लिव्ह इन की लीव्ह इट?

Submitted by ठमादेवी on 25 November, 2010 - 03:07

हा लेख प्रहारमध्ये प्रकाशित आहे....

‘मी लग्न करायचं म्हणून विवाहासंबंधी वेबसाइटवर माझी माहिती दिली. मला रिप्लायही आले. पण त्यातल्या 95 टक्के पुरुषांनी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल किंवा मैत्रीपूर्ण शारीरिक संबंधांबद्दल विचारणा केली होती,’ संगीता सांगत होती. संगीताचा घटस्फोट दोन वर्षापूर्वी झाला. आपल्या दुस-या लग्नासाठी तिने एका वेबसाइटवर स्वत:ची माहिती दिली आणि आलेल्या उत्तरांनी थक्कच झाली. दुसरीकडे शर्मिला हिने आता घटस्फोटानंतर पुन्हा लग्न न करता आणि कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता आवडत्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

ही दोन उदाहरणं काय सांगतात? एकीकडे लग्नसंस्था मोडकळीला येऊ लागलीय, तरुणांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वत:चं व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं वाटू लागलंय, करिअरच्या गळेकापू स्पर्धेत प्रेम हा केवळ ‘केमिकल लोचा’ वाटतोय आणि त्यामुळे भावनिक गुंतवणुकीला स्थानच नाही. अन्न, वस्त्र, निवारा यांच्याप्रमाणेच शारीरिक संबंध हे गरज म्हणून ठेवायचे. त्यात प्रेम वगैरे भावना आणल्या आणि काही अपेक्षा आल्या की तुम्ही ‘इमोशनल फूल’ ठरता. त्याचा मनस्तापच होतो. त्यापेक्षा प्रेम आणि जबाबदारी या अपेक्षा नकोतच, असा सरळसोट व्यवहार शारीरिक संबंधांमध्येही ठेवणं तरुण पसंत करतात. पण मग हा वेश्याव्यवसाय आहे का? तर नाही. ही समजून-उमजून केलेली तडजोड आहे.

‘मी तिशी ओलांडली तरी माझं लग्नच ठरत नाहीये. पण शरीराची गरज आहेच ना. मग एका मित्राशी संबंध ठेवले तर काय हरकत आहे? त्याच्याशी मला लग्न करायचं नाहीये कारण माझ्यासाठी तो ‘हजबंड मटेरियल’ नाही. पण मला तो आवडतो. तो या गोष्टीसाठी दुसरीकडे जाणार आणि मी भलतीकडे. त्यापेक्षा किमान आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो तरी,’ स्मिता दोशी नावाची एक तरुणी सांगत होती. आता हे तरुणींच्या बाबतीतच घडतंय असं नाही. मुलंही जबाबदारी नको आहे, असंच म्हणतात. ‘मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. पण आपण एकमेकांत गुंतायचं नाही आणि आपण एकमेकांना उत्तरदायी राहणार नाही. उद्या मला दुस-या कोणाशी संबंध ठेवावेसे वाटले तर तू मला काहीही विचारायचं नाही आणि मी तुलाही विचारणार नाही. त्याला फसवणूक समजण्याचं कारण नाही. अशा ‘टर्म्स’वर मी मैत्रिणीशी संबंध ठेवले आहेत,’ असं निखिल रानडे म्हणाला. ज्या दिवशी या नात्याचं ओझं वाटू लागेल त्या दिवशी त्यातून बाहेर पडण्याची मोकळीक स्वत:लाही ठेवणारे आणि दुस-यालाही देणारे, स्वत:ला काय हवं आहे, कितपत हवं आहे हे लक्षात घेऊन शारीरिक संबंध ठेवणारे अनेक तरुण आसपास दिसू लागलेत. त्याकडे सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन ‘सामाजिक नीतिमूल्यांचा -हास होत चाललाय’ असा असला तरी त्याकडे ‘आमचं बुवा असंच आहे,’ असं सांगून दुर्लक्ष करणारेही तरुण आहेत. पण यातल्या किती तरुणांच्या कुटुंबीयांना त्यांच्या संबंधांबाबत माहिती असते, असा प्रश्नच आहे.

आपल्या आधीच्या पिढय़ा प्रेम आणि विश्वास हेच कोणत्याही नात्याचं मूलभूत तत्त्व मानत होत्या. प्रेमाची परिणती लग्नात झाली की ते यशस्वी झालं, असं वाटायचं. लग्नानंतरही दुस-या स्त्रीशी किंवा पुरुषाशी संबंध असणं हे आपल्याला धोका दिला असं वाटायचं. पण आता मात्र ही तत्त्वं बदलत चालली आहेत. पूर्वी शारीरिक संबंध, त्यातला अपुरेपणा, त्याची गरज हेही प्रेमाच्या आवरणाखाली लपून जायचं. पण आता हे आवरण फाटत चाललंय. त्याऐवजी संबंध गरज म्हणून पुढे येऊ लागलेत. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यासाठी जबाबदारी घ्यायलाच हवी असंही नाही, असं मत व्यक्त केलं जातंय. हे मुलींच्याही बाबतीत तितकंच खरं. विशेषत: घटस्फोटासारख्या घटनेतून बाहेर पडलेल्या तरुणांना तसं वाटतं. नातं तुटण्याचं दु:ख होण्यापेक्षा ते कधीतरी तुटणारच आहे याची जाणीव असणं आणि त्यासाठी मनाने न गुंतणं जास्त योग्य वाटणारेही लोक आहेत.

