वपु- भाग १

Submitted by रुणुझुणू on 24 December, 2010 - 09:57

VapuKale photo.jpg

" ज्या मनाला आपण हळवं समजतो, ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते....आणि दुरावलेली व्यक्ती ! सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला काहीच सुचू देत नाही. कोणताही उपदेश उपदंशासारखा वाटतो. भक्तीरस सक्तीसारखा वाटतो. ' बेदम कामात स्वतःला गुंतवून घ्या ' हे सांगणं म्हणजे ' गाडीतलं पेट्रोल संपलंय, हे कुणाला सांगू नका, तसंच प्रवास करा ' असं म्हणण्यासारखं आहे !"
---वपु.

“एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.”
---वपु.

आजवर कित्येक प्रसंगांमध्ये वपुंची वाक्यं आपोआप आठवली आहेत आणि अशा प्रत्येक वेळी मनावर फुंकर घालून गेली आहेत !
वपु आवडणारे लोक जसे अगणित आहेत, तसेच वपु न आवडणारेही काही आहेत.
" अरे, जरा वेगळ्या विषयावर पण लिही. तोच तोच विषय लिहिला की माणसाचा वपु होतो. "
असंही एक वाक्य मागे कानावर आलं होतं. वपुंच्या लिखाणाच्या कक्षा फक्त मध्यमवर्गीयांपुरत्याच मर्यादित राहिल्या, त्यांनी बाकीचे विषय हाताळले नाहीत, असे शेरेही ऐकू येतात.
पण मला काय वाटतं सांगू ?
वपुंनी आयुष्यभर ' माणसा-माणसांतील संवाद ' ह्या विषयावर अमाप लिहिलं. त्यांनी लिहिलेला प्रत्येक प्रसंग अनेकांना आपल्याच बाबतीत घडतोय, इतका जवळचा वाटला. प्रत्येक वाक्य मनात घर करून राहिलं
पण तरीही 'संवाद' अडकण्याचा प्रश्न उरलाच आहे ! आयतं उत्तर समोर आहे, तरी प्रश्न सोडवता येत नाही अशी अवस्था झाली आहे. एवढा मोठ्ठा विषय आहे हा !.....
मी वपुंची भक्त ! माझी स्वतः ची काही नाती, काही मैत्र संवाद अडकल्यामुळे जागच्या जागी गोठून राहिलेत. पुन्हा वाहते व्हावेत अशी इच्छा खूप आहे, पण त्या भिंती पाडायच्या कशा?
आहे का अशी एकतरी व्यक्ती जिने संवाद थांबायचा अनुभव नाही घेतला ? परिघावरच्या सगळ्यांशीच वाहते संवाद असणारी व्यक्ती माझ्यातरी पाहण्यात नाही.
वपुंच्या लिखाणामुळे माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट होते. ' हे असं वाटणारे किंवा अनुभवणारे आपण एकटेच नाहीत, ' ही भावना फार मोठ्ठा दिलासा देऊन जाते !

वपुंना भेटण्याचं माझं स्वप्न कॉलेजात असताना अचानक पुरं झालं. ज्याकाळात त्यांची पुस्तकं झपाटल्यासारखी वाचत होते, ज्याकाळात मनाच्या संवेदना अजून नवथर होत्या.....त्या काळात वपुंची भेट ! आयुष्याने मला दिलेल्या काही अनमोल नजराण्यांपैकी हा एक !
३ भागांची ही लेखमालिका म्हणजे खरंतर पुन्हा एकदा माझ्या जुन्या डायरीतली पानंच आहेत...
कारण आता नव्याने लिहिलं तर ते कोवळं वेडेपण, ती एक्साइटमेंट जशीच्या तशी उतरणं शक्यच नाही !
वपुंच्या सहवासातला आनंद, आणि.......शेवटी आयुष्यभरासाठी मनाला लागलेला चटका....सगळं जसंच्या तसं इथे ठेवतेय !

vapu.jpg

दोन्ही फोटो जालावरून साभार.
*************************************************************************************************
१९/१०/२०००

