मायबोलीवीरांची कुलंगवारी !

Submitted by Yo.Rocks on 6 October, 2010 - 16:27

मायबोलीवीरांची कुलंगवारी !

कॅनियॉन व्हॅली हा ट्रेक आम्ही कुठलाही प्लॅन न करता अचानक गेलो होतो.. नंतर दोन तीन वेळा ट्रेक केला पण फकस्त मायबोलीकरांचा असा काही ट्रेक झाला नव्हता.. तेव्हा आपण सगळे मायबोलीकर मिळून एका ट्रेकला जाउया असे ठरले.. नि स्थळ निवडले कुलंग ! २-३ ऑक्टो. अशी लागून आलेली सुट्टी नि कुलंग हा ट्रेकर्समंडळींच्या वर्दळीपासून दुर असणारा हा गड... म्हणून समिकरण ठरवले गेले..

अंतिम यादी ठरली होती.. सुन्या, सुर्यकिरण, मल्लीनाथ, किश्या नि हबा हे सगळे पुण्याहून नि यो रॉक्स, इंद्रा, विन्या, गिरीविहार, रोहित.. एक मावळा, प्रसाद गोडबोले नि प्रणव कवळे हे सगळे मुंबईहून येणारे.. एकून संख्या १२..

कल्याण वा ठाण्याला पुण्याहून येणारे मायबोलीवीर भेटणार होते.. पण स्वारगेटहुनच निघणार्‍या एसटीला उशीर झाला.. नि कसार्‍याकडे जाणारी शेवटची लोकल त्यांना मिस झाली !! (त्यांना भलताच उशीर झाला होता अथवा साखळी ओढून ट्रेन थांबवावी का असा विचारही मनात आला होता.. Proud ) यावेळेत प्रचंड प्रमाणावर फोनाफोनी झाली.. पण गाडी त्यांना मिस झालीच.. आता कसार्‍याहूनच जाताना नाशिक हायवेवर भेटू असे ठरले.. इथे मुंबईतून येणारे मायबोलीवीर ठरल्याप्रमाणे कसारा गाडीत चढले.. गाडीने ठाणे स्टेशन सोडले नि इंद्राचा मोबाईल वाजला.. 'मी प्रताप.. कल्याणला चढतोय.. तुम्ही कुठल्या डब्यात आहात.." फोन कट झाला... आता हा आयडी कोण म्हणत आम्ही स्मरणशक्तीवर जोर देउ लागलो.. जल्ला आधी कळवले पण नव्हते कुणाला.. तोच पुन्हा फोन वाजला तेव्हा कळले की सुकीचा एक मित्र.. आमची एकुण संख्या १३ झाली.. गाडीने कल्याण स्थानक सोडले.. नि थंडीने जोर धरला.. एकेक सिटवर मायबोलीवीर आधीच पहुडले होते..

(गिरीविहार.. झोपी गेला.. )
इंद्राने तर खिडक्या, दरवाजे लावण्यास सुरवात केली.. जाकीट वगैरे असा प्रकार न आणल्याने प्रगो तर पुरता गारठला होता.. इकडेच ही हालत तर कुलंगवर काय असा प्रश्नही मनात येउन गेला..

रात्री साडेतीनच्या सुमारास कसार्‍याला पोहोचलो.. तेव्हा पुण्याहून येणारे मायबोलीवीर ठाण्याहून कुल कॅब करुन निघाले होते.. ठरल्याप्रमाणे आम्हाला घेण्यास जीप आली नि आम्ही पुढे कूच केले.. चहापाण्यासाठी बाबा दा धाब्यावर थांबलो.. इथे आलो नि गिरीला जोरदार भूक लागली.. पण त्याच्या भुकेला घाबरुन की काय तो ऑर्डर घेणारा सगळे संपलेय सांगत होता.. शेवटी उरलासुरलेला दाल फ्राय मेनूवर गिरीची भूक भागली.. खरे तर बाकीचे नुसते बसून बघणारे नसल्याने त्याची भूक विभागली गेली.. नि सगळ्यांनीच ताव मारला.. इथेच पुण्याहून येणारे मायबोलीवीर दाखल झाले.. ओळख झाली.. किश्या, ह बा या मंडळीना तर पहिल्यांदाच भेटलो.. पण हाय हॅलो पलिकडे विशेष बोलणे झाले नाही.. कारण तिथे सुन्याची हालत बेकार झाली होती.. तब्येत ढासळली होती.. !

