मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात

Submitted by सावली on 7 October, 2010 - 19:28

नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे या धाग्यावर काही जणांनी मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन कसे आणि कधी शिकवायचे याबद्दल काही प्रश्न विचारले होते. मला सुद्धा हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे. या विषयासाठी वेगळा धागा केला तर चर्चा एकत्रीत राहिल अस वाटलं म्हणुन हा धागा चालु करतेय.

जी मुलं मराठी शाळेत जात नाहीत त्यांना
- मराठी मुळाक्षरे, बाराखडी आणी शब्द वाचन कसे शिकवावे?
- कुठल्या वयापासुन याची सुरुवात करता येईल?
- मराठी वाचनाची आवड कशी लावता येईल?
- आणि त्या पुढची पायरी म्हणजे मराठी लिहायला कसं शिकवता येईल?
याबद्दलची माहिती इथे द्याल का?
याविषयी पुस्तके, सिडी, इंटरनेट स्रोत याविषयी माहिती असेल तर तीहि लिहा.

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वत्सला वर कविता ने सांगितलेली पुस्तकं बघ आणुन. ती वाचायला सोपी आहेत.
माझ्याकडे मराठी पुस्तकं आहेत बरीच पण तीचा टाईप आणी चित्र नविन वाचणार्‍या मुलांना खुप सोयीचा वाटत नाही.

मी पण वर वत्सला आणि सुनिधीनी सांगितलय तसंच करते. समोर जर अमराठी लोकं असतील (शाळेत वगैरे) तरच मुलीशी आम्ही मराठीतुन बोलत नाही.

ओह ते राहिलच. मी शक्यतो नेहेमीच मराठी मधुन बोलते. फक्त बोलताना तिसरी अमराठी व्यक्ती संभाषणात सहभागी असेल तरच वेगळ्या भाषेत बोलते.

माझा पोरगा अजून मुळाक्षरं वैगरे शिकवण्यासाठी तर खूप लहान आहे. पण त्याच्याशी बोलताना मी सहसा मराठीच बोलते(मराठी न समजणारे आसपास असतिल तर क्वचित कधीकधी हिंदीत बोलते.) घरात आपापसात आम्ही हिंदी बोलत असल्याने आणि आजुबाजुला बहुतांशी हिंदी-पंजाबी भाषिक असल्याने तो मराठीत फारच कमी बोलतो. त्याला मराठी चांगलं समजतं पण तो उत्तरं मात्र सहसा हिंदीत देतो.
मी मराठीत अन त्याचा बाबा आणि काका हिंदी आणि पंजाबीत बोलतात त्याच्याशी. शाळेत हिंदी/पंजाबी/इंग्रजी अशा तिन्ही भाषा. मला तो धेडगुजरी भाषा बोलेल की काय याचीच नेहेमी भिती वाटंत असते.

अल्पना, असे नाही होणार ग. माझी इथली एक मैत्रिण तामिळ अन अन तिच सासर मराठी आहेत तिची नणंद इथेच असते; तिचा नवरा बंगाली बाबु आहे. माझ्या मैत्रिणीला एक मुलगा आहे. सगळे वेगवेगळ्या भाषेत त्याच्याशी बोलत असतात. आता तो ६ वर्षांचा आहे आणि कुठल्याही प्रकारची सरमिसळ न करता सगळ्या भाषा व्यवस्थित बोलु शकतो.

मुलं भाषा पटकन शिकतात असा माझाही अनुभव आहे. इरा ३ वर्षांची असताना आम्ही बंगलोरला गेलो रहायला. तिने कधिही हिंदी ऐकले नव्हते बोलणे तर दुरच. आमच्याकडे तिकडे येणार्‍या कामवालीशी बोलुन बोलुन ती ३ महिन्यात बरेच हिंदी बोलायला लागली. नर्सरीत जायला लागल्यावर ३-४ महिन्यात इंग्लिश बोलायला लागली. दिवसातुन २ तास नर्सरी असायची फक्त.
आम्ही घरी तिच्याशी मराठीच बोलतो.
आता ती पावणेपाच वर्षाची आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश चांगले बोलु शकते.

