मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात

Submitted by सावली on 7 October, 2010 - 19:28

नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे या धाग्यावर काही जणांनी मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन कसे आणि कधी शिकवायचे याबद्दल काही प्रश्न विचारले होते. मला सुद्धा हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे. या विषयासाठी वेगळा धागा केला तर चर्चा एकत्रीत राहिल अस वाटलं म्हणुन हा धागा चालु करतेय.

जी मुलं मराठी शाळेत जात नाहीत त्यांना
- मराठी मुळाक्षरे, बाराखडी आणी शब्द वाचन कसे शिकवावे?
- कुठल्या वयापासुन याची सुरुवात करता येईल?
- मराठी वाचनाची आवड कशी लावता येईल?
- आणि त्या पुढची पायरी म्हणजे मराठी लिहायला कसं शिकवता येईल?
याबद्दलची माहिती इथे द्याल का?
याविषयी पुस्तके, सिडी, इंटरनेट स्रोत याविषयी माहिती असेल तर तीहि लिहा.

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माझ्या मुलीला समरपासून मराठी शिकवण्याचा प्रयत्न करित आहे. मुलीला योग्य वाटेल अशा पद्धतीने स्वतःच एक आराखडा तयार केलाय. पण आराखड्याचा हेतु फक्त मुलीला मराठी बोलता याव आणि ८/१० ओळी पर्यंत लिहाव एवढाच आहे.( ती त्याहून जास्त शिकली तर आनंदच आहे. Happy ) वीक एंड ला टाकते तो आराखडा.

माझा मुलगा उत्तम मराठी आणि हिंदी वाचु शकतो. मी बाराखडी वगैरे शिकवलेच नाही. मराठी छोटी छोटी जाड अक्षरातली पुस्तक आणुन तीच त्याला वाचुन दाखवत गेले. आता वाचता आल्यानंतर बाराखडी शिकवतेय. हा अ‍ॅप्रोच बरोबर की चूक ते कल्पना नाही but it worked for me.

माझ्या मुलीने नर्सरीपासुन शाळेची सुरवात केली ती पहिलीपर्यंत इंग्लिश माध्यमात होती. मी तिला तेव्हा मराठी लिखाण अजिबात शिकवले नव्हते कारण मलाच तेवढा वेळ नव्हता. ती पहिलीत असताना मराठी माध्यमाची चांगली शाळा घराजवळच सुरू झाली. पण शाळा सुरू झाल्यावर सहा महिन्यात माध्यम बदलले तर तिला त्रास होईल म्हणुन दुसरीपासुन मराठीला घातले. मे महिन्यात १५ दिवस सुट्टी घेऊन तिच्याबरोबर बसले आणि तिला बाराखडी शिकवली. ती अगदी सहजरित्या शिकली आणि शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवसापासुन पुस्तके वाचु लागली. (तिला वर्गात घेऊन गेले तर तिच्या टिचरला टेंशन आले, आता ह्या पोरीला अ-आ-इ-ई शिकवायचे म्हणुन, मी तिला सांगितले आम्ही जोडाक्षरांसकट सगळे वाचतो आता, तर तिला धक्काच बसला, कारण पहिलीत त्या टिचरने हिला मराठी अजिबात येत नाही हे पाहिलेले Happy ) दोन महिन्यात हस्ताक्षराच्या स्पर्धेत पहिले बक्षिसही मिळाले. यावरुन मराठी बाराखडी शिकणे काही खास कठीण आहे असे मला तरी वाटत नाही. फक्त आपण चिकाटीने मुलांबरोबर बसले पाहिजे.

धन्यवाद सावली मस्त धागा काढल्याबद्दल.
मी पण असाच प्रश्न दुसर्या धाग्यावर विचारला आहे.
जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

मी बाराखडी वगैरे शिकवलेच नाही. मराठी छोटी छोटी जाड अक्षरातली पुस्तक आणुन तीच त्याला वाचुन दाखवत गेले >> हो, आमच्या रिलेटिव चा मुलगा असेच शिकला, तो कॉन्व्हेट शाळेत आहे, पण घरी मराठी पेपर मधिल हेड्लाईन त्याल्या बोट ठेवुन घरी वाचुन दाखवायचे, आणि त्यानी पण ते खुप लवकर ग्रास्प केले ... बाराखडी न शिकता तो डायरेक्ट वाचायला शिकला ...

