हा लेख प्रहारमध्ये प्रकाशित आहे....
‘मी लग्न करायचं म्हणून विवाहासंबंधी वेबसाइटवर माझी माहिती दिली. मला रिप्लायही आले. पण त्यातल्या 95 टक्के पुरुषांनी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल किंवा मैत्रीपूर्ण शारीरिक संबंधांबद्दल विचारणा केली होती,’ संगीता सांगत होती. संगीताचा घटस्फोट दोन वर्षापूर्वी झाला. आपल्या दुस-या लग्नासाठी तिने एका वेबसाइटवर स्वत:ची माहिती दिली आणि आलेल्या उत्तरांनी थक्कच झाली. दुसरीकडे शर्मिला हिने आता घटस्फोटानंतर पुन्हा लग्न न करता आणि कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता आवडत्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.
ही दोन उदाहरणं काय सांगतात? एकीकडे लग्नसंस्था मोडकळीला येऊ लागलीय, तरुणांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वत:चं व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं वाटू लागलंय, करिअरच्या गळेकापू स्पर्धेत प्रेम हा केवळ ‘केमिकल लोचा’ वाटतोय आणि त्यामुळे भावनिक गुंतवणुकीला स्थानच नाही. अन्न, वस्त्र, निवारा यांच्याप्रमाणेच शारीरिक संबंध हे गरज म्हणून ठेवायचे. त्यात प्रेम वगैरे भावना आणल्या आणि काही अपेक्षा आल्या की तुम्ही ‘इमोशनल फूल’ ठरता. त्याचा मनस्तापच होतो. त्यापेक्षा प्रेम आणि जबाबदारी या अपेक्षा नकोतच, असा सरळसोट व्यवहार शारीरिक संबंधांमध्येही ठेवणं तरुण पसंत करतात. पण मग हा वेश्याव्यवसाय आहे का? तर नाही. ही समजून-उमजून केलेली तडजोड आहे.
‘मी तिशी ओलांडली तरी माझं लग्नच ठरत नाहीये. पण शरीराची गरज आहेच ना. मग एका मित्राशी संबंध ठेवले तर काय हरकत आहे? त्याच्याशी मला लग्न करायचं नाहीये कारण माझ्यासाठी तो ‘हजबंड मटेरियल’ नाही. पण मला तो आवडतो. तो या गोष्टीसाठी दुसरीकडे जाणार आणि मी भलतीकडे. त्यापेक्षा किमान आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो तरी,’ स्मिता दोशी नावाची एक तरुणी सांगत होती. आता हे तरुणींच्या बाबतीतच घडतंय असं नाही. मुलंही जबाबदारी नको आहे, असंच म्हणतात. ‘मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. पण आपण एकमेकांत गुंतायचं नाही आणि आपण एकमेकांना उत्तरदायी राहणार नाही. उद्या मला दुस-या कोणाशी संबंध ठेवावेसे वाटले तर तू मला काहीही विचारायचं नाही आणि मी तुलाही विचारणार नाही. त्याला फसवणूक समजण्याचं कारण नाही. अशा ‘टर्म्स’वर मी मैत्रिणीशी संबंध ठेवले आहेत,’ असं निखिल रानडे म्हणाला. ज्या दिवशी या नात्याचं ओझं वाटू लागेल त्या दिवशी त्यातून बाहेर पडण्याची मोकळीक स्वत:लाही ठेवणारे आणि दुस-यालाही देणारे, स्वत:ला काय हवं आहे, कितपत हवं आहे हे लक्षात घेऊन शारीरिक संबंध ठेवणारे अनेक तरुण आसपास दिसू लागलेत. त्याकडे सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन ‘सामाजिक नीतिमूल्यांचा -हास होत चाललाय’ असा असला तरी त्याकडे ‘आमचं बुवा असंच आहे,’ असं सांगून दुर्लक्ष करणारेही तरुण आहेत. पण यातल्या किती तरुणांच्या कुटुंबीयांना त्यांच्या संबंधांबाबत माहिती असते, असा प्रश्नच आहे.
