माझा स्वयंपाक गृहप्रवेश - भाग १

Submitted by शुभांगी. on 14 December, 2010 - 07:08

लग्न होईतो कुठल्याच नवरीला फुलटाईम हाऊसअ‍ॅटेंडंट या पदाची सवय नसते. घराजवळच्या पार्टटाईम जॉबवरुन उचलुन डायरेक्ट २०किमी अंतरावरच्या एम आय डी सी मधे पुर्णवेळ नोकरीला पाठवलेल्या उमेदवाराची जशी अवस्था होते अगदी तश्शीच होते लग्नाच्या पहिल्या काही दिवसात.

घरात नवीन पाळलेल्या माऊकडे किंवा भुभुकडे पहावे तसच लक्ष असत सगळ्यांच आपल्याकडे. ही चालते कशी? बोलते कशी? कसे कपडे घालते? आणि मुख्य म्हणजे स्वयपांक कसा करते? हे अगदी प्रश्नपत्रिकेतले कंपलसरी प्रश्न असतात. ऑप्शनला टाकायला काही सिलॅबसच शिल्लक नसतो.

माझं लग्न झाल (२०००) तेव्हा आजच्यासारखे हाताशी मोबाईल नव्हते उठसुठ, 'आई हे कस ग करायच' विचारायला आणि आईसाहेब पण राहायला ३५०किमी दूर, तेव्हा मारली टांग गाडीला की आणला पदार्थ रेडिमेड ही पण सोय नव्हती.

लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी सासुबाई म्हणाल्या अग आज्जीचा उपवास आहे आज थोडी उसळ करतेस का? आता आली का पंचाईत? मटकीची उसळ माहीती, मुगाची, चवळीची अगदी शेंगदाण्याची सुद्धा पण ही उपवासाची उसळ कसली??
कुणाला बर विचाराव? नवर्‍याला काही विचारण्याची सोयच नव्हती कारण तो माझ्यापेक्षा अजिबात हुशार नाही याची मला खात्री होती.

मग मोर्चा दिराकडे वळवला त्याने तर लांबुनच हात झटकले. आता सावजाच्या शोधात असलेल्या शिकार्‍यासारखी शोधायला लागले कोणी सापडतय का सांगायला म्हणुन.
सासुला विचाराव तर आपल अज्ञान उघडं पडेल आणि तेही सासुसमोर - कदापी शक्य नाही. नाक उडवुन पुढे गेले. साबांपेक्षा साबु कधीही चांगले अ‍ॅटलिस्ट कुठे गवगवा तरी करणार नाहीत म्हणुन त्यांना हळुच विचारले.
"अग तुमची साबुदाण्याची खिचडी म्हणजेच आमची उसळ" मी जितक्या हळु आवाजात त्यांना विचारल तेवध्याच भसाड्या आवाजात त्यांनी उत्तर दिले. कदाचित कॉलनीतल्या समस्त बायका-पुरुषांना कळलं असेल उसळ म्हणजे काय ते.

मानापमानाचा अजिबात विचार न करता मी स्वयपाक घराकडे वळले पण जाता जाता नवर्‍याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकायला विसरले नाही बघुन घेइन तुला नंतर या अर्थाचा.

साबांनी अगदी घाईघाईने साबुदाणे व शेंगदाण्याचा डबा कट्ट्यावर आदळला.
'मिरची, कोथिंबीर चिरुन आणि जिरं फोडणीत टाकतात हे माहितीये ना? की ते पण सासर्‍यांनाच विचारणार आहेस??'
कायपण ध्यान निवडलय हेमुने असे चेहर्‍यावर भाव आणत त्या परत बाहेर गेल्या.

मनात शंभर शिव्या देत आणि तोंडावर हसु आणत मी दाणे भाजायला घेतले. खरतर खुप रडायला येत होत मला अगदी आईची आठवण आली म्हणुन रडतेय या कारणाखाली स्वतःचा अपमान झाकता आला असता पण एवढ्यावर संपेल तर ती कला कसली??

