बिजींग ऑलिंपिक्स २००८

Submitted by मुकुंद on 12 January, 2008 - 00:00

२००८ वर्ष सुरु झाले व माझ्यासारख्या अनेक क्रिडाशौकीनांना साहजीकच दर ४ वर्षांनी येणार्‍या ऑलिंपीक्स स्पर्धेचे वेध लागले. या वर्षीच्या स्पर्धा बैजिंग येथे अजुन जवळ जवळ २०० दिवसात सुरु होतील. त्या निमित्ताने या बीबीवर ऑलिंपीक संदर्भातल्या मनोरंजक आठ्वणी किंवा माहीती टाकता यावी यासाठी हा बीबी सुरु करावासा वाटला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेमस्तक.... नविन मायबोलिच्या ऑलिंपिक्स सदरात लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. इथल्या व जुन्या मायबोलिवरच्या मी लिहिलेल्या ऑलिंपिक्सच्या सर्व गोष्टी माझ्या रंगीबेरंगीमधे हलवता येतील का?असो. आणी एक.. या नविन मायबोलित लिहिताना परिच्छेद का करता येत नाहीत? ते कसे करायचे ते कृपया कोणी सांगु शकेल काय?

बैजींग ऑलिंपिक्स केवळ ३० दिवसावर येउन ठेपले असताना ऑलिंपिक्सच्या आठवणींचा हा दुवा परत एकदा जिवंत करताना मला खुप आनंद होत आहे. मधल्या २ महिन्यांपेक्षा जास्त गॅप बद्दल परत एकदा दिलगीर...

आजची गोष्ट आहे एका गरीब घरात जन्म घेतलेल्या एका अमेरिकन कृष्ण्वर्णिय मुलीची.... २२ भावंडामधे हिचा जन्म २०व्या नंबरवर झाला होता..तोही प्रिमॅच्युअर.... सातव्या महिन्यातच... जेमतेम ४ पाउंड वजन घेउन ही मुलगी या जगात आली. अमेरिकेच्या टेनेसी राज्यात्(आर्च.. वाचत आहेस ना?:०)) नॅशव्हिल पासुन ५० मैलावर क्लार्क्सव्हील म्हणुन एका छोट्या गावात हिचा जन्म झाला. वडिल एड हे रेल्वे मधे पोर्टर म्हणुन काम करायचे तर आई ब्लांच.. या सगळया २२ मुलांचे घर सांभाळायची... एकतर प्रिमॅच्युअर.. वर जन्मानंतर स्कार्लेट फिव्हर्,चिकन पॉक्स्,न्युमोनिया असे एकापाठोपाठ एक अश्या अनेक आजरांनी या मुलीला पछाडलेले. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हिच्या पायातली ताकदच एकदम कमी झाली. गावातल्या डॉक्टरांनी तिला पोलियो झाला आहे असे तिच्या आइवडिलांना सांगीतले व आता ही मुलगी परत कधीच चालु शकणार नाही असेही सांगीतले. पण हिची आई त्याने डगमगुन गेली नाही. आशा न सोडता तिने ५० मैल लांब असलेल्या नॅशव्हिल शहरात क्रुष्णवर्णियांसाठी असलेल्या मोठ्या मेहॅरी हॉस्पिटलमधे तिला नेण्याचे ठरवले. आजुबाजुच्या गोर्‍या अमेरिकन लोकांच्या घरी मोलमजुरी करुन त्यासाठी तिने पैसे साठवले. त्या पैशातुन आठवड्यातुन दोनदा हिला ते गरीब आईवडिल नॅशव्हिलला घेउन जायचे. तिथल्या डॉक्टरांनी मात्र मनापासुन या मुलीकडे लक्ष दिले व या आइवडिलांना नाउमेद केले नाही. या मुलीला बळकट करण्याकडे लक्ष केंद्रित करायला त्या डॉक्टरांनी या आइवडिलांना सांगीतले व रोज २ ते ३ तास या मुलीच्या पायांना कसा व्यायाम द्यायचा व कसा मसाज करायचे ते त्या डॉक्टरांनी यांना सांगीतले. त्यांनी तिच्या पायांना एक ब्रेस बनवुन दिली व आधार म्हणुन कायम ती तिला घालायला सांगीतली.

दिवसांमागुन दिवस.. वर्षामागुन वर्षे जात होती. या अपंग मुलीच्या पायातली ताकद हळुहळु वाढत होती पण बाकीची भावंडे खेळामधे हिला कधीच सामील करुन गेत नसत. ती भावंडे हिला सोडुन बास्केट्बॉल खेळत असत व ही बिचारी एकटीच बाजुला बसुन त्यांचा खेळ बघत बसत असे.पण तिच्या आईने सर्व भावंडांना एकदा समजावुन सांगीतले की तीही तुमचीच बहीण आहे व तिला असे वागवता कामा नये. तिने त्या सर्व भावंडांना तिच्या पायाला कसा व्यायाम करायचा ते शिकवले. मग ही सर्व भावंडे आलटुन पालटुन आईला व वडीलांना तिच्या पायांना मसाज व व्यायाम करायला मदत करत असत.

