भवतालचा निसर्ग - १

Submitted by साधना on 17 December, 2010 - 01:16

मुंबईत आणि नव्या मुंबईत झाडे भरपुर आहेत. निसर्गाच्या गप्पा मारताना कित्येक झाडे नव्याने आठवत गेली. झाडे आपल्या आजुबाजुला असतात पण रोजच्या धावपळीत त्यांच्याकडे लक्ष जात नाही. कोणी पाहो न पाहो, त्यांचे वर्षभरातले कार्यक्रम नित्यनेमाने चालु असतात. अशाच आपल्या आजुबाजुच्या दिसणा-या आणि त्यामुळे आपल्या लक्षात न येणा-या झाडांची प्रकाशचित्रे. ही सगळी झाडे नेरुळ सिवुड्स परिसरातली आहेत.

१. काटेसावर उर्फ शाल्मली (Bombacacea/Bombax ceiba) - या झाडावर बरीच चर्चा झाली. हिवाळ्यात हे झाड सगळी पाने गळवुन टाकते. मग त्या पुर्ण रिकाम्या झालेल्या झाडाला एक कुठेतरी कळा येतो आणि मग बघताबघता झाड कळ्यांनी आणि फुलांनी भरुन येते. फुलाची जागा बोंडे घेत असतानाच नविन पाने येतात. यावर्षी मात्र माझ्या कॉलनीतल्या झाडाला जुनी पाने गळायच्या आधीच फुले यायला लागली. ही काटेसावरीची विविध रुपे, कळे, फुले. अजुन दोन महिन्यात फुलांच्या जागी हिरवी बोंडे लटकलेली दिसतील. बोंडे पिकली की चॉकलेटी होतात आणि आत एकदम चकचकित रेशमी कापुस तयार होतो. म्हणुन याला सिल्क कॉटन ट्री असेही म्हणतात. याच्या उशा वगैरेही बनवतात असे वाचलेय. पण या बोंडातला कापुस गोळा करणे खायचे काम नाही. आपल्या साध्या कापसाचे झुडुप असते, कापुस सहज खुडता येतो पण झाडावरची बोंडे ही वा-याने हलकी झालेली असतात आणि झाडावरच फुटू पाहतात ती गोळा करुन त्याचा कापुस काढणे मला तरी पेशन्सचे काम वाटते. बोंडे पिकुन फुटली की हा कापुस इतस्ततः पसरतो. मी मुद्दाम पाहिला हातात घेऊन. कृत्रिम कापसासारखा एकदम चिवट आहे, पण मऊ.

नव्या मुंबईत याचे भरघोस पिक येते. पारसिक हिलवर भरपुर आहेत. मुद्दाम लावावी लागत नाही. याच्या बिया सोबतच्या कापसाबरोबर हवाई उड्डाणे करुन जिथे-तिथे रुजतात. मुंबई-पुणे दृतगती मार्गावरही मी खुप काटेसावरी पाहिल्यात. फुलांच्या मोसमात या झाडावर पाने सहसा नसतात, मोठ्या आकाराची फुले फुललेली असतात त्यामुळे हे झाड अगदी लालभडक दिसते. हिरव्या झाडांच्या गर्दीत चटकन लक्ष वेधुन घेते.

याचे लाकुड वजनाला हलके असते आणि पाण्यातही चांगले टिकते. बांधकामात, काडेपेटीचे बॉक्स आणि काड्या, मोल्ड्स वगैरेसाठी याचा उपयोग करतात.

साधारण वर्षभराचे काटेसावरीचे झाड - अंगभर काटे वागवुन असते.

हे झाड मोठे झालेय. आता फुलावर येईल

आणि हे प्रौढ झाड. फुलांचे भरपुर ऋतु पाहिलेत याने.

ही फुले आणि कळ्या, झाड प्रौढ झाले तरी काटे मात्र सोडत नाही. उगीचच नाही काटेसावर नाव पडले..