प्रिंसेस, साधना- तुमची पद्धत फार आवडली.
माझा इरादा तोच आहे. सद्ध्या मराठी शब्दसंपदेवर/गाणी/गोष्टींवर भर देते आहे. १-२ वर्षात मला योग्य वाटले तर डायरेक्ट वाचायला शिकवीन.

एकदा टाईप केलेला प्रतिसाद गेला Sad

मंजिरी,मिनोती , सीमा नक्की लिहा.

प्रिंसेस, सचिन१८, सीमा कितव्या वर्षी सुरु केलं तुम्ही शिकवायला?

साधना तुमची लेक मराठी शाळेत जाते ना आता Happy छान.
काय फरक वाटतोय तुम्हाला?

आपल्या देवनागरी मूळाक्षरांचे वर्गीकरण, दंत्य, औष्ठ्य, तालव्य असे केले आहे, ते अत्यंत योग्य आहे.
पण मला शिकण्यासाठी (मी पण साधनाच्या लेकीसारखेच शिकलो, आईने घरीच शिकवले होते.)
त्यांचे आकारावरुन वर्गीकरण केले होते.
जसे र स ख
व ब क
य थ
प ष फ
ट ठ
ड ढ
घ ध

तसे केल्याने मी लवकर शिकलो असे आई म्हणते. मलाही तिने दुकानाच्या पाट्या, पेपरमधल्या ठळक बातम्या दाखवून अक्षरओळख करुन दिली होती.
आणि हि पद्धत मला फारसी मूळाक्षरे शिकताना पण उपयोगात आली. कारण हि लिपी मी स्वतःच शिकलो होतो.

साधना अजुन एक प्रश्न
तुम्ही अ‍ॅडमिशन घेताना मराठी येत नाही म्हणुन अ‍ॅडमिशन देणार नाही अस काही सांगितल नाही ना?
मी इथुन कॉल केलेला एका मराठी शाळेत अ‍ॅडमिशन प्रोसिजर विचारायला तर त्यांनी १लि साठी लिहिता वाचता आलं पाहिजे अस सांगितलं.

दिनेशदा पहिल्यांदाच अशि पद्धत बघितली. याबद्दल काहि माहिती असेल तर द्या ना प्लिज.

सावली, हि रित बहुदा आईनेच शोधली होती. थेट दुसरीत बसवायचे होते, म्हणुन तिच्याकडे वेळ थोडा होता.
म्हणजे प काढला आणि त्याच्या पोटात एक रेघ मारली कि तो होतो, ष. प ला एक शेपटी काढली कि त्याचा होतो फ (त्यावेळी आमच्या घरी एक कुत्रा होता, त्याचे शेपूट वगैरे दाखवत असे ती.)
प्रत्येक मूल हे स्वतंत्र विचारांचे असते आणि त्याची योग्यता आणि ग्राहणक्षमता आईशिवाय कोण समजू शकणार ? त्यामूळे त्या मुलाचा कल लक्षात घेता, आईनेच त्याला शिकवणे जास्त गरजेचे आहे, असे मला वाटते.
मायबोलीकर नलिनी ने केलेले प्रयोग मी स्वतः बघितले आहेत. तिला इथे लिहायचे आमंत्रण देतो.
फारसी लिपीत, ठिपके म्हणजेच नुक्त्यांना महत्व आहे. एक नुक्ता, दोन नुक्ते आणि तीन नुक्ते दिले कि अक्षर बदलते.
उदा U सारखा आकार काढून त्याच्याखाली एक टिंब दिले तर तो होतो ब, दोन दिली तर होतो य आणि तीन दिली तर होतो प.
आता याच आकाराच्या वर एक टींब दिले तर होतो न, दोन दिली तर होतो त आणि तीन दिली तर होतो थ.
आता एकच आकार शिकून, सहा अक्षरे शिकता आली कि नाही ?