आणी बघता बघता ही मुलगी अश्या घरगुती उपाय व प्रेमळ आइवडीलांच्या मेहनतीमुळे सशक्त होत गेली व केवळ १२ वर्षाची असताना बाकी भावंडांपेक्षा उंच व सुद्रुढ झाली. त्या वर्षी एका रविवारी आइवडिलांनी तिला एक मोठे सर्प्राइज दिले. चर्चला जायच्या आधी तिला त्यांनी एक बॉक्स दिला व तो उघडण्यास सांगीतले. तिने तो बॉक्स आतुरतेने उघडला.. त्यात चमकणारे कोरे करकरीत काळे नॉर्मल मुलींचे बुट होते. ते पाहुन तिने आईवडिलांना मिठीच मारली.... आज तिला प्रथमच चर्चमधल्या सगळ्या मुलींसारखे नॉर्मल बुट घालायला मिळणार होते... तिने विचारले.. मी माझ्या पायातल्या त्या अगली ब्रेसेस काढू शकते का? आणी आइवडिलांचा मानेचा होकार बघुन तिला रडु आवरेना... आजपासुन ती त्या पायातल्या ब्रेसेसपासुन मुक्त होणार होती...

पुढची चार वर्षे मग सगळ्यांना तिने आपल्यात असलेल्या नैसर्गीक ऍथलेटिसिझमने चकितच करुन टाकले. काही वर्षांपुर्वी ही अपंग होती हे कोणाला सांगुनही खरे वाटले नसते. ती शाळेच्या बास्केटबॉल टिमची स्टार बनली. अश्याच एका हायस्कुल बास्केटबॉल गेममधे तिच्यावर त्यावेळचा ट्रॅक अँड फिल्ड मधला विख्यात कोच... कोच टेंपल.. जो टेनेसी स्टेट युनिव्हरसिटीचा कोच होता... याची नजर पडली व या मुलीच्या भावी आयुष्याला एक वेगळेच वळण लागले... कोच टेंपलने हिच्या हायस्कुल बास्केटबॉल कोचला सांगीतले की ही मुलगी बास्केटबॉलपेक्षा धावण्यात जास्त प्रगती करेल. तिला माझ्या कोचींग कँपला पाठवता आले तर मी तिला ट्रेनिंग देउ शकतो.पण वयाच्या १३-१४ व्या वर्षी इतक्या लांब कँपला पाठवायला तिचे वडिल तयार नव्हते. पण शेवटी कोच टेंपलने स्वतः तिच्या सुरक्षेची हमी दिल्यावर वडिल तिला पाठवायला तयार झाले. ही गोष्ट होती १९५४ सालची..

१९५४ ते १९५६ मग कोच टेंपलने मग हिला आपल्या अखत्यारीत घेउन जवाहिरा जसा रफ डायमंडला पॉलिश करतो.. तस तिला एक एथलिट म्हणुन पॉलिश्ड व ग्रेसफुल केले.कसुन सराव व कोच टेंपलचे मार्गदर्शन.. यामुळे केवळ १६ व्या वर्षी हिची निवड मेलबोर्न ऑलिंपिक्स साठी झाली...त्या ऑलिंपिक्समधे तिला १ ताम्रपदक मिळाले. नंतर १५८ मधे ही गरोदर राहीली व एका मुलाला तिने जन्म दिला. त्यानंतरही तिने आपला सराव चालुच ठेवला व परत एकदा १९६० च्या रोम ऑलिंपिक्ससाठी हिची निवड झाली.रोमला मात्र या ५ फुट ११ इंच उंचीच्या या ग्रेसफुल मुलीने १००,२०० व ४ बाय १०० रिले या ३ शर्यती जिंकुन सगळ्या जगाचे लक्ष वेधले. तिची कामगीरी बघुन तिच्या आइवडिलांच्या डोळ्यांचे पारणे फिटले .एकाच ऑलिंपिक्समधे ३ सुवर्णपदके मिळवणारी ती पहीलीच अमेरिकन महिला होती. त्यानंतर परत एकाच ऑलिंपिक्समधे ३ सुवर्णपदके मिळायला तब्बल २४ वर्षे लागली जेव्हा फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनरने १९८४ मधे ३ सुवर्णपदके मिळवली....

रोम ऑलिंपिक्सनंतर परत आल्यावर टेनेसी मधे तिच्या गावात तिच्या आदराप्रित्यर्थ मोठा स्वागत समारोह टेनेसीच्या राज्यपालानी आयोजित केला होता पण तो काळ काळे व गोरे अमेरिकन एकत्र एकाच समारंभाला येण्या आधीचे होते. त्यामुळे गोरे व काळे असे २ समारंभ आयोजीत केले होते. पण या मुलीने तश्या सॅग्रिगेटेड समारंभाला जाण्यास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली की काळे गोरे सगळे एकत्र येत असतील तरच मी येईन. शेवटी राज्यपालांनी सगळ्यांना एकत्र यायची मुभा दिली. अश्या रितीने हा सोहोळा अमेरिकेच्या इतिहासातला पहिला डि-सॅग्रिगेटेड
सोहोळा म्हणुन ओळखला जातो.

अतिशय गरिब घरात जन्मलेली व जी मुलगी चालुही शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगीतल्यावरही जी मुलगी पुढे ऑलिंपिक्समधे जाउन ३ सुवर्णपदके मिळवते यापेक्षा स्फुर्तिदायी अजुन काय असु शकेल?आणि अश्या स्फुर्तिदायी मुलीचे नाव होते.... विल्मा रुडॉल्फ!