‘नो स्ट्रिंग्स अ‍ॅटॅच्ड’ अशा पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवणं आणि ते कुणी कुणाशी ठेवणं, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत अशा संबंधांत असणा-यांची तयारी आहे आणि त्यातून उद्भवणा-या कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्यास ते तयार आहेत तोपर्यंत इतर कुणालाही आक्षेप असण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारचे संबंध ठेवणा-या लोकांच्या संस्कारांबद्दल चर्चाही करण्याची गरज नाही. समाजव्यवस्था, नीतिमूल्यं, विचारसरणी, माणसाच्या गरजा हे सगळं बदलत चाललंय. ते कोणत्याही प्रकारच्या संस्कृतीरक्षणाचा आव न आणता स्वीकारावंच लागेल. तुम्ही स्वीकारलं नाही तरी हे घडणार आहेच. फक्त पूर्वी ते चोरीछुपे व्हायचं, आता खुलेआम होऊ लागलंय एवढंच, सचिन देशमाने यांनी आपलं मत व्यक्त केलं.

हेच चित्र आता सिनेमांमधूनही दिसतंय. पूर्वी प्रेमभंगाने वेडापिसा होणारा नायक आता त्याला ‘इमोसनल अत्याचार’ म्हणतो. ‘आय अ‍ॅम इन रिलेशनशिप’ असं म्हटल्यावर टवकारणारे कान आणि दचकणा-या नजराही आता असं ऐकायला सरावले आहेत!

गुलमोहर: 

ऋयाम..
माफ कर मित्रा.. समजण्यात चूक झाली असेल तर. Happy
असो.

मला वाटतं लग्न संस्थेला भारतात तरी इतक्यात धोका नाही. भारतात आपण विसंगतीने भरलेल्या जगात राहतो त्यामुळं त्यातलं नेमकं चांगलं तेच घ्यावं. जरा विषयांतर करतो पण लिव्ह इनचा पुरस्कार करणारा एक मित्र आंतरजातीय विवाहाचा / लिव्ह इन रिलेशनशिपचा मात्र कट्टर विरोधक आहे. तुम्ही कशाला पुरोगामी म्हणता हे मानण्यावर आहे.
एकीकडे ऑनर किलिंग आहे तर एकीकडे लिव्ह इन रिलेशनशिपसाठी लढा देणे आहे. वाद घालतांना माणसं ते तिथं ऑनर किलिंग चालतं तर हे काय वाईट आहे असा पवित्रा घेतात. एक गोष्ट मानवी संबंधांत खूप महत्वाची आहे.. ती म्हणजे ता र त म्य ..!

इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतर आपण त्यातल्या त्यात निर्दोष पद्धत निवडली आहे..जी समाजाला बांधून ठेवते. त्यात आपण सुधारणा करू शकतो, तसा वाव आहे... आणि समाज ते अ‍ॅक्सेप्टही करतो. लिव्ह इन साठी नेहमी चार पाच उदाहरणे देऊन चर्चेला सुरूवात होते. ही चार पाच उदाहरणे प्रातिनिधीक असावीत असं सुचवावंसं वाटतं. जोडीदाराकडून अपेक्षाभंग हा कुठल्याही व्यवस्थेत होणारा आहे त्यासाठी संपूर्ण व्यवस्था बदलणे चुकीचे वाटते. फसवणूक आदि मधे गावात तरी समाज मध्यस्थी करतो. शहरात मात्र समाजाचं असं दडपण जाणवत नाही.

ज्या वेळी एखाद्यावर अन्याय झालाय असं समाजाच्या लक्षात येतं त्या वेळी समाजानेही त्याच्या / तिच्या विवाहबाह्य संबंधांकडे डोळेझाक केलेली आहे. केस टू केस बेसिस वर समाजाने अशा कित्येकांच्या गरजा भागवल्या आहेत. म्हणूनच ज्या वेळी खरी गरज असेल तेव्हां त्या केसच्या संदर्भात समाज त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता देईलच... पण हे संबंध शाहीद - करिना -सैफ सारखे नसावेत. यांच्यात नेमका काय आणि कुणावर अन्याय झालाय ? समाजाच्या वर असल्याच्या भावनेतून आलेला हा स्वैराचार आहे. याला व्यक्तिस्वातंत्र्य म्हणणे चुकीचे आहे.

लिव्ह इन मधे तरूण जोडप्याची सोय होतेय पण जोडीदार बदलल्यानंतर झालेल्या मुलांचं काय ?माणूस कुणासाठी जगतो ? कि त्या मुलांनी सांगायचं हे माझे चौथे बाबा आहेत आणि सध्याची आई माझी पाचवी आहे म्हणून ?

त्यामुळंच अतिशय वैयक्तिक पातळीवर चालना-या या प्रकाराला लग्नाला पर्यायी संस्था म्हणून मान्यता मिळू नये आणि केवळ आत्यंतिक गरज म्हणूनच समाजाने या संबंधांना मान्यता द्यावी असं वाटतं. अपवादाला नियम समजलं जाऊ नये ...!

'सगळे जग हे रसातळाला चालले आहे' हे बॅबिलोनिअन शिलालेखातही आढळलेले वाक्य आहे, ही प्रत्येकच आधीच्या पिढीला, नविन पिढीबद्द्ल वाटणारी खात्री आहे!

एक्झॅक्टली काय असतो हा रसातळ ? परेश, रसातळाला जाणे म्हणजे नियम बाह्य काम करणे विवाह्बाह्य संबध त्याच्यातच मोडतं. रसातळाला जाणे म्हणजे अतिशय खालची पातळी गाठणे.

