" ज्या मनाला आपण हळवं समजतो, ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते....आणि दुरावलेली व्यक्ती ! सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला काहीच सुचू देत नाही. कोणताही उपदेश उपदंशासारखा वाटतो. भक्तीरस सक्तीसारखा वाटतो. ' बेदम कामात स्वतःला गुंतवून घ्या ' हे सांगणं म्हणजे ' गाडीतलं पेट्रोल संपलंय, हे कुणाला सांगू नका, तसंच प्रवास करा ' असं म्हणण्यासारखं आहे !"
---वपु.
“एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.”
---वपु.
आजवर कित्येक प्रसंगांमध्ये वपुंची वाक्यं आपोआप आठवली आहेत आणि अशा प्रत्येक वेळी मनावर फुंकर घालून गेली आहेत !
वपु आवडणारे लोक जसे अगणित आहेत, तसेच वपु न आवडणारेही काही आहेत.
" अरे, जरा वेगळ्या विषयावर पण लिही. तोच तोच विषय लिहिला की माणसाचा वपु होतो. "
असंही एक वाक्य मागे कानावर आलं होतं. वपुंच्या लिखाणाच्या कक्षा फक्त मध्यमवर्गीयांपुरत्याच मर्यादित राहिल्या, त्यांनी बाकीचे विषय हाताळले नाहीत, असे शेरेही ऐकू येतात.
पण मला काय वाटतं सांगू ?
वपुंनी आयुष्यभर ' माणसा-माणसांतील संवाद ' ह्या विषयावर अमाप लिहिलं. त्यांनी लिहिलेला प्रत्येक प्रसंग अनेकांना आपल्याच बाबतीत घडतोय, इतका जवळचा वाटला. प्रत्येक वाक्य मनात घर करून राहिलं
पण तरीही 'संवाद' अडकण्याचा प्रश्न उरलाच आहे ! आयतं उत्तर समोर आहे, तरी प्रश्न सोडवता येत नाही अशी अवस्था झाली आहे. एवढा मोठ्ठा विषय आहे हा !.....
मी वपुंची भक्त ! माझी स्वतः ची काही नाती, काही मैत्र संवाद अडकल्यामुळे जागच्या जागी गोठून राहिलेत. पुन्हा वाहते व्हावेत अशी इच्छा खूप आहे, पण त्या भिंती पाडायच्या कशा?
आहे का अशी एकतरी व्यक्ती जिने संवाद थांबायचा अनुभव नाही घेतला ? परिघावरच्या सगळ्यांशीच वाहते संवाद असणारी व्यक्ती माझ्यातरी पाहण्यात नाही.
वपुंच्या लिखाणामुळे माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट होते. ' हे असं वाटणारे किंवा अनुभवणारे आपण एकटेच नाहीत, ' ही भावना फार मोठ्ठा दिलासा देऊन जाते !
वपुंना भेटण्याचं माझं स्वप्न कॉलेजात असताना अचानक पुरं झालं. ज्याकाळात त्यांची पुस्तकं झपाटल्यासारखी वाचत होते, ज्याकाळात मनाच्या संवेदना अजून नवथर होत्या.....त्या काळात वपुंची भेट ! आयुष्याने मला दिलेल्या काही अनमोल नजराण्यांपैकी हा एक !
३ भागांची ही लेखमालिका म्हणजे खरंतर पुन्हा एकदा माझ्या जुन्या डायरीतली पानंच आहेत...
कारण आता नव्याने लिहिलं तर ते कोवळं वेडेपण, ती एक्साइटमेंट जशीच्या तशी उतरणं शक्यच नाही !
वपुंच्या सहवासातला आनंद, आणि.......शेवटी आयुष्यभरासाठी मनाला लागलेला चटका....सगळं जसंच्या तसं इथे ठेवतेय !
दोन्ही फोटो जालावरून साभार.
*************************************************************************************************
१९/१०/२०००
"मनोहर, निसर्ग पाहायचाय ? बघ ह्या फुलांकडे."
हो, हेच वपु. स्वागतालाच ही हळव्या फुलांची रांगोळी !
विश्वासच बसत नव्हता.इतके दिवस ज्या व्यक्तीच्या लिखाणाने भारावून गेले, ज्यांच्या जगण्याला मानाचा मुजरा देत आले तेच...तेच वपु आज प्रत्यक्षात समोर होते.