मुकुंद, अतिशय स्फूर्तीदायी कहाणी..
परिच्छेद करण्यासाठी "< u l >< / u l >" हा Tag spaces आणि अवतरण चिन्हांशिवाय वापरा.
==================
डिंग डाँग डिंग

अतीशय स्फूर्तीदायक! धन्स मुकुंद!!

मुकुंद, नविन मायबोलीत एकदम दमदार पदार्पण...... ग्रेट!!

मुकुंद, फार छान लिहीता तुम्ही. माहिती आणि थरार दोन्ही मस्त convey करता.
लिहीत रहा.

मुकुंद येथे (नवीन मायबोलीवर) आल्याबद्दल धन्यवाद! आता पुन्हा जोरात चालू होउ दे. एक दीड महिनाच राहिला ना ऑलिम्पिक्स ला?

धन्स मुकुंद!!
.
यु.एस. ऑलिंपिक स्विम ट्रायल्स बघितल्या का कोणी?? मायकेल फेल्प्स, केटी हॉफ, डेरा टॉरस, नताली कॉगलीन चमकले.

सुरेख लिहिले आहे मुकुंद!! नवीन मायबोलीवर हे लिखाण पुन्हा एकदा सुरु केल्याबद्दल धन्यवाद!! माहितच नव्हते तू इथे येऊन लिहायला सुरुवात केली आहेस ते Happy येउदेत आता पुढचेही भाग पटपट...

फारच छान लिहिलं आहे मुकुंद. इतक्या प्रतिकुल परिस्थितीत राहुन, सराव करुन केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर प्राविण्य मिळवणारे हे खेळाडू पहिले की आपल्या आयुष्यातले प्रश्न किती छोटे वाटायला लागतात, नाही?
पुढच्या भागाची वाट पहतोय.

अग पन्ना... ऑलिंपिक्स स्विमींग ट्रायल्स आमच्यापासुन ३ तासावरच होत्या... मी पाहील्या..त्याबद्दल व मायकेल फेल्प्स्,डेरा टोरस व केटि हॉफ बद्दल लिहीनच.. पण त्या निमित्ताने आज मी परत एकदा माझ्या सर्वात आवडत्या ऑलिंपिक्स स्पर्धांबद्दल...म्हणजे स्विमींगबद्दल ...२ गोष्टी सांगणार आहे.... या दोन्ही शर्यती मी टिव्ही वर पाहिल्या होत्या व आजही माझ्या मनात त्यांची आठवण एकदम ताजी आहे... मागे मी तुम्हाला शर्ली बाबशॉफची गोष्ट सांगीतलेली आठवत असेलच... त्या गोष्टीसारखीच याही २ गोष्टी तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे... गम्मत म्हणजे या दोन्ही गोष्टीतले नायकांचे स्वभाव.. दिवस आणि रात्र इतके भिन्न आहेत पण दोन्ही गोष्टींमधील मजा सारखीच आहे. या दोन्ही गोष्टी पुरुषांच्या रिले शर्यतीच्या आहेत.

ऑलिंपिक्सच्या रंगमंचावरच्या सर्व जलतरण स्पर्धा बघण्यासारख्या असतात.. खास करुन रिले.. आणी त्यात जर त्या एकदम अटितटिच्या असतील तर दुधात साखर.. आजची पहिली गोष्ट अशीच एकदम चुरशीची.. १९८४ च्या लॉस अँजलीस ऑलिंपिक्समधील... ४ बाय २०० मिटर्स फ्रिस्टाइल रिले शर्यतीची आहे. १९८४ पर्यंत अमेरिकेने ऑलिंपिक्स स्पर्धेत एकही रिले शर्यत गमावली नव्हती.. गेल्या ५० वर्षात त्यांचा रिले शर्यतीत कोणीच पराभव करु शकले नव्हते एवढे त्यांनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवले होते. पण १९८४ चे लॉस अँजलीस ऑलिंपिक्स मात्र त्याला अपवाद होते.. कारण या वर्षी ते प्रथमच संभावित विजेते म्हणुन ४ बाय २०० मिटर्स फ्रिस्टाइल मधे बघीतले जात नव्हते.. त्याचे एकमेव कारण म्हणजे... वेस्ट जर्मनीचा लेजेंडरी जलतरणपटु.. ६ फुट ८ इंच उंचीचा व ७ फुट आर्म स्पॅन असलेला... मायकेल ग्रॉस... उर्फ अल्बर्ट्रॉस! त्या वर्षी त्याने ऑलिंपिक्सला यायच्या आधी १०० मिटर्स बटरफ्लाय,२०० मिटर्स बटरफ्लाय व २०० मिटर्स फ्रिस्टाइल मधे जागतीक विक्रम करुन आपल्या नावाचा दबदबा निर्माण करुन सर्व जगाला आपल्या स्विमींग जिनिअसची चाहुल दिली होती... आणी आपल्या लौकिकाला जागुन या ऑलिंपिक्समधे आजच्या रिले शर्यतीच्या आधी १०० मिटर्स बटरफ्लाय व २०० मिटर्स फ्रीस्टाइल मधे त्याने सुवर्णपदके मिळवली होती. त्याला साथ द्यायला असलेले बाकीचे तिन जर्मन जलतरणपटु.. तेही कही लेचेपेचे नव्हते.. थॉमस फार्‍हनरने.. २०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे ताम्र पदक मिळवले होते...आणि डर्क कार्थलस व अलेक्झॅडर शुटका हेही २०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे जगात टॉप १० मधे होते.