आपल्या आधीच्या पिढय़ा प्रेम आणि विश्वास हेच कोणत्याही नात्याचं मूलभूत तत्त्व मानत होत्या. प्रेमाची परिणती लग्नात झाली की ते यशस्वी झालं, असं वाटायचं. लग्नानंतरही दुस-या स्त्रीशी किंवा पुरुषाशी संबंध असणं हे आपल्याला धोका दिला असं वाटायचं. पण आता मात्र ही तत्त्वं बदलत चालली आहेत. पूर्वी शारीरिक संबंध, त्यातला अपुरेपणा, त्याची गरज हेही प्रेमाच्या आवरणाखाली लपून जायचं. पण आता हे आवरण फाटत चाललंय. त्याऐवजी संबंध गरज म्हणून पुढे येऊ लागलेत. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यासाठी जबाबदारी घ्यायलाच हवी असंही नाही, असं मत व्यक्त केलं जातंय. हे मुलींच्याही बाबतीत तितकंच खरं. विशेषत: घटस्फोटासारख्या घटनेतून बाहेर पडलेल्या तरुणांना तसं वाटतं. नातं तुटण्याचं दु:ख होण्यापेक्षा ते कधीतरी तुटणारच आहे याची जाणीव असणं आणि त्यासाठी मनाने न गुंतणं जास्त योग्य वाटणारेही लोक आहेत.
‘नो स्ट्रिंग्स अॅटॅच्ड’ अशा पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवणं आणि ते कुणी कुणाशी ठेवणं, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत अशा संबंधांत असणा-यांची तयारी आहे आणि त्यातून उद्भवणा-या कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्यास ते तयार आहेत तोपर्यंत इतर कुणालाही आक्षेप असण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारचे संबंध ठेवणा-या लोकांच्या संस्कारांबद्दल चर्चाही करण्याची गरज नाही. समाजव्यवस्था, नीतिमूल्यं, विचारसरणी, माणसाच्या गरजा हे सगळं बदलत चाललंय. ते कोणत्याही प्रकारच्या संस्कृतीरक्षणाचा आव न आणता स्वीकारावंच लागेल. तुम्ही स्वीकारलं नाही तरी हे घडणार आहेच. फक्त पूर्वी ते चोरीछुपे व्हायचं, आता खुलेआम होऊ लागलंय एवढंच, सचिन देशमाने यांनी आपलं मत व्यक्त केलं.
हेच चित्र आता सिनेमांमधूनही दिसतंय. पूर्वी प्रेमभंगाने वेडापिसा होणारा नायक आता त्याला ‘इमोसनल अत्याचार’ म्हणतो. ‘आय अॅम इन रिलेशनशिप’ असं म्हटल्यावर टवकारणारे कान आणि दचकणा-या नजराही आता असं ऐकायला सरावले आहेत!
अरुंधती, तुमचे पोस्ट
अरुंधती, तुमचे पोस्ट आवडले.
दिनेश तुम्ही म्हणता अशी काही समाजाची बंधन सर्व स्तरात आता आहेत अस मला दिसत नाही, किंवा कुत्सित नजरा, स्पष्टीकरण वगैरेही दहा पंधरा वर्षापूर्वीच्या गोष्टी असाव्यात. अजूनही काही समाजगटात असे अनुभव येत असतील, पण तसे आले तर समाजाच्या चुकीच्या स्तरात मिसळतो आहोत हे लक्षात घेउन मोकळ्या विचारसरणीच्या स्तरामध्ये वावरले तर असे प्रश्न भेडसावणार नाहीत वा सपोर्ट ग्रुपचीही आवश्यकता भासणार नाही.
वा जी एस, तसे झाले असेल तर
वा जी एस, तसे झाले असेल तर आनंदच आहे !
अगदीच् जनावर झालेलं असाल तर
अगदीच् जनावर झालेलं असाल तर मग काही बोलायलाच् नको..<<परीक्षित<< सहमत
चोचले पुरविण्यासाठी निवडलेले रस्ते आहेत. व्यभिचाराला दिलेली गोड नावे आहेत.<<वि.म.< १००१%सहमती.
>>करिअरच्या गळेकापू स्पर्धेत प्रेम हा केवळ ‘केमिकल लोचा’ वाटतोय आणि त्यामुळे भावनिक गुंतवणुकीला स्थानच नाही. <<
करीअरच्या स्पर्धेत फक्त "शरीराचे हाल" होतात तसेच थोडि "बुध्दी" जास्त चालवावी लागते बस आणखी काय? पण या कारणा खाली आपली माणुकीच विसरुन "जनावरा पेक्षा बद्द्त्तर" वागण्यात कसला अभिमान आहे कसली माणुसकी आली आहे त्यात.
म्हणजे एकुण काय तर प्रेम,स्व:भिमान,निष्टा,विश्वास या माणुस़कीत बसणार्या शब्दांचा माणसाच्या जिवनात काहीच अर्थ उरला नाही.