त्यांच्या पुस्तकातून डोकावणारं त्यांचं उमदं, प्रसन्न, खेळकर आणि तरीही सखोल व्यक्तिमत्व प्रत्यक्षात साकार होत होतं.
'पार्टनर' पुस्तकाच्या पहिल्या पानावर वपुंचा फोन नं दिलेला. होस्टेलच्या कॉईन बॉक्सवरनं सकाळी सहजच नंबर फिरवला. अगदी सहज. वाटलंच नव्हतं, वपु ह्या नंबरवर भेटतील म्हणून.
" वपु काळे बोलताय का ? तुम्हाला भेटायचंय."
"ये."
"कधी येऊ ?"
"आज."
"किती वाजता वपु ?"
"संध्याकाळी ५:३०."
बस्स्....अपॉईंटमेण्ट, तीही इतक्या दिग्गजाशी इतकी सोप्पी असू शकते ?
नक्की काय घडणारे ,ह्याचा अंदाज येत नव्हता. पण मी आणि सई अक्षरशः उडत होतो.संध्याकाळी बांद्रा. ५:३० चे ६:३० झाले. वाईट वाटलं,वेळ पाळता आली नाही म्हणून.
फोन केला," वपु, जरा उशीर होतोय."
"या, मी वाट पाहतोय."
दिवाळीची शुभेच्छापत्रं आणि गुलाबाची फुलं घेऊन साहित्यसहवास मध्ये गेलो.
'झपूर्झा' फ्लॅट नं. -११.
दारावर पितळी अक्षरं.." वपु ". तीही अगदी रसिकतेने लिहिलेली.
दुसर्या दारावर ' प्लेझर बॉक्स '. चाहत्यांची पत्रं साठवणारा.
नेमप्लेट्च्या वरती आणखी एक पाटी.
" मी तुमच्याच कंपनीच्या वस्तू वापरतो. कृपया सेल्समन किंवा सेल्सगर्ल्सनी आपला वेळ वाया घालवू नये !"
दारापासूनच वपु 'फील' व्हायला लागले !
छोटासा पण अत्यंत रसिक हॉल....येणार्यांचं मनापासून स्वागत करणारा.
दार उघडलं त्यांचा मित्र-कम चाहता- मनोहर पेडणेकर ह्यांनी.
" बापू, तुमच्या दोघी अनामिका आल्या !"
अनामिका ? खरंच की. सकाळी फोनवर स्वतःचं नाव तरी कुठे सांगितलं होतं मी ?
आम्ही सोफ्यावर बसलो.
वपु आतून आले......शांत, तृप्त चेहरा. काहीसा स्वतःतच हरवलेला अन् तरीही सगळ्यांत मिसळणारा.
मुद्दाम ठरवून काहीच होत नाही हेच खरं.
आम्ही तिथे जायच्या आधी वेड्यासारखी चर्चा करत बसलो होतो, ' वपुंना नमस्कार आधीच करायचा की येताना ?'
शेवटी ठरलं, निघतानाच करू या वाकून नमस्कार.
आणि तिथे मात्र त्यांना पाहून आपोआपच खाली वाकलो...नकळत !
वपु समोर येऊन बसले तरी अजून घडतंय ते खरंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.
हॉलच्या मधोमध एक लाकडी टीपॉय.
वपु म्हणाले, " मनोहर, ते सर्कल पूर्ण कर आता."
मनोहर उठले आणि आमच्याशी बोलत-बोलत त्या टीपॉयचा एक कंपोनंट हलवला.
"तुम्ही याल की नाही हे प्रश्नचिन्ह होतं. उत्तर मिळालं. वेव्हलेन्थ जुळली, सर्कल पूर्ण झालं."
वपु...मुजरा !
त्यानंतरचा प्रत्येक क्षण मंतरलेला !
काय बोललो ते आता नीटसं आठवत सुद्धा नाही. पण बर्रच काही, बराच वेळ.
त्यांच्या पुस्तकांमधली आमची आवडती वाक्यं मध्येच आमच्या बोलण्यात आली की, " हं, ते पार्टनरमधलं ना." " सखी मधलं."
मान्य आहे त्यांनीच लिहिली आहेत ही पुस्तकं. पण तरीही हे असं वाक्य न् वाक्य लक्षात कसं राहू शकतं ?
