माझ्या अगदी पहिल्या-पहिल्या आठवणींमध्ये मी भाऊंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या पाठीवर उभा राहून त्यांची पाठ चेपून देतो आहे. दुपारी बारा वाजता शाळेतून परतल्यावर वरच्या खोलीत ते गादी घालून पालथे झोपत. मग मी थोडा वेळ भिंतीचा आधार घेत हलके हलके त्यांच्या पाठीवर उभा राहत, चालत त्यांची पाठ चेपून द्यायचो आणि मग अभ्यासाला बसायचो. भाऊ मानेखाली दोन-तीन उश्या लावून मग ग्रंथालयाचे पुस्तक घेऊन वाचायला लागत आणि वाचता-वाचताच झोपी जात. ते झोपलेले असताना त्यांच्या हातातून गळून शेजारी पडलेले जाडजूड ’तुंबाडचे खोत’ नावाचे पुस्तक माझ्या चांगलंच लक्षात आहे. पुढे बारा-तेरा वर्षांनी मी ते पुस्तक वाचेस्तोवर माझ्या डोकात ते पुस्तक ’तुंबाडचे खोरे’ म्हणूनच घट्ट बसले होते.
भाऊ असे रोज दुपारी, रात्री जेवणानंतर पुस्तक वाचत पडलेले असत. शनिवारी-रविवारी मी आई-बाबांकडे गेलो की त्या घरातपण पुस्तके लोळत पडलेली असत. फक्त शनिवारी-रविवारी मला मिळणारी आई खूप दिवस एक अतिशय जीर्ण झालेली ’गॉन विथ द विंड'ची पेपरबॅक आवृत्ती वाचत होती. तिला बिचारीला पण सुट्टीचा शनिवार-रविवारच मिळायचा वाचायला. पण वाचताना ती इतकी गुंग झालेली असे की तिला हाक मारलेली, ‘खायला दे’ म्हणून ओरडून सांगितलेले कानावरसुद्धा पडत नसे. त्या फाटक्या पेपरबॅकचे तुकडे-तुकडे करुन फेकून द्यायची माझी प्रचंड इच्छा होती. सुदैवाने लवकरच ती कादंबरी तिने हातावेगळी केली. क्लार्क गेबलचा ‘गॉन विथ द विंड’ हा सिनेमा खास व्हीसीआर भाड्याने आणून तिने आणि बाबांनी एका रात्री बघितला होता.
तसा मी जवळपास रोजच भाऊंबरोबर ‘खरे मंदिर’ला जात असे. खरे मंदिर हे मिरजेतले वाचनालय. खालच्या मजल्यावर साधारण भाऊंच्याच वयाची अनेक म्हातारी माणसं तिरक्या मोठाल्या लाकडी बोर्डावर टाचण्यांनी टाचलेली रोजची वर्तमानपत्रे वाचत असत. ’अतिरेकी’ आणि ’जनप्रवास’ ही दोन वर्तमानपत्रे तर मी फक्त ‘खरे मंदिर’मध्येच बघितली. कुणाच्याही घरी मला ही आजवर दिसलेली नाहीत. चौथीचा स्कॉलरशिपचा निकाल जाहीर झाल्याचे कळताच भाऊ मला घेउन ‘खरे मंदिर’ला गेले. ह्या ‘अतिरेकी’मध्येच ती यादी छापून आलेली होती. खरे मंदिरच्या वरच्या मजल्यावर वाचनालय होते. वर जायला लांबच्या लांब लाकडी जिना होता आणि जिन्याच्या लाकडी कठड्याला लागून म्हातार्यांना वर चढायला सोपे जावे म्हणून एक जाडजूड दोरी बांधलेली होती. ह्या वरच्या मजल्यावर लाकडी, काचेचे दरवाजे असलेली बरीच कपाटे भरुन पुस्तके होती. तिथे एक लहान मुलांच्या पुस्तकांचे पण कपाट होते. त्या कपाटातली पुस्तके सुट्टी सुरू झाली की मला भाऊ आणून द्यायचे. महिना-दोन महिन्याची माझ्या नावाची वर्गणी भरून ती पावतीपण मला द्यायचे. त्यातले ’भुताचा वाडा’ हे एकमेव पुस्तक मला आठवते. तिथे वाचलेले बाकी एकही पुस्तक आता आठवत नाही. पण मोठ्यांच्या कपाटातली, शंकर पाटलांचे धिंड, टारफुला वगैरे; गारंबीचा बापू, स्वामी, पांगिरा, माझी जन्मठेप वगैरे वगैरे पुस्तकं मला आठवतात. ह्याच मजल्यावर एक बाजूचे चांगले दोन-चार खणांचे मोठे कपाट एम.एन.रॉय ह्यांच्या पुस्तकांनी भरलेले होते. त्या कपाटाच्या पट्टीवर ’अमुक तमुक ब्याकुडकर देशपांडे ह्यांनी दान केलेली पुस्तके’ की असेच काहीतरी रंगवलेले होते. ह्या ब्याकुडकर देशपांड्यांचा वाडा अंबाबाईच्या देवळाच्या समोरच्या बोळात होता. माझ्याच वयाच्या आसपास असलेल्या ब्याकुडकर देशपांड्यांच्या अज्याच्या आजोबांनी ही पुस्तके इथे दान केलेली आहेत असे भाऊंनी मला सांगितले. त्यामुळे एम.एन.रॉय हे अज्याच्या आजोबांचे दोस्त होते असा काहीतरी माझा समज झाला होता. आजही एम.एन.रॉय म्हणजे ब्याकुडकरांच्या त्या निळ्या, बारका दरवाजा असलेल्या आडव्या वाड्यातल्या एका खोलीत भाड्याने राहणारा म्हातारासा एक माणूस असेच माझ्या डोळ्यासमोर येते.