खरं तर, जे असं वागतात अशा लोकांना आपण "असुरक्षित" आहोत असा समज होत असतो, त्यांना वाट्त असतं आपण एकनीष्ट राहु पण, आपल्या जोडीदाराचं काय? त्याचा काय भरवसा?.'म्हणुन मग असले फालतु मार्ग अवलंबले जातात ज्यात काहि धोका नसतो."
"मुळात त्यांना स्वःतावर आणि आपल्या प्रेमावर विश्वास नसतो"
"हा चॅलेंज त्यांना स्विकारणे जमत नाही"
ध्धिक्कार आहे असल्या संस्र्कुतिचा(sanskrutichaa) "असल्या लोकांचा"
>> विधवा विवाह, घटस्फोट घेउन
>> विधवा विवाह, घटस्फोट घेउन दुसरा विवाह ही जशी आज समाजमान्य गोष्ट झाली आहे तसेच अजुन ५०-१०० वर्षांनी लिव्ह इन देखिल समाजात मान्यता मिळवेल
डेलियाशी सहमत. सध्या लिव्हइन 'अनाचार' वगैरे वाटत असले तरी येत्या १/ २ पिढ्यांत, शहरी मध्यमवर्गात लग्न केवळ उपचारापुरते, समारंभापुरते आणि कागदपत्रांपुरते शिल्लक राहील असे मला वाटते.
खूप वर्षांपूर्वी मला माझ्या
खूप वर्षांपूर्वी मला माझ्या ऑफिसमधल्या अमेरिकन मैत्रीणीने having xxx is just like having coffee with a person I like असं मला जेंव्हा सांगितलं होतं तेंव्हा माझे डोळेच पांढरे झाले होते. अर्थात मी आधीच्या पिढीतली आहे म्हणून असेल.
समाज जीतका पूढे जातो, सभ्य
समाज जीतका पूढे जातो, सभ्य होतो "प्रगतिशिल" होतो तेवढाच व्याभीचारात गुरफटत जातो. ज्या समाजाची जित़की जास्त प्रगति, तितकाच सामाज "घाणेरडा" होत जातो. आतुन सड्त जातो. या "लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या आधुनीक रोगांनी ग्रस्त होत जातो.
"मग हाच "महारोग" आणखी "दहा" रोगांना आपल्या सोबत आणतो"
उदा:...............
वरील सर्व मुद्द्यांमधे
वरील सर्व मुद्द्यांमधे जन्माला येणार्या बाळांचा मुद्दा आलेला नाहीये.
आदिमानव टोळ्यांनी रहात असताना, 'लिव्ह इन' रिलेशनशिपच होती. अशावेळी अपत्ये केवळ आईच्या नावानेच ओळखली जात. त्यांच्या जनकत्वाची जबाबदारी कोणा एका पुरुषावर नसल्याने, टोळीयुद्धात त्यांचा बचाव करणारे कोणी नसे.
जेव्हा मानवसमुहाला स्थैर्य आले, मालकीच्या जमिनी, संपत्ती निर्माण झाली तेव्हा कुटुंबसंस्था निर्माण झाली. त्याच सुमारास केव्हातरी विवाहसंस्थाही निर्माण झाली असणार. आपल्याजवळील संपत्ती आपल्या कुटुंबात रहावी, याकरता आपली आपत्ये ओळखता यावीत आणि त्यांचे चांगल्या रितीने संगोपन व्हावे या भुमिकेतून विवाहसंस्कार निर्माण झाला. तेव्हापासून ते आजतागायत, जगात सर्वत्र (काही आदिवासी टोळ्या सोडल्या तर) विवाहसंस्था अखंड टिकून आहे.
याचबरोबर बाकी इतर रिलेशन्स, उदा. विवाहबाह्य संबध, विवाहपूर्व संबध, लग्नाशिवाय एकत्र रहाणे समांतर चालू होतेच की. पण थोड्याप्रमाणावर आणि समाजमान्यता न मिळता. अशा संबधांमुळे निर्माण झालेल्या संततीलाही समाजाने स्विकारले नाहीच. 'अनौरस' हा शिक्का त्यांच्यावर बसे - अजूनही बसतोच.
असे असताना, आताच या भरभक्कम तटबंदीला खिंडार पडण्याचे कारण काय? स्त्री-स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून? ज्या स्त्री-स्वातंत्र्यामुळे विधवा विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह बरेचसे समाजमान्य झाले आहेत तसे काही?
