Down the Memory Lane

Submitted by टवणे सर on 19 November, 2010 - 03:48

माझ्या अगदी पहिल्या-पहिल्या आठवणींमध्ये मी भाऊंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या पाठीवर उभा राहून त्यांची पाठ चेपून देतो आहे. दुपारी बारा वाजता शाळेतून परतल्यावर वरच्या खोलीत ते गादी घालून पालथे झोपत. मग मी थोडा वेळ भिंतीचा आधार घेत हलके हलके त्यांच्या पाठीवर उभा राहत, चालत त्यांची पाठ चेपून द्यायचो आणि मग अभ्यासाला बसायचो. भाऊ मानेखाली दोन-तीन उश्या लावून मग ग्रंथालयाचे पुस्तक घेऊन वाचायला लागत आणि वाचता-वाचताच झोपी जात. ते झोपलेले असताना त्यांच्या हातातून गळून शेजारी पडलेले जाडजूड ’तुंबाडचे खोत’ नावाचे पुस्तक माझ्या चांगलंच लक्षात आहे. पुढे बारा-तेरा वर्षांनी मी ते पुस्तक वाचेस्तोवर माझ्या डोकात ते पुस्तक ’तुंबाडचे खोरे’ म्हणूनच घट्ट बसले होते.

भाऊ असे रोज दुपारी, रात्री जेवणानंतर पुस्तक वाचत पडलेले असत. शनिवारी-रविवारी मी आई-बाबांकडे गेलो की त्या घरातपण पुस्तके लोळत पडलेली असत. फक्त शनिवारी-रविवारी मला मिळणारी आई खूप दिवस एक अतिशय जीर्ण झालेली ’गॉन विथ द विंड'ची पेपरबॅक आवृत्ती वाचत होती. तिला बिचारीला पण सुट्टीचा शनिवार-रविवारच मिळायचा वाचायला. पण वाचताना ती इतकी गुंग झालेली असे की तिला हाक मारलेली, ‘खायला दे’ म्हणून ओरडून सांगितलेले कानावरसुद्धा पडत नसे. त्या फाटक्या पेपरबॅकचे तुकडे-तुकडे करुन फेकून द्यायची माझी प्रचंड इच्छा होती. सुदैवाने लवकरच ती कादंबरी तिने हातावेगळी केली. क्लार्क गेबलचा ‘गॉन विथ द विंड’ हा सिनेमा खास व्हीसीआर भाड्याने आणून तिने आणि बाबांनी एका रात्री बघितला होता.

तसा मी जवळपास रोजच भाऊंबरोबर ‘खरे मंदिर’ला जात असे. खरे मंदिर हे मिरजेतले वाचनालय. खालच्या मजल्यावर साधारण भाऊंच्याच वयाची अनेक म्हातारी माणसं तिरक्या मोठाल्या लाकडी बोर्डावर टाचण्यांनी टाचलेली रोजची वर्तमानपत्रे वाचत असत. ’अतिरेकी’ आणि ’जनप्रवास’ ही दोन वर्तमानपत्रे तर मी फक्त ‘खरे मंदिर’मध्येच बघितली. कुणाच्याही घरी मला ही आजवर दिसलेली नाहीत. चौथीचा स्कॉलरशिपचा निकाल जाहीर झाल्याचे कळताच भाऊ मला घेउन ‘खरे मंदिर’ला गेले. ह्या ‘अतिरेकी’मध्येच ती यादी छापून आलेली होती. खरे मंदिरच्या वरच्या मजल्यावर वाचनालय होते. वर जायला लांबच्या लांब लाकडी जिना होता आणि जिन्याच्या लाकडी कठड्याला लागून म्हातार्‍यांना वर चढायला सोपे जावे म्हणून एक जाडजूड दोरी बांधलेली होती. ह्या वरच्या मजल्यावर लाकडी, काचेचे दरवाजे असलेली बरीच कपाटे भरुन पुस्तके होती. तिथे एक लहान मुलांच्या पुस्तकांचे पण कपाट होते. त्या कपाटातली पुस्तके सुट्टी सुरू झाली की मला भाऊ आणून द्यायचे. महिना-दोन महिन्याची माझ्या नावाची वर्गणी भरून ती पावतीपण मला द्यायचे. त्यातले ’भुताचा वाडा’ हे एकमेव पुस्तक मला आठवते. तिथे वाचलेले बाकी एकही पुस्तक आता आठवत नाही. पण मोठ्यांच्या कपाटातली, शंकर पाटलांचे धिंड, टारफुला वगैरे; गारंबीचा बापू, स्वामी, पांगिरा, माझी जन्मठेप वगैरे वगैरे पुस्तकं मला आठवतात. ह्याच मजल्यावर एक बाजूचे चांगले दोन-चार खणांचे मोठे कपाट एम.एन.रॉय ह्यांच्या पुस्तकांनी भरलेले होते. त्या कपाटाच्या पट्टीवर ’अमुक तमुक ब्याकुडकर देशपांडे ह्यांनी दान केलेली पुस्तके’ की असेच काहीतरी रंगवलेले होते. ह्या ब्याकुडकर देशपांड्यांचा वाडा अंबाबाईच्या देवळाच्या समोरच्या बोळात होता. माझ्याच वयाच्या आसपास असलेल्या ब्याकुडकर देशपांड्यांच्या अज्याच्या आजोबांनी ही पुस्तके इथे दान केलेली आहेत असे भाऊंनी मला सांगितले. त्यामुळे एम.एन.रॉय हे अज्याच्या आजोबांचे दोस्त होते असा काहीतरी माझा समज झाला होता. आजही एम.एन.रॉय म्हणजे ब्याकुडकरांच्या त्या निळ्या, बारका दरवाजा असलेल्या आडव्या वाड्यातल्या एका खोलीत भाड्याने राहणारा म्हातारासा एक माणूस असेच माझ्या डोळ्यासमोर येते.