सई आणि मी दोघीही शिवाजीराजे आणि लता साठी वेड्या. राजांना आदर्श मानणार्या. त्यात आता हे नवीन वेड आणि आदर्शस्थान म्हणजे- वपु. आमच्या तोंडून आदर्श हा शब्द ऐकून वपु म्हणाले,
" आदर्श आपण जेव्हा ठरवतो तेव्हा त्याची फक्त चांगलीच बाजू आपल्यासमोर असते. फार जवळ गेलं की दुसरी वाईट बाजूसुद्धा दिसायला लागते. मनाला चरा पडला की आदर्श कोसळतो ! "
" डाव्या हाताला कळत नाही की तो डावा आहे आणि उजव्यालाही ते कळत नाही. डावा-उजवा ठरवणारा आतमध्ये तिसरा कुणीतरी आहे् या तिसर्याला ओळखा. "
वपुंना विचारलं, " तुम्हाला कोण आवडतं, गायक किंवा कलाकारांमध्ये ?"
" गाणं म्हटलंत तर....लता !"
आम्ही जमिनीच्या दोन बोटं वर ! वॉव ! वपुंनापण लता आवडते.
वपु सांगत होते.
एकदा लताचा फोन आला.
" वपु, मला तुम्हाला भेटायचंय."
मी स्तब्ध.
"हॅलो, वपुच ना?"
" हो."
" मग बोलत का नाही ? काय झालं?"
"प्रत्यक्ष तुमचा फोन आल्यावर कोणालाही जे होईल तेच ! "
अरे, म्हणजे हे असं वेडं होणं वपुंनीही अनुभवलंय तर !
गप्पा पुढे सरकत होत्या. विषय पुरत नव्हते.
वसुंधरेच्या आठवणीने वपुंच्या चेहर्यावर अगदी सहज जाणवण्याइतपत व्याकूळ बदल झाले.
"वसुंधरा गेली आणि नंतर किती काळ गद्य लिहिताच येईना. जे लिहिलं ते कवितेतच."
पेडणेकरांनी एक पुस्तक हातात ठेवलं. 'वाट पाहणारे दार' ....वपुंनी वसुंधरेच्या आठवणी लिहिलेलं पुस्तक. सगळं कवितेत.
आम्ही म्हटलं," वपु,तुम्ही वाचून दाखवाल ह्या कविता ?".......किती खुळचट प्रश्न.
" नको, मला त्रास होतो." नजर कुठेतरी खाली.
खूप हललं आत काहीतरी.
"वपु, तुम्ही सुद्धा डिस्टर्ब होता ?"
" अरे, अगदी छोट्याशा गोष्टींनी सुद्धा डिस्टर्ब होतो....कधीकधी तर डिस्टर्ब व्हायला काही नाही म्हणून डिस्टर्ब होतो."
हम्म्म. स्वतः अस्वस्थ होत असल्याशिवाय हे असलं लिखाण कसं उतरणार म्हणा !
वपु, "तुम्ही काय घेणार ?"
"काहीच नको वपु. आमचं पोट भरलं. खरंच काही नको."
" पाणीपुरी चालेल?"
" पाणीपुरी?"
" बसा. आलोच मी."
चेंज करून वपु आले. "चला."
आम्ही खुळावल्यासारख्या त्यांच्यामागोमाग बिल्डींगच्या बाहेर.
कलानगरच्या रस्त्यावर वपुंसोबत चालत होतो आम्ही. म्हणजे पाय चालत होते...आम्ही हवेत उडत होतो !
कोपर्यावरच्या भेळवाल्याकडे पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाताना माझी नेहमीची त्रेधातिरपीट. आई लहानपणी म्हणायची मला, " केवढेसे घास घेतेस गं ? अन्ननलिका लहानच राहिलीये वाटतं तुझी." मी वैतागायचे.
पण पाणीपुरी खाताना मात्र मला तिचं म्हणणं खरंच होतं की काय असं वाटतं. तोडून खाता येत नाही आणि आख्खी गिळता येत नाही.
वपु आणि सई मात्र एकदम मजेत पाणीपुरीची मजा घेत होते.
घरी परत आलो. बराच उशीर झाला होता. निघायला हवं होतं.
"वपु, आम्ही निघतो.खरंतर उठवत नाहीये इथून."
"उशीर झालाय ? बरं,पुन्हा या. केव्हाही."
