जीवघेणे

Submitted by मिल्या on 15 May, 2008 - 02:21

जाळणे वणव्याप्रमाणे! जीवघेणे
चांदणे शिंपून जाणे! जीवघेणे

नाव ओठांवर कुणाचे घेत नाही
दर्द का घाली उखाणे जीवघेणे?

एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे

कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे

आज चालवतात नेते कुशलतेने
डास, जळवांचे घराणे जीवघेणे

लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे ते खार खाणे जीवघेणे

आठवांचा खण उघडताना मिळाले
दाखले काही पुराणे जीवघेणे

शब्द सारे संपल्यावर स्पंदनांचे
छेडतो मॄत्यू तराणे जीवघेणे

गुलमोहर: 

व्वा! सही आहे!
गालगागा * ३... जीवघेणे.... कठीण आहे, रे.
मतला आरपार! एक डास्-जळवांचा सोडल्यास (मला स्वतःला फारसा भावला नाही तो), बाकी सगळेच शेर 'जीवघेणे'.
मिल्या, एक सुचवू?
दर्द का घाले च्या ऐवजी दर्द का 'घाली' ... जास्तं बर वाटतं रे... 'घाले' विचित्र वाटतय. तसच शिबी 'पाळी'... बघ विचार करून!

दाद खूप धन्यवाद.

'घाले' का 'घाली' .....''पाळे' का 'पाळी'...

हम्म माहित नाही कोणते बरोबर ते? बाकिचे काय म्हणतायत बघुया

visit http://milindchhatre.blogspot.com

क्या बात है मिल्याभाय. जियो! कसलं जीवघेणे लिहिता बॉ तुम्ही Happy

मला पण घाली उखाणे रास्त वाटले. तुम्हाला कदाचित इतर ओळींत लय साधायची असेल. पण घाली उखाणे मुळे लय मुळीच बिघडत नाहीये. बदल करून पहा.
लोणचे आणि खार खाणे मस्तच जम्या! तसेच लाटांची जीवघेणे बहाणे आवडले.

लइ भारी. सगळीच कडवी मस्त..

वा!
मतला आणि 'लाटांचे बहाणे' सुंदर!
'नांव ओठावर कुणाचे घेत नाही' च्या जागी मी 'नांव ओठावर कुणाचे येत नाही' असं वाचलं.
'घाले' पेक्षा 'घाली' योग्य आहे असं मलाही वाटतं.
छान आहे गजल.
-सतीश

चिन्नू, शोनू, सतीश - खूप खूप धन्यवाद तुम्हाला

सर्वांच्या सुचनेप्रमाणे 'घाली' हा बदल केला आहे

सतीश : ते जाणिवपूर्वक 'घेत नाही' लिहिले आहे... नाव घेणे आणि उखाणे असा 'दुसरा' संदर्भ येण्यासाठी...

visit http://milindchhatre.blogspot.com

उखाणे घाली, घाले दोन्ही विचित्र वाटतंय मला. घेई बरं वाटलं असतं जास्त. वृत्तातही बसेल असं वाटतंय. बाकी १, २, ३, ६, ७ हे शेर आवडले. मला माहीत नाही ही प्रतिक्रिया बरोबर की चुक ते पण मला या लिखाणात उत्कटतेचा अभाव वाटतो. हे माझं प्रामाणिक मत. Happy

मिनू उखाणे घेणे च्या ऐवजी उखाणे(कोडे) घालणे असा अर्थाचा पदर यावा म्हणून घेई नाही वापरले... वरच्या मिसर्यात नाव घेणे मुळे तो एक अर्थ येत आहेच...

तसेच उत्कटतेचा अभाव वाटतो म्हण्जे नक्की काय वाटते थोडे स्पष्ट कर ना

visit http://milindchhatre.blogspot.com

हम्म तो कोडं वाला अर्थ नाहीच आला माझ्या लक्षात. अजुनही. मी विचार करेन. उत्कटतेचा अभाव वर बोललोच आपण.

मिल्याभाऊ,
शिर्षकातच "जीवघेणे" हा कासावीस करणारा शब्द टाकलास....
आणि बाकी....... थोडीशी जड... पण एकदम सही!
Happy

छान! मतला आणि खार विशेष आवडला!

शेवटच्या शेराचा अर्थ नीट कळला नाहिये किंवा पटत नाहिये.

आठवांचा खण उघडताना मिळाले
दाखले काही पुराणे जीवघेणे
खूप आवडला.... किती सहज... किती अर्थवाही... वा!!

मतलाही छान आहे....

गोबु, पुलस्ती, आनंदयात्री धन्यवाद

पुलस्ती शेवटच्या शेराचा अर्थ का पटला नाही?

दादने तिच्या एका लेखात लिहले होते... 'शब्द जिथे संपतात तिथे तराणा सुरु होतो' ... ह्या अर्थाने विचार करुन बघा पटतोय का?

visit http://milindchhatre.blogspot.com

आनंदयात्रीप्रमाणेच मलाही वाटले.
अर्थवाही गझल आहे. जीवघेणे हा अवघड रदीफ असूनही गझल प्रवाही झाली आहे.
शुभेच्छा Happy

आति सुंदर मिल्या जिव घेतलास..............................................

व्वा! क्या बात है!
पण अर्थाच्या दृष्टीने शेर क्र. ४, ५ आणि ६ मधलं 'जीवघेणे' इतर गजलेपेक्षा वेगळं आहे. ते तीन शेर वगळून गजल जास्त एकसंध वाटली.
बाकी .. 'जीवघेणे' हे अंत्ययमक घेण्याच्या कल्पनेला सलाम!

परागकण

संदीप , पिके : खूप धन्यवाद

व्वा मिल्या....... !
"जीवघेणे" कसला रदीफ निवडला आहेस रे......!!

लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे ते खार खाणे जीवघेणे......... हा शेर सगळ्यात जास्त आवडला Happy

व्वा मिल्या, मस्तच !! सगळेच शेर आवडले.

लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे ते खार खाणे जीवघेणे
----> खार खाउन गेलास रे... फार सुंदर वापरला आहेस खार हा शब्द.

सर्वच शेर सुंदर. झक्कस!

जयावी, आरती, सत्या : अनेक धन्यवाद...
गजलमध्ये मी शिकाउ असल्याने असे सगळ्यांचे प्रतिसाद बघितले की खूप आनंद होतो Happy

    ================
    मी मुकाट्यानेच सारे सोसतो पण-
    हुंदके गातात गाणे जीवघेणे

    ३, ६, ७ सही !!

      ***
      The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.

      धन्यवाद स्लार्ती

        ================
        आज झालो तुझी मी वदंता नवी
        कालची बातमी काल होती खरी

          शेवटी शेवटी खूप आल्या सरी

            -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

            मिल्या,

            छान ग़झल आहे. फक्त शीबी चा अर्थ माहीत नाही तो क्रुपया सांगावा.

            नरेन्द्र

            नरेंद्र
            धन्यवाद

            शिबी नावाचा एक दानशूर राजा होता. ईथे वाचा.

              ================
              ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
              रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

                -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
                रोजचे ते खार खाणे जीवघेणे>>> लय भारी Happy

                एक तर गिरवायची वाळूत नावे
                त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे>>> सुंदर Happy

                'जीवघेणे' हा शब्द ऐकला की मला भीमराव पांचाळांची 'जीवघेणे सारखे बोलायची ती' आठवते. माझी आवडती गझल. Happy

                Pages