शेंगदाणे भाजुन कुट करेपर्यंत निम्मे दाणे नवरा, दिर व समस्त बच्चेकंपनीच्या घशाखाली गेले होते. कसाबसा उरलेल्या दाण्यांचा कुट केला आणि गॅसवर कढई ठेवली. साबांनी सांगितल्याप्रमाणे मिरच्या कोथिंबीर धुवुन, चिरुन व जिरं कोरडे फोडणीत घातले तुपाच्या. फोडणी चांगली तडतडली. मिरच्यांचा ठसका उठला आणि ठसक्यात साबुदाण्याच लक्षात आल.

साबुदाणा पटकन नळाखाली धरला, चांगला धुतला व सगळ पाणी काढुन निथळत ठेवला. तोपर्यंत गॅस बारीक करायच राहुनच गेल आणि मिरची कोथिंबीर जिर्‍याने अमावस्येच्या रात्री चंद्र, चांदण्यानी असहकार पत्करावा तसा शह दिला. लगबगीने पुन्हा दोन मिरच्या चिरुन टाकल्या कढईत आणि कोथिंबीरीला काडीमोड दिला यावेळी. भिजवलेला साबुदाणा टाकला सोबत शेंगदाण्याचे कुट+चवीला साखर्+मीठ अंदाजे टाकले.

हा सगळा द्रावीडी प्राणायाम होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते, सगळ्यांची जेवण आटोपली होती आणि आज्जी नव्या सुनेच्या हातची खिचडी खायला एवढ्या आतुर होत्या जितकी मी सुद्धा माझ्या नवर्‍याला भेटायला नव्हते.

थोड्या वेळाने हातातल्या झार्‍याने खिचडी हलवली पण हाय रे देवा साबुदाण्याच्या एकीच बळ मला काही केल्या दुभंगता येइना. एकमेकांना त्यांनी इतक घट्ट पकडुन ठेवल होत जस जत्रेत मुलाचा हात आईने पकडावा तस. हा गुंता सोडवायचा म्हणजे डिव्हाईड अँड रुल पॉलिसी अ‍ॅप्लाय केली पाहिजे हा विचार करुन पुन्हा वाटीभर कुटाचा मारा केला. आता त्या कुटामधल्या सैनिकांनी पण आधीच शत्रुकटात सामिल झालेल्या साबुदाण्याशी हातमिळवणी केली. पुन्हा त्या गोळ्याच वजन ५०ग्रॅमने वाढलं.

बायको पहिल्यांदा स्वयपाकघरात कैतरी करतेय म्हणुन भरपेट डेबरा भरल्यावर नवर्‍याने चक्कर टाकली. आजुबाजुला कोणीच नाही हे पाहुन स्वारी जरा रंगातच आली दुपारी २.३०वा. माझ्या गळ्यात प्रेमाने हात टाकले आणि तेवढ्यातच माझ्या हातातला तापलेल्या झार्‍याने त्याच्या नाकाशी लगट केली.
एवढ्या रोमँटिक मुडमधे हा कोकलतोय का? म्हणुन मी मागे बघितले तर नाक मुठीत धरुन पळुन जाणे कशाला म्हणतात हे तेव्हा मला कळ्ळ.

बाहेरच्या खोलीतल्या आज्जीबाईंच्या चार आणि साबांच्या दोन हाका आल्यावर कशीबशी मी खिचडी डिशमधे काढली. वर चमचा, शेजारी लिंबु चिरुन ठेवल. पण चमचा काही केल्या खिचडीत शिरायच नावच घेइना. तोच तेवढा बिचारा माझ्याशी प्रामाणिक असावा.

आज्जींना खिचडी हातात दिली व कल्टी मारायच्या विचारात असताना साबांनी शेजारी जबरदस्तीने बसवल, दमली असशील ना खिचडी करुन म्हणुन.