"मनोहर, निसर्ग पाहायचाय ? बघ ह्या फुलांकडे."
हो, हेच वपु. स्वागतालाच ही हळव्या फुलांची रांगोळी !
विश्वासच बसत नव्हता.इतके दिवस ज्या व्यक्तीच्या लिखाणाने भारावून गेले, ज्यांच्या जगण्याला मानाचा मुजरा देत आले तेच...तेच वपु आज प्रत्यक्षात समोर होते.
त्यांच्या पुस्तकातून डोकावणारं त्यांचं उमदं, प्रसन्न, खेळकर आणि तरीही सखोल व्यक्तिमत्व प्रत्यक्षात साकार होत होतं.
'पार्टनर' पुस्तकाच्या पहिल्या पानावर वपुंचा फोन नं दिलेला. होस्टेलच्या कॉईन बॉक्सवरनं सकाळी सहजच नंबर फिरवला. अगदी सहज. वाटलंच नव्हतं, वपु ह्या नंबरवर भेटतील म्हणून.
" वपु काळे बोलताय का ? तुम्हाला भेटायचंय."
"ये."
"कधी येऊ ?"
"आज."
"किती वाजता वपु ?"
"संध्याकाळी ५:३०."
बस्स्....अपॉईंटमेण्ट, तीही इतक्या दिग्गजाशी इतकी सोप्पी असू शकते ?
नक्की काय घडणारे ,ह्याचा अंदाज येत नव्हता. पण मी आणि सई अक्षरशः उडत होतो.संध्याकाळी बांद्रा. ५:३० चे ६:३० झाले. वाईट वाटलं,वेळ पाळता आली नाही म्हणून.
फोन केला," वपु, जरा उशीर होतोय."
"या, मी वाट पाहतोय."
दिवाळीची शुभेच्छापत्रं आणि गुलाबाची फुलं घेऊन साहित्यसहवास मध्ये गेलो.
'झपूर्झा' फ्लॅट नं. -११.
दारावर पितळी अक्षरं.." वपु ". तीही अगदी रसिकतेने लिहिलेली.
दुसर्‍या दारावर ' प्लेझर बॉक्स '. चाहत्यांची पत्रं साठवणारा.
नेमप्लेट्च्या वरती आणखी एक पाटी.
" मी तुमच्याच कंपनीच्या वस्तू वापरतो. कृपया सेल्समन किंवा सेल्सगर्ल्सनी आपला वेळ वाया घालवू नये !"
दारापासूनच वपु 'फील' व्हायला लागले !