२. सप्तपर्णी/सात्विण (Alstonia scholaris) - हे एक अतिशय सुंदर दिसणारे सदाहरीत झाड आहे. होलसेलमध्ये पानगळ करताना मी तरी पाहिले नाही. याच्या शेंगा फार सुंदर दिसतात. अगदी बारीक हिरवे दोरे लटकलेले दिसतात. पाने आणि फांद्या दोघेही एक बिंदु धरुन त्यापासुन फुटतात. त्यामुळे झाड अगदी नीटनेटके दिसते.

ठाण्याला बरीच सप्तपर्णी पाहिलीय मी. ठाण्याची झाडे सध्या खुपच सुंदर दिसताहेत. नेरुळ आणि सीवूडस पूर्वेला याची खूप झाडे लावलीत. खूप फुलतात. पांढरी बारीक फुले आणि त्यातच मधुन मधुन लटकणा-या हिरव्या माळा. याचा वास ब-याच जणांना आवडत नाही, पण मला आवडतो. थोडा उग्र आहे खरा पण दुरवर वास येतो याचा. मला तो दालचिनी+जायफळाचा वास एकत्रीत केल्यासारखा वाटला. डिसेंबरात हवा नुसती कुंद होऊन जाते यांच्या त्या मादक सुवासाने. मलातर नशा चढल्यासारखे वाटते. हे झाड व फुले थोडी विषारी आहेत. याला devils tree असेही म्हणतात. याचे लाकुड हलके असल्याने पेट्या, फळे इ. बनवण्यासाठी वापरतात. साल औषधी आहे. आमच्या गावी पोटदुखीवर वगैरे आजही साल उगाळून वापरतात.

याची पाने, कळ्या, फुले आणि शेंगा... कळ्यांमध्येही रचना पाहा कशी अगदी भुमितीय आहे.

३. सेमल - (Ceiba pentandra) - . कपोक हे याचे सर्वसाधारण नाव आहे.. हे झाडही साधारण सप्तपर्णीसारखेच दिसते. पण फांद्यां फुटण्याला काही निश्चित आकार आहे. झाड नीट लक्ष देऊन पाहिले तर त्याच्या फांद्यांची रचना लक्षात येईल. एकाच जागी गोलाकार फांद्या आहेत, मग थोडी मोकळी जागा सोडलीय, मग परत गोलाकार फांद्या. आणि याचा बुंधा पाहा. झाड तिन मजली इमारतीच्याही वर गेलेय, पण बुंधा मात्र अजुनही हिरवागार दिसतोय. हा फोटो मी महापे सिग्नलजवळच्या लोकमत कार्यालयाच्या आवारातील झाडांचा घेतला आहे.

ही सगळी झाडे आता तोडली गेलीत. फ्लायओव्हर बांधताना, बाजूला सर्व्हिस रोड बनवला, त्यात बरीचशी झाडे गेली. लोकमत कार्यालयासमोर आता एकही झाड शिल्लक नाही.

z_2.JPG

याची पाने अशी दिसतात
DSC02755.JPG

खालचे चित्र याच जातीच्या दुस-या झाडाचे ज्याला आता फुले आणि बोंडे धरली आहेत. मला आधी वाटले वर दिलेय त्याच झाडाची ही फुले आणि बोंडे आहेत. पण नाही, बाजुलाच १० झाडे हिरवीगार, एकही फुल नसलेली अशी असताना शेजारच्या त्याच जातीचे झाड पानांचे ओझे बाजुला करुन कळ्या, फुले आणि हिरवीगार बोंडे मिरवीत बसणार नाही. आता झाडाची रचना दिसायला सारखी आहे, म्हणजे फक्त बिल्डिंगच्या स्लॅबसारखे एका ठिकाणी गोलाकार फांदीरचना, मग ४-५ फुट मोकळा बुंधा, मग परत गोलाकार फांद्या ही रचना. पण एक झाड हिरवेगार तर दुसरे पर्णहीन. ही एकाच फॅमिलीतली पण चुलतभावंडे असावित. ह्या झाडाचा फोटो काढायचे राहुन गेले पण कळे, फुले आणि बोंडे मात्र कॅमे-यात मिळाली.

