सुट्टी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवर लिहीलेले पहिले ललित..

सुट्टी या शब्दाइतका स्फूर्तीदायक दुसरा शब्द नसेल. आणि दरवर्षी नेमानं उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत धमाल करायचं वय एकदा संपलं की हाच शब्द एकदम nostalgic करून टाकतो.
सुट्टी म्हटलं की मला आठवतो आमचा गावातला वाडा. पुढच्या दारात उभं राहून जोरात ओरडलं तरी मागच्या दारातल्याला ऐकू जाणार नाही इतका मोठा जुना पण दणकट.
परिक्षा संपली की लगेच पप्पा आम्हाला ३ तासांवर असलेल्या आजोळी न्यायचे. जसजशा परिक्षा संपतील तसतसे आमच्या टोळीचे सभासद (म्हणजे इतर आत्ये, चुलत भावंडं) येऊन दाखल व्हायचे.
दिवाळीच्या सुट्टीला फटाक्यांची, फराळाची, पहाटेच्या पणत्या-रांगोळ्यांची जोड असायची तर उन्हाळ्यात त्याची जागा घरभर आढी पसरून बसलेले आंबे घ्यायचे. पण बाकी उद्योग सारखेच. आणि तेही कितीतरी.
एकतर आईला सुट्टी नसल्याने आम्ही आजीच्या ताब्यात. ती काही सकाळी हाका मारून उठवायला यायची नाही. वर्षभर उठावंच लागतं वगैरे कनवाळू विचार करून. त्यामुळं गच्चीवर अंथरुणं असतील तर उन्हं अगदी अंगावर आली, चादरीतूनही आत पोचून चटके द्यायला लागली की मगच उठणे व्हायचे. मग पप्पा अजून मळ्यात गेले नसतील तर त्यांच्याबरोबर जीपमधे बसून आमच्या स्वार्‍या मळ्यात निघायच्या पोहायला. बरोबर एखादी आत्या. छोटी मुलं हौदात आणि मोठी विहिरीत.
एवढं असूनही मला कित्येक वर्षं पोहता येत नव्हतं. त्यामुळं मी दादा लोकांचं टारगेट. आत्याबाईंचं लक्ष नसलं की पाण्यात बुडवायचे मुंडी दाबून. अर्ध्या मिनिटात प्राण कंठाशी यायचे. तरीही मी पोहायला शिकले ती शाळेच्या swimming team मधे दाखल झाल्यावर. शेतातल्या विहिरी, हौद आपले नुसते डुंबायला.
यथेच्छ जलविहार झाल्यावर मळ्यात जे काही काहीही प्रक्रिया न करता पोटात ढकलण्यासारखे असेल त्याचा शोध चालू व्हायचा. डाळिंबं, बोरं, कैर्‍या, चिंचा, चिकू, ऊस. जे जे मिळेल ते. त्याला मळ्यात रहाणार्‍या गड्यांच्या घरच्या पाट्यावर वाटलेल्या मिठाची जोड असे. या मिठाची चव काही औरच. त्या मिठाला आधी वाटलेल्या मिरची-लसणाचा वास असे.
कधी उशीर झाला तर याच गड्यांच्या बायका मळ्यातल्याच मक्याची भाकरी आणि काळं तिखट किंवा चटणी खाऊ घालत. त्यांना आम्ही तिथं जेवतो आणि त्यांची मक्याची भाकर खातो हे कौतुक आणि आम्ही तयारच असायचो. परातीच्या कडेपर्यंत थापलेली चुलीवर भाजलेली भाकर. दोघात एक पुरेल इतकी. यथेच्छ हुंदडून झाले की मग आम्हाला आठवण होई की पप्पांना शोधून घरी जायची व्यवस्था करायला हवी. घरी पोचल्यावर भूक असेल तर जेवण नाहीतर दुपारचे प्लॅन्स.
घरघर नावाचा एक अजब खेळ असतो ना लहानपणी. एका Theatre workshop मधे improvization चे धडे घेताना मला हा खेळ आठवला. तासन्तास चाले हा खेळ.
पप्पांच्या एका मित्राच्या घरी मोठा झोपाळा होता. कधीकधी आम्ही त्याच्यावर बसायला जायचो. आता वाटतं भर दुपारी आमरस खाल्ल्यानंतर जी अनावर झोप येते ती मोडायला येणार्‍या आमच्यासारख्या बालराक्षसांच्या गॅंगला त्या काकू कधी कशा रागवल्या नाहीत. आणि बर्‍याचदा त्या झोपलेल्या असतानाही आम्ही बिनदिक्कत खेळत बसायचो. कारण घरच्या दरवाजाला दिवसा आतून कडी लागायचीच नाही गावात. आणि बाहेरून कुलुपही अगदी गावाबिवाला किंवा जत्रेला अगर हुरडापार्टीला जातानाच लागायचे. इतरवेळी थोडी तरी माणसे घरात असायची. गावातल्या गावात जाताना बायका नुसती कडी अडकवून जात. अजूनही त्यात फारसा बदल नसेल झाला.