माझ्यामते हा आजच्या पिढीच्या विचारसरणीचा टप्पा आहे. करियर की मूल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न याच्या मुळाशी आहे. लग्नाचे वय लांबत असतानाच, शरिराची नैसर्गिक गरज पुरवण्याचा हा एक मार्ग झाला आहे आणि निदान शहरांतून, उच्चभ्रू समाजातून मान्यताही पावला आहे. छोट्या शहरातील मध्यमवर्गातून हे सहज स्विकारणे अजूनही कठीण जाते.
पण अजूनही, अपत्यप्राप्तीची गरज जेव्हा निर्माण होते, तेव्हा लग्न होतातच.
लिव्ह अँड लेट लिव्ह.....
लिव्ह अँड लेट लिव्ह.....
पसंद अपनी अपनी... मर्जी अपनी अपनी...
मामी खरंच आजचा मानव
मामी खरंच आजचा मानव "आदिमानवचं" होत चालला आहे ना गं?, शास्त्रांतल्या भविष्यवाणि प्रमाणे सगळं तसचं घटीत होत आहे. "अधोगती" "कलयुग"
"धन्य आहोत आपण नविनमानव"
वरील अनेकांच्या पोस्ट
वरील अनेकांच्या पोस्ट आवडल्या...
लग्न करायला जितकी मानसिक ताकद आणि कमिटमेंट लागते त्याहून कितीतरी जास्त ताकद आणि कमिटमेंट ही लिव्ह इन मध्ये लागते. दक्षिणा १०० अनुमोदन
आणि मामींनी मांडलेला मुद्दाही गहन आहे...
प्रचंड भेडसावणारा प्रश्न आहे..कारण अजूनही लीव्ह इनला कायद्याने मान्यता नसल्याने बाळाचे हाल होणार हे नक्की...
अगदी जन्मनोंदणी दाखल्यापासून...
पण अजूनतरी मी आधी म्हणल्याप्रमाणे लीव्ह इन आपल्याकडे फार सिरीयसली घेतले जात नाहीच आहे..त्यामुळे अर्थातच केवळ शरीराची गरज किंवा चोचले म्हणून त्याकडे बघीतले जात आहे..
अजून समाजानेही पूर्णपणे स्वीकारले नसल्याने लग्नसमारंभात किंवा इतर सणासुदीला नातेवाईकांमध्ये मिसळण्यास अडचण होत असणार हे नक्की...
एक विचारधारा अशीही आहे की
एक विचारधारा अशीही आहे की लिव्ह-इन किंवा घटस्फोटांचे सामान्यीकरण झाल्यावर त्यातील फायद्या तोट्यांचा पुरेपूर विचार करुन मगच त्या दिशेने पाऊल उचलले जाईल. एकतर तोवर त्यातील ''थ्रिल'' फॅक्टर किंवा ''बंडखोरी'' हा प्रकार ''इन्'' किंवा ''कूल'' उरलेला नसेल. शिवाय ज्या प्रकारे सध्याच्या लग्नसंस्थेतील दोषांबद्दल किंवा नवरा-बायकोच्या नात्यातील वाढीव अपेक्षांबद्दल नवी पिढी वास्तववादी बनत चालली आहे त्याचप्रमाणे ''लिव्ह-इन''मुळे काय परिणाम होतात व होऊ शकतात याबद्दलही ती सतर्क होऊ लागेल. काही देशांमध्ये आता लिव्ह इन चे व लग्न न करण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की तेथील सरकारे लग्नसंस्थेचा व मूल होऊ देण्याचा प्रसार करताना दिसतात.
मामींनी मांडलेला << अपत्यप्राप्तीची गरज जेव्हा निर्माण होते, तेव्हा लग्न होतातच >> मुद्दा रास्तच आहे. पण अनेकजणांना (शहरात) ही गरज वाटत नाही. ''अंथरुण पाहून पाय पसरावेत'' सारख्या त्यांच्या कल्पनेतील किंवा अपेक्षेतील ''किमान गरजा'' (जसे स्वतःची मालकीची जागा, सेव्हिंग्ज, गाडी इ. इ.) पूर्ण झाल्याशिवाय त्यांना मूलच काय, पण लग्नाची कल्पनाही नकोशी वाटते. त्या त्या गोष्टी मिळेपर्यंत वय वाढलेले असते. त्या वयात पालकत्व झेपेल किंवा नाही ह्याची खात्री नसते. कंफर्टच्या बाबतीत तडजोड करायला नाराजी असते. लग्नासारख्या रिलेशनमध्ये - नव्या नात्यात कराव्या लागणार्या तडजोडी नकोशा वाटतात. (पण लिव्ह इन मध्येही तडजोड थोड्याफार प्रमाणात असतेच हे त्यांच्या कसे बरे लक्षात येत नाही? लक्षात येतही असेल... पण लग्नासारखी सार्या घरादाराशी तडजोड करावी लागत नाही. पार्टनरपुरती तडजोड केली की काम भागले! शिवाय तिथे तडजोड नको वाटल्यास सुटकेचा मार्ग खुला असतो. त्याप्रमाणे लग्नांत होत नाही. लग्न मोडायचे झाल्यास कोर्ट कज्जा, भांडणे, वकील, पोटगी, प्रॉपर्टी वगैरे ''कटकटी'' असतात.)