आम्ही जिना उतरून खाली जाईपर्यंत वपु दारात उभे. अगदी घरच्या व्यक्तींसाठी थांबावे तसे. हात हलवून निरोप देत उभे होते.
आम्ही कलानगरच्या रस्त्यावरून भारल्यासारख्या चालत होतो....दोघीही नि:शब्द !
पुढच्या भेटीची स्वप्नं बघत ......
मस्त लेख... वपुंच्या
मस्त लेख...
वपुंच्या टीकाकारांनी देखील आवर्जून संपूर्ण वपु वाचलेलं आहे हेच त्यांचं मोठेपण ... सिद्धहस्त हा एकच शब्द आठवतो त्यांचं नाव निघाल्यावर
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
अरे वा.. फोटो आत्ता टाकलेत का
अरे वा.. फोटो आत्ता टाकलेत का ?
हे छान झाल....
छान लिहिलयस
छान लिहिलयस
सुरेख लेख!!!! वपु ऑल टाईम
सुरेख लेख!!!!
वपु ऑल टाईम फेव्हरीट
अरे, वाचला इतक्यात ? धन्स
अरे, वाचला इतक्यात ? धन्स प्रतिक्रियांबद्दल.
इदं सर्वं, फोटो आधी अपलोडच होत नव्हते. लेख प्रकाशित केल्यावर संपादन करून टाकावे लागले.
आयला काय सॉलीड भेट झालीये
आयला काय सॉलीड भेट झालीये तुमची....
अगदी स्वप्नवत....
डॅम लकी आहेस तु...
वपुंशी भरपूर गप्पा आणि त्यांच्याबरोबर पाणीपुरी खाण्याचा योग...
आणि लिहीले आहेस पण सुंदर...
अगदी मोकळेपणाने लिहतो.. वपु
अगदी मोकळेपणाने लिहतो..
वपु वाचले, अमाप, संपुर्ण, अगदी झपाटून जाऊन; जेव्हा वाचायचे होते तेव्हा!
जी.एं. ना जसा एकाच प्रश्नाचा ध्यास होता व तोच त्यांच्या कथांचा गाभा.. थोड्याफार अर्थाने वपुंनीही असाच प्रयत्न केला, नाही असे नाही.
जी.ए. आवडायचे, आवडतात.. कदाचीत कायम आवडतीलही.
वपु आवडायचे, आता नाही. अज्जिबात नाही. एकही पुस्तक आता हाती धरवत नाही.
आवड, निवड, जॉनर काहीही म्हणा..
माझ्या लेखी ज्या खोलात शिरायचा त्यांचा प्रयत्न होता/असेल, तो तितका यशस्वी झाला नाही. आपली झेप आपण ओळखावी.. कदाचीत त्यांनी जाणली नाही.
(जी.ए. व वपु यांच्यात तुलना करत नाहीये अन् व्यक्तीबद्दल मत नसून निव्वळ लिखाणाबद्दल आहे.. अन् हो तेही माझेच अगदी वैयक्तीक आणि ते इथे मांडण्याएवढी मुभा असल्याने. सो.. )
रुणुझूणू, एकेकाळी मी देखील
रुणुझूणू, एकेकाळी मी देखील त्यांच्या कथा वाचून भारावलो होतो.
पण हा अनुभव अगदी छान शब्दबद्ध झालाय.
आणि साधारण असाच अनुभव मला मराठीतले अनेक नाट्यकलाकार देऊन गेले. एवढी थोर माणसे, इतकी जमिनीवर कशी असतात, हे कोडे बरेच दिवस सूटत नव्हते.
मग लक्षात आले,कि म्हणूनच ती थोर आहेत.
अतिशय सुंदर लेख झालाय हा.
अतिशय सुंदर लेख झालाय हा. अघाशासरखा पुढच्या दोन भागांची वाट बघतोय.
हॅलो रुणुझुणू, खूप छान लेख
हॅलो रुणुझुणू,
खूप छान लेख आहे...
u r really very lucky की वपुंची तुमची भेट झाली...
मस्त वर्णन केलय तुम्ही भेटीच...I am feeling J
वपुंचा "घर हरवलेली माणसं" हा माझा सर्वात आवडता कथासंग्रह....परिस्थितीमुळे माणसामाणसामधील संवाद कसा हरवतो याच सुरेख चित्रण आहे त्यात...
त्यातलं आवडत वाक्य :
people become miserable because they create walls instead of bridges..