DSC02756.JPGDSC02759.JPG४. तुती (white mulberry/Morus alba) - मुंबईत सहसा न दिसणारे तुतीचे झाडही माझ्या कॉलनीत आहे. कोण्या सदगृहस्थाने मुद्दाम लावलेय, पण कोणाच्या मालकीचे असे नाही.

माझ्या गावी एक सरकारी रेशीमकेंद्र होते (आताही आहे, फक्त त्याची जागा बदललीय). त्या रेशीमकेंद्राच्या एका बाजुला तुतीची भरपुर झाडे लावलेली. या झाडांचा पाला रेशीमकिड्यांना खुप आवडतो म्हणे. मोठ्या गोल सुपांमध्ये गोल गोल खाचे करुन त्यामध्ये रेशीमअळ्या सोडलेल्या असत आणि त्यावर भरपुर तुतीचा पाला घालत. अळ्या प्रचंड वेगाने हा पाला खात. सकाळी भरुन ठेवलेला पाला दुपारपर्यंत फस्त Happy

tuti.JPG

या झाडाची लागवड मुख्यतः रेशीम किड्यांसाठीच करतात. याच्या इंग्रजी नावाची सगळीच गंमत आहे. नाव white mulberry पण यातला पांढरा रंग हा फुलाला उद्देशुन आहे, फळाला नाही. आणि जरी मलबेरी नाव असले तरी हे बेरी वर्गातले फळ नाही. याचे आपल्याला फळासारखे जे दिसते तो अनेक बारीक फळांचा एक घोस आहे.

हीच ती फळे. बाळ फळे हिरवी असतात, चव अशी काही नसतेच. उगीचच काहीतरी तोंडात टाकुन चघळल्यासारखे वाटते. त्याच्यावर कुसळेच जास्त असतात त्यामुळे खावीशी वाटतही नाहीत. जरा मोठी झाली की बाहेरुन गुलाबीसर होतात. आत थोडाथोडा आंबटपणा येऊ लागतो. पुर्ण मोठी झाली की बाहेरुन लालभडक होतात आणि आतुन गुलाबी. पण खुप आंबट लागतात. तोपर्यंत कुसळेही काळी होऊन गळालेली असतात. पुर्ण पिकलेली फळे मात्र रंगाने काळीभोर, आत जांभळी आणि चवीला ... आ हा हा.. काय गोड लागतात..... अमृत अगदी...

tuti_0.JPG५. वेडी बाभुळ (Earleaf acacia\Acacia auriculiformis) - ह्या झाडाचे नाव मला माहित नव्हते पण दिनेशनी सांगितले आणि मी त्याचे कुळ शोधुन काढले. पण मला हे झाड अजिबात आवडत नाही. नव्या मुंबईत याचे अमाप पिक आहे आणि मुंबईबाहेरही मी ही झाडे भरपुर पाहिलीत. मायबाप सरकारने जिथे जिथे 'सामाजिक वनीकरण' केलेय तिथे ही झाडे लावलीत Angry आता मुद्दाम लावायचीच होती तर अगदीच आंबा, फणस जाऊदे पण गेला बाजार वड, पिंपळ आणि रानातली इतर झाडे काय संपावर गेली होती?? पण नाही...