मोठं झालं की ही ‘खरे मंदिर’मधली सगळी पुस्तकं आपण वाचून काढायची हे माझ्या डोक्यात; मोठं झालं की लग्न करायचं असतं, इतक्या स्वाभाविकपणे बसलं होतं. त्यामानानं मी खरे मंदिरमधली पुस्तकं फारशी वाचली नाहीत. मिशन हॉस्पिटलमध्ये येणार्‍या अमेरिकन मिशनच्या डॉक्टरांनी आपल्या बरोबर आणलेली पेटाराच्या पेटारा पुस्तकं ते जाताना मिरजेतच सोडून गेल्यामुळे, सुरू झालेले बायसिंगर वाचनालयच माझे वाचनालय राहिले. तिथली इंग्रजी पुस्तकं अख्ख्या मिरजेत कुणी कधी वाचली की नाहीत, माहिती नाही पण मराठी पुस्तकांच्या विभागात मात्र चांगल्यापैकी गर्दी असे. पण ते बरेच नंतर, दहावीच्या सुट्टीपासून.

लहानपणी वाचलेली आणि लक्षात राहिलेली पुस्तकं भारत-भारतीची. संघाच्या कुठल्यातरी परिवार संस्थेने प्रकाशित केलेली ही प्रत्येकी पाच बाय तीन इंच, मोठ्या टाइपमधली अक्षरे आणि अठ्ठेचाळीस किंवा बावन्न पानांची पुस्तके होती. मुखपृष्ठावर ज्या व्यक्तीवर पुस्तक आहे त्या व्यक्तीचे चित्र आणि मलपृष्ठावर ह्या सगळ्या महान व्यक्तींच्या चेहर्‍यांनी बनवलेला भारताचा नकाशा. करमरकरांच्या वाड्यात राहणार्‍या मुकुंददादाने हा शंभर-एक पुस्तकांचा गठ्ठा आमच्या वाड्यातल्या घरात आणून टाकला होता. त्या गठ्ठ्यासाठी आईने किती किंमत मोजली माहीत नाही पण माझ्या आयुष्यात त्या गठ्ठ्याला तोड नाही. एका बैठकीत सलग, झपाटून पुस्तक वाचणे आणि वाचून संपल्यावर आनंदून-शहारून-दु:खी होउन ते पुस्तक डोक्यात घोळवणे, मला ह्या भारत-भारतीच्या गठ्ठ्यांनी शिकवले. नेहमीच्या ओळखीच्या गांधीजी, नेहरु, छत्रपती शिवाजी वगैरेंचे एक एक पुस्तक होतेच पण मोठ्या माणसांना पण माहीत नसलेल्या लचित बडफूकन, राजा छत्रसाल, राणी अंबाला, संत बसवेश्वर इत्यादींवरही एक एक पुस्तक होते. शाळेतपण कुणाला ही नावे ऐकूनही माहीत नाहीत आणि मला तर त्यांची अख्खी गोष्ट माहीत असे. आणि हे केवळ आपण पुस्तकं वाचत असल्यामुळे आहे, ही आपण बाकीच्यांपेक्षा भारी आहोत अशी (दांभिक) भावना निर्माण होण्याची सुरुवात.

तिसरीत इतिहासाला ’थोरांची ओळख’ हे पुस्तक होते. मी सुट्टीतच शाळा सुरू व्हायच्या आधी नवीन घरातल्या जिन्याच्या लॅंडिंगमध्ये बसून ते वाचून संपवले होते. त्यातला पहिला धडा दादाभाई नवरोजींवर तर शेवटचा महर्षी कर्व्यांवर होता. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला त्या-त्या थोर व्यक्तीचे चित्र होते. आईच्या आठवणीनुसार मी ते पुस्तक संपवून जिन्यातून खाली हॉलमध्ये आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मी आईला म्हटले की, "आई, महर्षी कर्वे नसते तर आज तू आणि आजीपण शाळा शिकल्या नसता ना." आईला मुलाचे कौतुक म्हणून आजही हा किस्सा आठवतो आणि सांगावासा वाटतो. मला मात्र महर्षी कर्वे एकशेपाचाव्या वर्षी गेले, हे वाक्य वाचून भाऊपण एकशेपाचाव्या वर्षी म्हणजे अजून तीस वर्षांनी जाणार असे गणित मांडल्याचे आठवते. भाऊ मात्र दोनच वर्षात वारले.

पाचवी ते आठवी काय वाचले ते फारसे लक्षात नाही. त्या दरम्यानची लक्षात राहिलेली तीनच पुस्तके - ’अपूर्वाई’, ’ पूर्वरंग’ आणि ’जावे त्यांच्या देशा’. आई आजारी होती तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्येच तळमजल्यावर असलेल्या छोट्याश्या वाचनालयातून ती पुस्तके आणायची. ही तीन पुस्तके मी त्या ग्रंथालयातून आणून वाचलेली. सुएझच्या कालव्यातून बोट जात असताना खजुराची झुकलेली झाडे वगैरे वर्णन व जोडीने बहुतेक सरवट्यांची रेखाचित्रे, पूर्वरंगमधले बहुतेक थायलंडमधले वगैरे वर्णन, थेम्सच्या काठचे लंडन आणि सीनच्या काठचे पॅरीस (आणि तिथे मिळणारी वारुणी) वगैरे वगैरे वाचून खूप प्रभावित झालो होतो. 'जावे त्यांच्या देशा'मधले फोन करुन वक्ष-नितंब-कंबर ह्यांचा आकार कळवून बाईला बोलावता येते असे अर्धवट कळणारे वाक्यपण नेमके आठवते. प्रवासवर्णन ह्या साहित्यप्रकाराची झालेली ही पहिली आणि फार छान ओळख. पुलंच्या लिखाणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुबोधता आणि कुठल्याही वयोगटातले वाचक वाचू शकतील अशी भाषा.