मोठं झालं की ही ‘खरे मंदिर’मधली सगळी पुस्तकं आपण वाचून काढायची हे माझ्या डोक्यात; मोठं झालं की लग्न करायचं असतं, इतक्या स्वाभाविकपणे बसलं होतं. त्यामानानं मी खरे मंदिरमधली पुस्तकं फारशी वाचली नाहीत. मिशन हॉस्पिटलमध्ये येणार्या अमेरिकन मिशनच्या डॉक्टरांनी आपल्या बरोबर आणलेली पेटाराच्या पेटारा पुस्तकं ते जाताना मिरजेतच सोडून गेल्यामुळे, सुरू झालेले बायसिंगर वाचनालयच माझे वाचनालय राहिले. तिथली इंग्रजी पुस्तकं अख्ख्या मिरजेत कुणी कधी वाचली की नाहीत, माहिती नाही पण मराठी पुस्तकांच्या विभागात मात्र चांगल्यापैकी गर्दी असे. पण ते बरेच नंतर, दहावीच्या सुट्टीपासून.
लहानपणी वाचलेली आणि लक्षात राहिलेली पुस्तकं भारत-भारतीची. संघाच्या कुठल्यातरी परिवार संस्थेने प्रकाशित केलेली ही प्रत्येकी पाच बाय तीन इंच, मोठ्या टाइपमधली अक्षरे आणि अठ्ठेचाळीस किंवा बावन्न पानांची पुस्तके होती. मुखपृष्ठावर ज्या व्यक्तीवर पुस्तक आहे त्या व्यक्तीचे चित्र आणि मलपृष्ठावर ह्या सगळ्या महान व्यक्तींच्या चेहर्यांनी बनवलेला भारताचा नकाशा. करमरकरांच्या वाड्यात राहणार्या मुकुंददादाने हा शंभर-एक पुस्तकांचा गठ्ठा आमच्या वाड्यातल्या घरात आणून टाकला होता. त्या गठ्ठ्यासाठी आईने किती किंमत मोजली माहीत नाही पण माझ्या आयुष्यात त्या गठ्ठ्याला तोड नाही. एका बैठकीत सलग, झपाटून पुस्तक वाचणे आणि वाचून संपल्यावर आनंदून-शहारून-दु:खी होउन ते पुस्तक डोक्यात घोळवणे, मला ह्या भारत-भारतीच्या गठ्ठ्यांनी शिकवले. नेहमीच्या ओळखीच्या गांधीजी, नेहरु, छत्रपती शिवाजी वगैरेंचे एक एक पुस्तक होतेच पण मोठ्या माणसांना पण माहीत नसलेल्या लचित बडफूकन, राजा छत्रसाल, राणी अंबाला, संत बसवेश्वर इत्यादींवरही एक एक पुस्तक होते. शाळेतपण कुणाला ही नावे ऐकूनही माहीत नाहीत आणि मला तर त्यांची अख्खी गोष्ट माहीत असे. आणि हे केवळ आपण पुस्तकं वाचत असल्यामुळे आहे, ही आपण बाकीच्यांपेक्षा भारी आहोत अशी (दांभिक) भावना निर्माण होण्याची सुरुवात.
तिसरीत इतिहासाला ’थोरांची ओळख’ हे पुस्तक होते. मी सुट्टीतच शाळा सुरू व्हायच्या आधी नवीन घरातल्या जिन्याच्या लॅंडिंगमध्ये बसून ते वाचून संपवले होते. त्यातला पहिला धडा दादाभाई नवरोजींवर तर शेवटचा महर्षी कर्व्यांवर होता. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला त्या-त्या थोर व्यक्तीचे चित्र होते. आईच्या आठवणीनुसार मी ते पुस्तक संपवून जिन्यातून खाली हॉलमध्ये आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मी आईला म्हटले की, "आई, महर्षी कर्वे नसते तर आज तू आणि आजीपण शाळा शिकल्या नसता ना." आईला मुलाचे कौतुक म्हणून आजही हा किस्सा आठवतो आणि सांगावासा वाटतो. मला मात्र महर्षी कर्वे एकशेपाचाव्या वर्षी गेले, हे वाक्य वाचून भाऊपण एकशेपाचाव्या वर्षी म्हणजे अजून तीस वर्षांनी जाणार असे गणित मांडल्याचे आठवते. भाऊ मात्र दोनच वर्षात वारले.
पाचवी ते आठवी काय वाचले ते फारसे लक्षात नाही. त्या दरम्यानची लक्षात राहिलेली तीनच पुस्तके - ’अपूर्वाई’, ’ पूर्वरंग’ आणि ’जावे त्यांच्या देशा’. आई आजारी होती तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्येच तळमजल्यावर असलेल्या छोट्याश्या वाचनालयातून ती पुस्तके आणायची. ही तीन पुस्तके मी त्या ग्रंथालयातून आणून वाचलेली. सुएझच्या कालव्यातून बोट जात असताना खजुराची झुकलेली झाडे वगैरे वर्णन व जोडीने बहुतेक सरवट्यांची रेखाचित्रे, पूर्वरंगमधले बहुतेक थायलंडमधले वगैरे वर्णन, थेम्सच्या काठचे लंडन आणि सीनच्या काठचे पॅरीस (आणि तिथे मिळणारी वारुणी) वगैरे वगैरे वाचून खूप प्रभावित झालो होतो. 'जावे त्यांच्या देशा'मधले फोन करुन वक्ष-नितंब-कंबर ह्यांचा आकार कळवून बाईला बोलावता येते असे अर्धवट कळणारे वाक्यपण नेमके आठवते. प्रवासवर्णन ह्या साहित्यप्रकाराची झालेली ही पहिली आणि फार छान ओळख. पुलंच्या लिखाणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुबोधता आणि कुठल्याही वयोगटातले वाचक वाचू शकतील अशी भाषा.