अरु, तुझे पोस्ट आवडले. मी तशी
अरु, तुझे पोस्ट आवडले.
मी तशी मागल्या पिढीतली. तेव्हा देशात असताना लिव इन बघण्यात नव्हती मात्र एक लग्नाचा आणि एक बिन लग्नाचा असे दोन संसार बर्याचदा बघितलेले. इथे आल्यावर पहिल्यांदा लिव इन बघितले. मात्र इथले लिव इन हे अपेक्षारहित अजिबात नसते. एंगेज होण्याच्या आधिची स्टेज म्हणजे लिव इन. हा काळ साधारण २-३ महिने ते २ वर्षे. या काळात प्रपोज केले नाही तर आडून आडुन हिंट देणे, रिलिशनशिपचा नव्याने विचार करणे वगैरे सुरु होते. माझ्या नवर्याचा बेस्ट फ्रेंड लिव इन रिलेशनशिप मधे आहे. त्याची GF माझ्या नवर्याची चांगली मैत्रिण आहे. तिचे प्रपोझलसाठी वाट बघणे, झुरणे आम्ही खूप जवळून पाहिलय. वन नाईट स्टँड कडे इथेही फारश्या चांगल्या नजरेने बघितले जात नाही. लग्न झालेले असो वा नसो एकदा तुम्ही सोशली कपल म्हणुन वावरायला लागलात की एकनिष्ठ असणे अपेक्षित असते. तुम्ही पार्टनर व्यतिरिक्त कुणाबरोबर संबंध ठेवले तर त्याला चिटिंगच म्हणतात. अगदी भांडण-मारामारी पर्यंत वेळ येते. तसेच लिव इन मधे ओझे झाले की बाहेर पडायचे असे कितीही म्हटले तरी एकाला ब्रेकअप हवे आहे पण दुसर्याला नको आहे असे झाले की ब्रेकअप सामंजस्याने होतेच असे नाही. पॅचअपसाठी प्रयत्न, बरेचदा स्टाकिंग, डोमेस्टिक व्हायलन्स पर्यंत मजल जाते. गेल्या वर्षी आमच्या शेजारच्या कॉलनीत यावरुन मर्डरही झाला. एक्स बॉयफ्रेंड/ गर्लफ्रेंड विरुद्ध रिस्ट्रेनिंग ऑर्डर हे रुटिन आहे. मध्यंतरी एक फ्रेंड्स विथ बेनिफिट प्रकार आला पण we are friends with benefit असे कुणी अभिमानाने सांगताना दिसत नाहित. तेव्हा लिव इन चा विचार करताना निर्णय सर्व बाजूने विचार करुनच घ्यावा.
लीव इन रिलेशनशीप बद्दल
लीव इन रिलेशनशीप बद्दल समाजात ज्या काही समजुती आहेत त्यात सर्वात वरचढ गैरसमज म्हणजे लीव इन केवळ शारिरिक संबंधासाठी सुरु होतो. वर चर्चेत आलेल्या मुद्द्यातून कळतेच की त्यापलीकडेही लीव इन आहे.
वरील मुद्द्यात आलयच की विवाह संस्थेतील असलेल्या बंधनांमुळे आजच्या पिढीला विवाह की करियर हा प्रश्न पडतोच. आजूबाजूला असलेल्या विवाहित जोडप्यांमध्ये किती जणांचे खरोखर मनोमिलन झालेय व किती जण जबरदस्तीने सगळं सहन करीत समाजाला बरं वाटावं म्हणून नाती निभावून नेतायत हा प्रश्न पडतोच.