आठवीच्या सुट्टीत घराजवळचेच एक ग्रंथालय सुरु केले. आता पुण्यात होतो. तिथली अंतरं मोठी वाटायची. नगर वाचनालय, रसिकचे वाचनालय वगैरे कुठेतरी दूर होते म्हणे. ज्ञानप्रबोधिनीत एक-दोनदा गेलो तर 'पुस्तक नको पण बौद्धिक आवर' अशी परिस्थिती झाली. म्हणून मग हे घराजवळचेच ग्रंथालय पकडले - नाव शांतिनिकेतन. कॉलनीतल्याच एका बंगल्यात बाहेरच्या खोलीत चालवलेलं हे ग्रंथालय. छोटेखानी असलं तरी मला दोन वर्षे खूप पुरलं. वर्गणी भरली आणि पुलंचे ’असा मी असामी’ हे पुस्तक घेउन आलो. लहानपणी दूरदर्शनवर पुलंचे कथाकथन लागायचे ते बघितल्याचे आठवत होते. पण हाय! साफ निराशा झाली. मला कुठल्याच विनोदावर हसू येईना. शंकर्‍या आणि त्याची आगाऊ बहीण, स्काऊट, शिवणाच्या-संगीताच्या शिकवण्या वगैरे भयंकर कंटाळत मी ते पुस्तक संपवले. जेवायला बसल्यावर पानात काही टाकायचे नाही हे मनावर जितके घट्ट बिंबले आहे तितकेच पुस्तक अर्धवट सोडायचे नाही हे देखील. आणि म्हणूनच केवळ असा मी असामी संपवले. पुढे त्याच वर्षभरात मग ’बटाट्याची चाळ’ आणि ’व्यक्ती आणि वल्ली’ पण वाचले. 'व्यक्ती आणि वल्ली'मधली मोजकी व्यक्तिचित्रे वगळता ही पुस्तकेपण आवडली नाहीत. पुलंचा एवढा उदो-उदो सगळीकडे की ही पुस्तके आपल्याला आवडत नाहीत, हे बोलायची पण चोरी. नंतर कधीतरी वडीलांशी बोलताना त्यांनीपण पुलंच्या ह्या पुस्तकांबाबत हेच मत नोंदवले आणि आपण एकटेच नाही,हे ऐकून हायसे वाटले. असेच एक अतिभंपक पुस्तक म्हणजे पार्टनर. तेव्हा व.पु.काळे हे फार प्रसिद्ध लेखक आहेत, हे माहीत नव्हते. त्यांच्या पुस्तकांनी ग्रंथालयातल्या कपाटाचे एक पूर्ण रॅक भरले होते. पण हे एक पुस्तकच एवढे भंकस होते की परत कधी ह्या लेखकाने लिहिलेले एकही पान उलटायचे नाही असे ठरवले. दुर्दैवाने असे घडणे नशिबात नव्हते!

ह्याच काळात सुहास शिरवळकरांची बरीचशी पुस्तके वाचली. ती वाचताना मजा यायची. त्यांचे ’समांतर’ नावाचे पुस्तक तेव्हा फार आवडले होते. त्यात एका माणसाला हुबेहूब त्याच्याप्रमाणे जीवन जगलेला एक मनुष्य भेटतो असे काहीतरी होते. चक्रपाणी हे नाव त्यात पहिल्यांदा वाचले व फार आवडले होते. विजय देवधर, रवींद्र गुर्जर प्रभृतींनी अनुवादित केलेली अनेक पुस्तके पण तेव्हा वाचली. सिडने शेल्डनच्या ब्लडलाईन वगैरे कादंबर्‍यांतली कामुक-मादक वर्णने पुन्हा-पुन्हा वाचायचो. ’साहसांच्या जगात’ वाचताना स्लिपिंग बॅग, कॅरॅबिनर, सिरॅक, बोल्डर असे कित्येक चित्रविचित्र शब्द केवळ कल्पनेनेच मनात चितारले (त्यातले स्लिपिंग बॅग, सिरॅक ह्याची मी कल्पिलेली चित्रे आणि प्रत्यक्षातल्या वस्तू ह्यात जमीन-अस्मानाचे अंतर होते). नारायण धारपांचे समर्थ आणि आप्पा पण ओळखीचे झाले ते ह्याच वर्षात. त्यांच्या उदबत्त्या, पंचकोन, यज्ञ, गंडे-दोरे वगैरे वाचून सुरुवातीला मजा आणि नंतर टिंगलीला यथेच्छ साहित्य मिळाले. पण त्यांच्या कथांमधल्या उपमा, धाट (फॉर्म), समर्थांना असलेले एक सर्वज्ञानी शांत शहाणपण वगैरे फार सुंदरपणे उभे केलेले असे. नातूंचे आगार, मकरंदची गोष्ट वगैरे आजपण चांगल्याच लक्षात आहेत.

दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात पहिले पाच धडे हे पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांवर होते. पुढे नेहमीचेच गांधी-नेहरु-इंग्रज वगैरे यशस्वी कलाकार होते. पण हे पहिले पाच धडे नववीतून दहावीत जायच्या सुट्टीत सुरुवातीलाच वाचले आणि ग्रंथालयातल्या एका जाडजूड पुस्तकाची आठवण झाली. त्याचे नाव ’नाझी’ काहीतरी होते. इथून माझ्या ’नॉन-फिक्शन’च्या प्रेमाला सुरुवात झाली. ’नाझी भस्मासुराचा उदयास्त’ ह्या कानिटकरांच्या पुस्तकाने अभ्यास करुन लिहिलेल्या, छायाचित्रे असलेल्या पुस्तकांचे एक नवे दालनच खुले करुन दिले. पूर्व युरोप, पश्चिम युरोप, उत्तर आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया, पॅसिफिक ह्यांना नकाशात शोधून, त्यांचे परस्परसंबंध कळायला लागले. हिटलर, रोमेल, हिमलर, गोबेल्स, गोअरींग, चर्चिल, चेंबरलेन, द गॉल, वायमार रिपब्लिक, स्टालिन, ख्रुश्चेव्ह, मुसोलिनी, चॅंग-कै-शेक, जनरल टोगो, यामामोटो, नेताजी, रुझवेल्ट, आयसेनहॉवर, मॉंटेग्युमेरी, नॉर्मंडी, पर्ल हार्बर, मोरोक्को, लिबिया, सुदान, सिंगापूर, स्टालिनग्राड, नॉर्वे, जपान असे अनेक आजवर फारशी माहितीच नसलेले शब्द-स्थळ-घटनासमुच्चय जणू काही लहानपणापासूनच माहीत आहेत असे वाटू लागले. ह्यातच मग लोकशाही, हुकुमशाही, भांडवलशाही, साम्यवाद हे शब्दपण कानावर पडू लागले, थोडेफार आकळू लागले. ह्या पुस्तकाच्या धारेने मग ’व्होल्गा जेव्हा लाल होते’, ’आणि ड्रॅगन जागा झाला’, ’फिडेल, चे आणि क्युबा’ ही पुस्तके वाचली. काहीतरी सामान्य गुप्तहेर कथा वगैरे असेल असं अनुमान करुन हाती घेतलेली पण अनपेक्षितपणे अतिशय सुरेख निघालेली ’डेझर्टर’ ही कादंबरी वाचली. आपण आज ज्या जगात-काळात राहतो आहोत तिथेच केवळ पन्नास वर्षांपूर्वी काय प्रचंड नरसंहार आणि उलथापालथ झाली होती, हे वाचून थक्क झालो. शाळेत मात्र सर्वजण चाचा चौधरी वा शेरलॉक होम्सच वाचत होते. फार फार तर फास्टर फेणे, बटाट्याची चाळ, ज्यूल वर्न वगैरे वगैरे. आणि हिटलरने ब्लिट्झ-क्रिग तंत्राचा वापर करुन दोन आठवड्यांच्या आत पोलंड घशात घातला असे उत्तर लिहून पैकीच्या पैकी मार्क मिळवत. अर्थशास्त्र हा नुकताच दाखल झालेला विषय. फरक लिहा - भांडवलशाही आणि साम्यवाद - ह्या प्रश्नाचे उत्तर मी पेपरात मध्यभागी रेघ न मारता निबंधासारखे सुरेख लिहिले होते. भांडवलशाहीत विषमता वाढते व साम्यवादात सर्वांची मुस्कटदाबी होते हे वाक्य पुस्तकात नसल्याने व मधोमध रेघ मारुन १, २, ३, ४ असे मुद्दे मांडत फरक न लिहिल्याने मास्तरांनी मला मार्क दिले नाहीत. पण तेव्हा मी बर्‍यापैकी कोडगा झाल्याने मला त्याचे काही वाटले नाही. शाळेत बरोबर पुस्तकांबद्दल बोलायला कुणीतरी असावं वा मी बोलत असेन तर ’काय विचित्र बोलतोय’ अशा नजरेनं न बघणारा एखादा मित्र असणं, ही माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा. हीच व्यथा पुढे महाविद्यालयीन शिक्षणातही राहिली. पदव्युत्तर शिक्षणाची दोन वर्षे मात्र एका जिवाभावाच्या मल्लू मित्राने इंग्रजी कादंबर्‍यांचे एक प्रचंड दालन उघडून दाखवले आणि प्रचंड बडबडपण केली. अर्थात ते फार नंतर.