आठवीच्या सुट्टीत घराजवळचेच एक ग्रंथालय सुरु केले. आता पुण्यात होतो. तिथली अंतरं मोठी वाटायची. नगर वाचनालय, रसिकचे वाचनालय वगैरे कुठेतरी दूर होते म्हणे. ज्ञानप्रबोधिनीत एक-दोनदा गेलो तर 'पुस्तक नको पण बौद्धिक आवर' अशी परिस्थिती झाली. म्हणून मग हे घराजवळचेच ग्रंथालय पकडले - नाव शांतिनिकेतन. कॉलनीतल्याच एका बंगल्यात बाहेरच्या खोलीत चालवलेलं हे ग्रंथालय. छोटेखानी असलं तरी मला दोन वर्षे खूप पुरलं. वर्गणी भरली आणि पुलंचे ’असा मी असामी’ हे पुस्तक घेउन आलो. लहानपणी दूरदर्शनवर पुलंचे कथाकथन लागायचे ते बघितल्याचे आठवत होते. पण हाय! साफ निराशा झाली. मला कुठल्याच विनोदावर हसू येईना. शंकर्या आणि त्याची आगाऊ बहीण, स्काऊट, शिवणाच्या-संगीताच्या शिकवण्या वगैरे भयंकर कंटाळत मी ते पुस्तक संपवले. जेवायला बसल्यावर पानात काही टाकायचे नाही हे मनावर जितके घट्ट बिंबले आहे तितकेच पुस्तक अर्धवट सोडायचे नाही हे देखील. आणि म्हणूनच केवळ असा मी असामी संपवले. पुढे त्याच वर्षभरात मग ’बटाट्याची चाळ’ आणि ’व्यक्ती आणि वल्ली’ पण वाचले. 'व्यक्ती आणि वल्ली'मधली मोजकी व्यक्तिचित्रे वगळता ही पुस्तकेपण आवडली नाहीत. पुलंचा एवढा उदो-उदो सगळीकडे की ही पुस्तके आपल्याला आवडत नाहीत, हे बोलायची पण चोरी. नंतर कधीतरी वडीलांशी बोलताना त्यांनीपण पुलंच्या ह्या पुस्तकांबाबत हेच मत नोंदवले आणि आपण एकटेच नाही,हे ऐकून हायसे वाटले. असेच एक अतिभंपक पुस्तक म्हणजे पार्टनर. तेव्हा व.पु.काळे हे फार प्रसिद्ध लेखक आहेत, हे माहीत नव्हते. त्यांच्या पुस्तकांनी ग्रंथालयातल्या कपाटाचे एक पूर्ण रॅक भरले होते. पण हे एक पुस्तकच एवढे भंकस होते की परत कधी ह्या लेखकाने लिहिलेले एकही पान उलटायचे नाही असे ठरवले. दुर्दैवाने असे घडणे नशिबात नव्हते!
ह्याच काळात सुहास शिरवळकरांची बरीचशी पुस्तके वाचली. ती वाचताना मजा यायची. त्यांचे ’समांतर’ नावाचे पुस्तक तेव्हा फार आवडले होते. त्यात एका माणसाला हुबेहूब त्याच्याप्रमाणे जीवन जगलेला एक मनुष्य भेटतो असे काहीतरी होते. चक्रपाणी हे नाव त्यात पहिल्यांदा वाचले व फार आवडले होते. विजय देवधर, रवींद्र गुर्जर प्रभृतींनी अनुवादित केलेली अनेक पुस्तके पण तेव्हा वाचली. सिडने शेल्डनच्या ब्लडलाईन वगैरे कादंबर्यांतली कामुक-मादक वर्णने पुन्हा-पुन्हा वाचायचो. ’साहसांच्या जगात’ वाचताना स्लिपिंग बॅग, कॅरॅबिनर, सिरॅक, बोल्डर असे कित्येक चित्रविचित्र शब्द केवळ कल्पनेनेच मनात चितारले (त्यातले स्लिपिंग बॅग, सिरॅक ह्याची मी कल्पिलेली चित्रे आणि प्रत्यक्षातल्या वस्तू ह्यात जमीन-अस्मानाचे अंतर होते). नारायण धारपांचे समर्थ आणि आप्पा पण ओळखीचे झाले ते ह्याच वर्षात. त्यांच्या उदबत्त्या, पंचकोन, यज्ञ, गंडे-दोरे वगैरे वाचून सुरुवातीला मजा आणि नंतर टिंगलीला यथेच्छ साहित्य मिळाले. पण त्यांच्या कथांमधल्या उपमा, धाट (फॉर्म), समर्थांना असलेले एक सर्वज्ञानी शांत शहाणपण वगैरे फार सुंदरपणे उभे केलेले असे. नातूंचे आगार, मकरंदची गोष्ट वगैरे आजपण चांगल्याच लक्षात आहेत.
दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात पहिले पाच धडे हे पहिल्या आणि दुसर्या महायुद्धांवर होते. पुढे नेहमीचेच गांधी-नेहरु-इंग्रज वगैरे यशस्वी कलाकार होते. पण हे पहिले पाच धडे नववीतून दहावीत जायच्या सुट्टीत सुरुवातीलाच वाचले आणि ग्रंथालयातल्या एका जाडजूड पुस्तकाची आठवण झाली. त्याचे नाव ’नाझी’ काहीतरी होते. इथून माझ्या ’नॉन-फिक्शन’च्या प्रेमाला सुरुवात झाली. ’नाझी भस्मासुराचा उदयास्त’ ह्या कानिटकरांच्या पुस्तकाने अभ्यास करुन लिहिलेल्या, छायाचित्रे असलेल्या पुस्तकांचे एक नवे दालनच खुले करुन दिले. पूर्व युरोप, पश्चिम युरोप, उत्तर आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया, पॅसिफिक ह्यांना नकाशात शोधून, त्यांचे परस्परसंबंध कळायला लागले. हिटलर, रोमेल, हिमलर, गोबेल्स, गोअरींग, चर्चिल, चेंबरलेन, द गॉल, वायमार रिपब्लिक, स्टालिन, ख्रुश्चेव्ह, मुसोलिनी, चॅंग-कै-शेक, जनरल टोगो, यामामोटो, नेताजी, रुझवेल्ट, आयसेनहॉवर, मॉंटेग्युमेरी, नॉर्मंडी, पर्ल हार्बर, मोरोक्को, लिबिया, सुदान, सिंगापूर, स्टालिनग्राड, नॉर्वे, जपान असे अनेक आजवर फारशी माहितीच नसलेले शब्द-स्थळ-घटनासमुच्चय जणू काही लहानपणापासूनच माहीत आहेत असे वाटू लागले. ह्यातच मग लोकशाही, हुकुमशाही, भांडवलशाही, साम्यवाद हे शब्दपण कानावर पडू लागले, थोडेफार आकळू लागले. ह्या पुस्तकाच्या धारेने मग ’व्होल्गा जेव्हा लाल होते’, ’आणि ड्रॅगन जागा झाला’, ’फिडेल, चे आणि क्युबा’ ही पुस्तके वाचली. काहीतरी सामान्य गुप्तहेर कथा वगैरे असेल असं अनुमान करुन हाती घेतलेली पण अनपेक्षितपणे अतिशय सुरेख निघालेली ’डेझर्टर’ ही कादंबरी वाचली. आपण आज ज्या जगात-काळात राहतो आहोत तिथेच केवळ पन्नास वर्षांपूर्वी काय प्रचंड नरसंहार आणि उलथापालथ झाली होती, हे वाचून थक्क झालो. शाळेत मात्र सर्वजण चाचा चौधरी वा शेरलॉक होम्सच वाचत होते. फार फार तर फास्टर फेणे, बटाट्याची चाळ, ज्यूल वर्न वगैरे वगैरे. आणि हिटलरने ब्लिट्झ-क्रिग तंत्राचा वापर करुन दोन आठवड्यांच्या आत पोलंड घशात घातला असे उत्तर लिहून पैकीच्या पैकी मार्क मिळवत. अर्थशास्त्र हा नुकताच दाखल झालेला विषय. फरक लिहा - भांडवलशाही आणि साम्यवाद - ह्या प्रश्नाचे उत्तर मी पेपरात मध्यभागी रेघ न मारता निबंधासारखे सुरेख लिहिले होते. भांडवलशाहीत विषमता वाढते व साम्यवादात सर्वांची मुस्कटदाबी होते हे वाक्य पुस्तकात नसल्याने व मधोमध रेघ मारुन १, २, ३, ४ असे मुद्दे मांडत फरक न लिहिल्याने मास्तरांनी मला मार्क दिले नाहीत. पण तेव्हा मी बर्यापैकी कोडगा झाल्याने मला त्याचे काही वाटले नाही. शाळेत बरोबर पुस्तकांबद्दल बोलायला कुणीतरी असावं वा मी बोलत असेन तर ’काय विचित्र बोलतोय’ अशा नजरेनं न बघणारा एखादा मित्र असणं, ही माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा. हीच व्यथा पुढे महाविद्यालयीन शिक्षणातही राहिली. पदव्युत्तर शिक्षणाची दोन वर्षे मात्र एका जिवाभावाच्या मल्लू मित्राने इंग्रजी कादंबर्यांचे एक प्रचंड दालन उघडून दाखवले आणि प्रचंड बडबडपण केली. अर्थात ते फार नंतर.