तिला मराठी वाचायला शिकवण्यासाठी एक मराठी तक्ता तिच्या खेळायच्या खोलीत लावुन ठेवला आहे. त्यात प्रत्येक अक्षराबरोबर एक चित्र आहे. सतत ते बघुन बघुन थोडी अक्षरे तिला कळायला लागली आहेत. कधी कधी स्वतःच सांगते की वाचुन दाखव /शिकव. सगळी अक्षरे ओळखायला लागली की पुढचे शिकवेन.

छान चर्चा चालु आहे. सगळ्यांचे मुद्दे छान.

मी पण माझ्या मुलांशी पुर्ण मराठी मधेच बोलते. माझा मुलगा २ वर्षाचा असताना जेव्हा preschool ला जायला लागला, तेव्हा सुरुवातीला त्याला थोडे अवघड गेले, पण महिन्याभरात त्याला यायला लागले, आधी शाळेत जायला लागला तेव्हा "बाबा" म्हणुन रडायचा, १५ दिवसानी शाळेत रडताना "daddy" म्हणुन रडायचा इतराना कळावे म्हणुन Happy

आता तो ४ वर्षाचा आहे, आणि मी त्याला मराठी शिकवणे सुरु केले आहे थोडे थोडे. त्याला बरीचशी अक्शरे ओळखता येतात, पण अजुन ते जोडुन शब्द वाचता येत नाहित. आणि तो खुप चंचल आहे, त्यामुळे एका जागी बसुन शिकण्याचा कंटाळा करतो. तो जेव्हा इंग्रजी वाचायला लागेल, तेव्हा मराठी वाचायला शिकवणे सोपे जाइल ह्या आशेवर मी सध्या त्याच्या जास्त मागे लागत नाहीये. या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे?

मराठी लिहायला शिकताना मला बाराखडीनुसार नाही तर अक्षर लिहिण्यासाठी कशी सोपी जातात त्यावरुन शिकल्याचे आठवते आहे... ग, म, भ, न... अशी सुरुवात करुन... नंतर व, ब, क, ळ. नर्सरीमध्ये नुसत्या तिरक्या रेघा, सरळ रेघा, वक्राकार रेघा.. काढल्यावर त्या वरुन पुढे जाताना ही पद्धत खूप सोप्पी आहे... जेव्हा शिकलो तेव्हा ओ का ठो कळत नव्हते पण इथले नर्सरी आणि हा हे बाफ वाचल्यावर लख्ख प्रकाश पडला असे का शिकवले गेले त्याचा...
दिनेशदांनी जसे सांगितले आहे ते ह्याच पद्धतीत येते... वर्णमाला वगैरे गोष्टी नंतर हळूहळू येतातच...

परवा ऑफिसात बोलताना सहजच सांगितलं की मी मुलाशी मराठीत बोलते, नवरा हिंदी-पंजाबीत. तर एकीने सांगितले, लहान मुलांशी बोलताना म्हणे २-३ वेगवेगळ्य भाषा वापरु नये. सगळ्यांनी एकाच भाषेत बोलावे, नाहीतर मुलं बोलताना अडखळायला लागतात.
मी आत्तापर्यंत असं कधी ऐकलं नव्हतं. एकावेळी संभाषणात एकच भाषा वापरावी हे ऐकलंय, पण एकावेळी एकच भाषा शिकवावी हे कधी नाही ऐकलं. असं काही असतं का?
आता नंतर विचार केला तर जाणवतंय मला, की आयाम पण बर्‍याचदा बोलताना अडखळतो, तो खूप जास्त एक्साइट झाला की त्याला शब्द आठवत नाहीत आणि मग अडखळत बोलायला लागतो. हे असं फार क्वचित होतं, पण होतं हे नक्की.