>>मराठी बाराखडी शिकणे काही खास कठीण आहे असे मला तरी वाटत नाही. फक्त आपण चिकाटीने मुलांबरोबर बसले पाहिजे.>> साधना.. अगदी पटेश Happy
माझा अनुभव सांगते.
माझी मुलगी लहान असताना तिला मी इंग्लिश पुस्तकाच्या जोडीला भरपूर मराठी पुस्तकंही वाचुन दाखवत होते. माझ्या आईनी "सकाळ" मधली "चिंटु"ची कात्रणं जमवुन ठेवली होती, त्यामुळे "चिंटु" वाचनही चालायचं.
मुलगी पहिलीत जाईल तेंव्हा तिला इथल्या "इंडियन स्कुल" मधे घालायचं हे ठरलं होतं. त्या शाळेत तिला हिंदी असणार हे माहित होतं म्हणुन यु केजी पासुन तिला हळुहळु एकेका दिवशी २/३ अक्षरांची फक्त ओळख करुन द्यायला सुरुवात केली. समजा एखाद्या दिवशी क, स, न ओळखायला शिकवलं, तर त्यातुन ससा, कान, नाक, कसा वगैरे शब्द तयार करुन दाखवले ("काना" दिला की "आ" उच्चार होतो, हे फक्त सांगितलं.) दुसर्‍या दिवशी अजुन २/३ अक्षरांची भर पडली की कालची आणि आजची अक्षरं मिळुन वेगवेगळे शब्द तयार करत गेले. त्यात तिला मजा वाटायची. मुळाक्षरं झाल्यावर "'मी तुला चिंटु' वाचुन दाखवणार नाही. तु प्रयत्न कर" असं सांगितलं. अडेल तिथे मदत करत गेले. ह्या वाचनातुन तिचं काना, मात्रा, वेलांटी पक्कं होत गेलं. मग आत्ता पर्यंत मी वाचुन दाखवेली पुस्तकं ती स्वत: वाचायचा प्रयत्न करायला लागली. ह्यात मुख्य भर चिंटु ची पुस्तकं आणि माधुरी पुरंदरेंच्या पुस्तकावर होता. त्यांची सगळीच पुस्तकं इतकी छान आहेत की तिला स्वतःलाच ती आवर्जुन वाचावीशी वाटायची. ती पहिलीत गेल्यावर हिंदी मुळे देवनागरी लेखनही शाळेत सुरु झालं. त्यामुळे त्यात मला वेगळे कष्ट नाही घ्यावे लागले.
मध्यंतरी लेकीला "बोक्या सातबंडे" सिनेमा दाखवला. तो खुप आवडला म्हणुन मग आत्ताच्या ट्रिप मधे बोक्या सातबंडेची पुस्तकं आणली. सिनेमा बघितला असल्यामुळे त्यातली पात्रं ती वाचताना डोळ्यासमोर आणु शकली (बहुदा म्हणुन पुस्तकांमधला रस टिकुन राहिला Happy )
लेकीला स्वतःला वाचनाची आवड आहेच. तिनी इंग्लिश बरोबर मराठीही तेवढंच वाचावं ह्या बाबतीत मी आग्रही होते (अजुनही आहे!). मला मराठीमधली मुलांयोग्य उत्तम पुस्तक मिळाल्यामुळे माझं काम तसं सोपं झालं. Happy

दिनेशदा लिहायला शिकवायला चांगली आय्डीया आहे. Happy
मंजिरी धन्स Happy
तुझ्याशि याबद्दल बोलेनच भेटल्यावर आता.
<तिनी इंग्लिश बरोबर मराठीही तेवढंच वाचावं ह्या बाबतीत मी आग्रही होते (अजुनही आहे!). > हो हो:)मी पण.

साधना तुमची लेक मराठी शाळेत जाते ना आता

हो, ती आता १०वीत आहे आणि शाळेत विज्ञान व गणित सोडुन बाकी मराठीत शिकवतात.

काय फरक वाटतोय तुम्हाला?

दुसरीत गेल्यावर दोनेक महिन्यांनी मी तिला विचारले, की मराठी आणि इंग्रजी माध्यमात तुला काय फरक जाणवतोय, ती म्हणाली, आधी वर्गात शिकवायचे त्यातले फक्त ५०% च मला कळायचे, उरलेले घरी येऊन तुझ्याकडुन कळायचे. आता मला वर्गातच १००% कळते. परत घरी येऊन वाचायची गरज पडत नाही. आणि खरेच ती इथे चौथी पर्यंत होती तोपर्यंत मी कधी तिचा अभ्यास घेतला नाही. ती संध्याकाळी खेळत बसल्याने होमवर्क राहायचे आणि मग शाळेत जाताना आता टिचर मारणार म्हणुन रडु कोसळायचे तेव्हा मी गणिते लिहुन द्यायचे आणि ती त्यांची उत्तरे लिहायची (उत्तरेही मीच लिहिली तर टिचरला अक्षरावरुन कळणार म्हणुन Happy ).