दहावीच्या मराठीच्या पुस्तकात एक अजिबात न कळणारा, काहीतरी विचित्र वाक्यं असलेला एक धडा होता. हाताच्या बोटातनं सटकणारी वाळू काय, अजंठ्यातला बुद्ध काय, धबधबे काय - काहीतरी असंबद्ध होते. शिक्षकांना पण ह्या धड्याबद्दल काहीही कळले नसणार, कारण पहिल्या वाक्यापासून शेवटल्या वाक्यापर्यंत त्यांनी फक्त तो वाचून काढला. ह्या धड्यावर प्रश्न आला तर काय लिहायचं हाच यक्षप्रश्न सर्वांना होता. परीक्षेत काय प्रश्न आले होते ते लक्षात नाही कारण मराठीच्या पेपरात मला निबंध लिहायलाच खूप वेळ लागत असे आणि मग बाकी प्रश्न मी फक्त उरकत असे. सुट्टीत मिरजेला घरी गेलो. ही पहिली मोठी सुट्टी. ’बायसिंगर मेमोरिअल’ ह्या मिशन हॉस्पिटलसमोरच्या ग्रंथालयात जाऊन वर्गणी भरली. इथे खूप पुस्तके होती (आणि ग्रंथपाल अगदी खडूस चेहर्यांचे). तर तिथे एक कोसला नावाचे पुस्तक दिसले. हे तर आपल्या घराचे नाव. त्यामुळे आनंदाने हे पुस्तक घेऊन घरी आलो आणि वाचून झाल्यावर झपाटल्यासारखा झालो. हे काहीतरी नवीनच हाताशी लागलं होतं. इथून जे सुरू झालं ते इंजिनिअरिंगच्या तिसर्या वर्षापर्यंत एक सलग कॅनव्हासच आठवतो. ह्या मधल्या वर्षांत मग पेंडश्यांची भाषा (आणि पुढे भूगोल) सापडली. रथचक्र, ऑक्टोपस, एक होती आजी, हद्दपार, गारंबीचा बापू, एल्गार, लव्हाळी अशी एकसे एक पुस्तके वाचली. दळवींची ’वेडगळ’ वाचून झाल्यावर आजूबाजूचा प्रत्येक मनुष्य व आपण स्वत:देखील खरेच शहाणे आहोत का, की हादेखील केवळ भासच आहे असे वाटू लागले. ’सारे प्रवासी घडीचे’ वाचून शिरोडा-आरवली हिंडलो. आपू, बिड्या ओढणारी आजी, कडक लाडू, रवळनाथ, दादू गुरवाचे वस्त्रहरण, माय नेम इज नेरु म्हणणारा नरू, पूर्णान्न बनवणारे डॉ. रामदास - एव्हढाश्या पुस्तकात दळवींनी केवळ कमाल केली आहे, कमाल! मग चक्र वाचली. त्याच्या प्रस्तावनेतल्या संदर्भाने वासूनाका, माहीमची खाडी वगैरे वाचले. मग 'मुद्दे आणि गुद्दे'तून अभ्यासू आणि आक्रस्ताळ्या अत्र्यांचे दर्शन झाले. 'पिपांत मेले ओल्या उंदीर'वर यथेच्छ टीका आणि 'चाफा बोलेना'ची तुफान स्तुती करणारे लेख एकाच पुस्तकात. मग 'मुद्दे आणि गुद्दे'च्या बाजूबाजूने ’वाघनखे’ वाचले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा शालेय इतिहासात गैरहजर असलेला पण अतिशय महत्त्वाचा इतिहास समजला. असेच एकदा आणीबाणीवरचे एक पुस्तक वाचायला मिळाले. १९७५ ते ७७ मध्ये लोकशाहीच्या चिंध्या उडवणारी एक घटना घडली होती व त्याबद्दल आजच्या तरुण पिढीला, म्हणजे माझ्याच मित्रमंडळींना अजिबात माहिती नसावी; इतकेच काय ’आणीबाणी’ नामक काही होऊन गेले हे माहीत असलेलेदेखील हाताच्या बोटावर मोजण्याइतके, हे बघून प्रचंड चिडचिड व्हायची. मग एकदा वर्गात आणीबाणीबद्दल सगळ्यांना सांगितले तर बरेचसे ’मग काय झालं?’ अशा भावनेने उठून गेले. महाराष्ट्र टाइम्समधून अशोक जैन ह्याच काळात कानोकानी हे फार सुंदर सदर चालवत होते. त्यात वाचून कित्येक साहित्यिकांचे कथासंग्रह, कादंबर्या आणल्या. पु.भा.भावे, व्यंकटेश माडगूळकर, पानवलकर, गाडगीळ, नवकथा, मौज-पॉप्युलर-कोठावळे, सत्यकथा, हंस, माणूस इत्यादी नावे माझ्या जिभेवर बसली.
एकदा ’एम. टी. आयवा मारु’ असे विचित्र नाव असलेली एक कादंबरी दिसली. कॅप्टन सेनगुप्ताच्या मृत्युपासून सुरुवात होऊन ज्वाला वादळात डेकवरून समुद्रात भिरकावली जाते इथे संपेपर्यंत मला ह्या कादंबरीने खिळवून ठेवले. त्या वयाचा परिणाम असेल, एकलेपणाची हाव पण त्याचवेळी दुसर्या माणसाने आपल्या कृतीस दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल फारच जास्त संवेदनशील असणे अशा विचित्र मानसिकतेच्या मला ह्या कादंबरीत काहीतरी प्रचंड दिसलं. अगदी आजवर मी एम.टी. आयवा मारु इतकी प्रचंड भारावून टाकणारी कादंबरी वाचली नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, जीए, ऑरवेल, काम्यु, कोएट्झी, माडगूळकर, पानवलकर, बाळकृष्ण प्रभुदेसाईंचे ’गंधर्व’, आरती प्रभू अशा कित्येक कलाकृती/लेखकांचे साहित्य मी पुन्हा पुन्हा वाचले आहे. पण एम.टी.आयवा मारू मी पुन्हा वाचली नाही. आज जर मी ती परत वाचली तर मला कदाचित ती मुळीच आवडणार नाही. आणि हा धोका मला पत्करायचा नाही. ती तिथेच राहू दे. तिच्याबरोबर बरेच काही तिथेच राहू दे.
