"खरं सांगायचं तर..."-एक जबरदस्त रहस्य!

Submitted by प्रज्ञा९ on 19 November, 2010 - 10:14

(काल आपलीमराठी वर "खरं सांगायचं तर.." हे नाटक बघितलं आणि जे वाटलं ते इथे सांगाय्चा प्रयत्न.
या आधी जर या नाटकावर काही लिहिलं गेलं असेल तर हे लेखन कुठे हलवू ते सांगावं).

नितिन सावरकर हा एक साधा, सरळ माणूस काही कारणामुळे एका स्त्रीच्या खुनाच्या खटल्यात अडकतो.
सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध असतात. 'होपलेस चेहर्यांची अखेरची आशा' असलेल्या अ‍ॅड. धनंजय कर्णिक (विक्रम गोखले) यांची मदत मिळावी म्हणून तो त्यांच्या ऑफिसमधे येतो. आपली सगळी कहाणी सांगतो. ती स्त्री- मिस शिरिन वाडिया हिच्याशी आपली ओळख कशी झाली, मैत्री कशी झाली वगैरे सगळं प्रामाणिकपणे सांगतो.
स्वतःच्या बायकोबद्दलही (आयेशा सावरकर-सुप्रिया पिळगावकर) सांगतो. तो एक नोकरी नसलेला, आणि थोडासा अस्थिर झालेला असा निरपराध माणूस आहे याची वकीलसाहेबांना खात्री होते. तरीही, अनेक प्रकारची आडवे-तिडवे प्रश्न ते त्याला विचारतात. मधेच त्यांची रेसेप्शनिस्ट त्यांना "मिड-डे" आणून देते तेव्हा या केसला वेगळं वळण मिळतं. मिड्-डे मधे, शिरिन ने आपली सगळी संपत्ती नितिन च्या नावावर केली आहे ही बातमी छापून आलेली असते आणि खुद्द नितिन याबद्दल अनभिज्ञ असतो! पण त्यामुळे त्याच्यावरचा संशय अधिकच दाट होतो. हे सगळं चालू असतानाच पोलिस येउन त्याला अटक करून घेउन जातात.

वकीलसाहेब आपल्या असिस्टंट वकीलांबरोबर चर्चा करत असताना नितिन ची बायको आयेशा तिथे येते. तिचं एकूणच वागणं थोडसं चमत्कारीक, गूढ वाटेल असं. एका क्षणी संशय येतो की हिनेच तर नसेल ना अडकवलं नितिन ला....

"खून रात्री ९:३० ला झाला. रात्री ९ वाजताच मी मिस वाडिया यांच्याकडून निघून चालत चालत माझ्या घरी आलो तेव्हा ९:२५ झाली होते" असं नितिन ने सांगितलेलं असतं. आयेशासुद्ध त्याला दुजोरा देते, पण "परिस्थितीजन्य पुरावे नसतील तर प्रेमळ बायकोने दिलेली साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही" असं कर्णिकांनी सांगितल्यावरचं तिचं वागणं आपल्याला कोड्यात टाकतं. "नितिन आणि मी, असे दोघंच या गोष्टीची साक्षीदार आहोत" हे लक्षात आल्यावर ती पुन्हा एकदा नितिन वर प्रेम असल्याचं सांगून त्याच्या बाजूने साक्ष द्यायचं कबूल करते.
तिच्याबरोबर झालेल्या प्रश्नोत्तरंतून अजून एक धक्कादायक माहिती समजते. ती ही, की, आयेशा नितिन ची बायको नाही!!! आणि इथे आपणही पुन्हा एकदा विचारांत पडतो! पण लगेचच आयेशा खरं काय ते सांगायला सुरुवात करते. नोकर्या बदलून झाल्यावर काही काम करण्यासाठी नितिन दुबईला येतो. तिथे त्याची आयेशाशी ओळख होते. दोघं एकेमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करतात. (नितिन च्या बोलण्यातून हे वकीलांना समजलेलं असतं). पुढचा प्रकार मात्र फक्त आयेशालाच माहिती असतो. तिचा दुबईमधे एका माणसाबरोबर निकाह झालेला असतो, पण त्यात तिला तिचं स्वातंत्र्य गमवावं लागलेलं असतं. तिला आता परत भारतात यायचं असतं, आणि म्हणून ती नितिनशी लग्न करते आणि भारतात येते. पण तिचा पहिला नवरा जिवंत असताना, आणि कायद्याने ते वेगळे झालेले नसताना नितिन्शी झालेलं तिचं लग्न बेकायदा असतं आणि नेमकी हिच गोष्ट नितिनला माहिती नसते. तो तिच्यावर खूप प्रेम करत असल्यमुळे त्याला ही गोष्ट ती सांगूच शकलेली नसते. "समहाऊ, मी ही गोष्ट नितिनला नाही सांगू शकले कधीच" असं ती वकीलसाहेबांना सांगून टाकते! आणि संशयाचं धुकं विरळ होण्याऐवजी अजून दाट होत जातं!
तिचा या केसमध्ये काहीही उपयोग होणार नाही असं मनाशी पक्कं ठरवून वकीलसाहेब पुढची तयारी करतात.
******************************८