इथे बर्‍याच जणांचे असे मत दिसतेय, कि केवळ शारिरिक गरजांसाठी हा मार्ग स्वीकारला जातोय.
तसे नाही आहे. विवाहसंस्थेत काही त्रुटी जाणवायला लागल्या आहेत, त्यातल्या त्रुटींवर मात करण्यासाठी
हा एक पर्याय शोधला गेलाय.
विवाह हा इतका रिजिड झालाय, कि सप्तपदी आणि होम झाले कि विवाह झाला (असे कायदा मानतो) त्यापुढची जबाबदारी कायदा घेत नाही.
हि संस्था सावरण्यासाठी कौटुंबिक न्यायालये आहेत, पण त्यांचा अनुभव तितकासा चांगला नाही (आजच्या लोकसत्तामधला शारदा साठे यांचा सुप्रीम अन्याय हा लेख वाचाच.)
हा पर्याय ज्यांनी शोधलाय ते अजून चाचपडत आहेत. यापुढे दोन गोष्टी होतील, कदाचित असे नाते, विवाहाचा एक प्रकार म्हणून स्वीकारले जाईल (तशी प्रक्रिया सुरु झालीय.) किंवा विवाहसंस्था जास्त प्रभावी करण्यात यश येईल.
आता विवाहबाह्य नाते अस्तित्वातच नव्हते (प्राचीन काळात नाही, नजीकच्या इतिहासात ) हे खरे नाही.
काही कलाकृतीमधले याचे चित्रण बघू या.
गाईड मधे राजू आणि रोझी एकत्रच रहात असतात.
चार चौघी नाटकात, तर आई आणि तिच्या ३ मूली स्वतंत्र जगत असतात.
वेक अप सिड, मधेही ते दोघे एकत्र रहात असतात
बचना ए हसीनो मधेही..
आणखीही उदाहरणे देता येतील. पण हि प्रातिनिधीक. या प्रत्येक कालाकृतील कारणे आणि परिस्थिती वेगळी आहे.
वेश्या व्यवसायाचा उल्लेखही झालाय. पण त्यासदृष्य समाजमान्य अशा प्रथा आत्ता आता पर्यत चालू होत्या. देवदासींचे पूर्ण निर्मूलन झालेय, असे कुणी छातीठोकपणे म्हणून शकेल ?
जुन्या काळातील एक अत्यंत सुंदर मराठी संगीत नाट्य कलाकार, कान्होपात्रा किणीकर, यांची दूरदर्शनवर मुलाखत झाली होती. त्यांना असे विचारण्यात आले होते, कि तूम्ही लग्न का नाही केलेत ? त्यावर त्यांनी, आमच्यात लग्न करत नाहीत, असे उत्तर दिले, पण ते वाक्य बोलताना, त्यांच्या चेहर्‍यावर जी खिन्नता होती, ती आजही मला दु:खी करते.
दुसर्‍या एका प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिकेला, गोव्यातील देवळांत प्रवेश दिला जात नाही.
म्हणजे त्यांचा दर्जा, तर समाजाने कितीतरी खालचा ठरवला आहे.
त्यांनी कितीही परिश्रमपुर्वक कला जोपासली, तिला मान्यता मिळवून दिली, तरी त्यांच्या परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही.
अनेक तमाशा कलावंत (उदा विठा भाऊ मांग नारायणगांवकर ) या प्रथेच्या बळी ठरल्या.
कोल्ह्याट्याचे पोर, मधेही अशीच परवड आहे.
पण त्या उलट, समजून उमजून दोन बायका करण्याची प्रथा, महाराष्ट्रात, खास करुन मराठ्यांत होती (ती द्विभार्याप्रतिबंधक कायद्यानंतर मोडीत निघाली ) त्या दोन्ही बायकांना समाजात मानाचे स्थान होते. निदान त्यांची हेटाळणी तरी होत नसे.
हे प्रकार सुद्धा विवाहाला पर्याय शोधण्याचेच प्रकार होते. काही तरले तर काही कायद्याने मोडीत निघाले
----
खरे तर मला हा उल्लेख करायचा नव्हता, पण लग्न आणि मूल यासंबंधात मामींनी जो मुद्दा मांडलाय, त्याला
अनुसरुन.
जसे आईला मूल हवे असते तसे बाबांनाही. आजकाल एक दोन मुलांच्या जमान्यात हे नाते अधिकच दृढ होत चाललेय. एका वयोमानानंतर शारिरिक गरजा तितक्या तीव्र नसतात, पण वात्सल्याची गरज मात्र असते.
कुठल्याही पित्याला अगदी आईचा खून केलेल्या बापालाही, कुठलेहि न्यायालय हा हक्क नाकारु शकत नाही.
पण तो हक्क मिळवण्यासाठी, त्या न्यायालयातील क्लीष्ट प्रक्रिया, म्हणजे अर्ज करा, त्यावर युक्तीवाद, प्रतिवाद सगळेच करावे लागते.
न्यायालयात एका खास दालनात, अशी भेट घेता येते. पण तिथे फोटो काढता येत नाहीत, मूलांना खाऊ, भेटवस्तू देता येत नाहीत. आणि एखाद्या पालकाने जर मूलाला आणण्यास नकार दिला, तर तो न्यायालयाच्या आदेशाचा अवमान मानला जात नाही व त्याविरुद्ध दादही मागता येत नाही. (हा माझा
अनुभव आहे.)
त्या न्यायालयातील प्रक्रिया सोपी असते, असा गैरसमज का कुणास ठाऊक पसरलेला आहे. तिथेही सर्व साक्षी पुरावे द्यावेच लागतात. परस्पर संमतीने विभक्त होणार असाल तर ठिक आहे, पण तसे नसेल, तर काही खरे नाही बुवा. आणि त्या न्यायालयाच्या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब व्हावे लागते.
मुंबईतील वांद्र्याच्या या न्यायालयात ५ न्यायालये आहेत. त्यात दिवसाला किमान ५०० ते १०००
खटल्यांची पुकारणी (सुनावणी नव्हे) होते. आणि त्या सर्व पक्षकारांच्या तितक्यात तर्‍हेच्या कहाण्या असतात. त्या पत्रकारांपुढे येणार नाहीत, तर सामान्य लोकांपुढे काय येतील ? यातल्या बर्‍याच कहाण्या
मी माझ्या मनात ठेवल्या आहेत.

तर अशा परिस्थितीमधे विवाहसंस्थेला आणि समाजालाहि सुधारण्याशिवाय किंवा बदलण्याशिवाय पर्याय नाही. लिव्ह ईन, हा एक क्षीण प्रयत्न असतो. तिथे कुठलेच संरक्षण नसते, त्यामूळे तो निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेतलेला असतो.