अश्या या बलाढ्य जर्मन संघाला आव्हान होते अमेरिकेच्या मायकेल हिथ्,डेव्हीड लार्सन्,कप्तान जेफ फ्लोट व ब्रुस हेस या चौकडीकडुन... यापैकी मायकेल हिथ याने मायकेल ग्रॉसच्या पाठोपाठ येउन २०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे रौप्य पदक पटकावले होते तर कप्तान जेफ फ्लोट जो... कर्णबधिर होता.. याने चौथे स्थान मिळवले होते. फक्त लाजरा बुजरा व भिडस्त ब्रुस हेस हाच एकमेव विक दुवा या चौकडिमधे होता... जरी या शर्यतीत जर्मन टिम ऑड्स ऑन फेव्हरेट होती तरी अमेरिकेचा कोच डॉन गँब्रिल हा काही नुसता हात चोळत बसला नव्हता... त्याला माहीत होते की रिले स्पर्धेमधे वैयक्तीक वेगाबरोबर इतरही काही इंटॅंजीबल्स असतात ते कधी कधी अपसेट्ला पुरेसे असतात.. त्यामुळे त्याच्या डोक्यात एक वेगळाच डावपेच तो आखत होता.. सगळ्या जगाला वाटत होते की अमेरिकेचा बेस्ट स्विमर मायकेल हिथ शेवटचे २०० मिटर्सची एंकर लेग जर्मनीच्या मायकेल ग्रॉसबरोबर स्विम करेल... पण कोच गँब्रिलने मात्र सर्व कन्व्हेन्शनल विस्डम दुर लोटुन असे ठरवले की मायकेल हिथ पहिली लेग स्विम करेल मग डेव्हीड लार्सन मग कप्तान जेफ फ्लोट व सर्वात शेवटी सगळ्यात वी़क लिंक असलेला... ब्रुस हेस... फायनल लेगमधे अल्बर्ट्रॉसच्या जबड्यात जाइल....! त्यामागचे कारण म्हणजे कोचला असे वाटत होते की अमेरिकेच्या फास्टेस्ट स्विमर्सनी पहिल्या ३ लेगमधे जर मोठी आघाडी घेतली तर फायनल लेगमधे मायकेल ग्रॉसची ब्रुस हेसला कॅच अप करताना दमछाक होइल व तो ब्रुसला गाठु शकणार नाही... वरकरणी सगळ्यांना हे लॉजिक घातकी वाटले... पण कोच गँब्रिलने ब्रुस हेसच्या शर्यत स्विम करण्याचा खुप कसुन अभ्यास केला होता.. त्यात त्याला एक पिक्युलिअर गोष्ट आढळली होती... ती म्हणजे ब्रुसचा २०० मिटर्स स्विम करण्याचा वेग जरी चारी स्विमर्सपैकी हळु असला तरी.. त्या २०० मिटर्समधल्या चौथ्या व शेवटच्या ५० मिटर्सचा त्याचा वेग सगळ्यांपेक्षा जास्त होता.. थोडक्यात त्याचे शेवटचे ५० मिटर्सचे स्प्लिट टायमींग हे सगळ्यांपेक्षा उत्तम होते.. म्हणजे ब्रुसचा वेग शर्यतीच्या शेवटी वाढत असे.. आणि कोचला त्याचाच नेमका फायदा करुन घ्यायचा होता... पण ही गोष्ट कोच गॅंब्रिलशिवाय कोणालाच ठाउक नव्हती कारण ब्रुस तसा जगाला एक अनभिज्ञ जलतरणपटु होता..

पण हे सर्व कागदावर व्युह रचणे तसे सोप्पे होते पण शेवटी जोपर्यंत शर्यत होत नाही तोपर्यंत या सर्व जर तरच्याच गोष्टि होत्या... कोचने रचलेल्या या व्युहाचे एक्झ्युकिशन या चार जलतरणपटुंनाच करायचे होते.. त्यातही अतिशय बुजर्‍या व भिडस्त अश्या ब्रुस हेसचे काम सगळ्यात अवघड होते... त्याला माहीत होते की त्याच्यावर अल्बर्ट्रॉसच्या जबड्यातुन अमेरिकेला विजयश्री खेचुन आणुन द्यायचे कठीण काम सोपवले गेले होते.... शर्यतिच्या आदल्या रात्री खलबतामधे कोचने सगळ्यांना रिलॅक्स करायचा प्रयत्न केला.... तो म्हणाला की जर्मनीवर व त्यांच्या मायकेल ग्रॉसवर विजय मिळवण्याचे दडपण आहे... आपण अंडरडॉग आहोत... त्यामुळे एकदम रिलॅक्स स्विम करा.. जलतरण तलावात १९,००० स्क्रिमींग पार्टिसन अमेरिकन प्रेक्षक आपल्या बाजुने आपल्याला चिअर करत असतील हे विसरु नका व त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीचा वापर करा... हे ऐकत असताना ब्रुस हेस मात्र हाताला घाम फुटुन ऐकत बसला होता... त्याच्या डोक्यात सारखे एकच चित्र येत होते.. ते म्हणजे शेवटच्या लेगमधे त्याच्या टिम मेट्सनी त्याला मिळवुन दिलेली आघाडी त्याच्या हातुन निसटुन चालली आहे व शेवटच्या ५० मिटर्समधे जर्मनिचा मायकेल ग्रॉस त्याच्या पाठुन येउन त्याला मागे टाकत आहे... आणि ऑलिंपिक्स व्हिलेजमधे... सगळे शर्यतिच्या आदल्या रात्री निद्राधिन झाले तरी ब्रुस मात्र त्या नाइट मेअरिश विचाराने या कुशिवरुन त्या कुशिवर तळमळत पडला होता....

