अळू चणे पातळ भाजी

Submitted by मेधा on 12 October, 2010 - 20:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन जुड्या अळू
१ नारळ वाटी
एक वाटी ब्राउन चणे ५-६ तास भिजत घातलेले.
७-८ ब्याडगी मिरच्या
६-७ पाकळ्या लसूण
लिंबाएवढी चिंच ( अमेरिकेत असाल तर की लाईम चा आकार साधारण - लेमन किंवा नेहमीचा लाईम फारच मोठा होईल )

१ च चमचा धणे
मीठ
तेल

क्रमवार पाककृती: 

कोवळी अळूची जुडी बघून घ्यावी मुंबैत भाजीचा अळू वेगळाच मिळतो.
अळू धुउन, देठ अन पाने बारीक चिरून चिंचेचा कोळ घालून थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. फार गचका शिजवू नये. त्यातच चणे पण घालून शिजवावेत.
थोड्या तेलावर सुक्यामिरच्या, धणे परतून घ्यावेत.
गार झाल्यावर खोबर्‍याबरोबर मिरच्या धणे अगदी बारी़क वाटावे. जास्त पाणी घालू नये.
हे वाटण अळू चण्याच्या मिश्रणात घालून, चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी काढावी.
ठेचलेल्या लसूण पाकळ्या पळीत फोडणीला घालाव्या व छान लालसर कुरकुरीत झाल्या की भाजीत फोडणी मिक्स करावी.

गरम गरम भाताबरोबर किंवा नुस्तीच वाटीत घेऊन ओरपावी Happy

वाढणी/प्रमाण: 
चार जणांकरता
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्विनी, आहेस कुठे मुली? अग मी पहिली प्रकरण तुला माहित नाहीच का? जाऊ दे झालं, बोलून वाईटपणा घेत नाही. Proud
मस्त आणि वेगळी वाटतेय रेसिपी. इथे पॅक्ड येतो अळू. तोच घेतलास ना?

>>>हे पहिली पहिली काय प्रकरण?
हे बहुतेक प्रतिक्रिया देण्यात पहीली असं अभिप्रेत असावं.!! Happy
हो ना मिनोती???

मी कधी कधी कुकरमधे एका भांड्यात चणे अन एका भांड्यात अळू असं शिजवते - पण तो शॉर्टकट Wink

इथे अमेरिकेत पॅकबंद मिळतो- त्यात कधी वडीची पानं निघतात तर कधी भाजीची . जीटीजीला स्वातीने आणलेल्या पाकीटात भाजीचं अळू होतं तेंव्हा ही भाजी केलेली .

कुठे मिळतो ? देसी दुकानात ? कधी बघितला नाही. असो, वेगळी रेसिपी आहे. करुन बघेन पुन्हा अळु मिळाला तर.

आमच्या जवळच्या देसी दुकानात मिळत नाही, न्यू जर्सी ला ओक ट्री रोडवर बरेचदा मिळतो.
या वर्षी मी अंगणात दोन चार अळकुड्या लावल्या होत्या - त्याची चार छोटी पानं उगवली फक्त Sad
पुढच्यावर्षी एक मोठ्या कोल्ड ड्रिंक टबमधे लावणार आहे म्हणजे त्याला भरपुर पाणी घालता येईल.

हे असले, पण प्लास्टिक
http://www.amazon.com/Outdoor-Patio-Stainless-Steel-Beverage/dp/B0043WKY...

अळवाचं फदफदं आवडत नाही ??? अरेरे कु फे ही पा ? Proud

मेधा, ह्यात अजून मोठं मिळतं ते लाव (आणि जास्तीची पानं मला दे) Wink अळकुड्या कशा लावल्या ? मी पण लावेन म्हणते. मला एकदा टण्याच्या आईचं गाठी देठी करुन खायचय Happy

भाजीचा अळू आणि वडीचा अळू ह्यात काय फरक असतो? >> भाजीच्या आळूची पाने लहान कोवळी असतात जेणेकरून शिजवल्यावर त्याचे चोथा पाणी होत नाही. वडीच्या आळूची पाने त्यामानाने मोठी आणि किंचीत जून असतात.

आळूची पाने फार पटापट मोठी होतात अगदी २ दिवसात पान जून होते त्यामुळे हे वडीचे आणि भाजीचे वेगळे कळू शकते.

भाजीच्या अळूच्या पानांच्या कडांना गोलाई असते तर वड्यांच्या अळूची पानं अगदी डोळ्यांना त्रिकोणी दिसतात. (विशेषतः पान उभं धरलं तर खालचे, मधल्या दांड्याच्या दोन बाजूंचे कोन.) मिनोतीने लिहिल्याप्रमाणे वड्यांचं अळू नुसतं शिजवलं तर चोथापाणी होतं. त्यासाठी ते शिजवण्याआधी थोड्या तेलावर परतून घेतात असं ऐकलं आहे. मी स्वतः करून पाहिलेलं नाही.

वेगळी आहे रेसिपी.. आवडेल नक्कीच! कारण मुळातच अळू आवडतो.. भाजीचा असो की वड्यांचा Wink

भाजीचा अळू आणि वडीचा अळू ह्यात काय फरक असतो?>>भाजीच्या आळूची पाने लहान कोवळी असतात जेणेकरून शिजवल्यावर त्याचे चोथा पाणी होत नाही. वडीच्या आळूची पाने त्यामानाने मोठी आणि किंचीत जून असतात. >> करेक्ट् मिनोती! तसचं वड्यांच्या अळूच्या देठांचा कलर डार्क असतो (डार्क ब्राऊन).

असं आहे होय. मग इथल्या पटेलमध्ये कायम वड्यांचाच आळू मिळतो.
माहिती बद्दल थँक्स मिनोती आणी स्वाती.
सिंडी तुला तु. क. Proud

मला वाटते कोवळी , फिकट हिरवी, नाजूक पानं मिळतात ती भाजीला,
दाट, मोठी, गडद हिरवी पानं असतात ती वड्यांना वापरतात.
अगदी कोवळी पानं असली तर एकेका पानाचि वळकटी वळून त्याची गाठ घालून लसणीच्या फोडणीची भाजी करतात .. यम्मी !!

ही चित्रं बघा - साधारण अंदाज येईल.

भाजीचं अळू (बदामासारखा आकार)

bhaji_aLu.jpg

वड्यांचं अळू (खालची टोकं बघा)

vaDee_aLoo.jpg

सिंडे, मला माहीत नाही कुठलं होतं. Happy

पन्ना, भाजीचं अळू असेल तर नाही लागत परतून घ्यायला.

Pages