लग्नानंनतरच्या कटकटी नको, स्वातंत्र्यावर घाला नको आपल्या आयुष्याचे आपणच मालक राहू असा विचार करतच असतील भरपूर लोक आज. भारताला 'लीव इन' नवीन आहे, मग जुनं ते सोनं म्हणत नव्याला विरोध करायचा हे आधीपासून सुरू आहे, म्हणतात ना की समाज बदलाला घाबरतो, तयार नसतो. 'लीव इन'ला स्विकारायचं की झिडकारायचं हा शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहेच.
आता माझ्या नेहेमीच्या
आता माझ्या नेहेमीच्या पध्दतीनुसार, लग्न विरूद्ध लिव्ह्-इन यांचा ताळा मांडते. जर काही मुद्दे राहिले असतील तर सांगा म्हणजे सगळे मुद्दे एकत्रित मिळतील:
लिव्ह-इन :
जमा:
१. मुळात नाते सुरू होते ते दोघेही एकमेकांना पसंत आहेत म्हणून - कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसते.
२. एकमेकांवरील विश्वासातून निर्माण होते.
३. दोघांनाही पुरेपूर व्यक्तीस्वातंत्र्य असते. बंधने कमीतकमी असतात. (जी परस्परांनी ठरवून एकमेकांवर घालून घेतली असतील तेवढीच)
४. नाते 'सडण्यापर्यंत' वेळ येत नाही. (किंबहुना येऊ नये)
५. एकमेकांना गृहित धरले जात नाही.
खर्चः
१. नाते सहज तोडता येते.
२. विशेषतः जोडीदारापैकी एकाला दूर व्हायचे असेल आणि दुसरा अजूनही गुंतला असेल तर कठिण.
३. यातून असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते.
४. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक होऊ शकतो. मानवी जीवनाला आवश्यक अशा या नात्यातील अनेक नाजूक भावभावना मुळातच निर्माण होत नाहीत. (यात मला नेमके काय म्हणायचे आहे ते उदाहरण देता येत नाहीये ... पण पती-पत्नीच्या नात्यात जे अनेक भावबंध असतात ते इथे असतात का?)
५. मुले होऊ देणे शक्य नसते किंवा कठिण असते.
६. समाजमान्यता कठीण आणि त्यामुळे नातेवाईक वगैरे दुरावण्याची शक्यता.
७. पूर्ण कायदेशीर मान्यता नाही.
लग्न :
जमा: (निदान जे संसार आनंदात चालले असतात त्यांकरता.)
१. समाजमान्यता.
२. सुरक्षितता.
३. अपत्याचा जन्म, संगोपन या गोष्टी सुरळीत.
४. जीवनात स्थैर्य.
५. जीवनातील सर्व गोष्टींचा आस्वाद शेअर करण्याकरता एक हक्काची अशी व्यक्ती. कोणी आपल्या सुखदु:खात शेवटपर्यंत सोबत असणार आहे ही कल्पनाच किती सुखद असते. माझ्यामते विवाहसंस्थेचा हा सर्वांत मोठा प्लस्-पॉईंट आहे.
खर्च :
१. लग्नाची जबरदस्ती होऊ शकते.
२. विवाहबंधन तोडणे कठीण.
२. (वर उल्लेख झालेली) 'टेकन फॉर ग्रँटेड' ची शक्यता.
स्वाती२, तु अतिशय चांगले
स्वाती२, तु अतिशय चांगले मुद्दे मांडलेस. अनुमोदन.
२. विवाहबंधन तोडणे
२. विवाहबंधन तोडणे कठीण.
मामी, ते तितकसं कठीण राहिलं नाहिये आता......
हो माहितेय पण इथे आपण
हो माहितेय पण इथे आपण 'रिलेटीव्हली' बोलतोय. लग्न मोडण्यासाठी निदान एक वर्षाचा काळ जातो. लिव्ह्-इन मध्ये हीच प्रक्रिया एका मिनिटात होऊ शकते.
पण मला वाटते की, लिव्ह इन
पण मला वाटते की, लिव्ह इन मध्येही पझेसिव्ह होतच असणार लोक..... असं एखाद्या व्यक्तीबरोबर ठरवूनसुध्दा "निरपेक्ष" एकत्र जगणं (निरपेक्ष म्हणजे लिमिटेड अपेक्षा ज्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर केला जाईल, अपेक्षा लादल्या नाही जाणार) खरंच कठीण आहे...... आणि असे प्रसंग येत तर नक्कीच असणार, फक्त ते कसे हँडल केले जातात की त्या क्षणी संबंध तोडले जातात (तशी मुभा असल्याने) हे ज्याच्यात्याच्या कुवतीवर अवलंबून आहे.