शर्यतीचा दिवस उजाडला... सगळे संघ जलतरण तलावावर येउन डेरेदाखल झाले... वातावरणात एक प्रकारचा उत्साह होता... १९,००० प्रेक्षक केव्हाच येउन आपापल्या जागेवर बसले होते... त्यांना आज एकतर अमेरिका स्विम रिले मधे प्रथमच हरण्याचा इतिहास तरी बघायला मिळणार होता किंवा त्यांच्या लाडक्या अमेरिकेच्या अंडरडॉग संघाने बलाढ्य मायकेल ग्रॉस व जर्मन संघाला धुळ चारलेली तरी बघायला मिळणार होती.....इदर वे एक इंटरेस्टिंग रेस त्यांना बघायला मिळणार होती . अमेरिकेचा रिले संघ तलावावर आला व त्यांचे टाळ्यांनी उत्स्फुर्त स्वागत केले गेले... त्याचबरोबर जेव्हा जर्मन संघ व उंच व सिंहकटिच्या मायकेल ग्रॉस उर्फ अल्बर्ट्रॉसने जेव्हा तलावावर प्रवेश केला... तेव्हाही जाणकार प्रेक्षकांनी त्यालाही टाळ्या वाजवुन रिस्पेक्ट दिला... अमेरिकन संघ तसा रिलॅक्स दिसत होता.. फक्त रात्रभर झोप न लागल्याने ब्रुस हेसचे डोळे मात्र लाल दिसत होते.. सगळ्यांनी आपापले रोब काढले व लिंबरींग ,स्ट्रेचींग करायला सुरुवात केली... दोन्ही हात हातात घेउन ते खांध्यांच्या वर स्ट्रेच करत तर काही कंबरेत वाकुन आपापले स्नायु स्ट्रेच करत होते. रेफ्रीने टेक युअर मार्क असे म्हटले व प्रत्येक संघातल्या पहिल्या स्विमरने चौथर्यावर ओणवे उभे राहुन पोज घेतली.... अमेरिकेला चौथी लेन दिली होती तर जर्मनिला पाचवी... कोच गँब्रिलच्या प्लानप्रमाणे अमेरिकेचा लिड ऑफ स्विमर मायकेल हिथ चौथर्यावर ओणवा उभा होता... पिन्ड्रॉप सायलंस असताना.. शर्यत सुरु व्हायचा ब्युगुल वाजला... व सगळे पाण्यात झेपावते झाले... आणी क्षणापुर्वी पिन्ड्रॉप सायलंस असलेला तलाव १९,००० प्रेक्षकांच्या बेंबीच्या देठापसुन ओरडणार्‍या यु. एस. ए..... यु. एस. ए.......यु. एस. ए....... अश्या नार्‍यांनी दुमदुमुन गेला....

आणि कोच गँब्रिलच्या अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या मायकेल हिथने जबरदस्त फास्ट स्विम करुन आपले २०० मिटर्स १ मिनिट ४८. ६७ सेकंदात पार करुन... जर्मनिच्या थॉमस फार्‍हनरला पहिल्या २०० मिटर्समधे १.१६ सेकंदाने मागे टाकुन ...अमेरिकेच्या डेव्हिड लार्सनला तेवढा मोलाचा लिड मिळवुन दिला. प्रेक्षक अलबत अजुनच जोरात यु. एस. ए. ... यु. एस. ए. ... असे ओरडु लागले होते व आता ते सगळे उभे राहुन .. अमेरिकेचे झेंडे फडकवत.. डेव्हीड लार्सन कडे डोळे लाउन बसले होते
तिकडे ब्रुस हेस मात्र आणखिनच नर्व्हस झाला.. आपले हात सतत शेक करत आपला नर्व्हसपणा घालवण्याचा तो केविलवाणा व अयशस्वी प्रयत्न करत होता... त्याला माहीत होते की १.१६ सेकंदाचा लिड त्याला पुरेसा नव्हता... त्याला किमान २.५ सेकंदाचा लिड हवा होता.. कारण त्याचे बेस्ट टायमिंग अल्बर्ट्रॉस पेक्षा तब्बल अडिच सेकंदांनी जास्त होते...

