जीवघेणे

Submitted by मिल्या on 15 May, 2008 - 02:21

जाळणे वणव्याप्रमाणे! जीवघेणे
चांदणे शिंपून जाणे! जीवघेणे

नाव ओठांवर कुणाचे घेत नाही
दर्द का घाली उखाणे जीवघेणे?

एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे

कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे

आज चालवतात नेते कुशलतेने
डास, जळवांचे घराणे जीवघेणे

लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे ते खार खाणे जीवघेणे

आठवांचा खण उघडताना मिळाले
दाखले काही पुराणे जीवघेणे

शब्द सारे संपल्यावर स्पंदनांचे
छेडतो मॄत्यू तराणे जीवघेणे

गुलमोहर: 

जीवघेणी ग़ज़ल! खूप सुंदर!

जाळणे वणव्याप्रमाणे! जीवघेणे
चांदणे शिंपून जाणे! जीवघेणे ............. द्वीपदी चांगली असली तरी फार भावली नाही. 'वणव्याचे जाळणे' आणि 'चांदणे शिंपणे' या अनेक वेळा वापरून झालेल्या शब्दरचनेमुळे असेल.

नाव ओठांवर कुणाचे घेत नाही
दर्द का घाली उखाणे जीवघेणे? ................. सुंदर! उखाणा पटला!

एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे ..................... अत्यंत सुंदर!

कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे ................... शिबी ची वाक्यरचना बदलली पाहिजे. पाळी, पाळे दोन्ही थोडे जड वाटतात. 'पाळतो' हा शब्द बसवता आला तर चांगले!

आज चालवतात नेते कुशलतेने
डास, जळवांचे घराणे जीवघेणे ....................... संदर्भ समजला नाही. म्हणून आवडला नाही.

लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे ते खार खाणे जीवघेणे ...................... बहुतेक लोकांवी दाद दिली आहे. पण मला समजलाच नाही. 'खार खाणे' हे शब्द माझ्या ओळखीचे नसल्याने असेल.

आठवांचा खण उघडताना मिळाले
दाखले काही पुराणे जीवघेणे .................. अत्यंत सुंदर!

शब्द सारे संपल्यावर स्पंदनांचे
छेडतो मॄत्यू तराणे जीवघेणे..................... सुंदर!

एकंदरीत ग़ज़ल आवडली!! Happy
(सगळ्याच ग़ज़लांच्या बाबतीत हा ऊहापोह मी करत बसत नाही. एक 'समंजस' मित्र म्हणून ...........)

सगळी गज़लच मस्तय.. एकदम प्रवाही ... जियो !!!
एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे----------- हा शेर पुर्वी वाचला होता अन लगेच भावला होता पण गज़ल वाचली नव्हती.. !!! एकदम बढीया !!!

व्वा... इतकी छान गझल वाचनातून सुटली होती.
''जीवघेणे '' आणि भीमरावांचा उल्लेख झाल्यावर मला ''मनोहर रणपिसेंचा '' शेर आठवला....

काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे
जीवघेण्या वेदनेला प्रेम ऐसे नाव आहे... इथे भीम्राव जीवघेण्या असा काही आळवतात की बस्स !!!

उत्तम गझल मिल्या.... खूप आवडली.

डॉ.कैलास

एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे>>>रम्य....े

कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे>>>शिबीचा संदर्भ लागल्यावर मजा आली..

एकंदर छान गझल! Happy

Pages