आई-बाबांकडून जीए हे नाव आणि ’स्वामी’ नावाची एक कथा ह्याबाबत बरेचदा ऐकले होते. एकदा ग्रंथालयात ’पिंगळावेळ’ हा ह्याच लेखकाचा कथासंग्रह दिसला आणि त्यात ही ’स्वामी’ नावाची कथापण होती. घरी आलो. पुस्तक उघडले. पहिली कथा ऑर्फिअस. फारशी रंजक वाटली नाही पण शैली अद्भुत, आजवर कधीच न वाचलेली होती. दुसरी कथा ’स्वामी’. कथा संपल्यासंपल्या पुन्हा एकदा वाचली. तिसरी कथा होती ’कैरी’. मग होती बळवंत मास्तराची ’वीज’. मग ’फुंका’, त्यानंतर ’तळपट’, ’ मुक्ती’, ’कवठे’, ’घर’, ’यात्रिक’ आणि शेवटी ’लक्ष्मी’. And I was zapped! एकाच लेखकाच्या एकाच कथासंग्रहात एवढ्या प्रचंड ताकदीच्या एकामागोमाग एक कथा मी कधीच वाचलेल्या नव्हत्या. त्यातली भाषा, उपमा, एकेक व्यक्तिरेखा ठसवत नेणं, सदा उपस्थित नियतीचं सार्वभौमत्व, लेखकाचा तो तुटला-तटस्थ निरीक्षकाचा अवतार - हे सगळेच जबरदस्त होते. पुढचे काही महिने मग निळासावळा, पारवा, हिरवे रावे, सांजशकुन, रमलखुणा जिरवण्यात गेले. तुती, विदुषक, प्रवासी, सेरेपी इस्कलार एली, चंद्रावळ, गुंतवळ ह्या कथा कोरल्या आहेत. ही शिल्पे आहेत; पांढर्या कागदावर पाच पैशांच्या शाईने गिरवलेली अक्षरे नव्हेत. माशांचा राजा, पैलपाखरे मधल्या कथा (पैलपाखरेच्या त्या आवृत्तीत म.द.हातकणंगलेकरांची अत्यंत उत्कृष्ट प्रस्तावना होती) ह्यांनी इंग्रजी/इतर भाषांतल्या गंभीर, सकस साहित्याची तोंडओळख झाली. हेच संदर्भ हाताशी पकडून पुढे गोल्डिंग, लॉरेन्स, मॉम अशी सुरुवात तरी करता आली. जी.ए. ह्या मनस्वी कलाकाराने त्यांच्या कलाकृतींमधून जो अनुभव मला दिला आहे तो माझ्यासाठी एकमेवाद्वितीय आहे. ह्या सगळ्यावर कडी केली ती ’माणसे: अरभाट आणि चिल्लर’ने. दातार मास्तर, पिशव्या विठोबा, दशांश चिन्ह, गडकरी आणि गदागदा हालून गळणारा अश्वत्थ वृक्ष. मला अक्षरओळख होत होती खरेतर त्या आसपास जी.ए. निर्वतले. मात्र गळलेल्या त्या पानाने मागे ठेवलेला त्याचा साठा आजही माझी सोबत करतो आहे. एखाद्या बेसावध क्षणी व्हेनेझुएलामधली कुठलीतरी नदी मनात खोल कुठूनतरी वर उफाळून येते, आतड्याला पीळ पडतो आणि काळ्याशार अंधाराने मी डोळे मिटून घेतो. अश्वत्थ वृक्षाची पाने गळत राहतात.
ह्या सगळ्यात कविता मात्र राहूनच गेल्या. ग्रंथालयात कवितासंग्रह कधी बघितल्याचे पण लक्षात नाही. म्हणजे ते तिथे असतीलही पण कथा-कादंबर्यांच्या पसार्यात कविताही असते हे मी साफ विसरून गेलो. दिवेलागण आणि 'नक्षत्रांचे देणे' हे दोनच कवितासंग्रह आयुष्यात आले. कधीमधी ग्रेसची एखादी कविता. कदाचित कविता समजण्याची-उमजण्याची तरलता माझ्या मनास मिळालीच नसेल. माहीत नाही. कदाचित ’रोमॅंटिकपणा’ कमी पडला असेल. तर्काच्या आधारे गोष्टी घासत पुढे पळत राहिल्याने ’कविता’ आसपास तरी कधी भटकली होती का असे वाटू लागते. पण तीदेखील आयुष्यात कुठेतरी असेलच अशी आशा करतो. कुणाच्या तरी मांडीवर डोके ठेवून कविता वाचत पडल्याची रोमॅंटिक स्वप्ने अजूनही पडतात. कवितेशी नाळ जुळवण्याची आशा मी अजून सोडलेली नाही.
आशाळभूतपणे पुण्यातल्या पुस्तकांच्या दुकानातून वा चर्चगेट, आझाद मैदानाजवळच्या जुन्या पुस्तकांच्या बाजारातून मी प्रचंड पुस्तके विकत घ्यायची स्वप्ने बघत हिंडायचो. चारही भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरलेल्या खोलीत मधोमध भल्याथोरल्या खुर्चीवर पसरून पुस्तके वाचत पडणे हे तेव्हा माझे परमोच्च सुखाचे स्वप्न होते. असं हिंडताना एखादे पुस्तक घ्यायचो देखील. नाईन्टीन एटीफोर, कॅचर इन द राय, द आऊटसायडर, क्राईम अँड पनिशमेंट अशा तेव्हा रस्त्यावर घेतलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतंत्रपणे पानेच्या पाने लिहिता येईल. शाळाकॉलेजात असताना वाटायचं की नोकरी लागली की हवी तेवढी पुस्तके विकत घेता येतील. परीक्षा नाही की कुणाची कटकट नाही की परीक्षेचा अभ्यास आणि नोकरीची चिंता सोडून पुस्तकं वाचताना वाटणारी बोच नाही. आज मनाला येईल तेव्हा, पुस्तकाचे दुकान-प्रदर्शन दिसेल तिथे पुस्तकं विकत घेतोय. अर्थात नोकरी लागल्यावर वेळ मात्र तुम्हाला परका होत जातो हे कुणी सांगितलेच नाही.