बाकी मराठीत गेल्याने तिचे वाचन खुप वाढले. वाचन ती अगदी दुसरीपासुनच करायला लागली, वाचलेले सगळे कळतही होते, कदाचित त्यामुळे. ती स्वतः तीच्या वाचनाआवडीचे श्रेय मराठी माध्यमाला देते. आणि जरी ती मराठीत गेली तरी मी तिच्याशी इंग्रजीत बोलण्याचा, पुस्तके वाचुन दाखवण्याचा पायंडा चालुच ठेवला त्यामुळे तिचे इंग्रजीही चांगले राहिले. तिच्या वर्गात चौथीपर्यंत कॉन्वेंट/इंग्रजी माध्यम करुन पाचवीपासुन या शाळेत आलेल्या मुलीही आहेत, पण तिच्या शिक्षिकेच्या मते ऐशुचे इंग्रजी संभाषण आणि व्याकरण कॉन्वेंटवाल्यांपेक्षाही चांगले आहे. (ती पुण्यात सैनिकी शाळेत आहे, सध्या १०वीत, शाळेत सगळ्यांना एकच मिडियम आहे - सेमी इंग्रजी)

तुम्ही अ‍ॅडमिशन घेताना मराठी येत नाही म्हणुन अ‍ॅडमिशन देणार नाही अस काही सांगितल नाही ना?

Happy नाही, असा प्रश्न पडला नाही. खरेतर पहिलीत त्या शाळेत अ‍ॅडमिशन घेतलेली. आधी दुस-या शाळेत होती. त्यांनी मराठी माध्यम जरा उशीरा सुरू केले. मराठीसाठी अ‍ॅडमिशन विचारायला मुख्याध्यापिकेला भेटले तर त्यांनी 'मराठीला आम्ही डोनेशन घेतले नाही, इंग्रजीला घेतले म्हणुन तुम्ही मराठी बदलुन घेताय का?' असा प्रश्न केला..:) म्हटले, शाळेला दिलेले डोनेशन हे मी मुलांना चांगल्या सोयी मिळाव्यात यासाठी पैसे दिले असे समजते, ते चुकवावे या उद्देशाने मराठीत जात नाही आहोत. पण त्यांनाही मुलगी मराठी कितपत पिकअप करेल हा प्रश्न पडलेला. पण दुसरीच असल्याने त्यांनी जास्त अडवले नाही.

माझा मुलगा सध्या दुसरीत आहे. इंग्रजी माध्यम. मी सुद्धा वर प्रिंसेस नी लिहील्या प्रमाणे डायरेक्ट शब्दच शिकवायला सुरुवात केली.. आता तो अडखळत का होईना वाचतो आणि आवडीने. विकास प्रकाशनाचा एक सेट मिळतो ' विकास बालवाचन माधुरी ' नावाचा ७/८ पुस्तक असतात छोटी छोटी.. सुरुवातीला शिकवायला छान आहे.
मराठी मुळाक्षर शिकवायला सोप्पी आहेत. एक अक्षर शिकवल की पाठोपाठ ४/५ शिकवता येतात जस की 'क' शिकवला की 'ळ' , 'व', 'ब' वगैरे.. जोडाक्षर विरहीत गोष्टींची खूप पुस्तक मिळतात ती पण चांगली आहेत.

' विकास बालवाचन माधुरी ' नावाचा ७/८>>> सावली हीच ती पुस्तक जी मी तुला गेल्या महिन्यात इमेल मधून कळवली होती. हा १० चा संच आहे. खूप मस्त आहे. सानिकाला खूप फायदा झाला.

तिला वाचून दाखवायचे मी मोठ्या टाईप मधली पुस्तकं, तिला आधी माझं नाव लिहायला शिकायचं होत मग तेच शिकवलं, आई लिहायला शिकवलं मोठ्या फळ्यावर. ते न पुसता तसच ठेवलं आठवडाभर. बघुन बघुन ते तिच्या डोक्यात फिट्ट बसलं मग तिला त्यातले आ आणि ई, क वि ता ही वेगळी अक्षरं आहेत हे सांगितलं अशी घरातल्या प्रत्येकाची नावं/नाती झाली शिकुन.

मग हळू हळू अक्षरं शिकवली. आता शाळे मुळे तिची बाराखडीही झालीच पक्की. पण तिला मुळात आवड होती/आपोआप लागली म्हणून फार कष्ट नाही करावे लागले मला.

तसे पाहिल्यास मी मुलीला वाचन आवडावे यासाठी मुद्दाम प्रयत्न केले नाही. ती सवय आपोआप घडत गेली, माझ्याही नकळत.