आधीच्या लिव्ह इन मधून बाहेर पडून नंतर वेगळ्या व्यक्तीशी लग्न केल्यावर आधीच्या लिव्ह इनवाल्या जोडीदाराकडून त्रास होणे, किंवा ज्याच्याशी लग्न केले आहे त्या जोडीदाराने आधीच्या रिलेशनशिपवरून त्रास देणे हे प्रकारही होताना दिसतात.

अकु, ते फसवणूक केल्यामूळे ! जर आधीच्या आयूष्याबद्दल मोकळेपणे सांगितले असेल, तर असे होणार नाही. दुसरीही लिव्ह इन च असेल तर शक्यता कमी.

दिनेशदा, हे प्रकरण केस टू केस वेगळं असतं हो!
फसवणूक न करताही असा त्रास होऊ शकतो.
एक परिचयातील मुलगी मुंबईत तिच्या बॉयफ्रेंडबरोबर एकत्र रहात होती. घरच्यांनी वेगळ्या मुलाशी लग्न ठरविले. घरच्यांना तिच्या आधीच्या लिव्ह इनची कल्पना नव्हती. पण हिने नवर्‍याला सगळे सांगितले. नंतर जेव्हा जेव्हा नवराबायकोंत धुसफूस-भांडणे होत तेव्हा तेव्हा तिच्या आधीच्या लिव्ह इनचा विषय काढून नवरा शिवीगाळ करत असे. माहेरी कोणाला आधीच्या नात्याविषयी सांगितले नसल्यामुळे तिला माहेरी नवरा असे का वागतो सांगता येत नसे. नंतर नंतर तर नवर्‍याला तिची आधीची लिव्ह इन हेच एकमेव निमित्त भांडाभांडीसाठी पुरेसे पडू लागले. बरं, तोही धुतल्या तांदळासारखा नव्हता. त्याचीही लग्नाअगोदर प्रकरणे होती. नवराबायको एकमेकांच्या आधीच्या प्रकरणांवरून भरपूर भांडणे करत. असेच एक दिवस तिचा नर्व्हस ब्रेक डाऊन झाला. सध्या विभक्त रहात आहेत.

इथे विवाहसंस्थेत सगळे आलबेल असते, असे आपण गृहित धरतोय का? एका जोडप्याने घटस्फोट घेतला नाही, शेवटपर्यंत निभावून नेले म्हणजे तो विवाह यशस्वी असतो का? त्या बंधनांतून बाहेर पडणे शक्य नाही, म्हणूनच केवळ एका छताखाली असलेली, तरीही एकमेकांसोबत नसलेली किती जोडपी असतील.
आपल्या खाजगी आयुष्यातील निर्णयांसाठी समाजाला उत्तरे देण्याची गरज कमी कमी होत जाणे याचे एक द्योतक लिव्ह्-इन. हा शब्द आणि ही व्यवस्था मध्यमवर्गीयांना जितके धक्कादायक , किमान भिवया उंचावणारे वाटतील तितके त्यांच्या वरच्या आणि खालच्या स्तरातल्या लोकांना वाटतीलच का? (इथे मला कोणालाही नैतिकतेच्या फुटपट्ट्या लावायच्या नाहीत, तर एखाद्या व्यक्तीला आपले आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगू देण्यात समाजात मिळणार्‍या मोकळिकीबद्दल म्हणायचेय.)

अकु, असे लिव्ह्-इनच का, लग्नाआधीच्या प्रेमप्रकरणांबद्दल सुद्धा केले जाते. वाईट वागायला, किंवा तू कशी/कसा वाईट हे दाखवायला आणखी एक निमित्त.

हो अकु,
या केसमधे घरच्यांना कल्पना नव्हती, हि मोठी चूक होती.
आणि घरच्यांना न सांगता , नवर्‍याला सगळे सांगितले असेल, ते ही लग्न ठरण्यापुर्वी, याची पण शक्यता कमी आहे.

भरत,
अगदी योग्य मुद्दा. पदरी पडलं पवित्र झालं, हेच आधीच्या पिढीपर्यंत झालं. आता सुटका हवी आहे, इथपर्यंत बोलणे होते, पण तशी पावले उचलणे, आणि ती प्रक्रिया करणे, दोन्ही कठीण आहे.

नातं म्हटलं की ते कधीतरी संपतंच, नातं समांतर असतं, आज आवडणारी व्यक्ती कायम आवडू शकत नाही; कालावधी कमी-जास्त असू शकतो. ज्या समाजात हे जितक्या सहज मान्य होत असेल त्या समाजात मला रहायला आवडेल. मग तेथे विवाह-संस्था असो लिव्ह इन वा इतर काही!
"मला तुझा कंटाळा आलाय" हे जर मी वा ती सहज म्ह्णु शकत असेल व सहज विभक्त होऊ शकत असेल तर लग्न वा लिव्ह इन सारखंच!
(प्रश्न राहतो तो कंटाळा या शब्दाचा कोण कसा अर्थ घेतो याचा!)

एकूण चर्चेवरून असे म्हणत येईल की, लिव्ह-इन दोन वेगवेगळया टप्प्यावर वेगवेगळ्या कारणाकरता असू शकते. पहिली असते लग्नाआधीची. दोघेही तरूण, करियरवर फोकस करणारे आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व्/व्यक्तीमत्व जपणारे असतात. तर दुसर्‍या टप्प्यावरची लिव्ह्-इन असते (कटू अनुभव आलेल्या) लग्नानंतरची. यात पहिल्या लग्नाच्या वाईट अनुभवामुळे लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाल्यामुळे म्हणा किंवा त्यातील फोलपणा/त्रुटी जाणवल्यामुळे ठेवलेली.