मामी, ताळेबंद छान आहे.
मामी, ताळेबंद छान आहे. लग्नाच्या मुद्द्यात ज्या गोष्टी ''जमेत'' आहेत त्याच ते लग्न जर मोडले किंवा टिकू शकले नाही तर खर्चात जातात.
घटस्फोट समाजमान्य असले तरी घट्स्फोट घेतलेल्या लोकांकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा असतो समाजाचा. अनेकदा त्यांना समाजाची नाराजी वेगवेगळ्या पध्दतीने सहन करावी लागते. त्यातून त्या व्यक्तीचा जर त्यांच्या विशिष्ट समाजाशी वारंवार संबंध येत असेल तर हे प्रमाण जास्त दिसते.
स्त्रीची सुरक्षितता (खास करुन ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसेल तर) धोक्यात येते. शिवाय सामाजिक, भावनिक सुरक्षितता वगैरे तर आहेतच. पुरुषांचीही आर्थिक व भावनिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
अपत्ये असतील तर त्यांचा ताबा, संगोपन, शिक्षण, पोटगी खर्च, अपत्यांची जबाबदारी, त्यांची सुरक्षितता हे प्रश्न येतात.
जीवनातील स्थैर्य नष्ट होते.
आजकाल नवराबायको एकमेकांबरोबर कमी, पण आपल्या कामाच्या ठिकाणच्या सहकार्यांबरोबर, ऑनलाईन मित्र मैत्रिणींबरोबर जास्त काळ वावरताना, त्यांच्या बरोबर आपल्या आयुष्यातील घटना - सुख दु:खे इ. शेअर करताना दिसतात. रात्रीबेरात्री एकमेकांशी मेसेजेस, फोनकॉल्स, चॅट, सोशल नेटवर्किंग करणे हे तर सामान्य झाले आहे. अनेकदा त्यांना आपल्या जोडीदारापेक्षा आपला ऑनलाईन फ्रेंड भावनिक दृष्ट्या जवळचा वाटतो.... अशा परिस्थितीत मुळात जी लग्ने डळमळीत आहेत त्यांचा पाया अजूनच भुसभुशीत होताना दिसतो.
स्वाती, लिव इन विषयी तू
स्वाती, लिव इन विषयी तू सांगितलेल्या गोष्टी भारतातील लिव इन जोड्यांनाही ते विभक्त झाले की सहन करायला लागतातच की! ''क्लीन ब्रेक'' नावाचा प्रकार फारच क्वचित अस्तित्त्वात असतो. एकमेकांना अब्युजिव मेसेजेस पाठविणे, धमक्या देणे, ब्लॅकमेल करणे, स्टाकिंग, शिवीगाळ, मारहाण हे येथेही चालते. कामाच्या ठिकाणीही प्रॉब्लेम्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सामान्यपणे त्या व्यक्तीबद्दल जितकी राळ उठवता येईल तितके बघणे ही मनोवृत्तीही दिसते. आणि भारतात अशा बाबतीत पोलिसांकडे गेले तर त्यांचा तर वेगळाच खाक्या असतो!
मामी, तुमचा ताळा
मामी, तुमचा ताळा आवडला.
<<जीवनातील सर्व गोष्टींचा आस्वाद शेअर करण्याकरता एक हक्काची अशी व्यक्ती. कोणी आपल्या सुखदु:खात शेवटपर्यंत सोबत असणार आहे ही कल्पनाच किती सुखद असते. माझ्यामते विवाहसंस्थेचा हा सर्वांत मोठा प्लस्-पॉईंट आहे.>>
बर्याच संसारात जीवनातील गोष्टींचा आस्वाद घेण्यात " दोन ध्रुवावर दोघे आपण " अशी अवस्था असते.....त्यावेळी दोघांपैकी एकाला, ( किंवा दोघांनाही ) कायम मन मारत रहावं लागतं. अशावेळी हाच मुद्दा संसार डळमळीत करू शकतो. पण वरवर पाहिला तर तो इतका क्षुल्लक वाटतो, की संसार मोडायला पुरेसाही नसतो. आणि निभावणंही कठीण जातं !.........लीव इन मध्ये पार्टनर निवडतानाच ह्या गोष्टीचा विचार होत असावा.
अकु, तु जे सांगत्येस ना ते
अकु, तु जे सांगत्येस ना ते घटस्फोटाचे तोटे आहेत. पण ते लग्नाच्या जमाखर्चात येऊ शकत नाहीत. कारण हेच मुद्दे थोड्याफार (खरंतर जास्तच) प्रमाणात लिव्ह्-इन रिलेशनशिपला लागू होतात. तो विषयच वेगळा. इथे आपण फक्त लग्नसंस्था आणि लिव्-इन रिलेशन यांची comparison करतोय.