दुपारच्या कार्यक्रमात फारच विविधता असायची. खरंतर आजी, आई, आत्या यांना दुपारी आम्ही थोडे झोपावे असे वाटायचे. पण छे! परिक्षेच्या काळात हातात पुस्तक धरता क्षणी अनावर होणारी दुपारची पेंग सुट्ट्या लागल्या की गायब व्हायची.
त्यावेळी एका वर्तमानपत्रात 'होय मी भूत पाहिले आहे' नावाचे एक रोमांचक सदर येई. ते वाचण्यात आणि त्यावर मौलिक विचारमंथन करण्यात बराच वेळ जाई. गावतल्या मैत्रिणी यात अजून गावातल्या तालमीतल्या, पडक्या वाड्यातल्या मसाला गोष्टी सांगून रंगत आणत. हे ऐकायला खूप मजा येई. पण मग दिवसा सुद्धा मधल्या खोल्या ओलांडून सोप्यात किंवा सैपाकघरापर्यंत एकटे जायला भिती वाटे. मधल्या खोल्या sprint मारून ओलांडल्या जात. वर्तमानपत्रं दुकानात म्हणजे हॉलमधे आजोबांच्या टेबलावर असत. तिकडं घराच्या पुढच्या खोलीला by default दुकान म्हणतात.
दुकानापलीकडे मधली खोली होती. इथं आजोबांचं कपाट आणि एक पुस्तकांचं मोठं जुनं लाकडी कपाट होतं.
आजोबांनी कधीतरी मोफत वाचनालय चालू केलं होतं. त्यातली कपाटभर पुस्तकं उरली होती. बाकीच्यांचं काय झालं आणि वाचनालय कसं लयाला गेलं हे सांगायला नकोच.
त्या खोलीला नेहेमीसारख्या खिडक्या नव्हत्या. उंचावर छताच्या थोडं खाली दोन झरोके होते. आणि इतर सगळ्या खोल्यांपेक्षा इथं शेतातलं धान्य बिन्य ठेवलेलं असायचं. तिथंच आजोबांची कॉट होती. वामकुक्षीसाठीची. उन्हाळ्यात सुद्धा दगडी बांधकामामुळं गार वाटणार्‍या त्या खोलीत कॉटवर लोळत, अर्धवट प्रकाशात, लाकडी कपाटातली, पानं पिवळी पडलेली कित्येक पुस्तकं वाचत रहाण्यात माझ्या सुट्टीतल्या कैक दुपारी सरल्यात. बाकीच्यांना एक पुस्तक परत केल्याशिवाय दुसरं मिळायचं नाही. पण मला कुठलीही आणि कितीही पुस्तकं घ्यायची full permission होती. आणि त्याचा मी पुरेपूर फायदा उठवत असे. बाबूराव अर्नाळकर, चिं. वि. जोशी, गोट्या, चिंगी, साने गुरुजी असे कितीतरी. नावं सुद्धा आठवत नाहीत आता पुस्तकांची. शिवाय वेगवेगळी जुनी मासिकं. सत्यकथा पण असायचं. आणि आजोबांना जोतिषशास्त्राची आवड असल्यानं ग्रहांकितचे अंकही असायचे. पण ग्रहांकित हे काही एकट्यानं वाचायचे पुस्तक नाही. ते वाचून कुणाची भाग्यरेषा किती सरळ वगैरे चर्चा झडत. मग आईशप्पत हिला आयुष्यरेषाच नाहीये. ही जिवंत कशी. असले तंग़डीखेच प्रयोग अर्थातच लहान गटावर उरकून घेण्यात येत. शिवाय आजचे भविष्य या सदरात मोठ्यांचे ऐकले नाही तर दुःखी होण्याचा संभव आहे असले आडाखे सांगून लहानांना राबवून घेण्याचा प्रयत्न होई. पण बालगटातला एखादा चुणचुणीत जीव ही योजना उधळून सैपाकघरात तक्रार नेई. मग एखादी पोक्तीपुरवती( हा शब्द वापरायचं फार दिवस मनात होतं) येऊन 'हे नाही ते उद्योग कुणी सांगितलेयत? मुलांनी या असल्या गोष्टीत रस घेऊ नये' अशा अर्थाचे काहीतरी ऐकवून जाई. याशिवाय पत्ते, कॅरम हे नेहमीचे उद्योग होतेच. ते पत्ते अगदी फाटके, विटके होऊन जाईपर्यंत आम्ही वापरायचो. खरंतर इतके वापरायचो की नवीन पत्ते एका दिवसात असा
फाटका-तुटका अवतार धारण करायचे. मग उजवं टोक दुमडलंय ती चौकट दश्शी, मधे निम्मी चीर पडलीय तो किलावर गुलाम, अर्धंच पान उरलंय तो इस्पिक एक्का असं प्रत्येकच पान वेगळं ओळखू यायला लागलं की मग एखाद्या गावातल्या चुलतभावाला नवा कॅट आणण्यासाठी पिटाळण्यात येई. थोडं मोठं झाल्यावर एका चुलतभावाला शोध लागला की कुठल्या तरी संकेतस्थळी पत्ते खेळत बसणारे काही लोक दर चारपाच डावानंतर कॅट बदलतात आणि ते अगदी नव्यासारखे दिसणारे पत्ते फक्त एक रुपयाला मिळतात. 'वा! किती श्रीमंत लोक असतील ते' असे वाटायचे.