आता दुसर्‍या लेगसाठी डेव्हिड लार्सनने पाण्यात उडी घेतली... व सप सप पाणी कापत तो सर सर पुढे जाउ लागला... जर्मनिचा डर्क कोर्थिलसने जेव्हा पाण्यात झेप घेतली तोपर्यंत लार्सनने अमेरिकेच लिड अजुनच वाढवला व त्याचे पहिले १०० मिटर्स पुर्ण होइसपर्यंत अमेरिकेचा लिड ३ सेकंद इतका वाढला.. तो लिड पाहुन सगळ्यांना कोच गँब्रिलच्या प्लानचे कौतुक वाटु लागले व तो प्लान यशस्वी ठरतो की काय अशी आशा सगळ्यांना वाटु लागली... पण ती आशा अगदी अल्पकाळच् टिकली.. कारण लार्सनने पहिले १०० मिटर्स अगदी जोरात पोहुन आपली बहुमुल्य एनर्जी पहिल्या १०० मिटर्समधेच खच्ची करुन टाकली.... व दुसर्‍या १०० मिटर्समधे तो हळु हळु फेड होउ लागला... उलट जर्मनिच्या कोर्थिलसने स्टेडी वेगात पोहुन दुसरी लेग संपेसपर्यंत अमेरिकेचा लिड फक्त ०.९ सेकंदावर आणला.... ते पाहुन ब्रुस हेसला तिकडे बाथरुमला जावेसे वाटु लागले... पण ते आता अशक्य होते...

तिसर्‍या लेगसाठी मग अमेरिकेच्या कप्तानाने... कर्णबधिर जेफ फ्लोटने पाण्यात उडी मारली... १९,००० प्रेक्षकांच्या आवाजाचा त्याला काहीच फायदा नव्हता.. पण कप्तानाची जबाबदारी त्याला ठाउक होती... व त्या जबाबदारीला जागुन खरच त्याने मायकेल हिथपेक्षाही कमी वेळात.... म्हणजे १ मिनिट ४९.६ सेकंदात आपले २०० मिटर कापले.... व अमेरिकेचा लिड परत एकदा १.५६ सेकंदावर आणुन ठेवला....

इकडे लेन चारच्या ठोकळ्यावर ब्रुस हेस ओणवा उभा राहुन आपल्या कप्तानाची वाट पाहात होता... व जेफ फ्लोटने भिंतीला हात लावताच.... एक मोट्ठा श्वास घेउन ब्रुस हेसने.... देवाचे नामस्मरण करत तलावात झेप घेतली... त्याच्या मनात अजुनही काल रात्रीचे नाइट्मेअरिश विचार येत होते... पण त्याने मनाची कवाडे बंद केली व १९,००० स्क्रिमिंग प्रेक्षकांच्या आवाजाच्या लयीत तो आपले छोटे पण फास्ट असे फ्रिस्टाइल स्ट्रोक रप रप असे पाण्यात मारु लागला.आणि तिकडे लेन पाचच्या ठोकळ्यावरुन.. जर्मनिची दारोमदार असलेल्या सिंहकटिच्या उंचापुर्‍या मायकेल ग्रॉसने पाण्यात सुर मारला... त्याच्या पहिल्या २-३ स्ट्रोकमधेच सगळ्यांना त्याचे कौशल्य दिसुन आले.... तो त्याचा ७ फुटि विंग स्पॅन तो पाण्यात सहजपणे.... आकाशात अल्बर्ट्रॉस पक्षी जसा विहार करतो.. तसा....वापरुन एफर्टलेसली पाणि कापत अमेरिकेच्या ब्रुस हेसच्या पाठलागासाठी लागला. आणि पहिल्या ५० मिटर्समधेच त्याने ब्रुस हेसला जवळजवळ गाठलेच.... प्रेक्षकातल्या अनेकांच्या पायातली शक्ति अचानक गळुन गेली व ते मटकन त्यांच्या सिटवर बसले... प्रेक्षकांच्या आवाजाचा क्रिशेंडो जरा कमी झाला व सगळ्यांना कळुन चुकले की हा जर्मन माणुसरुपी अल्बर्ट्रॉस्....खरोखरच अमेझिंग स्विमर आहे... ब्रुस हेसलाही पहिले ५० मिटर्स वळल्यावर हा अल्बर्ट्रॉस त्याच्या उजव्या बगलेत दिसला व त्याच्या काळजात चर्र्र झाले... अलास! त्याचे काल रात्रिचे नाइट्मेअर आता प्रत्यक्षात तो अनुभवत होता...

पण आता त्याच्या मनात विचार आला.. हेक! नाहीतरी आता पराभव अटळ आहे.. तर हरता हरता लढा देउन हरलेले बरे... निदान माझे देशबांधव म्हणतील तरी की ब्रुसने नांगी नाही टाकली... व त्याच्या मनातल्या गेल्या २ दिवसांच्या निगेटिव्ह विचारांची जागा क्षणार्धात एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने घेतली.... त्या पॉझिटिव्ह एनर्जीने म्हणा की प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त एन्करेजमेंटने म्हणा की आणखी काही म्हणा... पण ब्रुसने पुढचे १०० मिटर्स असे काही पोहोले की खुद्द त्याच्या कोचने.. कोच गँब्रिलनेही तोंडात बोटे घातली... ब्रुस हेस असा पोहु शकतो हे खुद्द ब्रुसलही आज प्रथमच कळत होते!आणि चक्क १५० मिटर्स पुर्ण झाले तेव्हा ब्रुस फक्ता अर्ध्या बॉडि लेंग्थ ने मायकेल ग्रॉसच्या मागे होता.