शासनाला वनीकरण करताना हे झाड आणि निलगीरी याशिवाय दुसरे काही दिसलेच नाही... या झाडाला ना धड रुप ना धड रंग ना धड फुल ना धड फळ. पिवळीपिवळी अतिबारिक फुले येतात आणि मग वेटोळे घातलेल्या चपट्या शेंगा लागतात. पाने पण अगदी सोंग आहेत याची. पानगळ मात्र बाराही महिने चालु असते. खाण्यासारखे काहीच नसल्याने पक्षी या झाडावर पाय टेकवायचेही मनावर घेत नाहीत. घरटे बांधणे तर दुरच... पक्ष्यांनी पुर्णपणे वाळीत टाकलेल्या या झाडाला सिडकोने अभय देऊन अख्ख्या नव्या मुंबईत लावलेय. नंदन कलबागांनी 'ह्या झाडाला पाने नसतात. झाड जेव्हा बीयापासुन रुजवतात तेव्हाच काय ती दोनचार पाने येतात. त्यानंतर पानसदृष्य जे दिसते ते खोडा/फांदीचेच एक रुप असते' असे सांगितलेले. सुरवातीची अगदी दोन पानं सोडली तर पानंसदृश दिसणारा देठ तर फार कामाचा आहे. याला phyllode म्हणतात. पाण्याची कमतरता आणि उष्ण हवामानाशी जुळवून घ्यायला यांची मदत होते.

तरिही शासकिय वनीकरणात हे झाड अग्रभागी दिसते याचे महत्त्वाचं कारण म्हणजे ही झाडं पाण्याच्या दुष्काळी भागात, उष्ण हवामानात, पाण्याने साचलेल्या जमिनीत, आगीने होरपळलेल्या मातीत व्यवस्थीत वाढू शकतात. पोषणमूल्य कमी असलेल्या जमिनीत, चिखलात किंवा कोरड्या मातीत जोमाने वाढतात. एवढच नव्हे तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियांच्या या झाडाच्या मुळांमधल्या वास्तव्यामुळे मातीचं पोषणमूल्य पण वाढतं. जळाऊ लाकुड म्हणून तर उपयोग होतोच, पण पेपर पल्पमधे देखिल वापरतात. थोडक्यात काय तर लो मेंटेनन्स-हाय सस्टेनेबिलिटी असलेलं गुणी झाड आहे.

शासनाच्या वनीकरणाव्यतिरिक्त याचा दुसरा उपयोग जळावू लाकुड म्हणुन होतो.

z.JPG

गेल्या आठवड्यात झाडांचे फोटो काढत फिरत असताना अचानक खालिल झाड नजरेत भरले. झाड बरेच लांब होते त्यामुळे नक्की कसले आहे ते कळत नव्हते. फोटो काढले पण तेही नीट दिसत नव्हते. पण काहीतरी नवीन झाड सापडलेय याचा एक अनामिक आनंदही होत होता. थोडे पुढे गेल्यावर रस्ता दुभाजकावर त्याच जातीच्या झाडांची रांग दिसली. आता मात्र झाड अगदी जवळुन पाहायचा मौका मिळाला. जवळून निरखत असताना अचानक झाडाच्या शेंगा दिसल्या आणि सगळा उलगडा झाला.

हेही वेडे बाभुळच. पण जरा जास्त सुधारीत जात. पानांचा आकार जरा मोठा पण रचना तशीच. फुलांचे सरही मोठे, रंग क्रिमी पण रचना मात्र तशीच. बहुतेक ही नव्याने विकसित केलेली हायब्रिड जात असावी.

६. कदंब (Neolamarckia cadamba) - कदंबावर ब-याच जणांनी लिहिलेय. तरी माझ्या लाडक्या झाडाचा फोटो टाकण्याचा मोह आवरत नाही.

z_0.JPG

सरळसोट बुंधा आणि त्याला समांतर फांद्या असे या झाडाचे रुप आहे. फांद्या जमिनीला समांतर असतात. हे झाड दिसायला त्रिकोणासारखे दिसते. मी टाकलेला फोटो तरुणपणात प्रवेश केलेल्या झाडाचा आहे. पण यापेक्षाही मोठी झाडे आहेत. उंचीला अजुन जरा जास्त, फांद्या मजबुत आणि अजुन लांब पसरलेल्या. पण आकृती मात्र त्रिकोणीच दिसते.