मी एक विचार म्हणून लिव्ह्-इन रिलेशनशिपच्या अजिबात विरोधात नाही. हा वैयक्तीक choice आहे हे मला मान्य आहे. आणि वरील सर्व मुद्दे अर्थात प्रत्येकाने आपापल्या वैयक्तीक अनुभवातूनच मांडलेले आहेत. मात्र म्हणूनच ज्यांना समजूतदार जोडीदार मिळाला आहे, एकमेकांना समजून घेऊन / तडजोड करून ज्यांचे संसार सुरळीत चालू आहेत त्यांचा लग्नसंस्थेवरचा विश्वास अढळ असणे यात वावगे काही नाही. प्रत्येक घराची स्वतःची एक गोष्ट असते आणि खूपच टोकाची केस नसेल तर विवाह न मोडण्याकडे सहसा कल असतो. सामाजिकदॄष्ट्या आणि कायदेशीर विचार केला तरी आजच्या घडीला तरी (मुलांचा विचार केला तर) विवाहसंस्थेला पर्याय नाही असे मला वाटते.

मुलांचा प्रश्न मला सर्वांत महत्वाचा वाटतो. दुसर्‍या टप्प्यावरच्या लिव्ह-इन रिलेशनशिप मधले जोडीदार जरी matured असले तरी मुलांच्या भावनिक गरजा वेगळ्या असू शकतात. त्यांना लहान, अजाणत्या वयात समाजाला तोंड द्यावे लागते - या वयात त्यांच्याकरता social acceptance अतिशय महत्वाचा असतो. जर नविन जोडीदाराच्या मुलांना आपले म्हणायची तयारी असेल तर त्यांना ही भावनिक आणि कायदेशीर सुरक्षितता देण्यास काय हरकत आहे? जशी मोठ्यांची अपत्याची / वात्सल्याची गरज असते तसे लहाग्यांनाही हक्काचे आईबाबा हवे असतातच. त्यांच्या दृष्टीकोनातून लिव्ह्-इन रिलेशनशिप कदाचित वेगळी दिसू शकते, नाही का?

अपत्य संगोपनाच्या संकल्पनाही बदलतायत. आता एकट्या अविवाहित पालकालाही (किमान स्त्रीलाही)मूल दत्तक घ्यायचा अधिकार आहे.
एका पालकाचा मृत्यू झाल्यावर मागे राहिलेला पालक किंवा विभक्त झालेला पालक मुलाला वाढवू शकतो, तर याच बाबतीत वेगळेपण का? मुलाला त्याच्या कुटुंबात काहीतरी कमतरता आहे अशी जाणीव समाजच करून देतो. (इथे रेणुका शहाणेंनी त्यांच्या आई शांता गोखलेंबदल लिहिलेले आठवतंय).
लिव्ह इन वाले पिरिऑडिकली पार्टनर बदलत राहतात हे गृहितक नाही का वाटत. निदान भारतीय परिस्थितीत तरी. फार कशाला लिव्ह-इन मध्ये मूल होऊ देणे हे पण भारतात घडायला अजून वेळ असावा.

लिव्ह इन वाले पिरिऑडिकली पार्टनर बदलत राहतात हे गृहितक नाही का वाटत.

>>>>> असे गृहितक कोणीही मांडलेले नाहीये - केवळ तुमचा तर्क आहे. उलट म्हणूनच जर स्टेबल रिलेशन्स असतील तर त्याची परिणती लग्नात का होऊ दिली जात नाही? दोघेही एकएकटे असतील तर कसेही रहावे. पण मुले असतील तर केवळ आपली सोय बघण्यापेक्षा थोडा त्यांचाही विचार केला जावा असे वाटते. त्यांच्या सायकॉलॉजी बद्दल कोणी सांगू शकेल का?

एकट्या पालकाला सहानुभुती मिळू शकते पण लिव्ह्-इन रिलेशन्स इतक्या सहजपणे स्विकारण्याइतपत आपला समाज तयार झाला आहे का?

आणि मी म्हणाले त्याप्रमाणे, हे माझे वैयक्तीक अनुभवातून आलेले मत आहे. बाकिच्यांचेही तसेच असणार. आणि त्या मतांचाही मी आदरच करते.

लिव्ह इन वाले पिरिऑडिकली पार्टनर बदलत राहतात हे गृहितक नाही का वाटत.

>>>>> असे गृहितक कोणीही मांडलेले नाहीये - केवळ तुमचा तर्क आहे. उलट म्हणूनच जर स्टेबल रिलेशन्स असतील तर त्याची परिणती लग्नात का होऊ दिली जात नाही? दोघेही एकएकटे असतील तर कसेही रहावे. पण मुले असतील तर केवळ आपली सोय बघण्यापेक्षा थोडा त्यांचाही विचार केला जावा असे वाटते. त्यांच्या सायकॉलॉजी बद्दल कोणी सांगू शकेल का?

एकट्या पालकाला सहानुभुती मिळू शकते पण लिव्ह्-इन रिलेशन्स इतक्या सहजपणे स्विकारण्याइतपत आपला समाज तयार झाला आहे का?

आणि मी म्हणाले त्याप्रमाणे, हे माझे वैयक्तीक अनुभवातून आलेले मत आहे. बाकिच्यांचेही तसेच असणार. आणि त्या मतांचाही मी आदरच करते.