चहापाणी आटपून आम्ही लगेच मार्गस्थ झालो.. एकोणीस जणांना कोंबुन घेउन जाण्याची क्षमता असणार्‍या ह्या जीपमध्ये आम्ही तेराजण कसेबसे मावलो.. त्यात आमच्या काहिजणांच्या अवजड बॅग्ज.. ड्रायवर तर इतक्या बाजूला सरकुन गाडी चालवत होता की त्याच्याबाजूला बसलेला किश्याच जणू गाडी चालवतोय असे वाटत होते..

दिडएक तासाच्या प्रवासानंतर भल्या पहाटे आम्ही आंबेवाडी गावात पोहोचलो.. एव्हाना सुन्यादेखील गाडीत झोप मिळाल्याने बर्‍यापैंकी फ्रेश झाला होता.. तिथुनच मग गावातील एका मामांना आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी घेउन गेलो.. पावसानंतर वाढलेल्या जंगलात भुलभुलैय्या नको म्हणूनच मामांना गाईड म्हणून घेतले.. निघताना रविवारच्या जेवणाची ऑर्डरही देउन ठेवली..

तंगडतोड करण्यास आम्ही सज्ज झालो.. त्याआधी सॅकमधील सामानांचे वाटप करुन वजन विभागणी केली.. पण काहिजणांनी सॅक इतक्या छोट्या आणल्या होत्या की त्यांना सामान देणे म्हणजे सरळ अत्याचार होता त्या सॅकवर... यंदाच्या मोसमात पाउस मस्त पडला होता.. त्यामुळे साहाजिकच सभोवतालचा निसर्ग चांगलाच खुलला होता.. त्यात वाटेच्या डावीकडुन सुरु होणारी कळसूबाई डोंगरांची रांग नि अगदी समोर उभे ठाकलेले अलंग-मदन- कुलंग त्रिकुट.... सकाळच्या तांबड्या मंद प्रकाशात चित्र काढल्याप्रमाणे भासत होते..

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)
-----------------------------------------------
----------------------------------------------

याशिवाय वाटेत पिवळ्याधमक रंगाची सोनकी भुरळ पाडत होती.. अजुन एक तिथे गडद जांभळ्या रंगाची नि पाकळ्यांना पांढरा तिका लावलेली अशी चिमुकले फुलेही लक्ष वेधुन घेत होती..

-------------

--------------

-----------------
आम्ही गप्पागोष्टी करत सगळे मामाच्या मागूनच चाललो होतो.. वाटेतच एक ओहोळ लागला.. तिथेच क्षणभर विश्रांती घेतली नि पुढे चालु लागलो..

--------------------

एव्हाना आम्ही कुलंगला डावीकडे ठेवुन चालत होतो.. प्रत्येकजणाच्या मनात एकच शंका.. चढायचे तरी नक्की कुठून ? किती वेळ लागेल ?? खरे तर त्याची उंचीच गगनाला भिडत होती त्यामुळे साहाजिकच कधी एकदाचे कुलंग चढायला घेतोय अशी उत्सुकला लागली होती.. लवकरच मामाने कुलंगला जाणार्‍या मुख्य वाटेला हात घातला...

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)

नि उत्सुकता शिगेला पोहोचली.. माझे लक्ष तर मामा नक्की कुठून घेउन जाणार इकडे होते.. कारण परतताना आम्हालाच यायचे होते.. शिवाय इथे दोन वाटा आहेत कुलंगला जाण्यास.. दोन्ही पुढे एका वाटेला येउन मिळतात.. पण ही वाटभेट जंगलात असतानाच होते त्यामुळे फार कठीण काम..

