माझा स्वयंपाक गृहप्रवेश - भाग १

Submitted by शुभांगी. on 14 December, 2010 - 07:08

लग्न होईतो कुठल्याच नवरीला फुलटाईम हाऊसअ‍ॅटेंडंट या पदाची सवय नसते. घराजवळच्या पार्टटाईम जॉबवरुन उचलुन डायरेक्ट २०किमी अंतरावरच्या एम आय डी सी मधे पुर्णवेळ नोकरीला पाठवलेल्या उमेदवाराची जशी अवस्था होते अगदी तश्शीच होते लग्नाच्या पहिल्या काही दिवसात.

घरात नवीन पाळलेल्या माऊकडे किंवा भुभुकडे पहावे तसच लक्ष असत सगळ्यांच आपल्याकडे. ही चालते कशी? बोलते कशी? कसे कपडे घालते? आणि मुख्य म्हणजे स्वयपांक कसा करते? हे अगदी प्रश्नपत्रिकेतले कंपलसरी प्रश्न असतात. ऑप्शनला टाकायला काही सिलॅबसच शिल्लक नसतो.

माझं लग्न झाल (२०००) तेव्हा आजच्यासारखे हाताशी मोबाईल नव्हते उठसुठ, 'आई हे कस ग करायच' विचारायला आणि आईसाहेब पण राहायला ३५०किमी दूर, तेव्हा मारली टांग गाडीला की आणला पदार्थ रेडिमेड ही पण सोय नव्हती.

लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी सासुबाई म्हणाल्या अग आज्जीचा उपवास आहे आज थोडी उसळ करतेस का? आता आली का पंचाईत? मटकीची उसळ माहीती, मुगाची, चवळीची अगदी शेंगदाण्याची सुद्धा पण ही उपवासाची उसळ कसली??
कुणाला बर विचाराव? नवर्‍याला काही विचारण्याची सोयच नव्हती कारण तो माझ्यापेक्षा अजिबात हुशार नाही याची मला खात्री होती.

मग मोर्चा दिराकडे वळवला त्याने तर लांबुनच हात झटकले. आता सावजाच्या शोधात असलेल्या शिकार्‍यासारखी शोधायला लागले कोणी सापडतय का सांगायला म्हणुन.
सासुला विचाराव तर आपल अज्ञान उघडं पडेल आणि तेही सासुसमोर - कदापी शक्य नाही. नाक उडवुन पुढे गेले. साबांपेक्षा साबु कधीही चांगले अ‍ॅटलिस्ट कुठे गवगवा तरी करणार नाहीत म्हणुन त्यांना हळुच विचारले.
"अग तुमची साबुदाण्याची खिचडी म्हणजेच आमची उसळ" मी जितक्या हळु आवाजात त्यांना विचारल तेवध्याच भसाड्या आवाजात त्यांनी उत्तर दिले. कदाचित कॉलनीतल्या समस्त बायका-पुरुषांना कळलं असेल उसळ म्हणजे काय ते.

मानापमानाचा अजिबात विचार न करता मी स्वयपाक घराकडे वळले पण जाता जाता नवर्‍याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकायला विसरले नाही बघुन घेइन तुला नंतर या अर्थाचा.

साबांनी अगदी घाईघाईने साबुदाणे व शेंगदाण्याचा डबा कट्ट्यावर आदळला.
'मिरची, कोथिंबीर चिरुन आणि जिरं फोडणीत टाकतात हे माहितीये ना? की ते पण सासर्‍यांनाच विचारणार आहेस??'
कायपण ध्यान निवडलय हेमुने असे चेहर्‍यावर भाव आणत त्या परत बाहेर गेल्या.

मनात शंभर शिव्या देत आणि तोंडावर हसु आणत मी दाणे भाजायला घेतले. खरतर खुप रडायला येत होत मला अगदी आईची आठवण आली म्हणुन रडतेय या कारणाखाली स्वतःचा अपमान झाकता आला असता पण एवढ्यावर संपेल तर ती कला कसली??

शेंगदाणे भाजुन कुट करेपर्यंत निम्मे दाणे नवरा, दिर व समस्त बच्चेकंपनीच्या घशाखाली गेले होते. कसाबसा उरलेल्या दाण्यांचा कुट केला आणि गॅसवर कढई ठेवली. साबांनी सांगितल्याप्रमाणे मिरच्या कोथिंबीर धुवुन, चिरुन व जिरं कोरडे फोडणीत घातले तुपाच्या. फोडणी चांगली तडतडली. मिरच्यांचा ठसका उठला आणि ठसक्यात साबुदाण्याच लक्षात आल.

