नैरोबीमधले गुलाब

Submitted by दिनेश. on 13 December, 2010 - 12:55

गुलाबांच्या फूलांचे मला लहानपणापासून आकर्षण आहे. मालाडला आमच्या घरी अनेक प्रकारचे गुलाब जोपारले होते. पण पुढे काही बांधकाम झाल्याने ते टिकले नाहीत.

अंधेरीला भवन्स कॉलेजच्या आवारात मी पहिल्यांदा मोठी गुलाबाची बाग बघितली. नंतर बघितली ती, वरळीला नेहरु सेंटरच्या समोर. आधी तिथे मोठी गुलाबाची बाग होती. पण आता ती नष्ट झालीय. तिथे आता एक बाग आहे पण बागेत गुलाबाची झाडे नाहीत.

मस्कतमधल्या कुरुम रोझ गार्डन ची निर्मिती होत असताना मी तिथेच होतो. तिथल्या उष्ण हवेत गुलाब फुलतील का, याची मला काळजी वाटत होती. पण अत्यंत परिश्रमाने ती बाग निर्माण केली गेली. ती फूलायला लागल्यावर तिथल्या माळीबुवांइतकाच मला आनंद झाला होता.

मुंबईत भरणारी गुलाबांच्या फूलांची प्रदर्शने मी अजिबात चुकवत नसे. ती अजूनही भरत असावीत.
झूरीकमधे मी अनेकवेळा निरुद्देश भटकत असायचो, त्यावेळी देखील तिथले अल्पाईन गुलाब बघत बसायचो. पण या सगळ्य काळात डिजीट्ल कॅमेरा नव्हता.

गेल्या १६ वर्षातील ७ वर्षांपेक्षा जास्त काळ मी आफ्रिकेतील विविध शहरांत वास्तव्य केले आहे. अजूनही अनेकजण या खंडाचा, देश म्हणून उल्लेख करतात. या खंडात तीन टोकाला (अल्जीरिया, सोमालीया आणि दक्षिण आफ्रिका ) तीन मोठी वाळवंटे असली तरी इथल्या नद्या आणि सरोवरांमूळे हिरवाई देखील आहे. अदीस अबाबा, नैरोबी सारखी शहरे तर एखाद्या हिलस्टेशन इतकी थंडगार आहेत. किलिमांजारो आणि केनया हे दोन बर्फाच्छादित पर्वत इथे आहेत.

नैरोबी आणि परिसरात गुलाबांची लागवड शेकडो एकरात झालेली आहे. इथून गुलाबांची निर्यात होते. माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर फूटपाथवर एक माणूस केवळ गुलाबफूले विकत असतो.
त्याच्याकडे २०/२२ बादल्यात निव्वळ गुलाबांची ताजी फूले असतात आणि ती तितक्याच प्रकारची देखील असतात.

निर्यातीसाठी किंवा विकण्यासाठी जी फूले असतात ती साच्यातून काढल्यासारखी, अगदी एकासारखी एक असतात. इथली हवा गुलाबांना चांगलीच मानवते, इथे कुठेही गुलाब दिसू शकतात. पेट्रोल पंप, फूटपाथ अशा ठिकाणी पण. कधी कधी तर अगदी कचर्‍यात ती फूलतात. आणि वीतभर वाढलेल्या झाडाला टपोरे फूल आलेले दिसते.

आणि या फूलांत रंग आणि आकार यात खूप विविधता दिसते. तर असेच काही निवडक गुलाब, तूमच्यासाठी पेश करतोय.

यातला एक फोटो सोडला, तर बाकीचे सर्व फोटो झाडावरच्या फूलांचे आहेत. काही फोटो मी क्रॉप न करता तसेच ठेवलेत, कारण, ते कूठे फूलले होते त दाखवायचे होते. काहि फोटो अपूर्‍या प्रकाशात काढले आहेत. इथे निरभ्र आकाश क्वचितच असते.

या फूलांचे म्हंटले तर एकच वैगुण्य. यांना अजिबात सुगंध नसतो. इथल्या थंड हवेत सुगंधाच्या कुप्या तशाही उघडल्या नसत्याच.

एक

दोन

तीन

चार

पाच

सहा

सात

आठ

नऊ

दहा (हा फोटो मी इथल्या देवळात काढला होता, फूलांच्या अनोख्या रंगासाठी )

अकरा

बारा

तेरा

चौदा

पंधरा

सोळा

सतरा

अठरा

एकोणीस

वीस

एकवीस

बावीस

गुलमोहर: 

अरे सहीच ! किती वेगवेगळे रंग.
४ नं चा रंग माझा खूप लाडका.
१० नं च्या फुलांचं शेडिंग मस्तच आहे.

वा... कच-यात पण काय मस्त भरगच्च फुल आलेय...
तो बादलीवाला पण टाकायचा ना....

रच्याकने, बेलापुरची हवा गुलाबाला मानवत नाही. माझ्याजवळ ६ कलमे होती आता दोनच उरली Sad

दिनेश, कसले मस्त आहेत गुलाब. दहाव्या फोटोतले तर मस्तच आहेत. आणि बाराव्यातल्या फुलाचा मखमाली पोत.