टण्या, तूला वाचनाचा लळा लागला
टण्या, तूला वाचनाचा लळा लागला कि वाचनाला तूझा हेच कळत नाही. अगदी अगदी मनातल्या वाचनीय खजिन्याची पेटी अलगद समोर ठेवलीस रे.
धन्यवाद. आवडत्या १० मधे असलं काहीतरी असावंच असं वाटतं.
हाच लेख Down the Memory Lane
हाच लेख Down the Memory Lane नावाने पुस्तकविश्व.कॉम ह्या संकेतस्थळावरील दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. हा अंक इथे http://www.pustakvishwa.com/diwali2010 बघता येईल.
फार आवडले लेखन. पुस्तकविश्ववर
फार आवडले लेखन. पुस्तकविश्ववर वाचले होते. (लेखाचे)नाव मात्र शो ना हो.
शाळेत बरोबर पुस्तकांबद्दल बोलायला कुणीतरी असावं वा मी बोलत असेन तर ’काय विचित्र बोलतोय’ अशा नजरेनं न बघणारा एखादा मित्र असणं, ही माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा. हीच व्यथा पुढे महाविद्यालयीन शिक्षणातही राहिली. >> अगदी अगदी.
काश, मला पण वाचण्याचा छंद असा
काश, मला पण वाचण्याचा छंद असा जडता तर !!
काहि पुस्तके वाचायची राहिलीत, हि खंत तर कायम जाळत राहते.
खुप छान मांडलं आहे शब्दांत...
खुप छान मांडलं आहे शब्दांत...
छान लिहिले आहे टण्या.
छान लिहिले आहे टण्या.
टण्या मस्त एम टी आयवा
टण्या मस्त
एम टी आयवा मारूबद्दल सहमत. पण मी पारायणं केलीत त्याची... तू म्हणतोस तसं, मी 'झिपऱ्या' ही कादंबरी वाचून मी भयंकर भारावून गेले होते, पण पुन्हा वाचली तर आवडणार नाही या खात्रीने ते पुस्तक पुन्हा हातात घेतलं नाही.
मस्त लिहिलय....
मस्त लिहिलय....
टण्या जबरीच लेख... हा हिदिअं
टण्या जबरीच लेख... हा हिदिअं मध्ये वाचायला आवडला असता..
सही लिहिलेस. लायब्ररीचे दिवस,
सही लिहिलेस. लायब्ररीचे दिवस, कळत्या-नकळत्या वयातल्या वाचण्याच्या जाणीवा बदलत गेल्याचे दिवस आठवले.
क्लासिक! नितळ, प्रामाणिक,
क्लासिक! नितळ, प्रामाणिक, झुळझुळीत!!
या लेखावर बोलण्यासारखा एकच शब्द आहे - अगदी ! अगदी!! भारत-भारती, थोरांची ओळख,
बरोबर पुस्तकांबद्दल बोलायला कुणीतरी असावं वा मी बोलत असेन तर ’काय विचित्र बोलतोय’ अशा नजरेनं न बघणारा एखादा मित्र असणं, ही माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा.>>
तर्काच्या आधारे गोष्टी घासत पुढे पळत राहिल्याने ’कविता’ आसपास तरी कधी भटकली होती का असे वाटू लागते.>>
शाळाकॉलेजात असताना वाटायचं की नोकरी लागली की हवी तेवढी पुस्तके विकत घेता येतील. परीक्षा नाही की कुणाची कटकट नाही की परीक्षेचा अभ्यास आणि नोकरीची चिंता सोडून पुस्तकं वाचताना वाटणारी बोच नाही...अर्थात नोकरी लागल्यावर वेळ मात्र तुम्हाला परका होत जातो हे कुणी सांगितलेच नाही. >>
There you are!.. No, no Here WE are!
थोरांची ओळख >>> मी सुद्धा ते
थोरांची ओळख >>>
मी सुद्धा ते पुस्तक शाळा सुरु व्हायच्या आधीच वाचून संपवलं होतं. त्यातले माझे आवडते होते राजा राम मोहन रॉय.
किती छान आढावा घेतलायस तुझ्या वाङ्मयिन वाटचालीचा
तू ४थी ५वीत असताना भाऊ गेले असणार. पण तुझ्यासाठी ते गेलेच नाहियेत कारण तुझ्या लिखाणांमधून ते तुझ्या मनाचा अविभाज्य कोपरा असल्यासारखे डोकावतात. त्यांच्याबद्दल लिहिताना तू हळूवार होतोस
चालायचंच ! वेगळंच नातं असतं ते.
अर्थात नोकरी लागल्यावर वेळ
अर्थात नोकरी लागल्यावर वेळ मात्र तुम्हाला परका होत जातो हे कुणी सांगितलेच नाही.
अगदी अगदी...
वाङ्मय... कॅपिटल G वापरला की
वाङ्मय... कॅपिटल G वापरला की येतय..
जबरदस्त...विशेषतः जीएंबद्दलचा
जबरदस्त...विशेषतः जीएंबद्दलचा परिच्छेद तर फारच महान!
धन्स हिम्या
धन्स हिम्या
मस्त
मस्त
सुंदर लिहिलंय सगळ्याच
सुंदर लिहिलंय
सगळ्याच वाक्यांना - अगदी अगदी ! ('असा मी असामी' आणि 'व्यक्ती आणि वल्ली' सोडून :फिदी:)
सुंदर लिहिलं आहेस टण्या!
सुंदर लिहिलं आहेस टण्या! रस्त्यावरुन चालताना वेगवेगळ्या टप्प्यांवर लागत गेलेल्या पुस्तकांच्या गावांचे थांबे शोधत मागे वळून पहाणे हा खरंच सुखद अनुभव आहे. काही पुस्तकं वाचून झाल्यावरची मनःस्थिती अचूक वर्णन केली आहेस. वाचनालयांच्या तु केलेल्या उल्लेखावरुन मलाही शाळेत असतानापासून ते अजूनही वेगवेगळ्या वाचनालयांतल्या पुस्तकांच्या रॅक्सच्या रांगांमधून घालवलेले तासचे तास आठवले.