साबुदाणा पटकन नळाखाली धरला, चांगला धुतला व सगळ पाणी काढुन निथळत ठेवला. तोपर्यंत गॅस बारीक करायच राहुनच गेल आणि मिरची कोथिंबीर जिर्‍याने अमावस्येच्या रात्री चंद्र, चांदण्यानी असहकार पत्करावा तसा शह दिला. लगबगीने पुन्हा दोन मिरच्या चिरुन टाकल्या कढईत आणि कोथिंबीरीला काडीमोड दिला यावेळी. भिजवलेला साबुदाणा टाकला सोबत शेंगदाण्याचे कुट+चवीला साखर्+मीठ अंदाजे टाकले.

हा सगळा द्रावीडी प्राणायाम होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते, सगळ्यांची जेवण आटोपली होती आणि आज्जी नव्या सुनेच्या हातची खिचडी खायला एवढ्या आतुर होत्या जितकी मी सुद्धा माझ्या नवर्‍याला भेटायला नव्हते.

थोड्या वेळाने हातातल्या झार्‍याने खिचडी हलवली पण हाय रे देवा साबुदाण्याच्या एकीच बळ मला काही केल्या दुभंगता येइना. एकमेकांना त्यांनी इतक घट्ट पकडुन ठेवल होत जस जत्रेत मुलाचा हात आईने पकडावा तस. हा गुंता सोडवायचा म्हणजे डिव्हाईड अँड रुल पॉलिसी अ‍ॅप्लाय केली पाहिजे हा विचार करुन पुन्हा वाटीभर कुटाचा मारा केला. आता त्या कुटामधल्या सैनिकांनी पण आधीच शत्रुकटात सामिल झालेल्या साबुदाण्याशी हातमिळवणी केली. पुन्हा त्या गोळ्याच वजन ५०ग्रॅमने वाढलं.

बायको पहिल्यांदा स्वयपाकघरात कैतरी करतेय म्हणुन भरपेट डेबरा भरल्यावर नवर्‍याने चक्कर टाकली. आजुबाजुला कोणीच नाही हे पाहुन स्वारी जरा रंगातच आली दुपारी २.३०वा. माझ्या गळ्यात प्रेमाने हात टाकले आणि तेवढ्यातच माझ्या हातातला तापलेल्या झार्‍याने त्याच्या नाकाशी लगट केली.
एवढ्या रोमँटिक मुडमधे हा कोकलतोय का? म्हणुन मी मागे बघितले तर नाक मुठीत धरुन पळुन जाणे कशाला म्हणतात हे तेव्हा मला कळ्ळ.

बाहेरच्या खोलीतल्या आज्जीबाईंच्या चार आणि साबांच्या दोन हाका आल्यावर कशीबशी मी खिचडी डिशमधे काढली. वर चमचा, शेजारी लिंबु चिरुन ठेवल. पण चमचा काही केल्या खिचडीत शिरायच नावच घेइना. तोच तेवढा बिचारा माझ्याशी प्रामाणिक असावा.

आज्जींना खिचडी हातात दिली व कल्टी मारायच्या विचारात असताना साबांनी शेजारी जबरदस्तीने बसवल, दमली असशील ना खिचडी करुन म्हणुन.

आज्जीनी चमचा काढुन बाजुला ठेवला आणि मी हुश्श केल. हाताने पहिला घास घ्यायला आज्जींची झटापट बघुन सगळ्यांचे कान टवकारले व नजरा रोखल्या गेल्या खिचडीवर. पण नशिब नव्हत ना जोरावर माझं, पहिल्या घासाबरोबर पुर्ण गोळा उचलला गेला . आज्जी त्या गोळ्याकडे झुरळाकडे बघाव तस आश्चर्यमिश्रीत कुतुहलाने टुकुटुकु बघायला लागल्या. त्यांच्या हातातला गोळा ज्या दिशेने फिरेल त्या दिशेला सगळ्यांच्या नजरा फिरायला लागल्या. आता कुठे कुणाच्या अंगावर पडतो की कॉय म्हणुन सगळे सावरुन बसले आणि सभेत एकच हशा पिकला. Lol Lol

गुलमोहर: 

बायको पहिल्यांदा स्वयपाकघरात कैतरी करतेय म्हणुन भरपेट डेबरा भरल्यावर नवर्‍याने चक्कर टाकली. आजुबाजुला कोणीच नाही हे पाहुन स्वारी जरा रंगातच आली दुपारी २.३०वा. माझ्या गळ्यात प्रेमाने हात टाकले आणि तेवढ्यातच माझ्या हातातला तापलेल्या झार्‍याने त्याच्या नाकाशी लगट केली.
एवढ्या रोमँटिक मुडमधे हा कोकलतोय का? म्हणुन मी मागे बघितले तर नाक मुठीत धरुन पळुन जाणे कशाला म्हणतात हे तेव्हा मला कळ्ळ.