कदंबाच्या फुलात लहानलहान कॅप्सुल्स गच्च बांधलेल्या असतात आणि प्रत्येकात बिया असतात. एका फुलात जवळजवळ ८,००० बिया असतात आणि एवढ्या हलक्या की एका ग्रॅममध्ये २०,००० बिया बसु शकतात असे मी वाचलेय. पोटाच्या रोगावर ह्याची फुले वापरतात.

कृष्ण कदंबावर बसुन यमुनेत आंघोळ करणा-या गोपींना न्याहाळत असे असे कुठेतरी वाचलेले. कृष्ण तेव्हा लहान असावा :).

पण हे खरे नसावे. श्री नंदन कलबागांनी लिहिलेय कि कृष्ण ज्या भागात राहत होता त्या भागात ह्या वृक्षाचे अस्तित्व नाहीय. त्यामुळे तो त्यावर बसून खोड्या काढायचा वगैरे केवळ कविकल्पनाच म्हणायला नवी. हा वृक्ष इतका सुंदर दिसतो आणि त्याच्या फांद्या अशा मस्त सरळसोट, जमिनीला समांतर असतात कि त्यावर चढून बसण्याचा मोह कोणालाही होईल.

लोणावळ्याला बालाजी तांब्यांच्या आश्रमात मोठ्ठे कदंब आहेत. कधीकाळी मी विमको मॅच कंपनीत कामाला होते. त्या कंपनीने आगकाड्या बनवण्यास लाकुड मिळावे या उदात्त हेतुने शेतक-यांना झाडांची लागवड करायला मदत केली होती. त्यात पॉप्लर आणि कदंब ह्या दोन झाडांना शॉर्टलिस्ट करुन शेवटी पहिल्या फेजमध्ये पॉप्लरची निवड केली होती. दुस-या फेजमध्ये कदंब होता. उत्तर भारतात ब-याच ठिकाणी त्यांनी शेतक-यांच्या शेतावर मोकळ्या जागी, मेरेवर वगैरेवर पॉप्लर लावले होते. शेतक-यांनी फक्त आपली जागा द्यावी एवढेच बंधन होते. ज्यांची पुर्णा देखभाल कंपनी करणार होती. झाडे शेतक-यांच्या मालकीची. योग्य वेळी त्यांना कंपनी शेतक-यांकडुन विकत घेणार होती. काही शेतक-यांनी सहकार्य केले, काहींनी कंपनीकडुन देखभाल तर करुन घेतली पण विकायच्या वेळी दुस-यांना विकुन जास्त पैसे कमावले Happy दुसरी फेज मग आपोआप रद्द झाली.

z_1.JPG

पोस्ट खात्याने ह्या सुंदर झाडाच्या सुंदर फुलांना आपल्या १ रुपयाच्या स्टँपवर जागा देऊन भुषविले आहे.

आता इतकेच आवरते घेते. पुढचे पुढच्या वेळेस. वर टाकलेल्या काही झाडांच्या पानांचे वगैरे जरा जवळुन फोटो काढायला हवेत असे वाटतेय. झाडे ओळखायला मदत होईल त्याने.

क्रमशः

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साधने, चालणारे पेक्षा बोलणारे असो देत. रमण्यासारखा विषय आणि ज्यांचं ऐकाव अशे वक्ते बरोबर असताना काट्याशी शर्यत नको...

छानच प्र्.चि. व माहिती. धन्यवाद.
किती आंधळेपणाने मी झाडं बघायचो, याची जाणीव झाली.

साधना, खरेच फोटो काढताना, झाडाचा, पानांचा असे वेगवेगळे काढायला हवेत. माझेही लक्ष कायम फूलांकडेच असते आणि त्याचेच फोटो काढतो मी. आता यापुढे लक्षात ठेवायला हवे.
बाकी, ज्या विषयाचा अभ्यास करायला आपण सुरवात करतो, तोच पुढे रुक्ष वाटायला लागतो कि काय न कळे..