ह्याच संदर्भात एक जुने उदाहरण सांगावेसे वाटते.... माझ्या दूरच्या नात्यातील (आजीच्या पिढीतील) एक स्त्री वयाच्या उत्तरार्धात (म्हणजे साधारण सत्तर वर्षांच्या आसपास) त्यांच्यापेक्षा वयाने पाच-दहा वर्षे ज्युनियर असणार्‍या गृहस्थांबरोबर एकत्र रहात होत्या. ही गोष्ट १९८३-८४ सालातील. आता ते दोघेही हयात नाहीत. दोघेही विनापाश होते. एकटे होते. म्हातारपणी सोबत लागते, आधार लागतो. त्या बाईंचे सामाजिक कार्य व आवाका एवढे मोठे होते की त्यांच्या अशाप्रकारे केलेल्या लिव्ह-इनकडे तेव्हाही पुणेकरांनी वा मुंबईकरांनी कुत्सितपणे पहाण्याचे टाळले. त्या सरळ सरळ लोकांना ''हे माझे कंपॅनियन आहेत,'' अशी त्या गृहस्थांची ओळख करुन देत असत. विलक्षण सहजपणे आणि सन्मानाने. त्यांच्या वागण्यात कसलाही चोरटेपणा किंवा भीती नव्हती. किंवा समाज आपल्याला स्वीकारेल वा नाही ही भीती नव्हती. समाजाची अवहेलना त्यांनी बालविधवा झाल्यावर भरपूर सहन केली होती. त्यामुळे त्या ज्या मोकळेपणाने त्या गृहस्थांबरोबर वावरत ती त्यांची अदब, सहजता मला आजही लक्षात राहिली आहे.
मी लिव्ह इनवाल्या इतरही अनेक जोड्या पाहिल्या आहेत. पण असा मोकळेपणा, सहजपणा मी त्या जोड्यांमध्ये पाहिलेला नाही. किंवा तसा तो मला अद्याप दिसला नाही असे म्हणूयात. Happy

मामी, खरेच अशा दोन प्रकारात होऊ शकेल विभागणी. मूळ लेखात मला वाटते एका कटू अनूभवानंतर घेतलेल्या निर्णयाकडेच रोख आहे.
पहिल्या विभागात मात्र कदाचित ट्राय करुन बघू या, असा दृष्टीकोन असू शकतो. तो विचारपूर्वक निर्णय असेल किंवा एखादे थ्रिल म्हणूनही असेल. नाते उघड करायचा मोकळेपणाही आता दिसतोय.
(तसे तितकेसे रिलेव्हंट नाही, पण सहज सूचलं म्हणून, मीनाकुमारी-धर्मेंद्र, अमिताभ्-रेखा, हेमामालिनी-धर्मेंद्र, जॉन अब्राहम्-बिपाशा बासू, करिना-सैफ ही या मोकळेपणाची चढती भाजणी आहे.)

अरुंधतीच्या पोष्टमधल्या जोडप्याबद्दल वाचल्याचे आठवतेय. त्या परिपक्व वयात, लोक काय म्हणतील, ही भिती जवळजवळ नसतेच.

भारतात ते असू नये, होऊ नये असे एक भाबडे मन म्हणतेय खरे, पण सिंगल पेरेंट फॅमिली, हे बाकिंच्या देशांतील वास्तव आहे. आणि त्या कुंटूबातील मुलांनी, ते सत्य जास्त समंजसपणे स्वीकारलेय, असे मला तरी दिसले. अशी कित्येक कुटुंब माझ्या आजूबाजूला आहेत. पहिल्यांदा या देशात आलो, त्यावेळी एका सहकारी स्त्रीला (ती एकटी राहते हे माहीत होते तरी) मी विचारले होते, कि हा मुलगा कुणाला, त्यावर माझ्या एकटिचा, असे तिने उत्तर दिले होते. (प्रकाश झा च्या मृत्यूदंड मधली, शबाना पण असेच उत्तर देते.)

विवाहसंस्था मोडीत निघालीय किंवा ती असू नये, असा कुणाचाच सूर नाही. पण विसंवादी सूर लागला, तर ते सूरात आणायला, ती संस्था असमर्थ ठरत चाललीय, हे सत्य आहे.
लिव्ह ईन, हा त्याला पर्याय ठरतोय का ? त्यावरचा उपाय आहे का ? याची चाचपणी सध्या होतेय एवढेच.
किंवा विवाहसंस्थेत काय सुधारणा करता येतील, याचा विचार झाला पाहिजे. ज्यांचे संसार (हा शब्द पण आता कालबाह्य ठरत चाललाय का ?) सुरळीत चालू आहेत, त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही. पण औषधोपचाराची गरज, निरोगी माणसापेक्षा, आजारी माणसालाच असते.

. मात्र म्हणूनच ज्यांना समजूतदार जोडीदार मिळाला आहे, एकमेकांना समजून घेऊन / तडजोड करून ज्यांचे संसार सुरळीत चालू आहेत त्यांचा लग्नसंस्थेवरचा विश्वास अढळ असणे यात वावगे काही नाही
>> इन फॅक्ट मामी, मला हा प्रश्न कायम पडतो की माझ्या नवर्‍याबरोबर मी लग्न न करता राहिले असते तर काही फरक पडला असता का खरच आमच्या नात्यात? आणि याचं उत्तर बरचस नकारार्थीच वाटतं मला!

अकु, तू जी उदाहरणं सांगतियेस ना ती मला वाटतं ट्रांझिशनचा परिणाम आहेत.. अजूनही काही भारतीय पुरुष 'सो कॉल्ड' शुचितेच्या संकल्पनांमधून बाहेर पडले नाहीयेत (आणि ह्या कल्पना जास्त करून फक्त स्त्रीच्या 'शुद्धते'भोवतीच फिरताना दिसताना.. माझ्या आजोबांच्या पिढीपर्यंत पुरुष २ लग्न करायचे आणि त्यात कुणाला काही गैर वाटायचंच असं नाही.. पण बाई! छया! विचारही करायची परवानगी नव्हती बायकांना)
- पण समाजात जितक्या जास्त प्रमाणात विवाहपूर्व प्रेम, लिव्ह इन वगैरे गोष्टी एक्झरसाईज होतील तितक्या जास्त प्रमाणात समाज ते अ‍ॅक्सेप्ट करेल - किंवा त्यांना करावच लागेल. ट्रांझिशन मधल्या लोकांना नक्की त्रास होईल पण तो कुठल्याही ट्रांझिशनच्या वेळेस होतोच होतो..

दिनेशदा छान पोस्ट आहे.

