तृप्ततेची चमक आणि फटाकडी

Submitted by अभय आर्वीकर on 7 October, 2010 - 09:07

आता काही देणे घेणे उरले नाही

१) तृप्ततेची चमक

तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत
तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे
दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे

जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी
तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही
हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!

२) मर्यादा सहनशीलतेची

तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो
तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो
तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो
तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो

माझी सोशिकता संपायला आली.. पण
मर्कटचाळे, तुझे काही सरले नाही
बस कर मित्रा, हा घे शेवटचा रामराम माझा
तुझे-माझे... आता काही... देणे घेणे.... उरले नाही

३) हे मृत्यो..!

जगायचे होते ते जगून झाले
करायचे होते ते करून झाले
द्यायचे होते ते देऊन झाले
घ्यायचे होते ते घेऊन झाले....!

हे मृत्यो..! तुला यायचे असेल तर ये
कधीही.....; तुझ्या सवडीने
तुला टाळावे असे आता कारण उरले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!

४) आयुष्याची दोरी

आयुष्याच्या दोरीची अंतिम किनार
माझी मला दिसायला लागली
जीव घाबरा अन् नाडी मंदावून
श्वासेही घरघरायला लागली

बराच पुढे निघून आलोय मी आता
रामनाम सत्याशिवाय काही उरले नाही
मोह,माया; मद,हेवा; काम-क्रोध यांचेशी
मला आता काही देणे घेणे उरले नाही

५) आत्मप्रौढी

मी फ़ूले मागितली, तू काटे दिलेस
फ़ुंकरी ऐवजी धपाटे दिलेस
तुझ्या पौरुषी अहंकारात
माझे अस्तित्वच नाकारले गेले
तुझ्या आत्मप्रौढी समोर
माझे आत्मक्लेश पुरले नाही
म्हणून मलाही तुझ्या अहंमन्यतेशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!

६) फ़टाकडी

तू आलीस आणि घुसलीस
हृदयाची सारी दारे ओलांडून
थेट ....... हृदयाच्या केंद्रस्थानी

तू असतेस..... तेंव्हा तू असतेस
तू नसतेस..... तेंव्हाही तूच असतेस
मला कसे एकटे म्हणुन सोडतच नाहीस तू

त्यामुळे.. हो त्याचमुळे....."त्या फ़टाकडीशी"
माझे आता, काही देणे घेणे उरले नाही.....!!

गंगाधर मुटे
..........................................................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा. Happy

शर्विलकजी, गणेशोत्सव स्पर्धेत पाठवल्या होत्या. पण पुरस्कार एकाच कवितेला मिळणार असतो.
आणि परीक्षकाच्या नजरेत जी रचना सर्वोत्तम असते तीला पुरस्कार मिळतो.
सर्वांना पुरस्कार तर देणे शक्य नसते.

तुमचे प्रतिसाद हा सुद्धा पुरस्कार असतोच की. Happy

अप्रतिम हि कविता तुमची
काय प्रतिसाद द्यावे कळले नाही
तुम्ही कविता दिली, मी प्रतिसाद दिले
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!!! Lol Lol Lol
--------
मुटेजी, एकदम झक्कास्स कविता... फोडतय....
वरचे प्रतिसाद निव्वळ मज्जा म्हणुन दिले.....
तसे तुमच्या कडुन आणि तुमच्या कवितेतुन घेण्यासारखे खुप काहि आहे...
त्यामुळे (देणे) घेणे उरले नाही बोलुन कसे चालेल....??? Wink Wink Wink

धनेषजी, तुम्ही दिलेले प्रेम
अजून पावतर सरले नाही
मंग मीबी कसा म्हणू ब्बॉ की
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!! Happy

सर्वच कविता आवडल्या

देणे घेणे खुप आहे बाकी
सगळे कांही सरले नाही.
मुटे बक्कळ लिहीत रहा,
आजुन माप भरले नाही.

अरे ही कशी वाचायची सुटली...
छान...वेगळी तुमच्या नेहमीच्या शैलीपेक्षा.. Happy

प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे. Happy

भाऊ, माझ्यासारख्या सामान्य माणसाला मायबोलीकरांनी प्रतिसाद देऊन कवी बनविले, यापेक्षा मोठ्ठा पुरस्कार कोणता असू शकतो. Happy

http://ranmewa.blogspot.com/p/blog-page.html

गंगाधर मुटेजी !!
छानच कविता आहे.!आणि आपण कविता छानच करता
आपल्या आजूबाजूच्या लोकांची पाठीवरची थाप
आपले मन फुलवते.मी आपणास काय सांगावे.?
आपणास खूप शुभेच्छा !!

छान !

मुटेजी, ह्या सुन्दर कवितांना प्रतिसाद सुध्दा तेवढ्याच
सुन्दर शब्दात द्यायला हवा, पण इतके सुन्दर शब्द
माझ्याकडे नाहीत. काय करू?