती कुठेतरी मनाला वाटून गेली.
कुठे तरी हे थांबायला हवे. आपण पाहतोच की कित्येक किल्याण वर असे प्रकार घडत असतात.
याला कुठेतरी आळा बसायला हवा. आणि साफ सुंदर अशी भटकंती अनुभवायला मिळावी बस आणखी काय हवे...

बापरे!!! काय भयानक अनुभव आहे. नशीब तो बाळु तुमच्या ओळखीचा होता.

असाच एक अनुभव आम्हाला आला होता. मी तेंव्हा ८वीत होते. म्हणजे अगदी वयात येणारी. मी, आई आणि बाबा पन्हाळ्याला गेलो होतो. २९ डीसेंबर ते १ जानेवारी रहाणार होतो. एम.टी.डी.सी मध्ये एक कॉटेज बुक केलं होत. माझ्या वडीलांचा ३१ ला वाढदिवस असायचा. २९ -३० ला पन्हाळा आणि इतर अजुबाजुला फिरलो. मजा केली. ३१ ला कोल्हापुरचा एक ग्रुप शेजारच्या कॉटेज ला रहायला आला. त्यांचा दंगा वाढु लागला. येवढ्या थंडीत ते फक्त अंडरवेयर वर बाहेर बसुन दारु पित होते. नीदान १०-१५ जण होते. त्यांचे नाच आणि गाणी चालु होती. त्यांचा एकंदर अवतार आणि भाषा बघुन ते एकदम वाया गेलेली मंडळी वाटत होती. वाढदिवस वगैरे बाजुलाच राहीला. बाबा खुप घाबरले. मी वयात येत असलेली, आई पण ३५-३६ वर्षांची, म्हणजे तरुणच. आम्ही त्यांन्ना दिसु नये म्हणुन जेवायलाही बाहेर पडलो नाही. तिथले सगळे नोकर गायब... भयाण वातावरण. बाबा जागेच होते. आम्ही दोघी जेवुन गुपचुप झोपुन गेलो. रात्री एक दीड च्या सुमारास दारावर धडका मारायला लागले. बाबा खुपच घाबरले. त्या लोकांच्या बोलण्या वरुन त्यांच्या कडचं खायला संपलं होतं. इकडे कोणी रहतं का ते बघायला ते आमच्या कॉटेज कडे आले होते. आम्ही चीडीचुप राहिलो. बाबा बिचारे पहाटे पहाटे झोपले. सकाळी आम्ही जेंव्हा कॉटेज सोडले, तेंव्हा ते लोक डोळे फाड फाडुन आमच्या कडे पहात होते. त्या नंतर मात्र ३१ ला कुठेही बाहेर जायचे नाही हा निश्चय केला. त्या वेळची बाबांची हालत मला आठवते. त्या घटनेला आज २५-२६ वर्ष होवुन गेली. पण अजुनही ती रात्र लख्ख आठवते.

अश्या लोकांन्ना बडवुन काढले पाहीजे. तुम्ही तुमची मजा करा ना. ईतरांन्ना त्रास कशाला.

तिथे जाऊन चोप द्यायची इच्छा आहे >> चला तर अस्सा एक ग्रुप बनवायला हरकत नाही

+ १००% अनुमोदन

माझे नाव लिस्ट्मधे जरुर ठेवा.

मोहन की मीरा... भयंकर प्रसंग. अश्या वेळी स्वतःहून काही करण्याऐवजी शांत बसून पुढच्या प्रसंगासाठी तयार राहणे कधीही योग्य... तुमच्या वडिलांच्या मनात किती दडपण असेल हे मी समजू शकतो.

हरिश्चंद्रगडवर असाच किस्सा झाला तेव्हा माझ्या शाळेतील मित्र तिथे हजर होते. अर्ध्या रात्री त्याना हाकलले होते.

सेनापती, अतिशय धीराने तुम्ही प्रसंगाला सामोरे गेलात.. तुम्ही सहीसलामत या संकटातून बाहेर पडलात हे महत्वाचे..

सोबत महिला असोत - नसोत एकट्या - दुकट्याने रात्री अपरात्री ट्रेक करूच नये.

आणि हे १०० लोक आणि त्यांचा कार्यक्रम..... गड - किल्ल्यांवर दारू पिऊन धांगड धिंगा करून किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करून नयेच पण त्याच सोबत 'या' मंडळींना त्यांना या असल्या शिक्षा करण्याचा अधिकार कोणी दिला ??? त्या लोकांना योग्य शब्दांत समाज द्या ना, गडाखाली किंवा वाटेत पोलिसांसोबत उभे राहून त्यांच्या सामानाची तपासणी करा ... पण इतिहास रक्षणाच्या नावाखाली शिवरायांचे नाव घेऊन त्यांना मारहाण करणे, त्यांचे कपडे उतरवणे हे देखील तेवढेच निंदनीय - निशेधास्पद आहे, हि निव्वळ गुंडगिरी आहे. आता डिसेंबर मध्ये रात्रीच्या वेळी हरीशचंद्रावर कशी थंडी असते हे जाणकार वाचकांना वेगळे सांगायला नकोच त्यात त्यांना यांनी अर्ध्या कपड्यात हाकलून लावले.. आता हि मंडळी नशेत असतील आणि तशा अवस्थेत गड उतरताना त्यांना काही अपघात झाला एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण ???

हि २००३ मधली गोष्ट आहे पण त्या नंतर या स्वघोषित 'इतिहास रक्षकांचा' / संस्कृती रक्षकांचा' उच्छाद खुपच वाढला आहे.. कधी नव्हे ती 'अधिकृत गुंडगिरी' करायला मिळत असल्याने शहरात एरवी इकडे - तिकडे उंडारत टगेगिरी करणारी टोळकी 'शिवाजी महाराज कि जय म्हणत ३१ डिसेंबर ला गड - किल्ल्यांवर जाऊन लोकांना मारहाण करत आहेत. (सगळेच नसतील पण बहुसंख्य याच गटातील असतात)

खरच जर कळकळ असेल तर या विषयी जन जागृती करा, समुपदेशन करा...

आणि गडावर मांस - मच्छी खायची नाही हा नियम कोणी काढला ??? यांच्या सगळ्या देव्यांना सणासुदीच्या कोंबड्या आणि बकरेच लागतात आणि मग ट्रेकर्स च्या मांस - मच्छी ने यांच्या मंदिरांचे आणि गडाचे पावित्र्य कसे नष्ट होते ???

उलट ट्रेक वर भाजी - पनीर असे प्रदार्थांपेक्षा अंडी - चिकन बनवणे जास्त सोईस्कर असते...

उद्या यांच्या मनात आले तर "गड - किल्ल्यांवर मुलींना आणि महिलांना येण्यास बंदी" असाही फतवा काढतील.

त्यामुळे सुजाण ट्रेकर मंडळींनी दारुड्या आणि दंगा मस्ती करणाऱ्या पब्लिक सोबत या गुंडांचा हि निषेध आणी विरोध करावा.