दहावीच्या मराठीच्या पुस्तकात एक अजिबात न कळणारा, काहीतरी विचित्र वाक्यं असलेला एक धडा होता. हाताच्या बोटातनं सटकणारी वाळू काय, अजंठ्यातला बुद्ध काय, धबधबे काय - काहीतरी असंबद्ध होते. शिक्षकांना पण ह्या धड्याबद्दल काहीही कळले नसणार, कारण पहिल्या वाक्यापासून शेवटल्या वाक्यापर्यंत त्यांनी फक्त तो वाचून काढला. ह्या धड्यावर प्रश्न आला तर काय लिहायचं हाच यक्षप्रश्न सर्वांना होता. परीक्षेत काय प्रश्न आले होते ते लक्षात नाही कारण मराठीच्या पेपरात मला निबंध लिहायलाच खूप वेळ लागत असे आणि मग बाकी प्रश्न मी फक्त उरकत असे. सुट्टीत मिरजेला घरी गेलो. ही पहिली मोठी सुट्टी. ’बायसिंगर मेमोरिअल’ ह्या मिशन हॉस्पिटलसमोरच्या ग्रंथालयात जाऊन वर्गणी भरली. इथे खूप पुस्तके होती (आणि ग्रंथपाल अगदी खडूस चेहर्‍यांचे). तर तिथे एक कोसला नावाचे पुस्तक दिसले. हे तर आपल्या घराचे नाव. त्यामुळे आनंदाने हे पुस्तक घेऊन घरी आलो आणि वाचून झाल्यावर झपाटल्यासारखा झालो. हे काहीतरी नवीनच हाताशी लागलं होतं. इथून जे सुरू झालं ते इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षापर्यंत एक सलग कॅनव्हासच आठवतो. ह्या मधल्या वर्षांत मग पेंडश्यांची भाषा (आणि पुढे भूगोल) सापडली. रथचक्र, ऑक्टोपस, एक होती आजी, हद्दपार, गारंबीचा बापू, एल्गार, लव्हाळी अशी एकसे एक पुस्तके वाचली. दळवींची ’वेडगळ’ वाचून झाल्यावर आजूबाजूचा प्रत्येक मनुष्य व आपण स्वत:देखील खरेच शहाणे आहोत का, की हादेखील केवळ भासच आहे असे वाटू लागले. ’सारे प्रवासी घडीचे’ वाचून शिरोडा-आरवली हिंडलो. आपू, बिड्या ओढणारी आजी, कडक लाडू, रवळनाथ, दादू गुरवाचे वस्त्रहरण, माय नेम इज नेरु म्हणणारा नरू, पूर्णान्न बनवणारे डॉ. रामदास - एव्हढाश्या पुस्तकात दळवींनी केवळ कमाल केली आहे, कमाल! मग चक्र वाचली. त्याच्या प्रस्तावनेतल्या संदर्भाने वासूनाका, माहीमची खाडी वगैरे वाचले. मग 'मुद्दे आणि गुद्दे'तून अभ्यासू आणि आक्रस्ताळ्या अत्र्यांचे दर्शन झाले. 'पिपांत मेले ओल्या उंदीर'वर यथेच्छ टीका आणि 'चाफा बोलेना'ची तुफान स्तुती करणारे लेख एकाच पुस्तकात. मग 'मुद्दे आणि गुद्दे'च्या बाजूबाजूने ’वाघनखे’ वाचले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा शालेय इतिहासात गैरहजर असलेला पण अतिशय महत्त्वाचा इतिहास समजला. असेच एकदा आणीबाणीवरचे एक पुस्तक वाचायला मिळाले. १९७५ ते ७७ मध्ये लोकशाहीच्या चिंध्या उडवणारी एक घटना घडली होती व त्याबद्दल आजच्या तरुण पिढीला, म्हणजे माझ्याच मित्रमंडळींना अजिबात माहिती नसावी; इतकेच काय ’आणीबाणी’ नामक काही होऊन गेले हे माहीत असलेलेदेखील हाताच्या बोटावर मोजण्याइतके, हे बघून प्रचंड चिडचिड व्हायची. मग एकदा वर्गात आणीबाणीबद्दल सगळ्यांना सांगितले तर बरेचसे ’मग काय झालं?’ अशा भावनेने उठून गेले. महाराष्ट्र टाइम्समधून अशोक जैन ह्याच काळात कानोकानी हे फार सुंदर सदर चालवत होते. त्यात वाचून कित्येक साहित्यिकांचे कथासंग्रह, कादंबर्‍या आणल्या. पु.भा.भावे, व्यंकटेश माडगूळकर, पानवलकर, गाडगीळ, नवकथा, मौज-पॉप्युलर-कोठावळे, सत्यकथा, हंस, माणूस इत्यादी नावे माझ्या जिभेवर बसली.