छोटासा पण अत्यंत रसिक हॉल....येणार्‍यांचं मनापासून स्वागत करणारा.
दार उघडलं त्यांचा मित्र-कम चाहता- मनोहर पेडणेकर ह्यांनी.
" बापू, तुमच्या दोघी अनामिका आल्या !"
अनामिका ? खरंच की. सकाळी फोनवर स्वतःचं नाव तरी कुठे सांगितलं होतं मी ?
आम्ही सोफ्यावर बसलो.
वपु आतून आले......शांत, तृप्त चेहरा. काहीसा स्वतःतच हरवलेला अन् तरीही सगळ्यांत मिसळणारा.
मुद्दाम ठरवून काहीच होत नाही हेच खरं.
आम्ही तिथे जायच्या आधी वेड्यासारखी चर्चा करत बसलो होतो, ' वपुंना नमस्कार आधीच करायचा की येताना ?'
शेवटी ठरलं, निघतानाच करू या वाकून नमस्कार.
आणि तिथे मात्र त्यांना पाहून आपोआपच खाली वाकलो...नकळत !
वपु समोर येऊन बसले तरी अजून घडतंय ते खरंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.
हॉलच्या मधोमध एक लाकडी टीपॉय.
वपु म्हणाले, " मनोहर, ते सर्कल पूर्ण कर आता."
मनोहर उठले आणि आमच्याशी बोलत-बोलत त्या टीपॉयचा एक कंपोनंट हलवला.
"तुम्ही याल की नाही हे प्रश्नचिन्ह होतं. उत्तर मिळालं. वेव्हलेन्थ जुळली, सर्कल पूर्ण झालं."
वपु...मुजरा !
त्यानंतरचा प्रत्येक क्षण मंतरलेला !
काय बोललो ते आता नीटसं आठवत सुद्धा नाही. पण बर्रच काही, बराच वेळ.
त्यांच्या पुस्तकांमधली आमची आवडती वाक्यं मध्येच आमच्या बोलण्यात आली की, " हं, ते पार्टनरमधलं ना." " सखी मधलं."
मान्य आहे त्यांनीच लिहिली आहेत ही पुस्तकं. पण तरीही हे असं वाक्य न् वाक्य लक्षात कसं राहू शकतं ?
सई आणि मी दोघीही शिवाजीराजे आणि लता साठी वेड्या. राजांना आदर्श मानणार्‍या. त्यात आता हे नवीन वेड आणि आदर्शस्थान म्हणजे- वपु. आमच्या तोंडून आदर्श हा शब्द ऐकून वपु म्हणाले,
" आदर्श आपण जेव्हा ठरवतो तेव्हा त्याची फक्त चांगलीच बाजू आपल्यासमोर असते. फार जवळ गेलं की दुसरी वाईट बाजूसुद्धा दिसायला लागते. मनाला चरा पडला की आदर्श कोसळतो ! "
" डाव्या हाताला कळत नाही की तो डावा आहे आणि उजव्यालाही ते कळत नाही. डावा-उजवा ठरवणारा आतमध्ये तिसरा कुणीतरी आहे् या तिसर्‍याला ओळखा. "
वपुंना विचारलं, " तुम्हाला कोण आवडतं, गायक किंवा कलाकारांमध्ये ?"
" गाणं म्हटलंत तर....लता !"
आम्ही जमिनीच्या दोन बोटं वर ! वॉव ! वपुंनापण लता आवडते.
वपु सांगत होते.
एकदा लताचा फोन आला.
" वपु, मला तुम्हाला भेटायचंय."
मी स्तब्ध.
"हॅलो, वपुच ना?"
" हो."
" मग बोलत का नाही ? काय झालं?"
"प्रत्यक्ष तुमचा फोन आल्यावर कोणालाही जे होईल तेच ! "
अरे, म्हणजे हे असं वेडं होणं वपुंनीही अनुभवलंय तर !
गप्पा पुढे सरकत होत्या. विषय पुरत नव्हते.
वसुंधरेच्या आठवणीने वपुंच्या चेहर्‍यावर अगदी सहज जाणवण्याइतपत व्याकूळ बदल झाले.
"वसुंधरा गेली आणि नंतर किती काळ गद्य लिहिताच येईना. जे लिहिलं ते कवितेतच."
पेडणेकरांनी एक पुस्तक हातात ठेवलं. 'वाट पाहणारे दार' ....वपुंनी वसुंधरेच्या आठवणी लिहिलेलं पुस्तक. सगळं कवितेत.
आम्ही म्हटलं," वपु,तुम्ही वाचून दाखवाल ह्या कविता ?".......किती खुळचट प्रश्न.
" नको, मला त्रास होतो." नजर कुठेतरी खाली.
खूप हललं आत काहीतरी.
"वपु, तुम्ही सुद्धा डिस्टर्ब होता ?"
" अरे, अगदी छोट्याशा गोष्टींनी सुद्धा डिस्टर्ब होतो....कधीकधी तर डिस्टर्ब व्हायला काही नाही म्हणून डिस्टर्ब होतो."
हम्म्म. स्वतः अस्वस्थ होत असल्याशिवाय हे असलं लिखाण कसं उतरणार म्हणा !
वपु, "तुम्ही काय घेणार ?"
"काहीच नको वपु. आमचं पोट भरलं. खरंच काही नको."
" पाणीपुरी चालेल?"
" पाणीपुरी?"
" बसा. आलोच मी."
चेंज करून वपु आले. "चला."
आम्ही खुळावल्यासारख्या त्यांच्यामागोमाग बिल्डींगच्या बाहेर.
कलानगरच्या रस्त्यावर वपुंसोबत चालत होतो आम्ही. म्हणजे पाय चालत होते...आम्ही हवेत उडत होतो !
कोपर्‍यावरच्या भेळवाल्याकडे पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाताना माझी नेहमीची त्रेधातिरपीट. आई लहानपणी म्हणायची मला, " केवढेसे घास घेतेस गं ? अन्ननलिका लहानच राहिलीये वाटतं तुझी." मी वैतागायचे.
पण पाणीपुरी खाताना मात्र मला तिचं म्हणणं खरंच होतं की काय असं वाटतं. तोडून खाता येत नाही आणि आख्खी गिळता येत नाही.
वपु आणि सई मात्र एकदम मजेत पाणीपुरीची मजा घेत होते.
घरी परत आलो. बराच उशीर झाला होता. निघायला हवं होतं.
"वपु, आम्ही निघतो.खरंतर उठवत नाहीये इथून."

"उशीर झालाय ? बरं,पुन्हा या. केव्हाही."
आम्ही जिना उतरून खाली जाईपर्यंत वपु दारात उभे. अगदी घरच्या व्यक्तींसाठी थांबावे तसे. हात हलवून निरोप देत उभे होते.
आम्ही कलानगरच्या रस्त्यावरून भारल्यासारख्या चालत होतो....दोघीही नि:शब्द !
पुढच्या भेटीची स्वप्नं बघत ......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है रुणुझुणु!! भग्यवान तुम्ही.. Happy
अगदी तुमच्यासारखाच मी वपुंचा वेडा चाहता. कॉलेजपासून.. झपाटल्यासारखी पुस्तकं वाचली मी. त्यांना भेटण्याची अनिवार इच्छा होती. पण फोन करायची भिती वाटायची. एकदा मात्र फोन केला. वपुंनीच उचलला फोन. त्यांचा आवाज ऐकूनच गोठून गेलो. एकवेळ विश्वासच बसेना.
त्यांनी मात्र संवाद सुरू केला.. सहजच. आणि मग मात्र एखाद्या वाहत्या झर्‍यासारखा आमचा संवाद चालू झाला. अगदी सहज..
त्यांना माझी ओळख करून दिल्यावर त्यांना मी म्हटलं की खर तर तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. पण फोन करायला धजत नव्हतो. तर म्हणाले की मी इतका भयानक दिसतो का.. Happy
दिवाळीच्या अंकाचं लिखाण चालल होतं त्यांच. सांगत होते की हल्ली तब्येत बरी नसते. पुर्वीसारखं लिखाण होत नाही. थकवा जाणवतो. मी म्हटलं मला आवडेल तुम्हाला मदत करायला लिखाणात. तर म्हणाले 'मला डिक्टेटरशिप आवडत नाही.' Happy