खूप पूर्वी पुण्याच्या टिळक स्मारक मध्ये प्रदर्शनात 'रॉयल हायनेस' म्हणून एक गुलाब पाहिला होता. त्या वर्षीचा तो विजेता होता. ते फूल अजून मनातून गेलेले नाही. गावठी गुलाबाचा गुलाबी रंग, टी ऱोजचा उभा कोनीकल आकार आणि मंद पण शाही गंध. 'रॉयल हायनेस' नाव सार्थ ठरवले होते बेट्याने! Happy

किती छान Happy

दिनेश

सुंदरच आहेत गुलाब,
माझ्याकडे ९ आणि १५ नंबर सारखे गुलाब आहेत. १५ सारख झाड बहरलं की छान बहरतं पण मधेच २,४ महिने काहीच येत नाही. काय होत काही कळत नाही. ९ सारख्या झाडाला एका वेळी एकच फुल येतं.

सुधीर

जो, आपल्याकडे गुलाब सिझनल असतात. झाडांना मधे विश्रांतीची गरज असते.
इथेही नऊ ला एकच फूल येते. एक, पंधरा आणि सोळा गुच्छामधे येतात.

माधव, मला वाटतं आपल्याकडे रोझ सोसायटी आहे. त्यांचे सारखे प्रयोग चाललेले असतात. मध्य रेल्वे कडे उत्तम कलेक्शन आहे, गुलाबांचे. यापेक्षा वेगवेगळे रंग आणि आकार बघितलेत मी. पण ती कलमे विकायला नसतात सहसा. आणि घरी हौसेने आणलेल्या कलमांना तशीच फूले येत नाहीत.

साधना म्हणते तसे कदाचित मुंबईची हवा मानवत नसेल. पण मी बघितलेल्या काही बागा, तर मुंबईमधेच जोपासलेल्या आहेत.
पण पूणे, सातारा भागात छान येतात फूले.

सुर्रेख फोटोज.. नजर सुद्धा ठरत नसेल त्यांच्यावर प्रतुअक्षात.. गुलाबी रंगाची शेड मनमोहन आहे अगदी Happy

आता बहुतेक फेब्रुवारी मधे, माटुंग्याच्या व्ही जे टी आय मधे आणि / किंवा भायखळ्याला राणीच्या बागेत फ्रेंड्स ऑफ ट्रीज या संस्थेचे प्रदर्शन असते. त्याच्या तारखांवर नजर ठेवावी लागते कारण ते एक्/दोन दिवसच असते. तिथे रेल्वे तर्फे अनेक प्रवेशिका असतात. पण त्यांची बाग कुठे आहे याची कल्पना नाही.
राणीच्या बागेतही काही उत्तम गुलाब आहेत.

राणीबागेतले प्रदर्शन नेहमी जानेवारीच्या शेवटाच्या आठवड्यात असते/फेब्च्या पहिल्या आठवड्यात... पेपरात जाहिरात येते. त्याचवेळी त्यांनी बागकामावर एकाखदोन वर्कशॉप्स पण ठेवलेली असतात.

प्रदर्शनात ठेवलेली सरकारी ऑफिसांमधली बहरलेली फुले पाहिली की धक्का बसतो, सरकारी ऑफिसातसुद्धा असल्या आवडी जोपासणारे लोक आहेत हे पाहुन...

तो सगळा प्रकार अगदी पाहण्यालायक असतो.. मी गेले चार वर्षे मिसतेय. या वर्षी जाणार.

आपल्याकडे असले गुलाब उघड्यावर सुरक्षित राहणार नाहीत. इथे मात्र फुले झाडावरुन तोडायची प्रथा नाही. (त्यासाठी वेगळी फूले मिळतात.)
याउलट नायजेरियात. आम्हाला पूजेसाठी सुद्धा फुले मिळायची नाहीत. मग जंगलात घुसून आम्ही फूले गोळा करायचो.
अगदी करुण प्रसंग म्हणजे, आमच्या ऑफिसातच एकाचा मृत्यू झाला, त्यांच्या पार्थिवावर वहायला देखील कुठे फूले मिळाली नाहीत.

उटीला पण मस्त गुलाबांच्या फुलांचा बगिचा आहे. आणि हो १ विचारायच होते के, गुलाबाला फळ येतात का? माझ्या घराशेजारी बोरांसारखी फळ आली आहे फोटो काढायचा कंटाळा आला आहे. पण आता जाउन काढूनच येते.

हो गुलाबांना इथे फळे येतात (बावीस नंबरमधे उजव्या बाजूला अंधूक केशरी रंगाचे दिसतेय) त्यांना रोझ हिप्स म्हणतात. त्यांचे सरबत करतात. आत पेरुच्या बियांसारख्या बिया असतात आणि त्या केसाळ असतात.

अखी सुंदर आहे तुझा गुलाब.

साधना ते प्रदर्शन लागल की मला नक्की सांग असही आम्ही पुढच्या आठवड्यात राणिच्या बागेत श्रावणीला घेउन जाणार होतो. मग तेंव्हाच जाऊ.

दिनेशदा इथल्याही काही गावठी गुलाबांना बिया लागतात पण त्याचे रोपात रुपांतर नाही होत.

सर्वच फुले मस्त. प्रत्येकाचे वेगवेगळे वर्णन करणे अशक्य. छान वाटले टपोरे गुलाब पाहून. हल्ली अशी फुले दिसत नाहीत.

Pages