सुंदर लिहीलंय.. खरंतर आपल्या
सुंदर लिहीलंय..
खरंतर आपल्या मानसिक स्थिती जशी असेल त्याप्रमाणे पुस्तकं आवडत्/भिडत जातात असं मला वाटतं.. सातवी-आठवीपर्यंत वि. स. खांडेकर माझे आवडते लेखक होते.. कारण तोवर आजुबाजुला दिसणारं जगपण तसंच साधं-सरळ होतं.. हळुहळु वय/आगाउपणा/परिघ वाढला तसतसे त्यांचं लिखाण व त्यातुन भेटणारी माणसे भाबडी वाटायला लागली.कॉलेजमध्ये वपु फार आव्डायचे.. आता उग्गीच फंडे मारलेत असं वाटतं, आता तर अगदीच वाचवत नाहीत...
शाळेत बरोबर पुस्तकांबद्दल बोलायला कुणीतरी असावं वा मी बोलत असेन तर ’काय विचित्र बोलतोय’ अशा नजरेनं न बघणारा एखादा मित्र असणं, ही माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा. >>>>>१००० मोदक. नशिबाने कॉलेजमध्ये इतका झकास ग्रुप बनला की तासन् तास चर्चा व्हायच्या.. वाद तर नेहमीचेच. धमाल नुसती.
शेवटचा परिच्छेद तर अगदी माझेच शब्द कागदावर उतवल्यासारखं वाटंतय.. अजुनही उतारवयात का होईना पण माझे हे स्वप्न पुर्ण होईल ही आशा आहे.. सांस है तो आंस है!
मस्त रे टण्या..
मस्त रे टण्या..
पुस्तकविश्व मध्ये वाचला होता
पुस्तकविश्व मध्ये वाचला होता लेख. खूप खूप आवडला.
बर्याच वाक्यांना अगदी अगदी.. असंच लहानपणी आज्जीच्या पुस्तकांमधून वाचायला सुरवात केली. इथे मायबोलीवर येईपर्यंत पुस्तकांबद्दल बोलता येईल असा एकही मित्र / एकही मैत्रिण मिळाली नव्हती. फक्त आणि फक्त पुस्तकांवर /वाचनावर प्रेम करणारे मित्र-मैत्रिणी इथे मिळाल्यामूळे मी मायबोलीवर आहे.
सुंदर लिहिलय
सुंदर लिहिलय
टण्या मस्त लिहिलयंस!
टण्या मस्त लिहिलयंस!
सुरेख! पुस्तकविश्व मधला
सुरेख! पुस्तकविश्व मधला सगळ्यात आवडलेला लेख!
छान लिहिलं आहे. मला टिमवि आणि
छान लिहिलं आहे. मला टिमवि आणि ब्रिटिश लायब्ररीत वर्षानुवर्षे घालवलेले तासच्या तास आठवले.
सुरेख!! खूप आवडला हा लेख.
सुरेख!! खूप आवडला हा लेख.
मस्त लिहिलंयस!
मस्त लिहिलंयस!
पुस्तकविश्वावरही वाचला होता.
सुन्दर लेख. पुस्तकाची नावे
सुन्दर लेख. पुस्तकाची नावे वाचून मन भुतकळात गेले. नशीब्वान आहात ऐवढी पुस्तके वाचायला मीळ्ल्याबद्द्ल. एम.टी.आयवा मारु ,हीट्लरचे नाझी भ्स्मासुरचा उदयास्त ई....विसरू शकत नाही.
टण्या, अगदी ९९% अनुमोदन. पुल
टण्या, अगदी ९९% अनुमोदन. पुल सोडून अर्थातच
माझा पिंड पोसलाय रे त्यावर.
तुझ्यापेक्षा मात्र मी नशिबवान ठरलो, भल्या थोरल्या एकत्र कुटुंबामुळे आम्ही चार चुलत भावंडं वाचनाचा नाद नव्हे तर पिसं लागलेली. तीनही घरात आणलेल प्रत्येक पुस्तक वाचलेल असायच आम्ही. हे इतकं वाईट होतं की अख्ख्या श्रीरंग सोसायटीत हातात पुस्तक घेउन रस्त्याने वाचत चाललेल पोर म्हणजे देसायांचच हे ठरलेल होत. त्यामुळे तुझ्या ह्या लेखाने आपल्यातलाच एकजण भेटल्या सारख वाटलं.
मला वाटत चांगल वा वाईट असं नसत काही, वेळ / वय बरोबवय्वा चुकीची असते बहुत्येक. मॅक्झिम गॉर्कीची 'मदर' चार वेळा प्रामाणिकपणे प्रयत्न करुनही अर्धवटच राहिलीये अजून.
अनंत सामंतांच सगळ लेखन वाचल एम् टी आयवा मारु ने झपाटल्यावर. तसाच परत झपाटला गेलो नाही पण लेखनातून वहावत ग्घेउन जायची ताकद मात्र जाणवली. त्यांनी अनुवाद (कि रुपांतर ?) केलेली जॅक लंडनची (व्हाईट फॅन्ग्स) 'लांडगा' वाच नक्की. तूला खात्रीने आवडेल.
आता आधी ठाण्यातली चांगली लायब्ररी लावतो आणि वाचून काढतो आधी सगळं, मग परत बोलूच.
Pages