खूप बोललो आम्ही. जवळ जवळ अर्धा ते पाऊण तास तरी बोललो असू. वाटलच नाही की मी कोणा फार मोठ्या लेखकाशी बोलतोय. वाटत होतं की मी माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीबरोबर बोलतोय. त्यांच्या पुस्तकांशिवाय इतरही गोष्टींवर चर्चा केली आम्ही. मला त्यांनी त्याच आठवड्याच्या रविवारी भेटायला बोलावलं. ठाण्यात घंटाळीला कार्यक्रम होता त्यांचा. मी ठरवूनही नाही जाऊ शकलो. खूप वाईट वाटलं तंव्हा.. आताही वाटतय.
म्हणूनच तुम्ही भाग्यवान.. Happy

क्य बात है! मस्त लेख! मी पण वपुंची फॅन आहे...वपुर्झाला तर कितीही वेळा सलाम ठोकला तरी कमीच आहे....काय लकी आहात तुम्ही,प्रत्यक्ष भेटलात त्यांना Happy
पुढच्या दोन भागांची वाट बघतीये Happy

मस्त लेख. मलाही व पु आवडले...
आपली झेप आपण ओळखावी.>> नसतील आवडले वपु पण असे का लिहीता?
How can you be creative if you restrict yourself with thoughts of No I can not/should not ...
लेखकाने याचा विचार न करता लिहावे. कोण कोठवर आहे हे वाचक ठरवतात...
आपली झेप आपण ओळखावी हे वाक्य जी अ चे माप लावुन थोडेही त्यांच्यासारखे लिहणार्याला लिहता येईल

खुप सुन्दर लिहिलय.मी पण वपुंची फॅन आहे.वपुर्झाचि पारायन अजुनहि अधुन मधुन चालु आहेत.

रचु, आर्या, किरू, सुमेनिष, अवधुत, सोनपरी, अश्विनाश्लेषा.....सगळ्यांना धन्यवाद. Happy
मंदारडी, होऊ शकतं असं. आवडी बदलतात.

रुणुझुणु मस्त, छान लिहीलेस तु! वपु माझ्याही आवडत्या लेखकांमधले एक. पण त्यांच्या भेटीचा किस्सा तु खुप छान रेखाटला आहेस. तुझ्या लेखनातुन सहजता जाणवते. असेच खुप छान लिहीत जा.

रुणु..किती सुरेख अनुभव..
कधी कधी दिग्गज माणसांना जवळून पाहिल्यावर,त्यांचा खरा स्वभाव लक्षात आल्यावर
त्यांच्याबद्दलच्या असलेल्या आदराला तडा जातो. आपण आत्तापर्यन्त ज्या व्यक्तीला मनातल्यामनात उच्च स्थान दिलं असतं ते त्यांना प्रत्यक्षात भेटलं कि डळमळीत होतं. आपल्या भ्रमाचा भोपळा फुटू नये म्हणून या व्यक्तींना जवळून जाणून घ्यायला मन धजत नाही
पण तुझा अनुभव वाचून वपुंबद्दलचा आदर दुणावलाय..

' ' वपुंना नमस्कार आधीच करायचा की येताना ?' Rofl

अरे, बर्‍याच दिवसांनी वर आला हा लेख.

आपण आत्तापर्यन्त ज्या व्यक्तीला मनातल्यामनात उच्च स्थान दिलं असतं ते त्यांना प्रत्यक्षात भेटलं कि डळमळीत होतं. >>
हो ना. हेसुद्धा खूप अनुभवलंय.
वपु तसेच होते जसे त्यांच्या पुस्तकांमधून दिसले. निदान मलातरी त्यांचा तसाच अनुभव आला.
एक व्यक्ती जगातील प्रत्येक माणसाला संतुष्ट करू शकतच नाही. वपुंचे वाईट अनुभव आलेले लोकही नक्कीच असतील. मला मात्र त्यांची चांगलीच बाजू अनुभवायला मिळाली.
त्यांची अनेक वाक्ये बर्‍याच जणांना बेगडी वाटतात, इल्युजन वाटतात. पण मला बर्‍याच प्रसंगात आपोआप हीच वाक्ये आठवून मन शांत होतं.

Pages