@ ऑल : सध्या जे स्वरूप दिसतय ते ट्रांझिशन मधलं आहे, आत्ता तुम्हाला ते भयानक वाटेल.. कदाचित ते भयानक असेलही.. पण ते तसच रहाणार नाही असं मला वाटतं.. त्याच्यात काळाबरोबर अनुकुल असे बदल घडतील..

नानबाशी सहमत. माझ्या नवर्‍याबरोबर मी लग्न न करता एकत्र राहिले असते तरी फार फरक पडला नसता असे मलाही वाटते. कायदेशीर बाबीत सोपेपणा असावा म्हणून लग्नाचा दाखला.

सध्या मालदीवमध्ये मी लग्न, एकत्र राहणं ह्या प्रकाराचे अगदी वेगळे ( कदाचित फक्त मलाच माहीत नसलेले ) पैलू पाहतेय.
इथे स्त्री-पुरूष दोघांनीही सरासरी ३-४ वेळा घटस्फोट घेणं, परत लग्न करणं ( दुसर्‍या किंवा क्वचित त्याच जोडीदाराशी) हे अगदी रूटीन आहे.
विधवा झालेली स्त्री ४ महिने दुसरं लग्न करू शकत नाही....पण त्या नवीन व्यक्तीला भेटू शकते.
नुकताच आमच्या एका नर्सचा नवरा समुद्रात बुडून वारला. आम्ही फारच हळहळलो. पण एक महिनाही नाही झाला तोवर ती दुसर्‍यासोबत फिरायला लागली....बरं, बाकीचे लोकसुद्धा हे इझिली स्वीकारताना दिसतात. ( मला तरी हे फारच ऑड वाटलं ! भावनिक गुंतवणूक काहीच नसते का ? जखम भरून येणं वगैरे लांबच, मुळात जखम तरी होते का?)
......कळस म्हणजे, काहीवेळा पेशंट जेव्हा डिलीव्हर होते तेव्हा तिच्याजवळ आधीचा आणि आत्ताचा असे दोन्ही नवरे असतात ! ......ओळखा पाहू कुणाचं बाळ ?:फिदी:
( अवांतर झालं असेल तर माफ करा.)

या विषयाचा आवाका इतका मोठा असेल असं वाटलं नव्हतं. अधूनमधून वाचलेल्या प्रतिक्रिया आणि लेख यावरून कुठल्याही निष्कर्षाप्रत येता येत नाही.
कुठल्याही नव्या संकल्पनेला विरोध होतो तसा इथं होतोय का ? मला वाटतं लिव्ह इन ही कल्पना नवीन नाहीच. या लेखाच्या पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. तसंच विवाहसंस्थेच्या फायदा तोट्यांबद्दलही चर्चा होणं गरजेचं आहे. लिव्ह इन ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे.. जिच्यावर काळाच्या ओघात सामाजिक बंधनं आलीत . या बंधनांना आज विवाहसंस्था म्हणून ओळखलं जातं. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. ज्या समाजात रहायचं त्या समाजाची रीतभात तो पाळतो. ही सर्वांनी एकमेकांच्या सोयीसाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणूयात आपण (खूप बाळबोध वाटतंय ना.. Happy ). सहकारी गृहरचना संस्थेत सदनिका घेतांना नाही का आपण तडजोडी करत.. ठरलेल्या वेळात पाणी भरणं वगैरे वगैरे. बंड केलंच तर तुम्ही वेगळे पडता. ज्यांची खरोखर अडचण आहे त्यांची अडचण लक्षात आल्यावर सूट मिळते हे ही खरं आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप मुळं सामाजिक बंधनांना धक्का लागतो. मोठ्या प्रमाणावर लिव्ह इनचा प्रसार झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. जिथं खरोखर गरज आहे त्या प्रकरणांचा सहानुभूतीने विचार होतोच. समाजात तितकी प्रगल्भता नक्कीच आहे.

विवाहसंस्था म्हणजे स्त्रीची घुसमट असाही निष्कर्ष काढणे बरोबर नाही. लिव्ह इन म्हणून लग्नाविना राहीलं काय नि लग्न करून राहीलं काय स्त्री आणि पुरूषाची मानसिक जडणघडण वेगळी असते त्यामुळं ज्या क्षणी तुम्ही सहजीवनाला सुरूवात करता त्याच क्षणी तडजोडींना सुरूवात होते. इथं सामंजस्य नसेल तर ते नातं टिकणार नाही हे सांगायला नकोच.

विवाहसंस्थेत देखील आता खूप प्रगल्भता आलीय. मुलांचा विचार न करता लग्नं ठरवणं केव्हांच मोडीत निघालंय. लग्नाआधी जोडीदाराशी बोलून निर्णय घेणं वगैरे कधीच रूढ झालंय. स्त्रीची घुसमट देखील पूर्वीसारखी राहीलेली नाही. हे मी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांबद्दल म्हणू शकेन. उत्तर भारतियांबद्दल माहीत नाही.

विवाहसंस्था निकोप करत नेणे हा एक चांगला मार्ग असू शकतो. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं ते गरजेचं आहे. ज्यांच्या समस्या खूप वेगळ्या आहेत आणि या चौकटीत त्यांना न्याय मिळू शकत नाहि त्यांच्या बाबतीत वेगळा विचार होणं हे समाजाला मान्य आहेच कि... समाजाची भीती इतकीच असते, जे सुरळीत चाललंय त्याला धोका निर्माण होऊ नये. ..

विवाहसंस्थेत देखील आता खूप प्रगल्भता आलीय. मुलांचा विचार न करता लग्नं ठरवणं केव्हांच मोडीत निघालंय. लग्नाआधी जोडीदाराशी बोलून निर्णय घेणं वगैरे कधीच रूढ झालंय. स्त्रीची घुसमट देखील पूर्वीसारखी राहीलेली नाही. हे मी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांबद्दल म्हणू शकेन. उत्तर भारतियांबद्दल माहीत नाही.