ती दुसरीत मराठीला जायला लागल्यावर मराठी अक्षरे ओळखण्याचा सराव व्हावा म्हणुन तिच्या हातात रोजचा पेपर देऊ लागले. (पुस्तके विकत घेऊन तिच्याबरोबर बसुन वाचायला मला तेव्हा जास्त वेळ मिळायचा नाही, जवळजवळ १२-१३ तास घराबाहेर असायचे) अर्थात पहिला नंबर चिंटूचा. हा पोरगा लहानथोर सगळयांनाच आवडतो. चिंटु वाचल्यावर नंतर काय वाचणार? पहिले पान तिच्या कामाचे नाही. इतर बातम्यातलेही काही कळायचे वय नव्हते. आणि कळत नसले की मुले कंटाळा करतात वाचायचा.

पण नाटक/सिनेमा वगैरे गोष्टी मात्र तेव्हा समजायला लागल्या होत्या Happy म्हणुन मग मी तिला 'पेपरात नाटका/सिनेमाच्या जाहिराती बघ आणि आजीला सांग रोज कुठे काय चालु आहे ते. तिला पेपर वाचायला वेळ नाही मिळत.' असे सुचवले आणि मग तो तिचा छंदच झाला. चिंटु वाचुन झाले की लगेच नाटकाचे पान काढायचे आणि फोन लावायचा आजीला. मग एकेक अक्षर लावत नाटकाचे नाव वाचायचे आणि ठिकाण वाचायचे. मग चित्रपटांची यादी........ बिचारी आई ऐकत बसायची आणि वर अडलेल शब्दही सुचवायची. तिच्याकडेही तोच पेपर यायचा ना Happy .... असे करत करत मराठीचा सराव वाढला आणि सोबत रोज उठल्यावर पेपर समोर धरायची सवयही लागली.

ती इंग्रजीत असताना highlights हे मुलांचे मासिक लावलेले. तिन वर्षे हे मासिक घरात येत होते. याचा तिला खुप फायदा झाला. पालकांच्या मदतीशिवाय आणि पालकांच्या मदतीने वाचायच्या अशा वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेल्या गोष्टी त्यात असत.

तिला वाचण्यासाठी पुस्तके मी स्वतः कधीच निवडली नाहीत. पुस्तक प्रदर्शन किंवा दुकान - मी तिला तिथे घेऊन जाई आणि सोडुन देई आत. तुला आवडतील ती घे पुस्तके. मग ती वरची चित्रे पाहुन पुस्तके निवडायची आणि कदाचित तिने स्वतःच निवडली असल्याने घरी आल्यावर आधी ती पुस्तके घेऊन वाचत बसायची. तिचा अभ्यास मी कधीच सिरियसली घेतला नसल्याने अभ्यास सोडुन पुस्तके वाचत बसली तरी मी कधी ओरडले नाही. ती तिच्या कुवतीनुसार मार्क मिळवते आणि पुढे जे करायचे त्यासाठी आता किती मार्क मिळवायला पाहिजेत हेही तिला माहित आहे. मग मी ओरडुन काय उपयोग? उगाच मला मनस्ताप. तिने एकदा पुस्तकात डोके खुपसले की तिला ऐकायला येत नाही.

आता चित्रांच्या जागी लेखक पाहुन पुस्तक घेते. शाळेतही ब-याच जणी घरुन पुस्तके आणतात. ग्रंथालयही मोठे आहे (या वर्षी गणपतीत १०वीच्या वर्गाने प्रत्येकी मुलीने २ अशी एकुण ९० पुस्तके ग्रंथालयाला दान केली). त्यामुळे बरीच पुस्तके तिथेही वाचुन होतात. तरीही विकत घेतली जातात. कुठल्याही विषयाचे वावडे नाही. रत्नाकर मतक-यांच्या गुढकथा, जयंत नारळीकरांच्या विज्ञानकथा आणि हिटलरचा उदयास्त - सगळी पुस्तके सारख्याच प्रेमाने वाचली जातात. पुस्तके वाचुन त्यांचा शालेय अभ्यासक्रमाशी मेळ घालायचाही प्रयत्न ती करते. गेल्या वर्षी पहिले-दुसरे महायुद्ध अभ्यासाला होते तेव्हा हिटलरचा उदयास्त वाचुन माहिती बरीच माहिती मिळाली म्हणुन सांगत होती. तिने पत्रातुन कळवले त्याप्रमाणे इंटरनेटवरुनही माहिती काढुन मी तिला पाठवली. (मायबोलीवरील वेदसंस्कृती, अन्न: वै प्राणा आणि इतर लेखमालिकांचेही प्रिंट घेऊन मी तिला पत्रातुन पाठवलेले आहेत. त्याचाही ही अभ्यासात जमेल तसा उपयोग करते).