एकदा ’एम. टी. आयवा मारु’ असे विचित्र नाव असलेली एक कादंबरी दिसली. कॅप्टन सेनगुप्ताच्या मृत्युपासून सुरुवात होऊन ज्वाला वादळात डेकवरून समुद्रात भिरकावली जाते इथे संपेपर्यंत मला ह्या कादंबरीने खिळवून ठेवले. त्या वयाचा परिणाम असेल, एकलेपणाची हाव पण त्याचवेळी दुसर्‍या माणसाने आपल्या कृतीस दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल फारच जास्त संवेदनशील असणे अशा विचित्र मानसिकतेच्या मला ह्या कादंबरीत काहीतरी प्रचंड दिसलं. अगदी आजवर मी एम.टी. आयवा मारु इतकी प्रचंड भारावून टाकणारी कादंबरी वाचली नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, जीए, ऑरवेल, काम्यु, कोएट्झी, माडगूळकर, पानवलकर, बाळकृष्ण प्रभुदेसाईंचे ’गंधर्व’, आरती प्रभू अशा कित्येक कलाकृती/लेखकांचे साहित्य मी पुन्हा पुन्हा वाचले आहे. पण एम.टी.आयवा मारू मी पुन्हा वाचली नाही. आज जर मी ती परत वाचली तर मला कदाचित ती मुळीच आवडणार नाही. आणि हा धोका मला पत्करायचा नाही. ती तिथेच राहू दे. तिच्याबरोबर बरेच काही तिथेच राहू दे.

आई-बाबांकडून जीए हे नाव आणि ’स्वामी’ नावाची एक कथा ह्याबाबत बरेचदा ऐकले होते. एकदा ग्रंथालयात ’पिंगळावेळ’ हा ह्याच लेखकाचा कथासंग्रह दिसला आणि त्यात ही ’स्वामी’ नावाची कथापण होती. घरी आलो. पुस्तक उघडले. पहिली कथा ऑर्फिअस. फारशी रंजक वाटली नाही पण शैली अद्भुत, आजवर कधीच न वाचलेली होती. दुसरी कथा ’स्वामी’. कथा संपल्यासंपल्या पुन्हा एकदा वाचली. तिसरी कथा होती ’कैरी’. मग होती बळवंत मास्तराची ’वीज’. मग ’फुंका’, त्यानंतर ’तळपट’, ’ मुक्ती’, ’कवठे’, ’घर’, ’यात्रिक’ आणि शेवटी ’लक्ष्मी’. And I was zapped! एकाच लेखकाच्या एकाच कथासंग्रहात एवढ्या प्रचंड ताकदीच्या एकामागोमाग एक कथा मी कधीच वाचलेल्या नव्हत्या. त्यातली भाषा, उपमा, एकेक व्यक्तिरेखा ठसवत नेणं, सदा उपस्थित नियतीचं सार्वभौमत्व, लेखकाचा तो तुटला-तटस्थ निरीक्षकाचा अवतार - हे सगळेच जबरदस्त होते. पुढचे काही महिने मग निळासावळा, पारवा, हिरवे रावे, सांजशकुन, रमलखुणा जिरवण्यात गेले. तुती, विदुषक, प्रवासी, सेरेपी इस्कलार एली, चंद्रावळ, गुंतवळ ह्या कथा कोरल्या आहेत. ही शिल्पे आहेत; पांढर्‍या कागदावर पाच पैशांच्या शाईने गिरवलेली अक्षरे नव्हेत. माशांचा राजा, पैलपाखरे मधल्या कथा (पैलपाखरेच्या त्या आवृत्तीत म.द.हातकणंगलेकरांची अत्यंत उत्कृष्ट प्रस्तावना होती) ह्यांनी इंग्रजी/इतर भाषांतल्या गंभीर, सकस साहित्याची तोंडओळख झाली. हेच संदर्भ हाताशी पकडून पुढे गोल्डिंग, लॉरेन्स, मॉम अशी सुरुवात तरी करता आली. जी.ए. ह्या मनस्वी कलाकाराने त्यांच्या कलाकृतींमधून जो अनुभव मला दिला आहे तो माझ्यासाठी एकमेवाद्वितीय आहे. ह्या सगळ्यावर कडी केली ती ’माणसे: अरभाट आणि चिल्लर’ने. दातार मास्तर, पिशव्या विठोबा, दशांश चिन्ह, गडकरी आणि गदागदा हालून गळणारा अश्वत्थ वृक्ष. मला अक्षरओळख होत होती खरेतर त्या आसपास जी.ए. निर्वतले. मात्र गळलेल्या त्या पानाने मागे ठेवलेला त्याचा साठा आजही माझी सोबत करतो आहे. एखाद्या बेसावध क्षणी व्हेनेझुएलामधली कुठलीतरी नदी मनात खोल कुठूनतरी वर उफाळून येते, आतड्याला पीळ पडतो आणि काळ्याशार अंधाराने मी डोळे मिटून घेतो. अश्वत्थ वृक्षाची पाने गळत राहतात.

ह्या सगळ्यात कविता मात्र राहूनच गेल्या. ग्रंथालयात कवितासंग्रह कधी बघितल्याचे पण लक्षात नाही. म्हणजे ते तिथे असतीलही पण कथा-कादंबर्‍यांच्या पसार्‍यात कविताही असते हे मी साफ विसरून गेलो. दिवेलागण आणि 'नक्षत्रांचे देणे' हे दोनच कवितासंग्रह आयुष्यात आले. कधीमधी ग्रेसची एखादी कविता. कदाचित कविता समजण्याची-उमजण्याची तरलता माझ्या मनास मिळालीच नसेल. माहीत नाही. कदाचित ’रोमॅंटिकपणा’ कमी पडला असेल. तर्काच्या आधारे गोष्टी घासत पुढे पळत राहिल्याने ’कविता’ आसपास तरी कधी भटकली होती का असे वाटू लागते. पण तीदेखील आयुष्यात कुठेतरी असेलच अशी आशा करतो. कुणाच्या तरी मांडीवर डोके ठेवून कविता वाचत पडल्याची रोमॅंटिक स्वप्ने अजूनही पडतात. कवितेशी नाळ जुळवण्याची आशा मी अजून सोडलेली नाही.