आणि मग शेवटचे ४५ मिटर्स ब्रुस हेस असा काही पोहला... की विचारता सोय नाही.... कोच गँब्रिलचा होका खरा ठरला होता... पहिल्या ५० मिटर्समधे ब्रुसला गाठण्याच्या पयत्नात मायकेल ग्रॉसचीही दमछाक झाली होती व ती आता शेवटच्या ५० मिटर्समधे त्याच्या कमी झालेल्या वेगात सगळ्यांना दिसुन येत होती...आणि लोकांना हेही दिसुन येत होते की ब्रुस हेस शेवटचे ५० मिटर्स जास्त जोरात पोहु शकतो... २५ मिटर्स राहीले... ब्रुस हेस व मायकेल ग्रॉस.. दोघेही नेक टु नेक!.... दोघांचीही स्विमिंगची कॉन्ट्रास्टिंग स्टाइल लोकांना दिसुन येत होती.... ब्रुस छोटे छोटे पण जास्त स्ट्रोक्स मारत होता तर मायकेल ग्रॉस... मोठे मोठे पण कमी... १५ मिटर्स... अजुनही कोण पुढे आहे ते कोणीच सांगु शकत नव्हते... सगळे प्रेक्षक आता उठुन उभे राहीले होते... हातात हात घेउन ते तोंडाजवळ नेउन ते उत्कंठतेने शर्यत कोण जिंकतो त्याची वाट बघत होते.. काही काही जण तर ओरडण्याचेही विसरुन गेले होते... १० मिटर्स.. पुन्हा तेच.. दोघेही एकाच वेगात... ५ मिटर्स.. ४ मिटर्स... ५ फुट... अजुनही कोणीच सांगु शकत नव्हते... २ फुट.. आता मात्र कमाल झाली.. सगळ्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली... आणि दोघांनीही भिंतिला हात टेकवुन माना मागे करुन डोक्यावरच्या स्विम कॅप्स काढून स्कोरबोर्डकडे माना मागे करुन वळुन पाहिले.... दोघांनाही वाटले की त्यानी शर्यत जिंकली.. नुसत्या डोळ्यांनी कोणीच सांगु शकत नव्हते की कोण जिंकले म्हणुन... सगळा स्विमिंग पुल इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्डकडे डोळे लाउन बसला... ते १-२ सेकंद सगळ्यांना युगांसारखे भासत होते.... आणि स्कोरबोर्डवर एकदाचा रिझल्ट झळकला.... व सर्व आसमंत उत्स्फुर्त जल्लोशाने दुमदुमुन गेला... यु. एस. ए..... यु. एस. ए..... यु. एस. ए.... च्या आवाजाने सगळा तलाव भरुन गेला... तिकडे पाण्यात ब्रुस हेसला मात्र विश्वासच बसत नव्हता... तो क्षणभर पाण्यातच डोळे विस्फारुन.... डोक्यावर हात धरुन उभा होता.... शेवटी त्याच्या टिममेट्सनी तलावात उड्या घेउन त्याला मिठ्या मारल्या तेव्हा तो भानावर आला... अमेरिकेने... नाही... नाही... एका लाजाळु भिडस्त ब्रुसने मायटी अल्बर्ट्रॉसला आकाशातुन खाली पाडले होते...

ब्रुस हेसने त्याच्या २०० मिटर्ससाठी घेतलेले टायमिंग होते.... १ मिनिट ४८.४१ सेकंद..... अमेरिकेच्या बाकीच्या तिनही स्विमर्सच्या टायमिंगपेक्षा कमी! आणि ब्रुस हेसच्या स्वतःच्या पर्सनल बेस्ट टायमिंगपेक्षा तब्बल २ सेकंदानी कमी! आणि शेवटच्या ५० मिटर्समधे तर त्याने मायकेल ग्रॉसलाही मागे टाकले व फक्त २७ सेकंदात त्याने ते शेवटचे ५० मिटर्स अक्षरशः कापुन काढले....कधी कधी माणुस परिक्षा आली की कसा आपल्यातले पर्सनल बेस्ट अचिव्ह करु शकतो हे ब्रुस हेस म्हणजे मुर्तिमंत उदाहरण होय! म्हणुनच मला या ऑलिंपिक्स स्पर्धांचे एवढे अप्रुप आहे.....

तळटिपः ही शर्यत अमेरिकेने ७ मिनिट्स १५.६९ सेकंदात किंकुन नविन वर्ल्ड रेकॉर्ड करुन जिंकली... वेस्ट जर्मनीची वेळ होती फक्त ४ शतांश सेकन्दाने जास्त... ७ मिनिट्स १५.७३ सेकन्द! आणी मुख्य म्हणजे मायकेल ग्रॉसने त्याचे २०० मिटर्स केवळ १ मिनिट ४६.८९ सेकंदात कापुन २०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे तेव्हापर्यंतचे सगळ्यात कमी टायमींग नोंदवुन २०० मिटर्सचा नविन जागतिक विक्रम याच शर्यतीत लुझिंग कॉजमधे केला.....!

आणी एक.... त्याच ऑलिंपिक्समधे डेरा टोरसने आपले पहिले ऑलिंपिक्स सुवर्णपदक जिंकुन ऑलिंपिक्स पदार्पण केले होते... तिच डेरा टोरस... २४ वर्षानंतरही... बैजिंग ऑलिंपिक्समधे आपल्या ५ व्या ऑलिंपिक्ससाठी वयाच्या ४१ व्या वर्षी निवडुन आली आहे...... हॅट्स ऑफ टु हर!