साधना,
ट्रेकला कुठे जाणार आहात ? जमल्यास येईन मीपण !
खुप दिवसापासुन भरपुर चालायची इच्छा आहे ..

माझेही लक्ष कायम फूलांकडेच असते आणि त्याचेच फोटो काढतो मी. आता यापुढे लक्षात ठेवायला हवे.
दिनेशदा,
तुमचे लक्ष फुलांकडे तरी असते, मला माझ्या रोजच्या रस्त्यावर अनेक झाडेही होती आणि आहेत हे आता गेल्या काही दिवसापासुन कळु (दिसु) लागलयं !
Lol

अनिल, आता कळायला लागलेय तर सतत झाडांकडे पाहात चालु नकोस, समोरच्याला खड्ड्यात घालशील Happy

दिनेश, अतिपरिचयात अवज्ञे म्हणतात ते काय खोटे नाही.....

साधना मस्त लिहियल ग! सप्तपर्णी मला माहीती होती पण त्याला सप्तपर्णी म्हणतात हे माहितीच नव्हत.

साधना,
मला अस म्हणायचं होतं,माबोवर आल्यानंतर मेनली दिनेशदा यांची भेट झाल्यापासुन (थोडं निसर्गसंबधित इतर पानामुळेही) त्यांच्याकडुन एकापेक्षा एक अशी झाडे,वनस्पती, भाज्यांचे प्रकार यांची माहिती मिळु लागली, त्यामूळे काही नव्या झाडांची ओळख झाली ,त्यामुळे एरवी आजुबाजुच्या झाडांकडे, पाना-फुलांकडे ,निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोण नक्कीच बदलला,आणखी आवड निर्माण झाली.

Happy

अनिल, हा वसा मी माझ्या गुरुजनांकडून पुढे वाहता ठेवला इतकेच. फोटो प्रसिद्ध करायला मायबोलीसारखे (कमी खर्चाचे) माध्यम मिळाले हेही तितके महत्वाचे. नाहीतर फोटो, इतक्या संख्येने आणि अशा मूळ रंगात इतर माध्यमात बघता येत नाहीत.
आणि माझ्या शिक्षणाची तर हि कुठे सुरवात आहे.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी. माझ्यासारखीच आजुबाजुच्या निसर्गाकडे पाहणारी इतरही मंडळी आहेत हे पाहुन मला खुप बरे वाटतेय. निसर्ग प्रेमाचा हा वसा आपण स्वतः जतन तर करायला हवाच पण आपल्या मुलांनाही द्यायला हवा. तरच काहीतरी आशा आहे... Happy

या लेखमालेतली माहिती जशी जमेल तशी अद्यावत करत आहे. भरपुर शोधाशोध चालु आहे. पुढच्या लेखांसाठी फोटो गोळा करण्याचे कामही सुरू आहे. जशी सवड होईल तशी माहिती टाकत जाईन.

कोणाला काही माहिती चुकीची वाटली तर लगेच सांगा. चुक कळाल्यावर लगेच दुरूस्त केलेले बरे.

मस्त लेख साधना. नारळ, वड, गुलमोहर आणि निलगिरी अशी ठळक मंडळी सोडली तर माझं झाडांबाबतचं ज्ञान अगाध आहे. हा लेख वाचूनही परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा नाही पण थोडे जवळून फोटो टाकलेस तर माझ्यासारखे आणखी कोणी माठ असलेच तर त्यांना कदाचित पुढे झाड ओळखणं सोपं जाईल असं मलाही वाटतंय Happy लिहित रहा.

काही महिन्यांपूर्वी फांद्या गाड्यांवर पडतात असं कारण पुढे करून आमच्या सोसायटीत झाडांच्या फांद्यांची बेसुमार कत्तल झाली. तुटलेल्या फांद्या पहावत नाहियेत. अशावेळी आपल्या वाणीला दुर्वासांचं बळ असतं तर बरं झालं असतं असं वाटतं. इतक्या शिव्या घालूनही झाडं तोडणारे मजेत हिंडताहेत. Angry

मी आज सकाळीच कॅमेरा घेउन पक्षांचा शोध घेत होते. पण पक्षी कॅमेरा बघुन धुम ठोकत होते अतिरेकी आल्यासारखे.

