माझा स्वयंपाक गृहप्रवेश - भाग १

Submitted by शुभांगी. on 14 December, 2010 - 07:08

लग्न होईतो कुठल्याच नवरीला फुलटाईम हाऊसअ‍ॅटेंडंट या पदाची सवय नसते. घराजवळच्या पार्टटाईम जॉबवरुन उचलुन डायरेक्ट २०किमी अंतरावरच्या एम आय डी सी मधे पुर्णवेळ नोकरीला पाठवलेल्या उमेदवाराची जशी अवस्था होते अगदी तश्शीच होते लग्नाच्या पहिल्या काही दिवसात.

घरात नवीन पाळलेल्या माऊकडे किंवा भुभुकडे पहावे तसच लक्ष असत सगळ्यांच आपल्याकडे. ही चालते कशी? बोलते कशी? कसे कपडे घालते? आणि मुख्य म्हणजे स्वयपांक कसा करते? हे अगदी प्रश्नपत्रिकेतले कंपलसरी प्रश्न असतात. ऑप्शनला टाकायला काही सिलॅबसच शिल्लक नसतो.

माझं लग्न झाल (२०००) तेव्हा आजच्यासारखे हाताशी मोबाईल नव्हते उठसुठ, 'आई हे कस ग करायच' विचारायला आणि आईसाहेब पण राहायला ३५०किमी दूर, तेव्हा मारली टांग गाडीला की आणला पदार्थ रेडिमेड ही पण सोय नव्हती.

लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी सासुबाई म्हणाल्या अग आज्जीचा उपवास आहे आज थोडी उसळ करतेस का? आता आली का पंचाईत? मटकीची उसळ माहीती, मुगाची, चवळीची अगदी शेंगदाण्याची सुद्धा पण ही उपवासाची उसळ कसली??
कुणाला बर विचाराव? नवर्‍याला काही विचारण्याची सोयच नव्हती कारण तो माझ्यापेक्षा अजिबात हुशार नाही याची मला खात्री होती.

मग मोर्चा दिराकडे वळवला त्याने तर लांबुनच हात झटकले. आता सावजाच्या शोधात असलेल्या शिकार्‍यासारखी शोधायला लागले कोणी सापडतय का सांगायला म्हणुन.
सासुला विचाराव तर आपल अज्ञान उघडं पडेल आणि तेही सासुसमोर - कदापी शक्य नाही. नाक उडवुन पुढे गेले. साबांपेक्षा साबु कधीही चांगले अ‍ॅटलिस्ट कुठे गवगवा तरी करणार नाहीत म्हणुन त्यांना हळुच विचारले.
"अग तुमची साबुदाण्याची खिचडी म्हणजेच आमची उसळ" मी जितक्या हळु आवाजात त्यांना विचारल तेवध्याच भसाड्या आवाजात त्यांनी उत्तर दिले. कदाचित कॉलनीतल्या समस्त बायका-पुरुषांना कळलं असेल उसळ म्हणजे काय ते.

मानापमानाचा अजिबात विचार न करता मी स्वयपाक घराकडे वळले पण जाता जाता नवर्‍याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकायला विसरले नाही बघुन घेइन तुला नंतर या अर्थाचा.

साबांनी अगदी घाईघाईने साबुदाणे व शेंगदाण्याचा डबा कट्ट्यावर आदळला.
'मिरची, कोथिंबीर चिरुन आणि जिरं फोडणीत टाकतात हे माहितीये ना? की ते पण सासर्‍यांनाच विचारणार आहेस??'
कायपण ध्यान निवडलय हेमुने असे चेहर्‍यावर भाव आणत त्या परत बाहेर गेल्या.

मनात शंभर शिव्या देत आणि तोंडावर हसु आणत मी दाणे भाजायला घेतले. खरतर खुप रडायला येत होत मला अगदी आईची आठवण आली म्हणुन रडतेय या कारणाखाली स्वतःचा अपमान झाकता आला असता पण एवढ्यावर संपेल तर ती कला कसली??

