फ्राईड चिकन अ‍ॅपेटायझर

Submitted by prady on 8 December, 2010 - 15:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१)चिकन बाईट साईझ तुकडे करून ( ग्रोसरी स्टोअर मधे बरेचदा थिनली स्लाईस्ड चिकन ब्रेस्ट मिळतात ते सोपे पडतात पटकन तुकडे करून घ्यायला.) साधारण १ पाउंड
२)तळणी साठी तेल

मॅरिनेशन साठी
१) आलं,लसूण, मिरची,कोथिंबीर पेस्ट
२)मीठ
३)मीरपूड
४) १ अंडं
५) कॉर्नफ्लोअर
६)शानचा तंदूरी चिकन मसाला १ छोटा चमचा
७)तिखट १ टीस्पून
सॉस साठी
१)टोमॅटो केचप १ टेबलस्पून
२)सोय सॉस १ टीस्पून
३)हॉट सॉस १ टीस्पून
४)बारीक चिरलेले आलं, लसूण, हिरवी मिरची
५)स्प्रिंग ओनियन ४-५
६)कांदा १ छोटा बारीक चिरून
७)भोपळी मिरची बारीक चिरून २ टेबलस्पून
८)चवी प्रमाणे मीठ मीरपूड

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम चिकन साफ करून त्याचे बाईट साईझ तुकडे करून घ्यावेत.
२) चिकनला मीठ,मिरपूड,(आलं+लसूण्+मिरची+कोथिंबीर) पेस्ट लावून मुरवावं.
३) करायला घेते वेळी ह्या चिकन मधे एक अंडं फेटून घालावं. गरजे प्रमाणे कॉर्नफ्लोअर्,तिखट,शानचा तंदूरी चिकन मसाला घालावा.
४)आता हे तुकडे तेलात तळून घ्यावेत.
५)सर्व तुकडे तळून झाल्यावर एका पातेल्यात थोडे तेल तापवावे.
६)आलं,लसूण,मिरची, पातीचा कांदा, कांदा,भोपळी मिरची असे क्रमा क्रमाने परतावे.
७)त्यात टोमॅटो केचप, सोय सॉस, हॉट सॉस, मीठ,मीरपूड घालावे. सर्वात शेवटी तळलेले चिकन मिक्स करावे.

234 copy.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा: 

चिकन मुरवल्या नंतर लागणारा वेळ साधारण ३० मिनिटे. चिकन मी शक्यतो ओव्हरनाईट मॅरिनेट करते. थंडीच्या दिवसात हे चिकन आणी जोडीला स्वीट कोर्न सूप, हाक्का नूडल्स आणी व्हेज स्टरफ्राय असा मस्त मेनू होतो.

माहितीचा स्रोत: 
आमच्या ईथे "बांबू गार्डन" नावाचं ईंडो चायनीज रेस्टॉरंट आहे. तिथे "चिकन लात माय के" अशा अजब नावाची एक अफलातून डिश मिळते. ती डिश नजरे समोर ठेऊन आणी अर्थातच थोडी मदत अंतरजालाचीही.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर बर Happy

प्रॅडी , मस्तच ! या वीकएंडला पार्टीसाठी मेन्यू शोधतेच आहे. Happy
सिंडे , सायो -- पनीर नाही मिळाले तर प्लीज बटाटे घालू नका हं . Wink Proud

प्रज्ञा, फोटो सही आहे. परवा पार्टीसाठी नवर्‍याला देते करायला रेसिपी.
हसता काय ग बटाट्यांना.. मी चिकन खात नाही, पनीर मला आवडत नाही. मग आम्ही हा पदार्थ खाऊच नये की काय Happy

प्रॅडी, अफलातून फोटो आणि चवीलाही तितकंच छान लागत असणार. एकदम तोंपासु Happy
बाकी पनीर घालून ही रेसिपी खरंच छान होईल ( आणि प्रॅडी म्हणते तसं बरोबर बेबी कॉर्न घालूनही ). बटाटे आणि पनीर घालून पांढरा रस्सा म्हणजे अल्टिमेट अपमान होता Proud

३१st च्या मेन्युत हे स्टार्टर एकदम बेस्ट जाईल....
धन्स गं एवढी मस्त रेसिपी दिल्याबद्द्ल. पनीरही मस्त जाईल....

(ज्यांना वांगी/भेंडी/दुधी/पडवळ्/गिलकी/दोडके इ.इ. वापरुन कराविशी वाटतात त्यांनी ती करावीत, त्याची चर्चा इथे करुन आमच्या तोंडाची चव घालवु नये Light 1 )

वॉव.. मस्त रेसिपी आहे. भारी लागत असणार! मेन्यूही मस्त आहे.

सायो, सिंडी- पनीर काय? तोफू घाला. गो हेल्दी! Wink
फ्लॉवरचे तुरेही मस्त लागतील.

आई ग.... गुरुवारीच नेमकी पाहीली ही रेसिपी. लगेच जाउन बनवतापण नाही येणार. पण हा रविवार ह्या रेसिपीसाठी दिला.

जबरी फोटो!
माझ्या सुगरणपणाच्या कमाल मर्यादा पाहता मी ट्राय केलंच तर 'माकाचु' मध्ये पोस्ट नक्की! Proud Wink

प्रज्ञा, अफलातून पाकृ आहे. मी शाकाहारी, पण अंडं घालेन. बरेच दिवस शोधत होते ही पाकृ, थँक्स!!

फक्त सायो, सिंडी आणि इतर शाकाहारींसाठी (हे वाचूनच ज्यांच्या तोंडाची चव जाणार असेल त्यांनी कृपया वाचू नये) : इकडच्या हॉटेलांमध्ये 'व्हेज क्रंची' नावाने स्टार्टर मिळतं ते असंच असतं, दिसतं आणि चवीलाही असंच लागतं. त्यात पनीर, बेबी कॉर्न, भेंडी (होय!), भो. मिरची, छोटे कांदे, बेबी गाजरं किंवा गाजराचे चौकोनी तुकडे असतात. करून पहा.

जबराट रेसिपी आहे..घरातल्या चायनिज वेड्यांच नक्की समाधान होईल या डिशनी अस वाटतय Happy

उद्या नाहीतर परवाच नक्की..धन्यवाद एवढी सोपी रेसिपी शेअर केल्याबद्दल Happy

मस्त

मंजुतै, तुमची स्पॉइलर वॉर्निंग पाहिल्यावर लगेच डोळे मिटुन घेतले आणि प्रतिसाद संपल्यावरच उघडले बै.... Happy

प्रज्ञा, काल रात्रीच्या जेवणात हे चिकन केलं. दोन-तीन बारकेसे बदल म्हणजे शॅलो फ्राय केलं, तंदूरीचिकन मसाला नव्हता म्हणून कढाई चिकन मसाला घातला आणि सॉससाठी चिरण्या ऐवजी आलं लसूण बारिक किसून घेतलं. सॉस जरा जास्त झाल्यामुळे चिकन तुकडे कोरडे (अ‍ॅपेटायझर स्टाइल) न होता भाताबरोबर खाता आले. घरी मंडळींनी प्रचंड आवडून खाल्लं. पाककृतीबद्दल धन्यवाद!

chicken-pradystyle.JPG

Pages