बढीया लिहीले

आता सावजाच्या शोधात असलेल्या शिकार्‍यासारखी शोधायला लागले कोणी सापडतय का सांगायला म्हणुन.

"अग तुमची साबुदाण्याची खिचडी म्हणजेच आमची उसळ" मी जितक्या हळु आवाजात त्यांना विचारल तेवध्याच भसाड्या आवाजात त्यांनी उत्तर दिले. कदाचित कॉलनीतल्या समस्त बायका-पुरुषांना कळलं असेल उसळ म्हणजे काय ते

मिरची, कोथिंबीर चिरुन आणि जिरं फोडणीत टाकतात हे माहितीये ना? की ते पण सासर्‍यांनाच विचारणार आहेस??'

आज्जी नव्या सुनेच्या हातची खिचडी खायला एवढ्या आतुर होत्या जितकी मी सुद्धा माझ्या नवर्‍याला भेटायला नव्हते.

पण चमचा काही केल्या खिचडीत शिरायच नावच घेइना. तोच तेवढा बिचारा माझ्याशी प्रामाणिक असावा

एवढ्या रोमँटिक मुडमधे हा कोकलतोय का? म्हणुन मी मागे बघितले तर नाक मुठीत धरुन पळुन जाणे कशाला म्हणतात हे तेव्हा मला कळ्ळ

आज्जी त्या गोळ्याकडे झुरळाकडे बघाव तस आश्चर्यमिश्रीत कुतुहलाने टुकुटुकु बघायला लागल्या. त्यांच्या हातातला गोळा ज्या दिशेने फिरेल त्या दिशेला सगळ्यांच्या नजरा फिरायला लागल्या. आता कुठे कुणाच्या अंगावर पडतो की कॉय म्हणुन सगळे सावरुन बसले आणि सभेत एकच हशा पिकला. :हा

वरची सगळी वाक्ये भन्नाट खुमासदार...... फार खुसख्शीत लेखन. ... Happy

Rofl Rofl मज्जाच आली असेल नाही..
खिचडीसाठी साबूदाणे आयत्यावेळी भिजवलेस तेव्हाच कळले पुढे काय होणार ते. Lol Lol
बिच्चार्‍या आजी...

मस्तच ! Lol Lol
लेख वाचायला चालू केल्यापासून हसू येत होतं ते शेवटच्या दोन-तीन वाक्यांनी फस्सकन बाहेर पडलं.
सगळं विज्युअलाईझ झालं. खूप आवडली तुमची खिचडी.

मस्त लिहिलंय Happy

तू एकवेळ साबुदाणा आयत्यावेळी भिजवलास ते एकवेळ समजू शकते Wink पण साबांनीसुद्धा आयत्यावेळीच साबुदाणा आणि शेंगदाणे तुझ्या समोर ठेवले म्हणजे... Uhoh

बाकी लेखन एकदम खुसखुशीत.

तू एकवेळ साबुदाणा आयत्यावेळी भिजवलास ते एकवेळ समजू शकते डोळा मारा पण साबांनीसुद्धा आयत्यावेळीच साबुदाणा आणि शेंगदाणे तुझ्या समोर ठेवले म्हणजे...<<
हो मला पण हाच प्रश्न पडला...
लेख छान... Happy

छान लिहिलंय Happy
साबांनीसुद्धा आयत्यावेळीच साबुदाणा आणि शेंगदाणे तुझ्या समोर ठेवले म्हणजे... >>> म्हणजे चुक तुझी नाही , नाहीतर खिचडी नक्की जमली असती तुला Happy

लेख छान Happy
तू एकवेळ साबुदाणा आयत्यावेळी भिजवलास ते एकवेळ समजू शकते पण साबांनीसुद्धा आयत्यावेळीच साबुदाणा आणि शेंगदाणे तुझ्या समोर ठेवले म्हणजे... >>> नेमकं हेच मनात आलं लेख वाचता वाचता. शक्यता दोनच. एकतर तुमच्या सासूबाईंचेही पाककलेतील ज्ञान यथातथाच असावे नाहीतर त्यांनी जोरदार गुगली टाकली आणि तुमची सहज विकेट पडली Proud Light 1

Pages