अल्पना मुलगा किती वर्षाचा आहे?
जर मुलगा दोन ते चार वयाचा असेल तर मला वाटतं की अडखळण नॉर्मल आहे. मुलं खुप एक्साईट झाली की ते योग्य भाषेत सांगायला त्यांना कधी कधी वेळ लागतो. जर खुपच टेन्शन येत असेल तर पेडि. ला विचारा. पण जनरली होतच असं. एकावेळी संभाषणात एकच भाषा वापरता हे बरोबरच आहे . सगळी बौद्धीक वाढ बरोबर वेळच्या वेळी होत असेल आणि कुठलाही प्रॉब्लेम नसेल तर दोन भाषा बोलल्यामूळे काही निगेटिव्ह फरक पडत नाही. झालाच तर फायदाच होतो.
शिवाय हे लक्षात घ्या समजा दोन वर्षाचा मुलगा २०० शब्द बोलतो, तर दोन भाषा येणार्‍या मुलाला कदाचित १०० एका भाषेतले आणि १०० दुसर्‍या भाषेतले शब्द माहित असु शकतात. तेवढ्यावरुन घाबरुन जाण्यात काही अर्थ नाही ना. Happy शाळेत जायच्या वेळे पर्यंत त्यांना सगळे शब्द दोन्ही किंवा अधिकही भाषेतले माहीत होतात. एकावेळी अगदी सहा पर्यंत भाषा मुलं बोलु शकतात.
यासंबधी आमच्या भारतातल्या पेडी. शी बोलुन इंटरनेट वर सुद्धा बरिच माहीती शोधली होती / वाचत असते.
मागच्या पानावर पण माझी या संदर्भात एक पोस्ट आहे.

मग काय , आताच तर सुरु झालय नीट बोलणं. मलापण इथे जपानमधे खुप जणांनी सांगितलं होतं म्हणे मुलांच्या डोक्यात गोंधळ होतो. पण भारतातले डॉ. नाही म्हणाले.

अल्पना दोन उदाहरणे देतो जी अगदी जवळून पाहिली आहेत.
१. मुलांना एकाच वेळी दोन भाषा शिकायला काहीच प्रश्न येत नाही. माझ्या मुलीशी आम्ही घरात फक्त मराठी बोलत असू. आणि घराबाहेर शाळेत फक्त इंग्रजी. त्यामुळे तीचे काहीच नुकसान झाले नाही. माझ्या माहितीत अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे मुले मराठी/गुजराती/कन्नड/ चायनीज/तामीळ/फ्रेंच (यापैकी एक) आणि इंग्रजी व्यवस्थित बोलतात.

२. माझा एक मित्र तेलगू आहे आणि त्याची बायको मराठी. घरात आई वडील त्या त्या भाषेत मुलाशी बोलत आणि घराबाहेर इंग्रजी. हेतू हा की त्याला तीन भाषा बोलता याव्यात. त्याला काही बोलण्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आणि ते अशा तीन भाषांमुळे असे डॉ. चे मत पडले.

जर घराबाहेर/शाळेत जर तुमचा मुलगा मराठी किंवा हिंदी बोलत असेल तर घरी दुसरी भाषा बोलण्यात अडचण येऊ नये. पण शाळेत जर इंग्रजी असेल (तिसरी भाषा) तर कदाचित प्रश्न येऊ शकतात.

अजय,
तुम्ही दिलेलं दुसरं उदाहरणाबद्दल. त्याचं कदाचित इतरही काही कारण असु शकेल. आणि Case by Case पण असु शकेल.
<<आणि घराबाहेर इंग्रजी. >> हा भाग फारच कन्फ्युझिंग आहे मुलांसाठी. मी आधी लिहिल्याप्रमाणे, मुलं व्यक्ती आणि भाषा यांच मॅपिंग करतात. त्यांना भाषा असा फरक सुरुवातीला कळत नाही. पण आई पाण्याला पाणी म्हणते, बाबा काही तरी वेगळं म्हणतात हेच त्यांना कळतं. हे मॅपिंग तसच ठेवलं, भाषांची सरमिसळ केली नाही तर काही त्रास होणार नाही
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई बाबांनी घरात त्या त्या भाषेत खुप बोललं पाहीजे. पण सरमिसळ अजिबात करता नये. मला वाटतं जास्त भाषा बोलणार्‍या मुलाच्या पालकांनी थोडं जागरुक रहावं लागतं याबाबतीत.