रुणुझुणु, मुळात लग्नाचा पायाच
रुणुझुणु, मुळात लग्नाचा पायाच तडजोड आहे. दोघांनी एकमेकांकरता आपल्या स्वभावाला थोडीथोडी मुरड घालून, एकत्रित जीवनाचा आस्वाद घेणे अभिप्रेत आहे. लिव्-इन मधे तडजोडीशी काडीमोड घेतलेला असतो. पण तडजोड इतकी वाईट नसते. आणि जीवनात इतर कितीतरी ठिकाणी आपण ती करत असतोच की, मग आपल्या जोडीदाराकरता थोडीशी केली तर काय बिघडलं...पण हा समजुतदार पणा दोन्ही बाजूंनी दाखवायला हवा.
थोडक्यात : ज्याला जसे योग्य
थोडक्यात : ज्याला जसे योग्य वाटेल त्याने/तिने तसे करावे. समाजाने तथाकथित नैतिक पोलिसांचा आव आणून वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये. विवाहसंस्था म्हणजे नीतीमत्तेचा कळस असे वाटत असेल तर राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचावे.
बाप रे ... " हे भलते अवघड
बाप रे ...
" हे भलते अवघड असते" असंच वाट्तय... लोकांसाठी नसेल कदाचित...
पण मला आपल्या मुलाबाळांचा विचार करुन ते तरुण होतील तेंव्हा काय परिस्थिती असेल असं वाटतय..
अरुंधती, स्वाती२, मंजिरीसोमण,
अरुंधती, स्वाती२, मंजिरीसोमण, साधना पोस्टस आवडल्या.
अनुमोदन.
विवाहसंस्था म्हणजे नीतीमत्तेचा कळस असे वाटत असेल तर राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचावे. > राज
लिव्ह इन , हा ज्याचा त्याचा
लिव्ह इन , हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेच तेव्हा एव्हढा उहापोह करण्याची , नैतिक / अनैतिक ठरवण्याची गरज काय ?
विधवा विवाह ही गोष्ट सुद्धा १०० वर्षांपुर्वी अशीच धक्कादायक , अनैतिक वाटत असणार , पण आज काही वाटते का त्याचे ??? १ काहुन जास्त बायका करणे , ७० वर्षाच्या म्हातार्याने १२-१३ वर्षाच्या मुलीशी लग्न करणे ई. अत्ताच्या काळात अतिशय अनैतिक वाटणार्या गोष्टी १०० वर्षांपुर्वी अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घडत होत्याच. तेव्हा नैतिकता ही अतिशय सापेक्ष आहे.
मुलांचाच प्रश्न असेल तर आता बाप कोण हे प्रूव्ह करायला DNA test उपलब्ध आहेत. बायोलॉजिकल आई वडीलांनी, लग्न झालेले असो वा नसो मुलांची जवाबदारी घेतलीच पाहिजे असा कायदा व्हायला हवा. ( असेल तर मला माहित नाही ) आणि लिव्ह इन मधल्याच मुलांचा एव्हढा पुळका समाजाला का यावा ?? वेश्यांची मुले, बलात्कारातुन जन्माला आलेली मुले , कुमारी मातांची मुले काय मुले नाहीत का ? त्यांच्या बायोलॉजिकल पित्यावर त्यांच्या पोषणाची जबाबदारी असली पाहिजे , तसेच त्यांनाही चांगले बालपण मिळाले पाहिजे , असे समाजाला किंवा कायद्यालाही का वाटत नाही ??
स्वाती , अकु , मामी चांगल्या
स्वाती , अकु , मामी चांगल्या पोस्ट्स ,
आपल्याकडील लिव्ह इन ची कल्पना , परदेशातली लिव्ह इन ची कल्पना ह्या बराच फरक जाणवतोय.
स्वातींनी वर लिहिल्याप्रमाणे इथे (परदेशात) लिव्ह इन ही लग्नाची पहिली पायरी मानता येईल , पण आपल्याकडे मात्र लिव्ह इन म्हणजे लग्नाला फाट्यावर मारण्याची पायरी वाटतेय.
डेलिया १०००% अनुमोदन
डेलिया १०००% अनुमोदन
डेलिया, १००१% अनुमोदन.
डेलिया, १००१% अनुमोदन.
Pages