एका वाक्यात सगळ summarize होत
बाकी फॅंट्सी कथा कोणी रेखाटाव्यात् तर त्या वपुंनीच्...
"भुलभुलैया".."मायाबाजार्"...कोण विसरु शकेल?
"सखी", "धर्म", "रितु बसंती रुठ गयी", "वन फॉर द रोड", "कुचंबणा", "वंदना सामंत", "इनफेक्शन" किती कथा आवड्ल्यात्..मोजदादच् नाही...फार थोड्या आहेत न आवड्लेल्या...
तुमच्या लेखामुळे झर्रकन् सगळा "चित्रपट" डोळ्यांसमोर आला..
thnk u for this nostalgia
बाकी वपुंविषयी बोलावं तितक कमी आहे...
keep writing...waiting for next part...
मयुरेश, सहमत. गोष्टी आवडल्या
मयुरेश, सहमत.
गोष्टी आवडल्या त्या वेळी जेव्हढे भाबडे असू तेव्हढे भाबडे आपण आता राहिले नसू कदाचित. :)))
व.पुं चं लिखाण मध्यमवर्गीय माणसाच्या नसलेल्या इंटलेक्चुअलपणा बद्दल होतं. म्हणजे जसं असावं असं आपल्याला वाटतं तशा प्रकारचं असं मला वाटतं. पण त्याने एके काळी मला त्यांचं लिखाण आवडायचं हे विसरता येत नाही आणि त्यांचे फ़ंडे सत्यात उतरवण्याकरता कशी विचारांची मोर्चेबांधणी केली होती हे ही विसरता येत नाही.
ते एक व्यक्ती म्हणून कसे होते हे आपल्याला त्यांच्या अनेक कथांमधून त्यांनी सांगितलं आहे. तसाच अनुभव आपल्यापैकी एकाला आला, त्या फ़ॅटसीज नव्हत्या हे वाचून बरं वाटलं.
अप्रतिम अनुभव! हेवा वाटला!
अप्रतिम अनुभव! हेवा वाटला!
परीक्षित, अनुमोदन
परीक्षित, अनुमोदन
सगळ्यांचे आभार. आशु, खरी
सगळ्यांचे आभार.
आशु, खरी सॉलीड,स्वप्नवत भेट पुढच्या भागात. आज टाकते.
मयुरेश, मी लेखातच लिहिलंय की वपु न आवडणारे अनेक आहेत. All with their own reasons.
काही काही लोक तर वपु आवडणं म्हणजे आपली आवड कित्ती mediocre आहे हे मान्य करणं असं ही समजतात. ग्रेस-बिस आवडणं म्हणजे जरा उच्च आवड.....मग त्यांचं लिखाण अज्याबात कळत नसलं तरी.
( माझे काही फ्रेण्डस आहेत असे)
<<माझ्या लेखी ज्या खोलात शिरायचा त्यांचा प्रयत्न होता/असेल, तो तितका यशस्वी झाला नाही. आपली झेप आपण ओळखावी.. कदाचीत त्यांनी जाणली नाही.>> हे वाक्य मात्र नाही पटलं. प्रश्न सोडवता आले नाहीत, म्हणून त्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ का? आपली झेप कशी झेप ओळखायची आपण ?
मला वाटतं, कुठलंही लिखाण हे त्या लेखकाचं म्हणून वाचण्यापेक्षा स्वतंत्र लिखाण म्हणून वाचावं. प्रत्येक लिखाणाला स्वतःची फूटपट्टी असावी. काही अगदी नवोदित लेखकाचं एखादं लिखाण अगदी प्रचंड आवडून जातं आणि काहीवेळा नावाजलेल्या लेखकाचा एखादा नवीन लेख नाही आवडत तितका. म्हणून त्या नावाजलेल्या लेखकापेक्षा नवोदित लेखक श्रेष्ठ ठरू शकेल का?
हे.आ.मा.म.
( लेखाएवढी पोस्ट होऊ नये
( लेखाएवढी पोस्ट होऊ नये म्हणून दोन पोस्टी टाकतेय. प्रतिसाद संख्या वाढवायसाठी नाही. )
दिनेशदा, <<एवढी थोर माणसे, इतकी जमिनीवर कशी असतात, हे कोडे बरेच दिवस सूटत नव्हते.मग लक्षात आले,कि म्हणूनच ती थोर आहेत.>> अगदी अगदी.
मंदार, आज टाकते दुसरा भाग.