आज्जीनी चमचा काढुन बाजुला ठेवला आणि मी हुश्श केल. हाताने पहिला घास घ्यायला आज्जींची झटापट बघुन सगळ्यांचे कान टवकारले व नजरा रोखल्या गेल्या खिचडीवर. पण नशिब नव्हत ना जोरावर माझं, पहिल्या घासाबरोबर पुर्ण गोळा उचलला गेला . आज्जी त्या गोळ्याकडे झुरळाकडे बघाव तस आश्चर्यमिश्रीत कुतुहलाने टुकुटुकु बघायला लागल्या. त्यांच्या हातातला गोळा ज्या दिशेने फिरेल त्या दिशेला सगळ्यांच्या नजरा फिरायला लागल्या. आता कुठे कुणाच्या अंगावर पडतो की कॉय म्हणुन सगळे सावरुन बसले आणि सभेत एकच हशा पिकला. Lol Lol

गुलमोहर: 

माझ्या हातातला तापलेल्या झार्‍याने त्याच्या नाकाशी लगट केली.
एवढ्या रोमँटिक मुडमधे हा कोकलतोय का? म्हणुन मी मागे बघितले तर नाक मुठीत धरुन पळुन जाणे कशाला म्हणतात हे तेव्हा मला कळ्ळ. >>>>>>>>>>>>>> बाप्रे शुभांगी! Rofl आता फूडे वाचते...आई गं पोट दुखतय...... Lol

जाम हसवलस बयो........आमच्याकडे असे काही शब्दबदल जाणवले

आला होता=आलता
आली होती=आलती (यावरूनच गेलता, गेलती, फोन केलता, वगैरे)
इस्त्री=इस्तरी
सांडशी/पक्कड्=गावी

मी सुरूवातीलाच नवर्‍याला दटावलं, हे अस्ले गावठी शब्द मी तुझ्याकडून तरी खपवून घेणार नै Proud

आज्जींना खिचडी हातात दिली व कल्टी मारायच्या विचारात असताना साबांनी शेजारी जबरदस्तीने बसवल, दमली असशील ना खिचडी करुन म्हणुन.

आज्जीनी चमचा काढुन बाजुला ठेवला आणि मी हुश्श केल. हाताने पहिला घास घ्यायला आज्जींची झटापट बघुन सगळ्यांचे कान टवकारले व नजरा रोखल्या गेल्या खिचडीवर. पण नशिब नव्हत ना जोरावर माझं, पहिल्या घासाबरोबर पुर्ण गोळा उचलला गेला . आज्जी त्या गोळ्याकडे झुरळाकडे बघाव तस आश्चर्यमिश्रीत कुतुहलाने टुकुटुकु बघायला लागल्या. त्यांच्या हातातला गोळा ज्या दिशेने फिरेल त्या दिशेला सगळ्यांच्या नजरा फिरायला लागल्या. आता कुठे कुणाच्या अंगावर पडतो की कॉय म्हणुन सगळे सावरुन बसले आणि सभेत एकच हशा पिकला. <<<<<<<< भन्नाट !!!!! ग्रेट !! Rofl

नवीन लग्न असतानाचा माझा अनुभव : एकदा साबा बाहेर गेलेल्या परत कधी येणार याची कल्पना नसताना साबुनी आणलेले मासे कसे बनवायचे हा प्रश्न पडला. तळलेले मासे बनवण्यापेक्षा सार बनवूया म्हणून अगदी साबा करतात तसे वाटप घेतले करायला (माझी निरीक्षण शक्ती येथे उपयोगी पडली मला वाटपासाठी) आणि फोडणी करून वाटलेला मसाला घातला त्यात मासे सोडले पण पाणी किती घालावा याचा अंदाज नसल्याने अगदी तांब्याभर घातले तर ते सार न होता त्याची आमटी झाली एवढे पातळ सार साबा बनवत नाही व मी बनवलेले कोणी खाणार नाही म्हणून काय करावे या विचारात असताना आठवले कि तांदळाची पिठी लावली कि होईल ते घट्ट. चल मग टाकली पिठी पाहिजे तितकी consistansy नाही आल्याने टाकत गेले आणि शेवटी साराचे पिठले झाले. अगदी भीत भीत साबुना वाढले तर 'ते' बघून माझ्याकडे एक हलकाच कटाक्ष टाकून म्हणाले 'अग मला यासिडीती वाटतेय नको जेवायला. तू घे जेवून.' Sad