असे चालु असते. अजुन बरेच पुढे जायचेय. पण एका गोष्टीचे समाधान वाटते की मुद्दाम काही प्रयत्न न करता मुलीला ब-याच चांगल्या सवयी लागल्या. सुजाण पालकत्व वगैरे गोष्टी मला माहितही नव्हत्या आणि त्या माहित करुन घ्यायला वेळही नव्हता. मुलगी मोठी होत गेली तशी तिच्याशी संबंधित गोष्टींचा तिच्या बाजुने विचार करत करत मीही पालक म्हणुन वाढत गेले.

मला १ प्रश्न आहे. कुठे विचारु कळले नाही म्हणुन इथे लिहिले. बरोबर वाटले नाही तर योग्य जागी लिहिन.
माझा असा प्रश्न आहे कि मुलांशी आपण मराठीत बोलले पाहीजे कि फक्त इंग्लिश मधेच बोलले पाहीजे कायम. मी माझ्या मुलीशी मराठीतच बोलते. कुठेही बहेर असले तरी आपसुक मराठीतच बोलले जाते. तर हे चुकिचे आहे का? आजुबाजुचे लोक बघितले की मला असे वाटते कि खुप मोठी चुक करते आहे कि काय? ते लोक स्वतः मराठीच आहेत पण मुलांनी मराठीत बोलणे हा त्याना कमीपणा वाटतो. ते नवरा बायको एकमेकांशी किंवा इतर लोकांशी बोलताना मराठीतच बोलतात पण फक्त मुलांनी मराठीत बोलु नये हा त्यांचा आग्रह असतो. तर हे बरोबर आहे का? ते अभिमानानी सांगतात कि आमच्या मुलांना मराठी येतच नाही. मान्य आहे आजकाल इंग्लिश बोलता आलेच पाहीजे पण मल असे वाटते कि मोठी झाल्यावर ती आपोआप शिकेल. आणि आतासुध्दा ती तिचे फ्रेंडस बघुन मराठीत/इंग्लिश मधे बोलते. पण सतत इंग्लिश नाही बोलत.बाकीच्यांपेक्षा तिचे इंग्लिश कमी पडते तर मी तिच्याशी मराठीत बोलते ही माझी चुक आहे का? त्यामुळे ती मागे पडेल का?

साधना धन्स. तुमचा अनुभव फारच छान वाटला :). मी भारतात नाही ना म्हणुन जास्त चिंता वाटते बाकी काही नाही.
कविता हो ग. आहेत ती पुस्तकं माझ्याकडे. तीला सध्या आवडत नाहीत ती फार. चित्र रंगित नाहीत म्हणुन बहुधा. पण अजुन थोडे दिवसांनी देईन परत. तशी समोरच ठेवली आहेत. म्हणजे कधीतरी तीचा मुड होईल वाचायचा.
धनश्री६ धन्स Happy
nirmayi ,
<अभिमानानी सांगतात कि आमच्या मुलांना मराठी येतच नाही> अरेरे Sad
<आजकाल इंग्लिश बोलता आलेच पाहीजे पण मल असे वाटते कि मोठी झाल्यावर ती आपोआप शिकेल.> बरोबर Happy
मला वाटत तुम्ही बरोबरच करता आहात. आपल्या मुलांशी आपण आपल्या भाषेत बोलण्यात काहीच चुकीचं नाही. मी तर म्हणेन की जर तुमची मुलगी मराठी आणी इंग्रजी एकत्र करत असेल तर तुम्ही तुमच्या बोलण्यातुन तीला मराठी शब्द शिकवा. तीला भाषा वेगवेगळ्या असतात आणि त्यांची गंम्त असते, त्या एकत्र करु नयेत हे कळत नकळत शिकवता येईल. तुमच्या आजुबाजुचे लोक काय करतात त्याची उगीच चिंता करु नका. मुलं दोन काय त्याहुन जास्त भाषा शिकु शकतात. त्यांचे सुरुवातीला भाषा आणि माणस अस मॅपिंग असतं म्हणजे आईशी बोलताना मराठी, शाळेत बोलताना इंग्रजी अस त्यांना आपल आपण कळायला लागतं. फक्त त्यासाठी तुम्ही कसिस्टंट राहुन एकाच भाषेत तिच्याशी बोलल पाहीजे. तुम्हाला इंग्रजी बोलायच असेल तर ५ मिनीट्स इंग्लिश टाईम गेम अस वगेरे करुन खेळता खेळता बोलु शकता. पण एरवी घरातली भाषा मराठीच ठेवता येईल.
हे मी माझ्या अनुभवावरुन लिहित आहे. माझी मुलगी तीन भाषा बोलते. दोन भारतीय भाषा आणी जपानी. लहानपणापासुन मी तिच्याशी केवळ मराठी मधेच बोलते, तीचे बाबा त्यांच्या भाषेत आणि डे केअर मधे जपानी. ती भाषाची सरमिसळ करत नाही. शब्द माहित नसेल तर विचारते याला मराठीत काय म्हणतात, जपानीमधे काय म्हणतात ते.