आशाळभूतपणे पुण्यातल्या पुस्तकांच्या दुकानातून वा चर्चगेट, आझाद मैदानाजवळच्या जुन्या पुस्तकांच्या बाजारातून मी प्रचंड पुस्तके विकत घ्यायची स्वप्ने बघत हिंडायचो. चारही भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरलेल्या खोलीत मधोमध भल्याथोरल्या खुर्चीवर पसरून पुस्तके वाचत पडणे हे तेव्हा माझे परमोच्च सुखाचे स्वप्न होते. असं हिंडताना एखादे पुस्तक घ्यायचो देखील. नाईन्टीन एटीफोर, कॅचर इन द राय, द आऊटसायडर, क्राईम अँड पनिशमेंट अशा तेव्हा रस्त्यावर घेतलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतंत्रपणे पानेच्या पाने लिहिता येईल. शाळाकॉलेजात असताना वाटायचं की नोकरी लागली की हवी तेवढी पुस्तके विकत घेता येतील. परीक्षा नाही की कुणाची कटकट नाही की परीक्षेचा अभ्यास आणि नोकरीची चिंता सोडून पुस्तकं वाचताना वाटणारी बोच नाही. आज मनाला येईल तेव्हा, पुस्तकाचे दुकान-प्रदर्शन दिसेल तिथे पुस्तकं विकत घेतोय. अर्थात नोकरी लागल्यावर वेळ मात्र तुम्हाला परका होत जातो हे कुणी सांगितलेच नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टन्या फार सुरेख. वपु आवडले नन्तर नावडले. अगदी तिरस्कार करण्याइतके नावडले... अगदी आताआता वपुंचे कुठले तरी शेवटी शेवटीचे पुस्तक वाचताना त्यांच्या वडिलांबद्दल त्यानी एक आठवण लिहिली होती ती वाचून खूपच गलबललो .त्यानंतर मानवी संबंधाबद्दल दृश्तीकोन बदलून गेला. मी 'सिनिक'पणातून बाहेर येऊन भोवतालच्या थोड्या विचित्र वागणार्‍या लोकाबाबत अधिक अकॉमोडिव्ह झालो. सहिष्णु झालो. वपुंचे हे उपकार आहेत माझ्यावर ,माझ्या स्वभावात बदल केल्याबद्दलचे.

ही आठवण मला वाटते वपु.चे वडील शेवटी शेवटी भ्रमिष्टासारखे करू लागल्यानन्तर कपडे करून घराबाहेर घाईघाईने निघत आणि म्हणत, मला राजकमलमधून बोलावणे आले आहे.(वपुंचे वडील श्रेष्ठ चित्रकार व कलादिग्दर्शक होते पण त्याना उचित संधी आणि आर्थिक यश फारसे मिळाले नाही ) पाच हजार रुपये देणार आहेत.' वपु म्हणतात . किती छोट्या छोट्या इच्छा माणसाच्या अपुर्‍या राहतात आणि त्या किती विचित्र पद्धतीने बाहेर पडतात. असा काहीसा तो प्रसन्ग आहे. त्यावर मला वाटले आपणही आजूबाजूच्या मित्र, नातेवाइकांच्या छोट्या छोट्या इच्छा बालीशपना, पोरकटपणा, बाळबोध अभिरुची या नावाखाली उडवून लावतो . हे बरे नाही. ह्या छोट्या बाबींचेही त्या माणसांच्या भावविश्वात महत्व असते.

त्याला रिस्पॉन्ड केले तर तर त्यामाणसाच्या आयुष्यात एक दोन क्षण तरी आनन्दाचे आपण निर्माण करू शकतो. तेव्हापासून मलाही एक वेगळ्या प्रकारचे सुख लाभते...

टण्या, मी ही पुवि वर वाचला होता. आवडला.

याचे २D किंवा ३D ग्राफीक बनवता येईल का? पुस्तकाचा प्रकार क्ष व य अक्षांवर (उलट्या क्रमाने अक्ष लिहीणार होतो, पण तो 49erच्या प्रताधीकाराचा भंग झाला असता), व काळ तिसर्‍या अक्षावर. पुस्तकांच्या प्रकारांवे थवे/घोळके कसे काळाप्रमाणे सरकतात याचे चित्र नुसते डोळ्यासमोर उभे न राहता चक्क दिसेल.

खूप छान, खूप प्रामाणिक लिहीलं आहेस. माझ्या तर्फे ह्या लेखाला 'A private affair with books' किंवा नुसतं 'A private affair' हे नाव. अस्चिगची कल्पना भन्नाट आहे.

केवळ आपण पुस्तकं वाचत असल्यामुळे आहे, ही आपण बाकीच्यांपेक्षा भारी आहोत अशी (दांभिक) भावना निर्माण होण्याची सुरुवात. >>>> हं.. Happy

भरपूर पुस्तकांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने माहितीवर लिखाण म्हणून चांगलं वाटलं आणि त्यामुळे आशिषची कल्पनाही मस्त वाटते आहे. पण लेख म्हणून फारसा आवडला नाही. एकतर कुठेकुठे आत्मप्रौढी जाणवली. काही काही गोष्टी पार्ले, पुपु, मिवापु किंवा तत्सम कुठे कुठे याआधी बर्‍याचदा बोलल्या गेलेल्या आहेत.
याशिवाय गेल्या एक दीड वर्षापासून मायबोलीवर नेमाडे, पेंडसे, पानवलकर वाचणारे लय भारी !! बाकीचं वाचणारे अगदीच फालतू अश्या अर्थाच्या कमेंट्स बर्‍याचदा पहायला मिळतात.. त्याच्या थोड्याफार जवळ जाणारं लिखाणं वाटलं.

अर्थात हा सगळा मा.बु.दो. किंवा लेखाबद्दल विचार करण्याच्या माझ्या दृष्टीकोनातला प्रॉब्लेम असू शकतो. !

