मी वळूनी हासले - चुकले जरासे

Submitted by सांजसंध्या on 26 November, 2010 - 05:02

मी वळूनी हासले - चुकले जरासे (गझल)

प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे
उत्तराशी थांबले, चुकले जरासे

शीळ त्याची ओळखीची रानभूली
मी वळूनी हासले - चुकले जरासे

पाळले ना भान तू मज छेडतांना
लाजले मी लाजले, चुकले जरासे

भावनांना बांधले त्या, धुंद राती
आज का सैलावले चुकले जरासे

बंद होते द्वार माझे तव सुरांना
का कशी नादावले - चुकले जरासे

रोखले मी आसवांच्या आठवांना
शेवटी रागावले - चुकले जरासे

सोडतांना गांव जे मन घट्ट केले
त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे

सांजछाया दाटल्या या अंगणाशी
मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे

संध्या
२६.११.२०१०

गुलमोहर: 

सुरेश भटांची पण एक अशीच गझल आहे. ती खाली देत आहे:

मी कशाला जन्मलो, चुकलेच माझे
या जगाशी भांडलो, चुकलेच माझे

मान्य ही केलेस तू आरोप सारे
मी खुळा भांबावलो, चुकलेच माझे

भोवतीचे चेहरे सुतकीच होते
एकटा मी हासलो, चुकलेच माझे

चालताना ओळखिचे दार आले
मी जरासा थांबलो, चुकलेच माझे

वाट माझ्या चार शब्दांचीच होती
मी न काही बोललो, चुकलेच माझे

पाहिजे पुजेस त्यांना प्रेत माझे
मी जगाया लागलो, चुकलेच माझे
- कवी: सुरेश भट

मक्ता सुरेख आहे.

गझलही चांगलीच झाली आहे. आपल्याला शुभेच्छा! आधी पाहिली नाही याबद्दल क्षमस्व!

-'बेफिकीर'!

क्षमस्व!

तुमचे नांव (सदस्यनाम) परत वाचल्यावर हा प्रतिसाद देत आहे.

तो 'मक्ता' नव्हे.

शेवटचा शेर चांगला आहे.

-'बेफिकीर'!

या गझलेच्या फायनल रेकॉर्डिंगची लिंक काही सापडली नाही. पण शोधत असताना कच्चं रेकॉर्डिंग जे संध्येच्या आवाजात केलं गेलंय ते इथं देतोय. अर्थात परवानगीनेच.

http://www.4shared.com/mp3/GyOODcEY/mi_valuni_hasale_new.html

Pages