परीक्षित, << u r really very lucky की वपुंची तुमची भेट झाली. >> अगदी खरंय ! कित्ती वाक्यं आठवायची रे त्यांची. एकाच वाक्यात सगळं स्पष्ट. तू म्हणतोस तसं वपुंविषयी बोलावं तेवढं कमीच आहे.
बित्तुबंगा, धन्स.
मणिकर्णिका,
<<गोष्टी आवडल्या त्या वेळी जेव्हढे भाबडे असू तेव्हढे भाबडे आपण आता राहिले नसू कदाचित. >> हम्म्म. भाबडं राहिलं ना की आजूबाजूच्या माणसांच्या वागण्याचा त्रास होत नाही. " जगण्याचा महोत्सव करता येतो." परिस्थितीची पुटं चढू दिली अंगावर की तू म्हणतेस तसं होऊ शकतं. बाकी वपु एक व्यक्ती म्हणून त्यांच्या कथांत दिसतात तसेच दिसले.:)
ज्या काळात वपु लिहीत होते
ज्या काळात वपु लिहीत होते त्या काळासाठी ती एक झिंग होती.
लेख तर अहो भन्नाटम.. झकास !
लेख आवडला. पुढच्या भागाच्या
लेख आवडला. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
परिस्थितीची पुटं अंगावर चढत
परिस्थितीची पुटं अंगावर चढत नाही हे मानणं हा ही भाबडेपणाच एक प्रकारचा.
व.पुं.नी रंगवलेली माणसं असतात, नाही असं नाही, पण ती इतकी हातावर मोजण्यासारखी असतात की..त्यांच्या गोष्टी अशक्यप्राय वाटतात. हव्याहव्याशा पण अशक्यप्राय.
’जगण्याचा महोत्सव करा’..कसा? अपेक्षा कमी करा. कशा? अशक्य. त्यांचे फ़ंडे म्हणजे घनघोर जंगलात आणून सोडायचं, म्हणायचं "हे पहा घनघोर जंगल", की त्यांचं कम संपलं आणि पुढची वाट आपल्यालाच शोधायला लावायची.
व.पु म्हणजे माझे आवडते लेखक
व.पु म्हणजे माझे आवडते लेखक आहे . खुप सुंदर लेख रुणु. बापरे रुणु त्यांच्या सोबत पाणीपुरी खाण्याचा योग म्हणजे भन्नाटच यार.
रूणुझूणु, व.पु माझ्याही अतिशय
रूणुझूणु, व.पु माझ्याही अतिशय आवडते लेखक. त्यांच्या माझं माझ्यापाशी , पार्टनर्,रंगबिरंगी पुस्तकांची
मी कित्येकदा पारायण केले आहे. सिंधुताई सपकाळ त्यांच्यामुळेच माझ्या आदर्श झाल्या. कितीतरी महान व्यक्तींचि ओळख त्यांच्या पुस्तकाद्वारे झाली आहे. खरोखरच व.पुनी आपल्याला भरभरुन दिले आहे.
अमृतांजन, विजय, स्मिता, समई
अमृतांजन, विजय, स्मिता, समई धन्यवाद.
अमृतांजन, झिंग...अगदी योग्य शब्द.
स्मिता, पुढचा भाग वाच. आणखी भन्नाट.
समई, पारायणं....सेम पिंच.
मनकर्णिका,
<<पण ती इतकी हातावर मोजण्यासारखी असतात की..त्यांच्या गोष्टी अशक्यप्राय वाटतात. हव्याहव्याशा पण अशक्यप्राय.>>.........मला उलटं दिसलंय. त्यांनी रंगवलेली माणसं उलट नको-नकोशी वाटतात. पण अगदी मुबलक पसरलेली दिसतात आजूबाजूला. साधी, मनाच्या सर्व विकारांनी ग्रस्त माणसं. आठव, पार्टनरमधली आई. इन फॅक्ट, जवळजवळ सगळ्याच कथांमध्ये अशा रोज भोवताली जाणवणार्या माणसांच्या छटा दिसतात.
<<.....पुढची वाट आपल्यालाच शोधायला लावायची.>> हा काही लोकांचा अनुभव असू शकतो. पण बर्याच लोकांना ह्याच्या नेमका उलटा अनुभव आलाय. जंगलात अडकावं आणि वपुंच्या एखाद्या वाक्याने पुढचा मार्ग स्पष्ट दिसू लागावा.