स्वप्ना, झाड तोडत असताना महापालिकेकडे तक्रार करता येत असे. तो दखलपात्र गुन्हा आहे. पण आता काय परिस्थिती आहे, ते माहित नाही.

जागू, पक्षांच्या बाबतीत माझा अनुभव तोच. खुप लांबून झूम करुन घ्यावे लागतात ते. जर झाडाच्याच उंचीवर आपण असलो, तर थोडेफार जमते.

दिनेशदा, रीतसर परवानगी घेतली आहे असं उत्तर मिळालं. झाड तोडलं नाही, फांद्या तोडत होते त्यामुळे तो गुन्हा होतो का नाही काही कल्पना नाही.

पक्षांच्या बाबतीत माझा असा अनुभव आहे की आपण त्यांचं निरिक्षण करायला लागलो - दुरुन का असेना - की ते उडून जातात. बहुतेक त्यांना सिक्स्थ सेन्स असावा. निदान आमच्या घरातून दिसणारे गोल्डन ओरियॉल, बुलबुल आणि किंगफिशर ह्यांच्याबाबतीत माझा हा अनुभव आहे. बाकी कबुतरं, चिमण्या आणि कावळे ढिम्म हलत नाहीत Happy आमच्या इथे साळुंक्या येत नाहीत हे मात्र दु:ख आहे. Sad

जागू, ते कॅमेरा नाय, तूला बघून बिथरले असतील. काय सांगाव उद्या त्यांच्या नावची पाककृती छापशील, फोटोंसकट. Light 1

पक्ष्यांचे फोटो घेण्यासाठी त्यांच्या वावराच्या ठिकाणी बराच वेळ (त्यांच्या आधी जाउन) बसून रहावे. तज्ञ मार्गदर्शन करतीलच.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

असुदे Lol

सगळे प्रचि आणि माहीती सुंदर... Happy
सधनातै, कधितरी एखा:द 'ऐरंडाचं' प्रचि टाका ना..प्लिज. (जमल्यास)

साधना,
कदंब ,वेडे बाभुळ आणि अशी अनेक झाडे मी नीट पाहिलेलीही नाहीत, त्यामुळे ती जर जवळुन पहायला मिळाली तर आणखी आनंद होईल
पुण्यात जर कुठे असतील तर नक्की त्याची बाग्,उद्यान किंवा जागा सांगीतल्यास नक्की बघता येईल
Happy

मस्त लेख साधना.. मला सप्तपर्णा आणि अष्टपर्णी असे २ वेगळे असतात हे माहितच नव्हते.धन्यवाद छान माहिती आणि चित्रांबद्दल..

अनिल, मी पुण्यात फारशी फिरलेली नाही, त्यामुळे सांगु शकत नाही. वरच्या फोटोत पाहुन पाने, फुले इ. लक्षात ठेवलेस तर सहज ओळखता येतील ही झाडे.

चातक, पुढच्या लेखात घेतलेय एरंडलाही. लवकरच टाकते इथे Happy

साधना, तुम्हाला Acacia auriculiformis बद्दल सांगणार होते, राहून गेलं.

>>ह्या झाडाला पाने नसतात.
सुरवातीची अगदी दोन पानं सोडली तर पानंसदृश दिसणारा देठ तर फार कामाचा आहे. याला phyllode म्हणतात. पाण्याची कमतरता आणि उष्ण हवामानाशी जुळवून घ्यायला यांची मदत होते.