पुढील वाचनाला शुभेच्छा.. Happy

एक दीड वर्षापासून मायबोलीवर नेमाडे, पेंडसे, पानवलकर वाचणारे लय भारी !! बाकीचं वाचणारे अगदीच फालतू अश्या अर्थाच्या कमेंट्स बर्‍याचदा पहायला मिळतात
..>>>

आणि मीना प्रभू , पुलं, अवचट वगैरे वाचणारे वाचकच काय पण माणसेही नाहीत असे तु.क.
त्यांना वाचणारांची अभिरुची अगदी पाशवी पातळीवरची....

तुम्हाला राहत आवडत नाही? अरेरे .. अनेक तु.क.

छान लिहिलाय आढावा वाचन प्रवासाचा. नुस्त्या वाचनापासून सुरु होऊन साक्षेपी वाचनापर्यंत पोचायला ज्या व्यक्तिंची मदत झाली ते वाचायला आवडलं असतं . प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष असे 'गुरु' अनेक टप्प्यावर भेटतात, कधि आपल्याला कळतं, कधी अनेक वर्षांनी मागे बघुन पाहताना लक्षात येतं.

असामी असामी किंवा पुल आवडत नाहीत हे अगदी 'आंबा आवडत नाही' या कॅटेगरीतले वाटते. असो , पसंद अपनी अपनी. बाकी लेख छान आहे. आवडला.

टण्या... पुस्तकवेडं कोणी दिसलं, भेटलं की बरं वाटतं... हा लेख वाचताना तसंच काहीसं बरं वाटलं Happy
ही पुस्तकांची नाव वाचूनच मस्त वाटलं Happy पुस्तकांबद्दल लिहावं, बोलावं तितकं कमीच आहे..
पण मुळात ज्या कारणाकरता मी प्रतिक्रीया लिहायला आले ते म्हणजे लेखात मिरजेचा उल्लेख वाचला म्हणून. माझे बाबा मिरजेचे (आणि इतकी वर्ष पुण्यात राहूनही) ते अजूनही मिरजेचेच. लहानपणापासून अंबाबाई तालीम, भानू तालीम, खरे मंदीर, ब्राह्मणपुरी, मिशन हॉस्पीटल, मिरजेचे अरब, मिरज जंक्शन, वसंत व्याख्यानमाला... इतकं काय काय ऐकलंय ना की बस्स ! लहानपणी टांगा आणि पेढा हे मिरजेला जाण्याची आणि मचूळ पाणी ही न जाण्याची कारणं असायची !
हे सगळे परिचयाचे शब्द वाचले लेखात... मस्त वाटलं... मला ब्राह्मणपुरीत माझ्या बाबा, काकांनी जिथे लहानपण काढलं ती जागा आठवली Happy

का कुणास ठाऊक पण लहानपणी मला मिरजेला वेड्यांच इस्पितळ आहे वाटायचं अन मिरजेत राहणारे सारे वेडे आहेत असचं वाटायचं. Proud

शाळेत बरोबर पुस्तकांबद्दल बोलायला कुणीतरी असावं वा मी बोलत असेन तर ’काय विचित्र बोलतोय’ अशा नजरेनं न बघणारा एखादा मित्र असणं, ही माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा. हीच व्यथा पुढे महाविद्यालयीन शिक्षणातही राहिली. >>> अगदी मनातलं.

काय प्रतिक्रिया देउ ते कळत नाहीए....
आपल्या मनात असलेले विचार, आपल्याला आलेले अनुभव, इतके जसेच्या तसे दुसर्‍या कुणाला आले असतील असे कधीच वाटले नव्हते.... इट्स काईंड ऑफ स्केरी!!
तेंव्हा आत्तातरी फक्त....अगदी... अगदी....अगदी.

माय गॉड, किती साम्य आपल्या अनुभवात..
माझे आजोबा (भाऊच), त्यांच्या पाठीवरुन चालणे हे नेहमीचं काम. त्यांनीच २ री- ३रीत आणून दिलेली भारत-भारतीची पुस्तकं..३०-४० तरी नक्कीच होती. वाचनालयातल्या रोजच्या फेर्या, ७-८ वी त च वाचलेले पूर्वरंग, अपूर्वाई, जात्यांदे. जीएंचं पहिलं पुस्तक मी ही पिंगळावेळच वाचलं. नववीत असताना. मग कधीतरी निळासावळा.
व्होल्गा जेव्हा लाल होते हे पुस्तक मात्र मला नाही आवडलं. दहावीत असेन तेव्हा. काय कळतंय? असो.
वपुंच पार्टनर मी वाचलेलं पहिलं अन शेवटचं पुस्तक. "यात आवडण्यासारखं काय आहे?" असं म्हटल्यावर आई म्हणाली " काय माहिती, मलाही नाही आवडत". मग वपु काही आमच्या घरी आले नही पुन्हा.
कवितांच्या बाबतीत पुन्हा +१. मला कविता अजुनही क्वचितच कळतात ..

मला मात्र शाळेत नाही तरी अकरावीपासून पुढे मस्त वाचनप्रेमी मित्र-मैत्रिणी मिळाले. सगळे फक्त इंग्लिशच वाचणारे. मग मी ही मराठी वाचणं सोडूनच दिलं ते थेट मायबोलीवर येईपर्यंत. (इथेही चर्चाच जास्त! Wink )
आता कोसला वाचायला पाहिजे, कदाचित माझंही हे वर्षं एकदम मस्त जाईल.

लेख वाचायला खूप छान वाटला ..

आधीही वाचला होता पण काय प्रतिक्रीया द्यावी ते न कळल्यामुळे बहुदा लिहीलं नसावं .. आज नताशाने वर काढल्यावर परत वाचला .. परत आवडला ..