अगदी सोप्पं उदा. देते. आजूबाजूची माणसं आपल्यावर उगीचच जळतायेत हा अनुभव अल्मोस्ट सगळ्यांना येतो. चिडचिड होते तेव्हा. पण वपुंचं वाक्य आठवतं, "माणसं आपल्यावर जळायला लागली की समजावं आपला उत्कर्ष होतोय."
फिनिश ! हसू येतं.सगळी अस्वस्थता पळून जाते.
हे सगळं मी तुला कॉन्ट्रॅडिक्ट करायला नाही हं सांगत. प्रत्येकाचे अनुभव, मतं वेगळी असू शकतात.
I respect individual's opinions.
लेख खुप छान आहे. वपु माझे ही
लेख खुप छान आहे. वपु माझे ही आवडते त्यांची वपुर्झा खुपच आवडीची आहे.
पुढचा भाग वाचायला आवडेल. तुमच्या मताशी सहमत आहे.
मयुरेशला अनुमोदन. मी भरपूर
मयुरेशला अनुमोदन.
मी भरपूर वपु वाचले, अगदी भारावून,इंप्रेस वगैरे. पण आता त्यातल्या कशाचाच मनावर जराही ठसा उरलेला नाही.
पुण्यातला एक अर्थतज्ञ अभय
पुण्यातला एक अर्थतज्ञ अभय टिळक याचे वपु सख्खे मामा. त्याने आम्हाला त्याच्या घरी चिंचवडला वपुंशी गप्पा मारायला बोलवल होत. एक खुर्ची त्यांच्यासाठी ठेवली होती आणि आम्ही खाली बसलो होतो. आल्या आल्या त्यांनी खुर्ची काढुन टाकली आणि खालीच बसकण मारली.
संवाद साधाताना फार अंतर नसावे हे त्यांनी कारण सांगीतले. आजही तो प्रसंग तसाच कोरलेला आहे.
रुणुझुणू.............. लेख
रुणुझुणू..............
लेख खुपच छान. वपु म्हणजे माझ्या जीवनातील एक आदर्श आहे. वपुर्झा म्हणजे माझी "गीता" आहे. दररोज त्यामधील एक परिच्छेद वाचल्याशिवाय माझा दिवस सुरु होत नाही. उत्सुकतेने पुढील लेखांची वाट पहात आहे.
हसरी, नितीनचंद्र,
हसरी, नितीनचंद्र, कदमसर....धन्यवाद.
आगाऊ, असं होतं बर्याचदा. आवडी बदलत जातात. माझ्याही काही आवडी पूर्ण बदलल्या आहेत. म्हणजे इतक्या की प्रश्न पडतो, खरंच आवडायचं का हे आपल्याला ?
नितीनचंद्र, तुम्हालाही अनुभव आलाय तर वपुंच्या उमद्या स्वभावाचा. जे त्यांच्या पुस्तकांत दिसले, तेच वपु प्रत्यक्षात होते.
कदमसर,.....तुम्हीसुद्धा वपुभक्त तर.
ही घ्या पुढच्या लेखाची लिन्क.
http://www.maayboli.com/node/22174
रुणुझुणू छान लिहील आहेस तु
रुणुझुणू छान लिहील आहेस
तु खरच खुप लकी आहेस. आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट होणे हे खरच महत्त्वाच असतं आणि तु तर त्यांच्या बरोबर पाणीपुरी खाल्लीस....:)
<<<<एवढी थोर माणसे, इतकी जमिनीवर कशी असतात, हे कोडे बरेच दिवस सूटत नव्हते.मग लक्षात आले,कि म्हणूनच ती थोर आहेत.>> अगदी अगदी दिनेशदा.
वपु एकेकाळी खुप आवडायचे.
वपु एकेकाळी खुप आवडायचे. त्यांची जवळ जवळ सर्व पुस्तके वाचली आहेत. ह्या लेखामुळे त्यांची आठवण झाली. आता परत वाचावी असे वाटत नाही. तसे पण आजकाल थोडीफार मायबोली आणि technical specifications सोडुन मी काहीही वाचत नाही
रुणु!! स्तब्ध झाले मी हे
रुणु!! स्तब्ध झाले मी हे वाचुन! खरच तु खुप लकी...चक्क वपुंसारख्या महान लेखकाला भेटुन आलीस!!
Pages