माझ्या नवर्‍याच्या ऑस्ट्रेलियन बॉस चा मुलगा आहे २ वर्षाचा , त्यालाही ते दोघे सध्या दोन भाषा शिकवतात . फ्रेन्च आणि इंग्लिश .आई फ्रेन्च मध्ये बोलते आणि बाबा इंग्लिश भाषेमध्ये.ते ही सांगत होते कि मुले एकावेळेच ५-६ भाषा शिकू शकतात.

मी एका पुस्तकात वाचले होते वयवर्ष ६ पर्यंत मुल जास्तीत जास्त २७ भाषा शिकू शकतात. पुस्तकाचे नाव लक्षात नाहि, उद्या टाकेन.

मी पण वाचल आहे " की लहान मुले लवकर भाषा शिकतात. पुस्तक ज्ञानेश्वर घडती घरोघरी" लेखक डॉ. ह. वि. सरदेसाई. माझी मुलगी पण मराठी, थोडं हिंदी, थोडं कानडी, थोडं इंग्लिश बोलते, आणि तमिळ समजते.
माझ्या मैत्रीणीची मुलगी पण उरीया, बंगाली, कानडी, इंग्लिश, हिंदी बोलते. (वय साडे तीन)

माझा मुलगा ३ वर्षाचा आहे.. नर्सरीत ईंग्लिश मिडियममध्ये.
आम्ही घरात सगळेच त्याच्याशी मराठीतच बोलतो. त्याला जर ईंग्लिश मिडियमला टाकले तर , त्याला पुढे मराठी शिकण्याचा प्रॉब्लेम तर नाही ना येणार. , किंवा मराठी मिडियमला टाकले तर पुढे ईंग्लिश भाषा शिकणे कितपत जमेल .

साधनाला अनुमोदन. अल्पना इराही फार एक्साईट झाली की शब्द खाऊन टाकते. तिला सध्या मराठी , हिंदी, इंग्रजी तिन्ही समजते. आम्ही घरी मराठी बोलतो.
सावलीचा सरमिसळीचा मुद्दा मला योग्य वाटतो. आम्ही आधी इरासाठी इंग्रजी पुस्तकं मराठीतून वाचायचो (म्हणजे ती गोष्ट मराठीत अनुवाद करुन सांगायचो). आता त्याच गोष्टी इंग्रजीतून वाचायला ती नकार देते. पण ज्या गोष्टी इंग्रजीतूनच थेट वाचायला लागले, त्या तशाच इंग्रजीत वाचायला लावते.
नक्की कधी तिला अमुक वस्तुला अमुक भाषेत हे म्हणतात (प्रतिशब्द) कळायला लागेल ते माहीत नाही.

जुई, घरात मराठी आणि शाळेत इंग्रजी या दोन्ही भाषा आरामात शिकणारे अनेकजण बघण्यात आहेत. त्याचप्रमाणे मराठी माध्यमात शिकूनही इंग्रजी भाषा चांगली असणारे पण खूप जण माहित आहेत (अर्थात हे सगळे माझ्या -तुझ्या वयाचे असतिल म्हणा).

अजय, सावली, सखी, चंपी धन्यवाद.
खरंतर अशी २-३ उदाहरणं माझ्याही बघण्यात आहेत. माझ्या जावेचा मुलगा (वय १०) मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषा चांगल्या बोलतो, वाचतो. पंजाबी पण बर्‍यापैकी नीट समजते त्याला, पण त्याच्याशी कोणी नेहेमी पंजाबीत बोलत नसल्याने बोलण्याचा तितकासा सराव नाही. तो ३ वर्षाचा होईपर्यंत दिल्लीतच वाढला (त्यानंतर औरंगाबादला). तेंव्हापासूनच त्याला आईशी मराठीत बोलायचे व बाबाशी हिंदीत हे समजले होते. आईने बाबाला देण्यासाठी मराठीत सांगितलेला निरोप तो बाबाला हिंदीत भाषांतर करून सांगायचा. शाळेत मात्र इंग्रजी शिकला. हल्ली हल्ली त्याच्या हिंदीमध्ये बर्‍याचदा मराठी शब्द येतात.