आम्ही खुणा लक्षात ठेवत पुढे जात होतो.. सुकी लाकडं दिसली तर उचलत होतो.. (कुलंगवरती एकही झाड नसल्याने लाकडं इथुनच घ्यावी लागणार होती.. त्यात दोनवेळचे जेवण, चहापाणी उरकायचे होते).. तरीसुद्धा गडाची उंची बघून आतापासूनच लाकडे कशाला म्हणत आमच्या सुचनेकडे काहीजण दुर्लक्ष करत होते.. त्यात मामाने पुढं मिळतील बरीच सुकी लाकडं आसं म्हटल्यावर कोण आमचे ऐकतोय.. तरीपण प्रत्येकाने दोनेक लाकडं पकडलीच..

पुन्हा एकदा एक चढण पार केले नि सगळ्यांनी नाश्त्याच्या खुराकावर ताव मारला.. विन्याने आणलेले थेपळे नि सुकीने आणलेल्या गावच्या शेंगा.. लवकरच आटपले कारण सुर्याची कोवळी किरणे आता प्रखर बनत चालली होती...

इथुनच आता खर्‍या ट्रेकला सुरवात होणार होती.. मागे मी आलो होतो तेव्हा वेगळी वाट पकडली होती.. पण मामांचे म्हणणे ऐकुन त्यांनी सांगितलेल्या दुसर्‍या वाटेने आम्ही पुढे सरकु लागलो.. हि वाट बरीच खडकाळ होती.. छोटेमोठे धोंडे पार करत ती जंगलात शिरली.. जंगल सांगायचे तर पाउलवाटेच्या दोन्ही बाजूस आपल्यापेक्षा उंच अशी वाढलेली झाडी.. जेणेकरुन पायाखालची वाटही दिसत नव्हती.. आजुबाजूच्या गवताची पातं तर आमच्या कान- डोळ्यांना गुदगुदल्या करीत होते..

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)

जिथे आम्हाला चालणे जिकरीचे होते तिथे हातात लाकडं घेउन चालणे म्हणजे वाटेतील अडथळ्यांना आमंत्रण.. तरीदेखील आमची वाटचाल सुरुच होती.. त्यात अधुनमधून घोंगावणार्‍या मोठ्या टोकदार (!!!) माश्या त्रास देत होत्या.. खासकरुन प्रणव, रोहीत नि इंद्रा यांचा फार लळा लागला होता तीला.. Lol वाटेत काहि ठिकाणी मध्येच जंगल संपत होते.. नि आतापर्यंत केलेली वाटचाल दिसुन येत होती.. अर्थातच एव्हाना आम्ही बर्‍यापैंकी उंची गाठली होती.. म्हणजेच नवख्यांसाठी एका छोट्या गडाची उंची गाठली होती.. पण कुलंगचा कळस अजुनही मान पुर्ण वर करुन बघितल्याशिवाय काही दिसत नव्हता.. Proud

जंगलानंतरची पुढील वाट मला ठाउक असल्याने मामांना अर्ध्यावरूनच माघारी फिरण्याचे सांगितले होते.. पुढे वाटेत एक सुकलेले मोठे झाड लागले नि मामांनी लगेच कोयता काढला.. झाले.. आमच्या वजनात अजून भर पडली.. Proud पुन्हा काहि जणांचे त्रस्त चेहरे.. Proud स्वत:चाच वरपर्यंत पोहोचण्याचा भरोसा नाही त्यात आणखीन ही लाकडं असा त्रासिक विचार नवख्यांच्या मनात नक्कीच आला असावा.. Lol पण तरीदेखील सगळ्यांनी हातभार लावलाच.. Happy लवकरच त्या वाटेचा टप्पा संपला.. नि मामा माघारी फिरले..