केस उभी रहाते. दोन्ही बाजूंचे वकील आपापले युक्तीवाद सुरु करतात. शिरिनची केअरटेकर, सरस्वती सावंत, हिची साक्ष चालू होते. नितिन ने या बाईबद्दल वकीलसाहेबांना सांगितलेलं असतं. तिने खुनाच्या वेळेच्या थोडं आधी म्हणे शिरिनचा आणि नितिनचा आवाज ऐकलेला असतो. त्यामुळे तिची नक्की खात्री असते की खून नितिननेच केला आहे. इतर गोष्टी सुद्धा नितिन च्या विरोधात असतातच. पण त्याच वेळी त्या बाईचाही संशय आपण घेउ लागतो. कारण, शिरिनच्या बाबतीत ती खूप जास्त पझेसिव्ह झालेली असते. शिरिन ने एका म्रुत्युपत्रानुसार सगळी संपत्ती (सुमारे ५ कोटी) या बाईच्या नावे केलेली असते; पण म्रुत्युपूर्वी ६ दिवस अगोदर, ती सगळी संपत्ती नितिन च्या नावे करते. त्यामुळे या बाईचा नितिन वर खूप राग असतो. शिवाय, शिरिन आणि नितिन मधले मैत्रीचे संबंधही तिला मान्य नसतात. जवळजवळ २० वर्षं सरस्वतीबाईंवर अवलंबून असलेली, आणि त्यांना घरचं माणूस म्हणून आपलं म्हणणारी शिरिन नितिनला जास्त आपलं मानू लागली आहे हे बाईंना पसंत नसतं.
बाईंची साक्ष संपते आणि साक्षीदार म्हणून मिसेस आयेशा खान यांना बोलावण्यात येतं. आयेशाला बघून नितिन्ला खूप मोठ्ठा धक्का बसतो. तो मुळापासून हादरतो. आयेशाची साक्ष सुरु होते. तिचा पहिला निकाह, मग नितिनशी लग्न करून भारतात येणं वगैरे सगळं ती कोर्टासमोर सांगते. "नितिनशी लग्न करताना आपण खोटं बोललो, पण तो एक खूनी आहे ही आपल्याला माहिती आहे, आणि आता खोटं बोलणं आपल्याला पटणार नाही" असं कारण सांगून ती पूर्ण विरुद्ध साक्ष देते. त्याचे खुनाच्या वेळचे कपडे, त्याचं ९:२५ च्याऐवजी रात्री १०:१० ला घरी येणं...सगळं सगळं ती सांगते! केस पूर्ण फिरते!

वकीलसाहेबांना समजून चुकतं की आता केस गेल्यातच जमा आहे! पुढच्या सुनावणीची घोषणा होते आणि वकीलसाहेब परत ऑफिसमधे येतात. तिथे त्यांना एक बाई भेटायला येते. "नितिन सावरकरला उपयोगी येतील असे काही पुरावे आपल्याकडे आहेत" असं ती सांगते. तिचा एकूण अवतार बघून तिचं काहीही ऐकून घ्यावं असं खरं तर वकीलसाहेबांना वाटत नसतं, पण न जाणो, खरंच काही उपयोग झाला तर...या विचाराने ते तिला आत बोलावतात. अतिशय छचोर अशा त्या बाईला बघून तिचा पोटापाण्याचा "धंदा" ते ओळखतात. ती त्यांना काही पत्रं देते.

काय असतं त्या पत्रात? खरंच काही पुरावा असतो का तो? नितिन खरंच निर्दोष सुटतो क? आयेशा ने दिलेल्या साक्षीचं काय होतं?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी नाटक बघणं गरजेचं आहे.