छान.. मजा आली..................

ह्या उसळ प्रकरणावरून सांगते. माझेही सासर विदर्भातलेच आणि माहेर मुंबई. आई आणि बाबा दोघांचाही जन्म मुंबईचा पण आजीआजोबा मूळचे कोकणातले. त्यामुळे घरी सगळे कोकणी वळण. खाणेपिणे, सणवार सगळेकाही कोकणी. परिणामी लग्नानंतर चालू झालेली विदर्भ विरुद्ध कोकण झटापट पंधरा वर्ष झाली तरी चालूच आहे. साखरेची पुरणपोळी, वडाभात, गोळाभात, कढी याशिवाय बात नाही.

आज्जी त्या गोळ्याकडे झुरळाकडे बघाव तस आश्चर्यमिश्रीत कुतुहलाने टुकुटुकु बघायला लागल्या. त्यांच्या हातातला गोळा ज्या दिशेने फिरेल त्या दिशेला सगळ्यांच्या नजरा फिरायला लागल्या. आता कुठे कुणाच्या अंगावर पडतो की कॉय म्हणुन सगळे सावरुन बसले आणि सभेत एकच हशा पिकला...... हे ऑफीस मध्ये वाचू नये असा मजकुर टाकायचा नाही का. खुर्चीवरून पडता पडता वाचले.

मस्त लिहिलंय... माझं लग्न झाल्यावर महिन्याभरातच माझ्या साबा आणि जाऊबाई माहेरी गेल्या.. सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आली.. आणि नवऱ्याला वाटत होतं,हक्काची बायको आली आहे घ्या हट्ट पुरवून.. म्हणुन मला दोसे करण्याचं फर्मान सोडले गेले.. मीसुद्धा आनंदाने तयार झाले आणि साबांना फोन करून डाळ तांदुळाचे प्रमाण विचारले... आणि रात्री डाळ तांदूळ भिजवून शांत झोपी गेले.. पण दुसर्‍या दिवशी डोसे करायला घेतले तर ते अगदी कडक कडक झाले मला तेव्हा पण काही कळल नाही.. माझा नवरा,साबु आणि भासरे तिघांनी काहीही न बोलता डोसे खाल्ले... आणि 8 दिवसा नंतर साबा आल्यावर सगळा खुलासा झाला की मी उडदाच्या डाळी ऐवजी बरबटीच्या डाळीचे डोसे बनवले होते.. आता खूप छान करते पण अजूनही डोसे केले की नवरा चिडवतो नक्की कोणत्या डाळीचे बनवले आहेत म्हणुन.. Lol

बरबटी कडधान्य माहीत असेल ना?>>>नाही माहित.
पण आधीही बरबटीची चर्चा झाली आहे असं आठवतंय.
पण डाळ कोणती ते नाही आठवत Happy

ओके.
पण मग दोस्यांसाठी चवळीची डाळ भिजवली? Uhoh

हो..उडदाची समजून.. तेव्हा खूप embarrassing feeling आलं होतं... पण आमच्या घरातल्या देवमाणसांनी मला काही एक जाणवू न देता ते डोसे खाल्ले.. आता आठवले की खूप हसायला येत.. आणि डोसे केले की ते हमखास आठवतं...

Pages