नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

Submitted by स्वानंद on 15 October, 2010 - 01:23

ज्याची मनास भीती तेची घडे अताशा
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा

दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?

मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने
त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा

दूरातूनी विराणी सनई उदास गाते
ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा

इतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे-
मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा?

इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने
लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा

हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही
दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा

-स्वानंद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वानंद

छान गझल!

पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे-
मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा?.....हा शेर सुंदर

दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?

हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही
दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा

हे खुप आवडले Happy

ज्याची मनास भीती तेची घडे अताशा
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा - वा वा!

दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? - हा शेर फार चांगला केलात आपण!

दूरातूनी विराणी सनई उदास गाते - 'तु'! (दूरातुनी)
ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा

इतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा - वा वा! मस्त!

पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे-
मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा? - छान!

इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने
लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा - व्वा!

हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही
दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा - सुंदर!

छानच गझल! आपल्याला मनापासून शुभेच्छा!

(मार्गदर्शन करणे हा माझा अधिकार नाही. आपली ती फक्त चर्चा होती. माझे नांव नोंदवणे ह आपला मोठेपणा आहे, तरीही कृपया नोंदवू नयेत अशी विनंती! गैरसमज नसावा. )

-'बेफिकीर'!

''अता'' व ''आता'' हे दोन्ही चालतात.... तसेच ''अताशा'' व ''आताशा'' हे ही दोन्ही मात्रेनुरुप वापरता येतात... Happy

चुडे आणि बुडे कसे चालतील???
अलामत भंग होते आहे!

भटांच्या एका गझलेत वसंत आणि पसंत मतल्यात आहेत. पुढे ती अलामत पाळलेली नाही. तसेच, त्यांनी असेही म्हंटले आहे की 'अशाप्रकारची सूट अलामतीत घ्यायची असेल तर एक सोपा उपाय आहे, ती सूट मतल्यातच घ्या'! मग इतकं जर चालणार असेल, तर सूट या बाबीला 'सूट' म्हणूनच का ट्रीट करू नये??

आनंदयात्री,

तांत्रिकदृष्ट्या आपले म्हणणे योग्य आहेच. पण 'अ' ला सुट म्हणून 'इ' किंवा 'उ' वापरले तर 'कधी' चालतील आणि 'कधी' नाही चालणार असा हा प्रश्न आहे. स्वानंद यांनी हीच सुट मतल्यात घेतली असती तर प्रश्न उद्भवला नसता. मात्र मतल्यात नसल्याने उद्भवला.

(इतर वाचकांपैकी काहींसाठी - माझे वरील लिखाण म्हणजे आनंदयात्रींना भोसकणे किंवा बोचकारणे नव्हे, ते माझे मित्र आहेत व ही चर्चा आहे.)

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
"ती" सूट चालते, मग ही का नको याचं सोपं उत्तर म्हणजे, "बाराखडीमध्ये" सांगितलेल्या नियमांमध्येच गझल लिहीली जावी या मताचा मी आहे. नवे प्रवाह मराठी गझलेमध्ये आणावेत की नाहीत, अथवा नवीन नियम करावेत की नाहीत याबद्दल मी जाणकार नाही. आहे त्या नियमबंधांतही दर्जेदार गझल लिहिणं हे माझ्यासाठी अजूनही आव्हान आहे. केवळ त्या तंत्रात जमत नाही म्हणून नियम बदलावेत (भावना महत्त्वाच्या की तंत्र यात निसंशय भावना हेच उत्तर असेल, पण गझलेपुरतं दोन्ही हे माझं उत्तर असेल) हे पटत नाही. शेवटी अगदीच शक्य नसेल, तर सूट घेतोच. आपल्यासारखा गझलेतील अनुभवी हे सर्व जाणतोच!

माझे वरील लिखाण म्हणजे आनंदयात्रींना भोसकणे किंवा बोचकारणे नव्हे, >> हे मला चांगलं समजतं बेफिकीर. इतरांच्या काळजीपोटी आपण at least माझ्या बाबतीत ही आगाऊ (म्हणजे advance) स्पष्टीकरणे कृपया देऊ नका. आणि शब्दिक भोसकणे, बोचकारणे या पातळीपर्यंत आपली मैत्री जाणार नाही हे आपण दोघेही जाणतो!
धन्यवाद!

सूट घेण्याचा मुद्दा माझ्यापुरता संपला आहे!

आनंदयात्री,

आपल्याला कदाचित राग आला असावा. तसे असल्यास क्षमस्व!

१. आपल्याशी माझी चर्चा फक्त अलामतीतील सूट याच विषयापुरती होती.

२. ते विधान काही इतरांसाठी होते. त्यांना ते स्पष्टीकरण देण्याइतकी सबळ कारणे माझ्याकडे होती. आपण त्याकडे दुर्लक्ष करावेत.

चु.भु.द्या.घ्या.

-'बेफिकीर'!

छे! (अजून तरी) राग आलेला नाही. Happy मी त्याकडे दुर्लक्षच करेन. मला एवढंच म्हणायचंय, की त्या बाकीच्यांबद्दलचे तुमचे reflections मला उद्देशून लिहिलेल्या प्रतिसादात कृपया येऊ देऊ नका. मी केवळ गझलप्रेमापोटी गझला वाचत असतो आणि चर्चेत सहभागी होत असतो. बाकीच्या कसल्याच वादात मला पडायची इच्छा नाही!

स्वानंद,
चांगली गझल!!

मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने
त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा
व्वा!
हा शेर चर्चेमुळे खरा ठरला आहे.

दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?>>>> मस्त!!

इतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा>>>> सुरेख!!!

खुप छान गझल! आवडली Happy