अगाथा ख्रिस्तीच्या "Witness for the Prosecution" या मूळ कादंबरीवर हे नाटक बेतलेलं आहे. सगळ्याच कलाकरांचा उत्तम अभिनय ही या नाटकाची खूप मोठी जमेची बाजू; पण त्यातही, सुप्रियाने केलेला एकूनच अभिनय जबरदस्त भावखाऊ! म्हणजे अप्रतीम! तिच्या अभिनयाने हे नाटक एकहाती पेललंय असं काही वेळा वाटतं. अर्थात विक्रम गोखले, अक्षय पेंडसे, विवेक लागू हेही उत्तमच्...पण सुप्रियाला hats off!!!

खरं तर मी मायबोलीवर फार काही लिहित नाही. बरेचदा रोमात, किंवा प्रतिसाद देताना फारतर कोमात (COM= comment only mode हा माझा स्वतःचा शब्द्..अगदी आताच सुचलेला!! Happy )क्वचित एक छोटासा अनुभव शेअर केला होता, त्यालाही २ वर्षं झाली असतील. पण या नाटकाने वेड लावलं मला आणि पुन्हा काहीतरी शेअर करावंसं वाटलं. पुस्तक, नाटक, सिनेमा....कसलंच परीक्षण लिहिलेलं नाही मी याआधी. त्यामुळी लिहिताना काही कमी-अधिक झालं असेल तर चुभूद्याघ्या!! माझ्या परीने, जसं जमलं तसं लिहिलंय. शिवाय ही संपूर्ण वैतक्तीक आवड आहे.

तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादची वाट बघतेय.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हे २००८ च्या डिसेंबर मध्ये दिनानाथला पाहिले होते. चांगले आहे नाटक पण तोपर्यंत व्यवस्थित बसले नव्हते. नाटके जितके जास्त प्रयोग तित्की जास्त चांग्ली बसतात असा आजवरचा अनुभव. "Witness for the Prosecution"वाचलेली असल्यामुळे शेवट साधारण्पणे माहित होता.

मी आत्ताच बघितल हे नाटक. मस्त आहे.
मला पण आवडलं.सुप्रियाची अ‍ॅक्टिंग काय सही झाली आहे.
खरंच ' त्या' सीन मधे मी पण सुप्रियाला नाही ओळखलं:)

या नाटकाबद्दल मी आधी लिहिले होते. नाटक आणि सुप्रिया, याबाबत प्रश्नच नाही, पण भारतीय न्यायव्यवस्थेचा विचार केल्यास, नाटकात काही त्रुटी राहिल्यात. (त्याबद्दलही मी लिहिले होते.)

दीपांजली, रचु, मीही आधी त्या सीन मधे सुप्रियाला ओळखलं नव्हतं, पण मग समजलं. मग वाटलं, जुळ्या बहिणी वगैरे काहीतरी....मग एक चांगली नि एक वाईट्..मग काहीतरी सूड्-बिड असेल..... :ड

आणि ट्रॅव्हल कं. मधे गेलेली ती मुलगी वगैरे ऐकून का कोण जाणे, ती रश्मीच आली पटकन डोळ्यासमोर!! माझं असं खूपदा होतं. काहीही कारण नसताना मला उगिच कहीतरी वाटतं, आणि नेमकं तसंच काहीतरी असतं! Wink

दिनेशदा, तुम्ही लिहिलेलं मला कुठे वाचायला मिळेल?

प्रज्ञा, आपल्याकडे नाटक कसं वाटलं असा बीबी आहे त्यावर असणार.
सुप्रिया माझी अत्यंत आवडती कलाकार. लग्नानंतरचा बराच कालखंड ती नाटक सिनेमापासून दूर राहिली. तू तू मै मै मधे तिचे आणि रिमाचे मस्त ट्यूनिंग जमले होते. पण तिच्या योग्यतेची किंवा तिचा कस लावतील, अशी नाटके तिला मिळाली नाहीत.

मी सुद्धा हे नाटक २ वर्षापुर्वी दिनानाथला पाहीलं. खुप आवडले.
छान लेख. आज पुन्हा त्या नाटकाची आठवण झाली. पण त्याचे प्रयोग बंद झालेत.

प्रज्ञा नाटक विश्लेशन छान लिहिले आहे..
नाटकाचा शेवट तसा लक्षात येण्यासारखाच आहे..
जेंव्हा विक्रम गोखले आणी सुप्रिया प्रथम भेटतात तेंव्हा तो तिला सांगतो.. प्रेमळ बायकोची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जात नाही.. आणी त्यावर ती विक्षीप्त पणे ऊत्तर देते..
मला जी माहीती हवी आहे ती मिळाली ..

तेंव्हाच बराचसा नाटकाचा शेवट लक्षात येतो Happy