कॅरमच्या सोंगट्यानीही रंग सोडून दिले होते. पांढरी कुठली काळी कुठली हेही ओळखू यायचे नाही. ते पत्तेवाले श्रीमंत लोक कधीकधी कॅरम का नाही खेळत म्हणजे आमची पत्त्यांसारखी सोंगट्यांचीही सोय झाली असती. पण 'न्हाई बाबा पत्ते खूप लोक खेळत्यात पाराबिरांवर बसून पन क्यारम खेळनारं कुनी दिसलं न्हाई' अशी निराशाजनक माहिती मिळाल्यावर मग आम्ही सोंगट्यांवर पेनाने खुणा करून ठेवलेल्या.
शिवाय प्रत्येक सुट्टीत एक नाटक बसवण्याचा प्रयत्न होई. एकदा ते खरेच व्यवस्थित बसले होते तेंव्हा आम्ही लहान मुलांसाठी तिकिट लावून प्रयोग करायचे ठरवले होते. पण आजोबांना सुगावा लागल्याने तो बेत बारगळला. मग नाईलाजाने आम्ही आमची नाटकाचे commercial वरून amateur मधे रूपांतर केले. (म्हणजे फुकट दाखवले.)
याशिवाय प्लॅंचेट नावाचा अद्भुत प्रकार आम्ही करायला शिकलो. त्याबद्दल तर बरेच सांगण्यासारखे आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.
संध्याकाळी सडकेवर फिरायला जायचो कधीकधी नाहीतर अंगणात भेंड्या खेळायच्या. टीव्हीची कमतरता तिथं जाणावायची नाही. लाईट्स बहुतेकदा दिवसातून एकदा तरी जायचेच. आणि अनेकदा दोन दोन दिवस यायचे नाहीत. मग दुकानात एक, सोप्यात एक, सैपाकघरात एक असे कंदील लागायचे. पण तो वाडा गूढ कधी वाटला नाही.
तुमच्या घरात भूत आहे असं माझी गावातली एक मैत्रीण मला म्हणाली होती. पण आम्हाला ते कधीच खरे वाटले नाही. मोठ्या वाड्यांबद्दल अशा अफवा गावात असतातच.
माझ्या कर्तबगार पूर्वजांच्या कहाण्या घेऊन तो वाडा उभा होता. आणि माझी आवडती माणसं होती ना तिथं. एकेकाळी चाळीस पन्नास माणसं, पाव्हणेरावळे यांना वागवणारा वाडा आता आम्ही गेल्यावरच सुट्टीत गजबजायचा. त्याच्या कोपर्‍याकोपर्‍यात आम्ही खेळलो, लपलो, भातुकलीचे डाव मांडले, आमची गोट्या, सागरगोटे, बांगड्या, बाहुल्या, पिगी बॅंका, खेळणी असली दौलत सुरक्षित ठेवली.
आता वर्षातून एकदा तिथं जाणं होतं. आणि पुन्हा गच्चीच्या जिन्यात बसून भुताच्या गोष्टी सांगाव्या वाटतात.
अंगतपंगत मधला स्वतः केलेला कच्चा भात खावा वाटतो. भान विसरून तासंतास पत्ते खेळावे वाटतात. राजाची, त्याच्या नावडत्या राणीची आणि विदुषकाची नाटकं बसवावी वाटतात. आजोबांच्या समोर पिगी बॅंक नेऊन हप्तावसूली करावी वाटते.
पण वाड्यात रहायचा प्रोग्रॅम नसतोच. आजोबांबरोबर वाड्याचे माणूसपण आणि आमचे लहानपण गेलेय. ते काहीही केले तरी परत येणार नाहीये.
हल्ली सुट्टी पाहिजे तेंव्हा घेता येते पण लौकर संपते. सुट्टीत करण्यासारखे काही नसतेच ना.

विषय: 
प्रकार: 

छान लेख लिहला आहे.... आवडला Happy

<<सुट्टी या शब्दाइतका स्फूर्तीदायक दुसरा शब्द नसेल. आणि दरवर्षी नेमानं उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत धमाल करायचं वय एकदा संपलं की हाच शब्द एकदम nostalgic करून टाकतो.>> अगदी खर...