माझ्या मुलाबाबत, मी त्याच्याशी मराठीत बोलते आणि नवरा हिंदीमध्ये. आम्ही दोघे आपापसात हिंदीमध्ये बोलतो. घरात येणार्‍या जाणार्‍यांशी बहूतांशी हिंदीत बोलले जाते. फक्त मराठी व्यक्तींशी मी मराठीत बोलते. सासरचे सगळे आपापसात फोनवर किंवा इथे आल्यावर /आम्ही तिथे गेल्यावर पंजाबीत बोलतात. आम्ही इथे रहात असलेला भाग पंजाबी बहुल आहे, त्यामूळे शेजारी-पाजार्री सुद्धा हिंदी-पंजाबी भाषा कानावर येते.
त्याच्या प्लेस्कूलमध्ये अजूनतरी हिंदीच बोलतात, परंतू थोडीफार इंग्रजी शब्दओळख केली जातेय. त्याला मराठी चांगलं समजतं,पण काही ठरावीक शब्द सोडले तर तो हिंदीतच बोलतो. किंवा हिंदीमध्ये मराठी शब्द घुसडतो. जसं की रात्री झोपताना इम्मी गोष्ट सांगो / पापा गोष्ट सांगो. (यावर पापाचं उत्तर असतं इम्मी गोष्ट सांगते. पापा कहानी सुनाते है.) बर्‍याचदा मी बोलत असलेला मराठी शब्द समजला नाही तर इसका मतलब क्या होता है असा प्रश्न तो विचारतो. अशावेळी त्याला माहित असलेला समानार्थी हिंदी /इंग्रजी शब्द सांगून त्यालाच असंही म्हणतात असं मी सांगते.
पण ज्यावेळी तो सुट्टीसाठी औरंगाबादला जातो त्यावेळी मात्र तो हिंदी कमी आणि मराठी जास्त बोलतो. म्हणजे बहूतेक अजूनतरी तो संभाषण करताना त्याच्याशी ज्या भाषेत बोलल्या जाता आहे त्याच भाषेत उत्तर न देता, आजूबाजूला ज्या भाषेत संभाषण होत आहे त्या भाषेत बोलतो. दिल्लीत हिंदी, औरंगाबादला मराठी आणि पंजाबमध्ये बर्‍यापैकी पंजाबी. (तिकडे गेल्यावर तो मीठ दो किंवा नमक दो न म्हणता लूण दो असं म्हणतो. Happy )

चंपी, अखी धन्यवाद.
मुलं जास्त भाषा शिकू शकतात म्हणुन आपणच अनेक भाषांमधे बोलुन शिकवण्यात काही अर्थ नाही. कारण त्याने सरमिसळ होते. शक्यतो इतक्या लहानपणी
एक व्यक्ती = एक भाषा
हाच नियम करायचा. शिवाय जी आपली मातृभाषा/ मुळ भाषा नाही त्याचे उच्चार आपण (मोठी माणसे) बर्‍याच्वेळा नीट शिकवू शकत नाही ते नेटीव्ह लोकांकडुनच छान शिकले जातात. खरोखर तसच कारण असेल आणि वातावरण असेल तर छानच.

अल्पना,
(यावर पापाचं उत्तर असतं इम्मी गोष्ट सांगते. पापा कहानी सुनाते है.) >> हे एकदम पर्फेक्ट Happy भाषा मिक्स न करण्याची जाणिव कधी कधी करुन द्यावी लागते. ती अशी केली तर बेस्ट. जर बोलल्या जाणार्‍या भाषा दुसर्‍या व्यक्तीला अज्जिबात कळत नसतील तर जरुरी नाही पडत पण आपल्याकडे जसं हिंदी / मराठी सगळ्यांना कळतं मग मराठीतल्या प्रश्नाला हिंदीत उत्तर दिलं तरी खपुन जातं. आणि शेवटी सरमिसळ भाषा होतात.
"इम्मी" गोड Happy