शेंगदाणे भाजुन कुट करेपर्यंत निम्मे दाणे नवरा, दिर व समस्त बच्चेकंपनीच्या घशाखाली गेले होते. कसाबसा उरलेल्या दाण्यांचा कुट केला आणि गॅसवर कढई ठेवली. साबांनी सांगितल्याप्रमाणे मिरच्या कोथिंबीर धुवुन, चिरुन व जिरं कोरडे फोडणीत घातले तुपाच्या. फोडणी चांगली तडतडली. मिरच्यांचा ठसका उठला आणि ठसक्यात साबुदाण्याच लक्षात आल.

साबुदाणा पटकन नळाखाली धरला, चांगला धुतला व सगळ पाणी काढुन निथळत ठेवला. तोपर्यंत गॅस बारीक करायच राहुनच गेल आणि मिरची कोथिंबीर जिर्‍याने अमावस्येच्या रात्री चंद्र, चांदण्यानी असहकार पत्करावा तसा शह दिला. लगबगीने पुन्हा दोन मिरच्या चिरुन टाकल्या कढईत आणि कोथिंबीरीला काडीमोड दिला यावेळी. भिजवलेला साबुदाणा टाकला सोबत शेंगदाण्याचे कुट+चवीला साखर्+मीठ अंदाजे टाकले.

हा सगळा द्रावीडी प्राणायाम होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते, सगळ्यांची जेवण आटोपली होती आणि आज्जी नव्या सुनेच्या हातची खिचडी खायला एवढ्या आतुर होत्या जितकी मी सुद्धा माझ्या नवर्‍याला भेटायला नव्हते.

थोड्या वेळाने हातातल्या झार्‍याने खिचडी हलवली पण हाय रे देवा साबुदाण्याच्या एकीच बळ मला काही केल्या दुभंगता येइना. एकमेकांना त्यांनी इतक घट्ट पकडुन ठेवल होत जस जत्रेत मुलाचा हात आईने पकडावा तस. हा गुंता सोडवायचा म्हणजे डिव्हाईड अँड रुल पॉलिसी अ‍ॅप्लाय केली पाहिजे हा विचार करुन पुन्हा वाटीभर कुटाचा मारा केला. आता त्या कुटामधल्या सैनिकांनी पण आधीच शत्रुकटात सामिल झालेल्या साबुदाण्याशी हातमिळवणी केली. पुन्हा त्या गोळ्याच वजन ५०ग्रॅमने वाढलं.

बायको पहिल्यांदा स्वयपाकघरात कैतरी करतेय म्हणुन भरपेट डेबरा भरल्यावर नवर्‍याने चक्कर टाकली. आजुबाजुला कोणीच नाही हे पाहुन स्वारी जरा रंगातच आली दुपारी २.३०वा. माझ्या गळ्यात प्रेमाने हात टाकले आणि तेवढ्यातच माझ्या हातातला तापलेल्या झार्‍याने त्याच्या नाकाशी लगट केली.
एवढ्या रोमँटिक मुडमधे हा कोकलतोय का? म्हणुन मी मागे बघितले तर नाक मुठीत धरुन पळुन जाणे कशाला म्हणतात हे तेव्हा मला कळ्ळ.

बाहेरच्या खोलीतल्या आज्जीबाईंच्या चार आणि साबांच्या दोन हाका आल्यावर कशीबशी मी खिचडी डिशमधे काढली. वर चमचा, शेजारी लिंबु चिरुन ठेवल. पण चमचा काही केल्या खिचडीत शिरायच नावच घेइना. तोच तेवढा बिचारा माझ्याशी प्रामाणिक असावा.

आज्जींना खिचडी हातात दिली व कल्टी मारायच्या विचारात असताना साबांनी शेजारी जबरदस्तीने बसवल, दमली असशील ना खिचडी करुन म्हणुन.