नाही ती एकत्र नाही करत भाषा. ती मराठी लोकांशी मरठीत बोलते आणि अमराठी लोकांशी इंग्लिश मधे बोलते. आणि जपानी शब्द एकुन एकुन शिकत असते.
पण तिच्याबरोबरचे मुल कोणीही असो इंग्लिश मधेच बोलतात मग ते पाहुन असे वाटते कि ती कुठे कमी पडेल का? आणि लोक असेही बघतात मग की मराठीत काय बोलते ही म्हणुन.
का मला पण तिला इंग्लिश बोलण्याचीच सवय लावली पाहीजे? मलाच कळत नाही कधी कधी मी करते ते बरोबर आहे की चुकीचे.

nirmayi तुम्ही तोक्यो मधे रहाता हे आताच बघितलं.
मला तरी वाटत तुमची मुलगी कुठेहि मागे पडणार नाही. लोकं बघत असतील तर बघुदेत ना. तुम्ही इथे तोक्यो मधे बघितल असेलच ना कि इथली लोकं त्यांच्या भाषेतच बोलतात , शिकतात. मातृभाषा येणे आणि त्यात आपल्या घरातल्यांशी संवाद साधणे यात काहीच कमी पणाच नाहीए.

धन्यवाद सावली. खुप बरे वाटले तुमचा प्रतिसाद वाचुन. मन शांत झाले.
हो मी तोक्यो त च रहाते मला तुम्ही नका म्हणू तु म्हणलं तरी चालेल.

मुले भाषा खुप लवकर शिकतात. माझ्या शेजा-यांची एक सुन अमेरिकेत होती, ह्या जूनमध्ये भारतात मुलांसकट परतली, नवरा पुढच्या वर्षी येणार आहे. मुलाला मराठी येत होते बरेच पण चार वर्षांच्या मुलीला बोललेले थोडेफार कळले तरी बोलता मात्र यायचे नाही. आता चार महिन्यात मुलगी अगदी उत्तम मराठी बोलायला शिकली. घरातले आधी तिच्याशी इंग्रजीत बोलायचे पण आता तीच मराठीत बोलायला लागलीय.

माझ्या लेकीला ती अडिज वर्षांची होईपर्यंत हिंदी अजिबात येत नव्हते कारण शेजार सगळा मराठी होता. इथे नेरुळला राहायला आलो तर एक मल्याळी आणि एक मुसलमान शेजारी. ती महिन्याभरात हिंदीत बोलायला लागली. मी अजिबात प्रयत्न केले नाहीत तिला हिंदी यावे म्हणुन. तिचे तिच शिकली. अर्थात सुरवातीला इधर जाव च्या उलट बोलायचे झाले तर तिधर जाव बोलायची. Happy मग सुधारली

मराठीत बोलणे कमीपणाचे वाटणा-या लोकांबद्दल मला दया वाटते. Sad

>>मराठीत बोलणे कमीपणाचे वाटणा-या लोकांबद्दल मला दया वाटते.
खरं आहे साधना!
निर्मयी, मला सुद्धा वाटतं तुम्ही बरोबरच करताय. मी सुद्धा माझ्या मुलीशी फक्त मराठीतुनच बोलते.
तिच्या लहानपणापासुन मी आणि माझा नवरा ती जर भेसळयुक्त मराठी बोलली तर पहिल्यापासुनच त्या वाक्यांचा अनुल्लेख करायचो. तसंच, कुठलीही भाषा बोलताना त्यात उगाच वेगळ्या भाषेचे शब्द वापरु नयेत, हे सुद्धा वारंवार सांगायचो (अजुनही सांगावं लागतं कधीकधी). त्यामुळे तिच्या बोलण्यात कधीही मी "थिंक करते", "माझं ते डर्टी झालं आणि ब्रोक झालं" किंवा "मी आस्क करते तु आन्सर कर" (उदा: वाक्य देत्ये!) असं येत नाही. आपण जसं इंग्लिश किंवा जपानी बोलताना त्यात मराठी शब्द घालत नाही, तसंच मराठी बोलताना सुद्धा त्यात दुसर्‍या भाषेचे शब्द नाही घालायचे, हे समजवल्यावर नीट कळलं आहे तिला. पण त्यासाठी सुरुवातीला आपण खुप ठाम रहावं लागतं हे खरं आहे.
मी पण माझ्या तोक्यो मधल्या मैत्रिणींची मुलं बघते, त्यापेकी फार कमी मुलं एकतर मराठी बोलतात किंवा स्वच्छ मराठी तर फारसं कुणीच नाही बोलत Sad