रैना,
साधनाला अनुमोदन>> सावली म्हणायचय का? कारण इथे साधनाची पोस्ट नाहीए.
इराला बोललेलं बरचसं, इतर छोट्या छोट्या कन्सेप्स कळत असतील तर तीला भाषांची नावं सांग. आपण बोलतोय ती मराठी भाषा. हे पुस्तकात लिहिलय ते इंग्रजीमधे लिहिलय. हे गाण लागलय ते हिंदी भाषेत आहे. अस काही काही गप्पा मारताना बोलत रहायचं. हळुहळू त्यांना हा कन्सेप्ट कळतो. मग शब्द माहीत नसला तर मुलंच विचारतात याला इंग्रजी मधे काय म्हणतात, किंवा हिंदी मधे काय म्हणतात. लेकीला साधारण तीसरं वर्ष चालु झालं तेव्हा सांगायला सुरुवात केली होती. तीला कळलं काही दिवसात. पण सगळी मुलं सारखी नसतात काहींना तिसर्‍या वर्षी कळेल काहींना चौथ्या. त्यामुळे काळजी नको Happy
पण एकदा हे कळलं की मग मुलं पुढचा विचारही करु करतात असं वाटतं. म्हणजे कदाचित पंजाबी बोलणार्‍या माणसाला तमिळ कळणार नाही म्हणुन पंजाबी मधे उत्तर द्याव वगरे जाणिवपुर्वक करतात. आणि कधीकधी मुद्दाम शाईनिंग मारायला समोरच्याला न कळणार्‍या भाषेतही बोलुन दाखवतात Proud

माझी लेक पण मराठी आणि इंग्रजी व्यवस्थित बोलते. ५ वर्षाची आहे.
ते डोरा बघुन सध्या स्पॅनिश पण बोलते मध्ये मध्ये. आम्ही तिला इंग्रजी मध्ये ते डोरा लावुन द्यायचो पण आमच्या बाईसाहेबांना स्पॅनिश आवडते. Happy
आणी आम्हाला काही कळत नाही. Sad
तिला शाळेत शिकवणार्या बाईंना स्पॅनिश येते. त्या म्हणत होत्या की ती जे काहि बोलायते ते व्यवस्थित आहे. त्यामुळे सध्या १-१०० इंग्रजी , १-२० मराठी , १-१० स्पॅनिश चालु आहे.
वर आणी ऑनलाईन दोन्ही कडच्या आजी आजोबांना स्पॅनिश शब्द म्हणायला लावते आणि त्याचा मराठी अर्थ सांगते.

सहजपणे कानावर पडत असेल, तर मुलं चटकन आत्मसात करतात.. जसं की आई एका भाषेत आणि बाबा एका भाषेत बोलत असतील, तर त्यांच्या नेहेमीच्या संभाषणामधून आपोआप मुलं शिकतात आणि हळूहळू सरमिसळही होत नाही.. ह्या भाषेत अमूक गोष्टीला अमूक म्हणतात आणि त्या भाषेत त्याच गोष्टीला वेगळे काहीतरी म्हणतात, हे त्यांना समजू लागतं.

त्रास कधी होऊ शकतो- जेव्हा प्रयत्नपूर्वक, आग्रहपूर्वक, हट्टाने म्हणून एक वेगळी भाषा शिकवली जाते तेव्हा. तेव्हा त्या शिकण्याचंच दडपण येऊन मुलं स्टॅमर करण्याची शक्यता असते (हे उदाहरण पाहिले आहे)

आणि एक्साईट झालं, अनेक कल्पना धाडधाड डोक्यात यायला लागल्या, की आपोआप स्टॅमर होतात, हे अगदीच नॉर्मल आहे Happy हे मोठ्यांचंही होऊ शकतं Happy