विवाहसंस्था निकोप करत नेणे हा एक चांगला मार्ग असू शकतो. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं ते गरजेचं आहे. ज्यांच्या समस्या खूप वेगळ्या आहेत आणि या चौकटीत त्यांना न्याय मिळू शकत नाहि त्यांच्या बाबतीत वेगळा विचार होणं हे समाजाला मान्य आहेच कि... समाजाची भीती इतकीच असते, जे सुरळीत चाललंय त्याला धोका निर्माण होऊ नये. ..

>>>>>>> प्रचंड अनुमोदन.

दुसर्‍या टाईपची लिव्ह इन रिलेशनशिप स्विकारलेल्यांनी पहिल्यांदा लग्न केलेच होते ना? शिवाय असे कितीसे लिव्ह्-इन आईबाबा आहेत जे आपल्या मुलांना लग्नापासून परावृत्त करून त्यांनी केवळ लिव्ह्-इन रिलेशन ठेवावी अशा मताचे आहेत?

माझे म्हणणे इतकेच आहे की, ज्यात मुले involve आहेत त्या ठिकाणी लिव्ह्-इनपेक्षा पुनर्विवाहाचा पर्याय better असू शकतो.

उतारवयातील लिव्ह्-इन तर खूपच सुंदर असेल. त्यावयात कोणी साथीला असणं ही फारच जमेची बाजू असेल. आणि म्हणजे ही तिसर्‍या टप्प्यावरची लिव्ह-इन झाली.

<<विवाहसंस्था म्हणजे स्त्रीची घुसमट असाही निष्कर्ष काढणे बरोबर नाही. लिव्ह इन म्हणून लग्नाविना राहीलं काय नि लग्न करून राहीलं काय स्त्री आणि पुरूषाची मानसिक जडणघडण वेगळी असते त्यामुळं ज्या क्षणी तुम्ही सहजीवनाला सुरूवात करता त्याच क्षणी तडजोडींना सुरूवात होते. इथं सामंजस्य नसेल तर ते नातं टिकणार नाही हे सांगायला नकोच.>>.............१०० % अनुमोदन !

पुर्ण चर्चा बसून वाचली. एकदम ईंट्रेस्टींग. (हॉतेलातील कीबोर्ड एकदम बेकार आहे... त्यामुळे मत लिहु शकत नाही...वाचलात तोवर..)

पश्चिमात्य देशात स्त्री-पुरूष संबंधातील पायर्‍या:
१. भेट-ओळख-डेट
२. सहसा तिसर्‍या डेट ला सेक्स (सहसा. पहिल्या डेट ला ही होऊ शकतो)
३. सेक्स नंतरही डेटींग सुरू राहणे म्हणजे more-than-interested
४. सेक्शुअली एक्स्लुसीव्ह (sexually exclusive) होणे. Girlfriend-boyfriend stage. ही एक कमिटेड रिलेशनशीप आहे.
५. They move-in together. लिव्ह-इन रिलेशनशीप ची सुरुवात.
६. लग्न.
७. घटस्फोट
-----

लग्न आणि लिव्ह-इन मधला फरक फक्त कायदेशीर बाबिंचा आहे. बाकी सगळ्या जबाबदार्‍या लग्नासारख्याच. वेस्टर्न समाजात केवळ कायदेशीर बाबिंना पर्याय म्हणून हा उपाय आला असावा. कारण विवाह-घटस्फोट विषयक कायदे फारच किचकट आहेत. घटस्फोट झाल्यास राहते घर आणि अर्धी संपत्ती पार्ट्नर (सहसा पत्नी) चे होते. दर महिन्याची पोटगी वेगळी. हे होऊ नये म्हणून प्रिनप्च्युअल चाही पर्याय योजला जातो.

स्वैराचार असलेले संबंध हे चौथ्या पायरी आधिचे आहेत. चौथ्या पायरीनंतर ईतर कुणाशी संबंध असण्याला चीटींगच म्हणतात.

याव्यतिरिक्त one-night-stand (क्लब मधे जा, भेटा, सेक्स करा, नो strings attached) आणि friends-with-benefits - सेक्स करणारे मित्र या categories सुद्धा आहेत.

केवळ एकत्र राहणे (रूम-पार्ट्नर) हे लिव्ह-इन मधे मोडत नाही.

अवांतरः माझी एक अल्जेरीयन मैत्रीण मुस्लीम पद्धतीने विवाहीत आहे. पण फ्रांस मधे त्यांच स्टेटस लिव्ह-इन आहे.

अमेरिकेत अजुन एक बघितलेला लिव इन प्रकार म्हणजे सरकारी फायदे चालू रहाण्यासाठी असलेले लिव इन. इथे कुटुंबाचे उत्पन्न कमी असेल तर कमी भाड्याचे घर,फुड स्टॅम्प, डेकेअर साठी वॉउचर,शाळेत मुलांना फ्री किंवा रिड्युस्ड लंच वगैरे मदत मिळते. आई जेव्हा लिव इन मधे असते तेव्हा जरी बॉयफ्रेंड घरखर्चासाठी पैसे देत असला तरी फक्त तिचेच उत्पन्न धरले जाते. मात्र लग्न केल्यास दोघांचे एकत्र उत्पन्न बरेचदा त्यांना सरकारी मदतीसाठी अयोग्य ठरवते. पण हे एकत्र उत्पन्न कटऑफ रकमेपेक्षा थोडेसेच जास्त असते. म्हणजे सरकारी मदतीविना ओढाताण होणार असते. अशावेळी बरेचदा मदत चालू रहावी म्हणून जाणून बुजून लिव इन! कसलीच जबाबदारी नको म्हणुन निवडलेल्या लिव इन पेक्षा अगदी वेगळे. आपल्या चिल्यापिल्यांना दोनवेळचे पोटभर अन्न मिळावे म्हणून नाईलाजाने पत्करलेले लिव इन!
Sad

Pages