सुरेख मुकुंद Happy
खूप दिवसांनी पुन्हा ऑलींपीक चा थरार अनूभवायला मिळतोय Happy

मस्तच मुकुंद. तुझे लिखाण वाचुन दरवेळी स्फुरण चढते :-). बर्‍याच दिवसांनी लिहायला घेतलस, आता खंड पडू न देता लिहीत रहा.

जबरदस्त Happy
इथे आजच पाहिले.
चालु राहु दे मालिका.

खुप छान .... दर वेळेला माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्ती नवा अविष्कार बघायला मिळतो..

काय लिहिले आहेस मुकुंद तू ब्रुस हेसबद्दल!! खरच, अतिशय मस्त लिहितो आहेस रे!! सगळे लिहून झाले की पुस्तक काढायचा विचार कर!! खरच..

मुकुंदनी सुचवल्याप्रमाणे त्यांचे लेख त्यांच्या रंगीबेरंगी मध्ये हलवायला सुरुवात केली आहे.

http://www.maayboli.com/blog/377

अरे वाह!! हा बा.फ. परत सुरु झाल्याचे मी पाहीलेच नाही. मस्त. मुकुन्दा आता मागच्या वेळेसारखा ब्रेक घेउ नका. गोष्टींची संततधार बरसु द्यात.
बाकी लिखाणाबद्दल परत परत काय लिहायचे? नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट.

ऑलिंपिक्स ओपनींग सेरीमनी काय जबरी झाला. खासकरुन ते २००८ कराटे खेळनारे मुल.

मला उशीर झाला चॅनल सापडेपर्यंत.... पण मुख्य ऑलिंपिक ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम बघायला मिळाला आणि नेत्रदिपक अशी आतषबाजी.... भारताचा झेंडा बघायला मिळाला तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. फारच सुंदर कार्यक्रम झाला.....

भारताचा झेंडा बघुन खूप सुखावह वाटणे स्वाभाविक आहे.. पण काही सदस्यांनी प्रोटोकॉल न पाळता कोणतेही कपडे घातले होते ते बघुन खूप वाईट वाटले..
आणि ते सदस्य दुसरे तिसरे कोणी नसून सानिया मिर्झा आणि तिची डबल्स मधली पार्टनर होती हे अजूनच वाईट...
.
आज सकाळी अंजली भागवत आणि अवनित कौर अतिशय वाईट कामगिरी केली..
२९ आणि ३९ असे नंबर आले..
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

आज सकाळी अंजली भागवत आणि अवनित कौर अतिशय वाईट कामगिरी केली.. >> Sad
खेळावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी राल्फ नदाल च्या मागे फिरल्यावर काय होणार.

समशेर जंग ह्यांनी पण पहिल्या दहा मिनिटातच जंग संपवली. सगळ्या आशा आता फक्त राठोड वर आहेत. बॉक्सर कडुन खुप अपेक्षा नसल्या तरी त्यांच्या कडुन चमकदार खेळ पहायला मिळेल असे वाटते. सानियाची वर्षभरातील कामगिरी पाहता, ती पण फार काही करेल अशी अपेक्षा नाही. पेस-भुपती ह्या दोघात समन्वय साधला गेला तर निश्चित काहीतरी हाती पडेल.

७५ किलो (मुष्ठियुद्ध) वजनीगटात सलामीची लढत विजेन्दर ने जिंकली
तिरंदाजी मधे मंगल सिंग यांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला. याशिवाय सायना नेहवाल हिने बॅडमिंटन मधे दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला, बजरंगलाल ठक्कर (नौकानयन?) यांनी पण पहिल्या फेरीची लढत जिंकुन उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

चक दे ईंडिया !!!

भारतातील वृत्तपत्रांनी भागवत,कौर, जंग हे पहिल्या फेरीत बाद झाल्याची बातमी काही मिनिटात दिली. पण बाकी काही खेळाडुंनी विजयी सलामी दिल्यानंतर काही तास उलटुन गेले तरी त्याची कोणी पण दखल घेतली नाही.

जलतरण : संदीप सेजवाल ह्यांना सेमी फायनल मधे प्रवेश मिळवता आला नाही.
मुष्ठियुध्दः दिनेश कुमार ह्यांना ८१ किलो गटात अपयश.
Sad

ऑलंपिक २००८ मधील हिंदुस्थान

ऑलंपिक समितीचे प्रमुख, श्री. सुरेश कलमाडी यांनी सांगितले कि सानिया आणि सुनिता राव सराव करुन नुकत्याच परतल्या होत्या त्यामुळे त्यांना भारताचा पोषाख (साडी) घालण्यासाठी वेळ मिळाला नाही. (सानियाच्या मेकअप वरुन तरी तसे वाटत नाही.) असो, इतके dedication सामन्याच्या वेळेस दाखवले आणि पदकांची कमाई केली तर सारे गुन्हे माफ.

सायना नेहवाल ने दुसरी फेरी जिंकुन बॅड्मिंटन च्या तिसर्‍या (उप-उपांत्य) फेरीत प्रवेश मिळवला.
आज महाराष्ट्राचा विरधवल खाडे १०० मि. पोहण्याच्या शर्यती मधे भाग घेणार आहे. शुभेच्छा!!

Pages