मी वळूनी हासले - चुकले जरासे

Submitted by सांजसंध्या on 26 November, 2010 - 05:02

मी वळूनी हासले - चुकले जरासे (गझल)

प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे
उत्तराशी थांबले, चुकले जरासे

शीळ त्याची ओळखीची रानभूली
मी वळूनी हासले - चुकले जरासे

पाळले ना भान तू मज छेडतांना
लाजले मी लाजले, चुकले जरासे

भावनांना बांधले त्या, धुंद राती
आज का सैलावले चुकले जरासे

बंद होते द्वार माझे तव सुरांना
का कशी नादावले - चुकले जरासे

रोखले मी आसवांच्या आठवांना
शेवटी रागावले - चुकले जरासे

सोडतांना गांव जे मन घट्ट केले
त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे

सांजछाया दाटल्या या अंगणाशी
मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे

संध्या
२६.११.२०१०

गुलमोहर: 

चुकुनी गझल वाचावयास आले - चुकले जरासे Wink

बेहद्द आवडली.

मला गझलेतले विशेष कळत नाही. पण शीर्षक वाचून वाचायचा मोह झाला आणि वाचून आवडली. Happy

काही बदल केलाय का आता?? Uhoh

"मी वळूनी हासले - चुकले जरासे बदलून" असं शीर्षक वाचायला फार विनोदी वाटतंय Wink

खूप दिवसांपूर्वी कुणीतरी एक शेर ऐकवला होता.. नीटसा लक्षात नाही.

मी जरासा वाकलो चुकले कुणाचे ...ही ओळ मनात कुठेतरी राहीली आणि आज एक गझल बाहेर पडली... ही गझल मात्र त्या अज्ञात शेरकर्त्यास अर्पण !

आवडली Happy

गंगाधरजी, विशाल धन्यवाद

हबा.. तुम्ही विपु मधे केलेली सूचना सर आंखो पर.. मलाही तसंच वाटत होतं. या आधी मतला मी असा घेतला होता..

प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे
उत्तराशी थांबले, चुकले जरासे

तोच आता कायम ठेवत आहे...!!

छान गझल. आवडली. का कुणास ठाऊक इंदिरा संतांच्या काही ओळी अचानक आठवल्या.
"माझ्या मनीचे खुळे पाखरू
मणिबंधावर तुझ्या उतरले
आणिक तू तर दुष्ट नष्टसा
घुंगुर त्याच्या पदी बांधले"

Pages