मी लग्नाआधी पासून मद्रासमध्ये (आताचे चेन्नै) होतो. मुलांचा जन्म तिथलाच. घरात आम्ही मराठीतच बोलत असू. शेजारी तामिळ तसेच पंजाबीही होते. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच मराठी, तमिळ व हिंदी भाषा उत्तम तर्हेने बोलता येत. मुंबईहून मराठी व इंग्रजीच्या सुलेखा पाट्या आणून त्यावर अक्षरे गिरवून घेत असे. त्यांना
१ लीपासून केंद्रिय विद्यालयात घातले होते. काही अडचण न येता. तेथे प्रवेश घेताना हिंदी व इंग्लिश येणे आवश्यक असते. कारण हिंदी व सोशल स्टडीज हिंदीत तर विज्ञान, गणित आणि इंग्लिश इंग्रजीत शिकवले जाते.
त्यासुमारास मी एका मराठी अंकात के. भि. ढवळे प्रकाशनाची छोट्यांसाठी ५० रु. त ५० पुस्तके ही जाहिरात वाचली व लगेच मागवली. रात्री त्यांना मी त्यातील गोष्टी वाचून दाखवत असे व त्यांनाही वाचावयास सांगत असे. हिंदी वाचता येत असल्याने मराठी वाचनास अडचण येत नसे. काही मराठी शब्दांचा अर्थ मात्र माहित नसे. तो मी सांगत असे. त्यामुळे मराठी शब्दकोश ही वाढत असे.
जेव्हा सुट्टीत मुंबईला येत असू तेव्हा मराठीतून बोलत असत.पण आपापसात तमिळ मध्ये भांडत तेव्हा इतरांना गंमत वाटे.
आता तर कन्नड, तेलुगु या भाषापण जरुरीनुसार बोलु शकतात.

माझी मुलगी जेवताना तिच पोट भरल असेल तर सांगते 'नssssको', 'बेssssला', 'नो' कानडी मधे बेडा म्हणजे नको.
जर तिला बसायला सांगायच असेल तर म्हणते बस आपल लक्ष नसेल तर सांगते बैठो सीट
डरना म्हणजे घाबरणे सारखे समानार्थी शब्द तिला समजतात. कानडी लोकांशी ती कानडी मधे बोलते. जे तिला कानडी मधे सांगता येणार नाही ते ती पुढे मराठी मधे सांगते.
मी पण तिला शिकवताना काही शब्द मुद्दाम दोन्ही भाषेमधे शिकवते. मराठी मधे जर सफरचंद म्हणते तर त्याच वेळी मी तिला अ‍ॅपल पण शिकवते.

कालचीच गोष्ट आहे, रात्री स्वैपाक करताना मी आयामला मला दोन कांदे दे सांगितलं, तर तो टोपलीतून घेवून आला. मग सह़जच कांद्यांच दुसरं नाव काय असतं असं विचारलं तर त्याने ओनियन म्हणून सांगितलं. मग पापा काय म्हणतात असं विचारून बघितलं, आधी मूझे पता नही म्हणाला अन मग आठवून प्याज असं उत्तर दिलं.
खरंतर त्याला बहुतांशी वस्तूंसाठी तिन्ही- चारी भाषातले शब्द माहित आहेत (हिंदी, मराठी, इंग्रजी अन पंजाबी) पण तो बोलताना हिंदीतच बोलतो. पण मराठी येत नसलेल्या व्यक्तीसमोर हमखास एखादा मराठी शब्द बोलतो.

