कैरीची उडदमेथी

Submitted by शैलजा on 26 November, 2010 - 11:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ कोवळ्या कैर्‍या - बाठे नसलेल्या उत्तम.
१ वाटी खोबरे
२- ३ लाल सुक्या मिरच्या
मसाल्यातल्या छोट्या चमच्याचे माप - १ चमचा तांदूळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा धणे, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद. मीठ, फोडणीसाठी हिंग अणि मोहरी, १ चमचा तेल.
किंचितसा गूळ.

क्रमवार पाककृती: 

१. कैरीची साले काढून्, मध्यम आकाराचे तुकडे करुन वाफवून घ्यावी. कोवळी कैरी असेल तर लगेच शिजते, तेह्वा वेगळी वाफवायचीही गरज पडत नाही. कैरीच्या सालांची मस्त चटणी होते, फेकायला नकोत. : )
२. वाटण - खोबरे, लाल सुक्या मिरच्या, धणे व हळदीचे वाटण करुन घ्यावे.
३. तांदूळ, उडीद डाळ्,मेथी आणि मोहरी किंचित तेलात परतून घ्यावी, व वरील वाटणात घालून पुन्हा वाटून घ्यावे.
४. पातेल्यात हिंग मोहरीची तेलावर फोडणी करुन त्यावर वाफवलेले कैर्‍यांचे तुकडे घालावेत. कोवळ्या न वाफवलेल्या कैर्‍यांचे तुकडे घतले तर त्यांबरोबर थोडेसे पाणी घालून जरा शिजू द्यावे. कैरी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही.
५. कैरी जरा बोटचेपी शिजली की त्यावर वाटण घालून बेताने आमटीसारखी कन्सिस्टन्सी होईल असे, इतपत पाणी घालायचे व जरा उकळी फुटू लागली की गूळ घालायचा.
६. चवीनुसार मीठ घालायचे. खूप उकळी काढायची नाही, एका उकळीनंतर गॅस बंद करायचा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जहबहरी! काल केली होती. कैरीचा आंबटपणा आणि मेथ्या, लालमिरचीचा तिखटपणा. जियोच. मी खोबरं जास्त घातल्याने जरा दाट झाली. पोळीबरोबर खाता येण्यासारखी.
धन्यवाद शैलजा. आणि ही पाकृ सुचवल्याबद्दल मंजूडी आणि अल्पनालाही. Happy

इन्टरेस्टिंग चव येते एकदम Happy आज केली आहे. तांदूळ-उडिद डाळ-मेथ्या हे मस्त कॉम्बो आहे. अशा चवीचं पहिल्यांदाच खाल्लं काहीतरी, आवडलं. धन्यवाद. (कोलंबीची खायला मिळाली, तर बहार येईल :))

Pages