>> पिवळीपिवळी अतिबारिक फुले येतात
आणि त्यांचा पोलन काउंट पण फार कमी असतो. पोलन अ‍ॅलर्जीवाल्यांना त्रास नको. Happy

>>शासनाला वनीकरण करताना हे झाड आणि निलगीरी याशिवाय दुसरे काही दिसलेच नाही.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही झाडं पाण्याच्या दुष्काळी भागात, उष्ण हवामानात, पाण्याने साचलेल्या जमिनीत, आगीने होरपळलेल्या मातीत व्यवस्थीत वाढू शकतात. पोषणमूल्य कमी असलेल्या जमिनीत, चिखलात किंवा कोरड्या मातीत जोमाने वाढतात. एवढच नव्हे तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियांच्या या झाडाच्या मुळांमधल्या वास्तव्यामुळे मातीचं पोषणमूल्य पण वाढतं. जळाऊ लाकुड म्हणून तर उपयोग होतोच, पण पेपर पल्पमधे देखिल वापरतात. याची हायब्रिड व्हरायटी आली असावी एव्हाना. त्यावर काम चालू असल्याचं आठवतंय. थोडक्यात काय तर लो मेंटेनन्स-हाय सस्टेनेबिलिटी असलेलं गुणी झाड आहे. या झाडावर रागवू नका. Happy

मृण्मयी, तुमचे पटले. आणि माहितीबद्दल अगदी मनापासुन धन्यवाद. इतर झाडांबद्दलही काही विशेष असेल तर लिहा. तेवढीच माझ्याही ज्ञानात भर.

वरचे वाचुन असे वाटते की जिथे इतर झाडे सहज जगु शकत नाही तिथे यांना लावलेले योग्य. सरसकट सगळीकडेच नको ना ही झाडे लावायला. जिथे गरज आहे तिथे लावा. जिथे मुद्दाम कस वाढवण्याची गरज नाही पण झाडे लावण्याची गरज आहे तिथे इतर झाडेही लावाना. ह्या झाडांचा पक्ष्यांनाही उपयोग झालेला दिसत नाही. ही झाडे लावण्याचा निर्णय घेण्यामागे शासकिय दृष्टीही कदाचित हीच असावी. पण शासकिय कामांमध्ये ब-याच वेळा नियम वापरण्याकडे प्राधान्य दिले जाते, पण ते नियम कुठल्या परिस्थितीसाठी लागु आहेत ह्याच्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जाते आणि या झाडाची झालेली बेसुमार लागवड हे त्याचेच उदाहरण आहे असे मला वाटते. मुंबईहुन आंबोलीला ब-याच वेळी खासगी वाहनाने जाताना घाटांघाटांमध्ये हीच झाडे लावलेली दिसतात.

झाडाचा असाही उपयोग कळल्याने आता नाही रागावणार त्याच्यावर Happy

याची हायब्रिड व्हरायटी आली असावी एव्हाना
वर फोटो टाकलाय ती बहुतेक हीच हायब्रिड असावी. तिची पाने, फुलांचे तुरे सगळेच मूळ झाडापेक्षा मोठे आहे.

छान

मृण्मयी, माझा पण या झाडावर रागच होता. मुंबई गोवा प्रवासात, यांच्या शिवाय दुसरे काहि दिसतच नसे.
मला तरी वाटते, आपल्याकडची विविधता जपायला हवी होती. कोल्हापूर बेळगाव रस्त्यावर आता वेगवेगळी झाडे लावल्याचे दिसले.

या गुंजा,
चंदनाच्या झाडाला लाल चार पाकळ्यांची फूले आणि काळी गोल फळे लागतात. कोकिळा ती खाताना मी बघितली आहेत.
रच्याकने, आमच्या मुंबईत पण मी चंदनाचे झाड दाखवू शकेन. पण चंदनाच्या झाडाच्या पानाला, फुलांना तितकासा तीव्र गंध नसतो, झाड कमीतकमी ६० वर्षांचे व्हावे लागते, मग त्याच्या गाभ्याला तो सुगंध यायला लागतो.

Pages