ह्म्म्.. चांगली चर्चा आहे.
"आणि एक्साईट झालं, अनेक कल्पना धाडधाड डोक्यात यायला लागल्या, की आपोआप स्टॅमर होतात, हे अगदीच नॉर्मल आहे हे मोठ्यांचंही होऊ शकतं " >>> पूर्ण अनुमोदन.
माझ्या बघण्याप्रमाणे जी मुले बर्‍याच भाषा आजूबाजूला ऐकतात ती मुले लहान असताना (२-३ वर्षे) भाषांची थोडी सरमिसळ करतात पटकन बोलताना, पण तरी त्यांना कोणाशी कोणत्या भाषेत बोलायचे हे मात्र अगदी लहान असल्यापासून (१ वर्ष) कळते. आणि हीच मुले साधारण ४-५ ची झाली की काहीही सरमिसळ न करता त्या सर्व भाषा सहजपणे बोलू शकतात.
माझ्या मुलीशी आम्ही घरात फक्त मराठी बोलतो, शाळेत फक्त इंग्रजी, मित्र्-मैत्रिणींमध्ये फक्त हिंदी ( तिचे बहुतांश सवंगडी हिंदी भाषिकच आहेत), आणि कामवाल्या/भाजीवाले/बाहेर इतरत्र कानडी, असे सगळे चालू आहे जन्मल्यापासून. पण आता तिला मराठी-इंग्रजी-हिंदी या तीन भाषा व्यवस्थित बोलता येतात. कानडी थोडेफार कळते.
पण माझे असे निरीक्षण आहे की पुण्या-मुंबईतल्या ५-६ वर्षांच्या मुलामुलींची जेवढी मराठी शब्द्संपदा आहे तेवढी या बाहेर राहणार्‍या मुलांची बर्याचदा नसते. कारण पुण्यात सगळीकडे (म्हणजे मित्र्-नातेवाईक-शिक्षक वगैरे) मराठीच कानावर पडते, तर तो मराठी भाषेचा एक पाया त्यांचा पक्का होतो. जे पालक जाणीवपूर्वक मराठी जोपासायचा प्रयत्न करतात त्यांची गोष्ट वेगळी पण साधारणपणे बाहेर राहणार्‍या मुलांना जेवढं मराठी तेवढंच बाकीचंही येतं. माझ्याच मुलीचं सांगायचं तर ती जितकी अस्खलितपणे मराठी बोलते तितकीच इंग्रजी. मग मला कधीकधी प्रश्न पडतो की ती विचार कुठल्या भाषेत करत असेल ? कारण जरी घरात पूर्णवेळ मराठी बोलले जाते, पुस्तके वाचली जातात तरी घराबाहेर सगळीकडे इंग्रजीच वापरले जाते.
ही अशी बहुभाषिक मुले नक्की कोणत्या भाषेत विचार करतात ? किंवा कोण्या एका भाषेतील शब्दसंपदा तुलनेने कमी असल्याने त्यांच्या विचारप्रक्रीयेत काही फरक येतो का ?

मवा हा <ही अशी बहुभाषिक मुले नक्की कोणत्या भाषेत विचार करतात ? > प्रश्न मलाही पडलाय. Happy

ती बिरबलाची गोष्ट आठवते का? एका व्यापार्‍याची मातृभाषा ओळखण्यासाठी तो त्याला झोपेतुन दचकवुन उठवतो? तर ते ही आमच्याकडे लागु नाही. मी झोपवलं असेल तर लेक झोपेत मराठीत बोलते. बाबानी झोपवलं तर त्याच्या भाषेत Happy

नमस्कार, माझी मुलगी २२ महिन्यान्ची आहे. आम्ही अमेरिकेत आहोत. ती daycare मधे जाते तिथे तिच्या कानावर दिवसभर english पडते तर घरी आम्ही शक्यतो मराठी बोलतो. तिची एकुण शब्द्सन्ख्या सुमारे ३०० आहे (दोन्ही भाषातील), आणि ती खूप वेळा पूर्ण वाक्ये बोलते (e.g I want one more cookie, mama see this vaati, I want poli-bhaji etc.) तसेच तिला सर्व english alphabets आणि numbers माहिती आहेत. आम्ही तिला मराठी अक्शरे शिकवायचा विचार करत आहोत पण याच्यासाठी ती अजून लहान आहे का, सुरुवात कधी करावी, तिची शब्दसम्पदा वाढण्यासाठी अजून काय करता येइल यासम्बन्धी मार्गदर्शन करावे ही विनन्ती. तसेच इथे कुठे devanagari alphabet puzzles मिळतात का ते कळवावे. मुलीला alphabet puzzles करायला आवडतात तेव्हा त्याचाही उपयोग होइल. धन्यवाद!

तसेच इथे कुठे devanagari alphabet puzzles मिळतात का ते कळवावे >>>>>
चीकू, पझल्स नाही पण इतर गोष्टी जसे चार्ट, कार्ड्स इ. आहेत इथे http://www.inditoy.com/

Pages