मला कधीच वाचनाची गोडी लागली नाही .. बहुदा ह्यामुळेच "असंही असतं ?" हेच वाटलं, तेव्हा आणि आताही .. Happy

सुंदर लिहिलय. माझ्या आणि तुझ्या लहानपणात काहीच साम्य नसलं तरी नॉस्टॅलजिक व्हायला झालं. खुप दिवसांनी लेख वाचायला मजा आली. Happy
त्या सिडनी शेल्डनचे पुस्तक वाचताना एकदम कामूक वर्णन आल्यावर वर त्रेधातिरपिट उडाल्याची चांगली आठवते! मी एका खोलीत वाचत एकटा बसलेलो असताना एकदम चोरट्यासारखी "आपल्याला कोणी बघत तर नाहीये ना?" अशा भावनेनी इकडे तिकडे नजर फिरवून कोणी नाहीये ना अशी खात्री केली होती. Lol
पुढे ते इंग्रजी टर्म्स बद्दल पण तेच. मी चौथी पाचवीत टिनटिन वाचायला घेतलं तेव्हापासून कित्येक वर्ष "hi"
ला "ही" म्हणून वाचायचो. Lol आता मध्यंतरी टिनटिन परत वाचायला घेतलं तेव्हा गंमत म्हणून मी हाय च्या जागी हि टाकून तुटक, अडखळत वाचून बघितलं. Happy

शाळेत बरोबर पुस्तकांबद्दल बोलायला कुणीतरी असावं वा मी बोलत असेन तर ’काय विचित्र बोलतोय’ अशा नजरेनं न बघणारा एखादा मित्र असणं, ही माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा. हीच व्यथा पुढे महाविद्यालयीन शिक्षणातही राहिली.>>>>>>>>>>> इथे तुझ्या भावना टोटली समजू शकतो कारण मी त्या विचित्र नजरेने बघणार्‍यांमधला एक होतो. माझ्या ओळखीची होती अशी एक दोन मुलं पण त्यांना यडं किंवा लै शानं समजून सोडून द्यायचो.
मी स्वतः कधी फिक्शनच्या बाहेर पडलोच नाही पण त्याची खंत वगैरे नाही कारण तेव्हा पुस्तकं म्हणजे फक्त विरंगुळा होता. जी काही थोडी थिडकी वाचली त्यात मजा आली पण आता हा लेख वाचून तू वाचलेली काही पुस्तकं मला वाचायची इच्छा होत आहे ह्याचे कारण माझ्या डोक्यातले बॅरियर्स पडले आहेत आणि तू वर्णनं ही खुप सुंदर केलीयेत. परत एकदा, मस्त लेख! Happy

टू गुड ! ...फारच मस्त लिहिलंय. स्वतंत्र लेख म्हणून तर परत परत वाचण्यासारखा आहेच पण ह्या निमित्ताने प्रत्येकजण आपापल्या गल्ल्यांतून फेरफटका मारुन आला असेल हे निश्चित.
तशा तर आठवणी खूपच आहेत. पण पाचवी-सहावीतील एक खास आठवण म्हणजे आमच्याकडे अशीच कुणीतरी दिलेली ८०-८१ सालातली जुनी किशोरची मासिकं आणि दिवाळी अंक होते. त्यात एक साहसकथा/ रहस्यकथा क्रमशः म्हणून प्रसिद्ध झाली होती. दुर्दैवाने एका उत्कठांवर्धक वळणावर कथा पोचली त्या महिन्याचा आणि त्याच्या पुढचे अंकच मिळाले नव्हते. खूप दिवस अस्वस्थ होते.अगदी चुटपुट लागून राहिली होती. नंतर कधीतरी एक-दोन वर्षांनी लायब्ररीत अचानक त्या कथेचं जीर्ण पुस्तक मिळालं. ती संध्याकाळ, झपाटून जाऊन ते पुस्तक तासादोन तासांत आधाशासारखं वाचून काढणं, वाचता-वाचता त्या तुटलेल्या क्षणापाशी कथा पोचली तेव्हा वाढलेली प्रचंड धडधड हे सगळं सगळं आठवतंय. गंमत म्हणजे त्या पुस्तकाचं नाव आणि बाकीचे तपशील मात्र काहीही आठवत नाहीत ! त्या कथेत समुद्र आणि पाणबुडी होती एवढंच आठवतंय आता Happy

उत्खनन केल्याबद्दल नताशाला स्पेशल थँक्स Happy

<<<< पुलंचे ’असा मी असामी’ हे पुस्तक घेउन आलो. लहानपणी दूरदर्शनवर पुलंचे कथाकथन लागायचे ते बघितल्याचे आठवत होते. पण हाय! साफ निराशा झाली. मला कुठल्याच विनोदावर हसू येईना. शंकर्‍या आणि त्याची आगाऊ बहीण, स्काऊट, शिवणाच्या-संगीताच्या शिकवण्या वगैरे भयंकर कंटाळत मी ते पुस्तक संपवले. जेवायला बसल्यावर पानात काही टाकायचे नाही हे मनावर जितके घट्ट बिंबले आहे तितकेच पुस्तक अर्धवट सोडायचे नाही हे देखील. आणि म्हणूनच केवळ असा मी असामी संपवले. >>>>>>>>> +१११११११११११११

अगदी माज़ा ( Z) च अनुभव........ मला पण असेच वाटलेले ते पुस्तक वाचुन... आणि बाकिच्यानी मला वेड्यात काडलेले....

खुपच सुंदर लेख आहे. वर काढल्याबद्दल नताशाला धन्यवाद.
असा प्रत्येकाचा आपापला इंटरेस्टिंग प्रवास असेल...
अगो, खरंच गल्ल्यांमधून भटकून यायला झालंच Happy

ओघवता आढावा वाचनरुचि रुजण्याचा, जोपासण्याचा !! फारच छान.
[ आमचा कालखंड ह्याही पूर्वीचा. सुरवात, नाथमाधव, वि.वा. हडप, ह. ना. आपटे, राहुल सांकृत्यायन, चिं वि. जोशी, ताम्हणकर, ग.ल. ठोकळ इ.इ. पासून. त्यांतच, शि. म.परांजपे, माटे इत्यादींचं लिखाण/भाषणं वाचणं समयोचितच असायचं. त्यावेळीं पुण्याच्या 'सकाळ'मधे आठवड्यातून एक-दोनदा क्रमशः 'मॉबी डिक' चं भाषांतर यायचं. त्याने इंग्लीश पुस्तकांबद्दल प्रचंड कुतूहल व नंतर ओढ निर्माण केली. नंतर स्ट्रँड बुक स्टोअरमधून मुद्दाम मिळवलेली 'मॉबी डिक'ची काळ्या जाड कव्हरवर सोनेरी अक्षरात 'मॉबी डिक' कोरलेली प्रत म्हणूनच आजही मला खूपच प्रिय आहे. वाचन खूपच झालं असं अजिबात नसून निदान किनार्‍यावर नुसता डुंबलो म्हणून हा सागर किती अथांग आहे, क्षितीज किती दूर आहे याची कल्पना तरी आली. आनंदाबरोबरच जीवनात हा 'परस्पेक्टिव्ह' दिल्याबद्दल पुस्तकांचा सदैव ॠणी आहे.]

Pages