आज्जीनी चमचा काढुन बाजुला ठेवला आणि मी हुश्श केल. हाताने पहिला घास घ्यायला आज्जींची झटापट बघुन सगळ्यांचे कान टवकारले व नजरा रोखल्या गेल्या खिचडीवर. पण नशिब नव्हत ना जोरावर माझं, पहिल्या घासाबरोबर पुर्ण गोळा उचलला गेला . आज्जी त्या गोळ्याकडे झुरळाकडे बघाव तस आश्चर्यमिश्रीत कुतुहलाने टुकुटुकु बघायला लागल्या. त्यांच्या हातातला गोळा ज्या दिशेने फिरेल त्या दिशेला सगळ्यांच्या नजरा फिरायला लागल्या. आता कुठे कुणाच्या अंगावर पडतो की कॉय म्हणुन सगळे सावरुन बसले आणि सभेत एकच हशा पिकला. Lol Lol

गुलमोहर: 

धन्यवाद सगळ्यांना.
आमचा प्रेवि आहे तेव्हा लग्नाआधी सासरी दोन्-तीनवेळा जाण झाल होत. पण स्वयंपाक घरातले सामानाचे डबे लक्षात ठेवण्यापेक्षा बाकीच्या बर्‍याच गोष्टी महत्वाच्या होत्या त्यावेळी Wink साबांना वाटल मला माहित असेल पण माझ ज्ञान यथातथाच तिथल म्हणुन तर हा सगळा घोळ.
बाकी त्या खुपच प्रेमळ आहेत Happy
स्वगत
कदाचित स्वतःच्या पसंतीची सुन आणता आली नाही याचा वचपा काढला की कॉय माझ्यावर अशी मलाही शंका आलेली तेव्हा Lol
स्वगत समाप्त

कायपण ध्यान निवडलय हेमुने असे चेहर्‍यावर भाव आणत त्या परत बाहेर गेल्या.>>> Rofl
शुकु Lol मस्त लिहिलं आहेस. पुढचा भाग वाचायला नक्कीच आवडेल.

बाकी.. तुमचा पण प्रेवि आहे तर. Wink

खिचडीला उसळ म्हणतात ते मलाही पहिल्यांदाच कळलं Happy

बाकी लेख एकदम खुसखुशित Happy

खिचडी मला प्रचंड प्रिय. माझे बाबा म्हणतात की प्रत्येक साबुदाणा खिचडीत वेगळा दिसेल अशा बेताने जिला/ज्याला भिजवता येईल ती/तो खरी/रा सुगरण.. Happy
मी पहिल्यांदा खिचडी केली तेव्हा पहिल्यांदा तेल जास्ती झालं म्हणून, मग भिजवलेला साबुदाणा घातला मग एकदम पांढरी दिसली म्हणून कुट वाढवलं, मग पुन्हा तेल कमी.. Sad ढिगभर खिचडी... मीठ,साखर सगळंच कमी.. पण फजिती जास्तीची Proud

पुलेशु! बाकिचे पदार्थ (प्रयोग) सवडीने टाक Happy

मी पहिल्यांदा खिचडी केली तेव्हा पहिल्यांदा तेल जास्ती झालं म्हणून, <<<
खिचडीत तेल??? दक्षे काय गं?

साबुदाण्याच्या खिचडीला उसळ म्हणतात हे पहिल्यांदीच समजले >>>. माझंही सासरी आल्यावर असंच व्हायचं. जन्मल्यापासून पुण्यात पण सासर मराठवाड्याचं त्यामुळे बरेच शब्द झेपायचे नाहीत आधी. (जसे की उभारणे , आम्ही फक्त गुढी उभारायचो ;)) उपासाच्या दिवशी नवरा म्हणाला उसळ कर, तेव्हा मी म्हटलं, तुझ्या घरी उपासाला उसळ चालते का ? तर तो म्हणे उसळच चालते बाकी काही नाही. मला कळेना, म्हणलं मग पोळ्या करु उसळीबरोबर की ब्रेड खाणार ? (उसळीबरोबर ब्रेड खातात हेही नव्याने मिळालेले ज्ञान होते, बहुधा बॅचलर्स करत असावेत.) तर तो हसायला लागला. तरी काही कळेना, मग जेव्हा मी उसळीसाठी मटार काढले तेव्हा त्याला घोळ कळला. असो. लेख मस्तच झालाय, अजून येऊदेत अनुभव.
बादवे, माझी साबुदाण्याची खिचडी मस्त होते एकदम, कधीच नाही बिघडत. Happy

ए, मी पण साचीखि तेलात करते. मला तीच आवडते. पाहिजे तर वरून थोडं तूप सोडावं ... यामुळे ती तुपट चव तोंडात रहात नाही ... अर्थात ज्याचा त्याचा चॉईस!