पण मग तुम्ही मुलांशी घरीच फक्त मराठीत बोलता की बाहेर पण इतर लोकांसमोर मुलांशी बोलताना मराठीतच बोलता?

मातृभाषा आलीच पाहीजे याविषयी आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे आम्ही मुलीशी घरी मराठीतच बोलतो. बाहेरही - दुकानात, डॉक्टरकडे शक्यतोवर मराठीत बोलतो. पण उदा. मी जर तिच्या शाळेत मदतीसाठी गेले तर ईतर मुलांसमोर्/शिक्षकांसमोर इंग्रजीत बोलतो. जेणेकरुन त्यांना आम्ही काय बोलतोय हे समजावे. गंमत म्हणजे ती मला शाळेत 'आई' च म्हणते आणि आमच्या विदेशी मित्रांना काका/मावशी म्हणते. (त्यांना आपल्या संस्कृतीची बरीच माहीती आहे आणि मोठ्या माणसांना आपण नावाने संबोधत नाही ही कल्पना आहे)
तिची मराठीची शब्दसंपत्ती चांगली आहे. ती लहान असताना (२ ते ४) कोणतेही पुस्तक तिला मी इंग्रजी आणि मराठीत वाचुन दाखवत असे. आणि मग तिला तिच्या मनातल्या मनात वाचायला (बघायला) सांगत असे. तेव्हढा वेळ मी माझे वाचन करीत असे. तिला विचारल, 'झालं का तुझं वाचुन?' तर ती कधीकधी सांगायची 'मराठीत झालं, इंग्रेजीत व्हायचय' Biggrin (मला तेव्हढाच वेळ स्वतःसाठी मिळायचा) तिच्याशी अजुन हिंदीत अजिबातच बोललो नाही कारण ती भाषा आमच्यासाठी 'राखीव' आहे (अजुनतरी)! (घरात हिंदी सिनेमांची चलती नसल्याने तिला हिंदी समजत नाही)
अजुनपर्यंत तिला मराठी लिहा/वाचायला शिकवले नाही कारण मला समजत नव्हते नक्की कशी सुरुवात करायची ते. आता दिनेशदांच्या पद्धतीने प्रयत्न करुन बघते.
मला तिच्या वयासाठी (पाच वर्ष) मराठी पुस्तके सुचवाल का कोणी?

हा धागा मस्तय. मी पण मराठीत बोलते मुलीशी व शाळेत गेले की ईंग्लीश.
मी आधी एक बाराखडीचे पुस्तक आहे घरी त्यातुन अक्षरे शिकवत होते , फक्त ओळखायला. पण वरची कविताची पध्धत मला जाम आवडली. परवाच २ कागदांवर तिच्या जवळच्या माणसांची नावे मी लिहिली. आधी इंग्लीश व डॅश मारुन त्यापुढे मराठी. आता ती आधी इंग्लीश नाव वाचते व लगेच मराठी शब्दावर हात ठेउन मराठी वाचते. फक्त एक करणार आहे मी त्यात. ईंग्लिश मधे जर एखादा उच्चार लिहायला २ 'लेटर्स' लागली तरी मराठीत १च लागु शकते (जोडाक्षर नसेल तर). तर त्या समुहाखाली रंगीत मॅचिंग लायनी काढणार आहे म्हणजे कोणत्या ईंग्लिश समुहासाठी कोणते मराठी अक्षर ते लगेच कळेल तिला.

नंतर लिहायला शिकवायच्या वेळेस दिनेश ह्यांची पध्धत वापरणार.

आणि आपल्या न संपणार्‍या मालिकांच्या कृपेने मुलीला हिंदी समजायला लागले आहे व थोडे बोलायला पण येऊ लागले.

Pages