मवा, अगं पुण्याची ना तू . मग तू त्याला हसायचे , त्यानी नाही काही तुला. काय हे पुण्याचे नाव असे घालवायचे नाही काही. पुणेरी मराठी ही सर्वात शुद्ध मराठी आहे, विसरलीस की काय.
रच्याकने, आमच्या कॉलेज मधेही काही मुली म्हणायच्या 'उभारले, करुन राहिले , जाऊन राहिले' वगैरे त्याची आठवण झाली.

माझंही सासरी आल्यावर असंच व्हायचं. जन्मल्यापासून पुण्यात पण सासर मराठवाड्याचं त्यामुळे बरेच शब्द झेपायचे नाहीत आधी. <<<
मराठवाड्याच्या ऐवजी कोकण एवढाच काय तो बदल. बाकी सेम पिंच.
शब्दांबद्दलचा एक किस्सा पूर्वी टाकला पण होता माबोवर.. Happy

मवा, अगं पुण्याची ना तू . मग तू त्याला हसायचे , त्यानी नाही काही तुला. >>>> Biggrin अगं त्या एका हसण्याची त्याला नंतर किंमत मोजावी लागली ना, इतका त्या उसळीचा मी उद्धार करते. ;). साबा पहील्यांदा घरी रहायला आल्या तेव्हा (त्या शुक्कुरवार म्हणाल्या तेव्हा ) त्याने पहीले हेच सांगितले की आता जरा जपून शब्द वापर, नाहीतर ही हसेल. ;). साधे साधे शब्द पण वेगळे आहेत जसे की, तो पेन की ती पेन की ते पेन.
नी, लिंक दे. :).

मस्त लिहिलंय शुकु Happy

नवर्‍याला काही विचारण्याची सोयच नव्हती कारण तो माझ्यापेक्षा अजिबात हुशार नाही याची मला खात्री होती.>>>>>:फिदी:

मस्त लेख.
याच्यावरून कालनिर्णय मध्ये सई परांजपे यांनी लिहिलेला एक लेख आठवला.
त्यांना एका नियतकालिकाने सेलिब्रिटीची आवडती रेसिपी द्यायला सांगितली.
त्यांनी साबुदाणा खिचडीची कृती दिली. तेलात हिंग मोहरी हळद ही फोडणी वापरून केलेल्या.
सईबाईंचा साबुदाणा खिचडीशी संबंध फक्त आयती मिळालेली खिचडी आवडीने खाण्याइतपतच होता.

मस्त लेख, वाचल्यावर विचारणार होतो की हा खरा अनुभव आहे का, पण प्रतिक्रीयांवरून ते देखिल समजले, ....... खिचडीला उसळ म्हणतात तर उसळीला काय म्हणत असतील आणि खिचडी कशाला म्हणत असतील Uhoh ... ......... पुलेशु Happy

नी, मवा अगदी अगदी ग.
त्यांचे शब्द गेल्या १० वर्षात माझ्या लक्षात आले नाहीत अजुन. नवरा मात्र अजुनही काही बोलायच्या आधी मला विचारतो तुमच्या पुण्यात याला काय म्हणतात ते Lol
माझ्याकडे तर लिस्टच आहे अशा शब्दांची जी मी डिक्शनरी म्हणुन कित्येक वर्ष माझ्या स्वयपांक घरात ठेवली होती जसे
उसळ - साबुदाणा खिचडी
वाळुन घेणे - गुंडाळुन घेणे
घेउन घे - घे
डांगर - लाल भोपळा
गिलके - घोसावळे
नागली - नाचणी
रुमाल - टॉवेल
एकोणाविस - एकोणिस
दोडका - शिराळ
असे बरेच ज्यावरुन किस्से झालेत लग्नानंतर

Pages