आता आम्ही मायबोलीवीर वाटेचा माग काढत पुढे सरकरणार होतो.. तशी वाट सरळच आहे.. पण पुन्हा छोटेमोठे कारवीचे जंगल लागते.. ह्या जंगलात पाच पावलापलीकडची व्यक्ती दिसत नव्हती इतके दाट जंगल होते.. त्यात चढणीची पाउलवाट.. पण काही झाले तरी मायबोली टोळी हळु का होइना पुढे सरकत होती..

-------------------

(गिरी, इंद्रा नि रोहीत)
--------------------

(इक्झॅटली शब्द फाडणारे प्रसाद गोडबोले)
-------------------

(किश्या.. वजनाने वाकलेला.. )
--------------------

--------------------
जंगल संपले नि मग कोरलेल्या पायर्‍या लागल्या.. या पटकन नजरेत येत नाही.. पण माझे एकदा जाणे झाले असल्याने कठीण गेले नाही.. सुरवातीला अत्यंत छोट्या नि नजरेस न पडणार्‍या ह्या पायर्‍यांचा आकार पुढे वाढत जातो.. तशी वाट सोप्पी होत जाते.. पण मागे वळून पाहिले तर थेट दरी दिसते नि साहाजिकच मायबोलीवीरांचा थरथराट सुरु झाला.. थरथराट एवढा की पुढे गेलेल्या मायबोलीवीरांनी लाकडं वाटेतच सोडुन दिली.. तसे त्यांचे काही चुकीचे नव्हते कारण तिथे एक भलताच एकदम कडक असा पॅच लागतो.. जिथे सॅक घेउन चढताना कसरतच.. अगदी वळणावर कोरलेल्या अशा पायर्‍या आहे.. त्यात शेवाळपाण्याने बरबरटलेल्या दोन तीन पायर्‍या !! नि शेजारी आ करुन बसलेली दरी ! Proud शेवटी मागाहून येणारे मी, प्रणव कवळे, रोहीत, इंद्रा नि गिरीविहार यांनी अत्यंत शिफाईतीने जपत आणलेली लाकडं वर सरकवत आणली.. काय करणार.. त्या लाकडांमध्ये आम्हाला जेवण दिसत होते.. Happy

तो पॅच पार केला नि एक ठराव मांडला.. साखळी करुन लाकडं पुढे सरकावयची.. नि त्याबरोबर आपणही हळुहळू पुढे वाटचाल करायची.. एकमेकां सहाय्य करुचा ठराव चांगलाच फायदेशीर ठरला नि आमच्या चढाईचा वेग किंचीत वाढला.. जसे पुढे सरकत होतो तसा पायर्‍यांच्या उंचीचा आकार वाढत होता.. शेवटी आम्ही अगदी अंतिम टप्प्यात पोहोचलो.. थकलेभागलेल्यांना हे खुप समाधानकारक होते..

(ह बा, मल्लीनाथ, सुर्यकिरण नि प्रणव.. कदम कदम बढाते जाये..)
---------

पण एवढ्यात सुटका नव्हती.. कारण अगदी शेवटच्या टप्प्यात असणार्‍या पहिल्या दोन तीन पायर्‍या चढून जाणे खुप कसरतीचे होते.. एका बाजूला कातळ तर दुसर्‍या बाजूला दरी.. इथे आवश्यक काळजी घेउन सगळ्यांना चढवण्यात आले नि अंतिम टप्प्यात असणार्‍या दोन गुहा नजरेस पडल्या...

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)
-----------------------------------------------
----------------------------------------------


(सुन्या.. शेवटच्या ट्प्प्यातील पायर्‍या चढून येताना..)
------------------------------

(विन्या.. हिरो दा स्टाईलमे.. कुलंगच्या दरवाज्यापाशी..)
----------------------

(कुलंगच्या प्रवेशद्वारापर्यंत येणारी वाट.. ! )
--------------------------
पाचेक मिनीटातच वरती पोहोचलो तर समोर कमरेपर्यंतच्या उंचीपर्यंत वाढलेले गवत स्वागतासाठी उभे होते...

-----------------------------
पावसाळ्यानंतर आम्हा मायबोलीवीरांचेच कुलंगवर पहिले पाउल पडत होते.. ही देखील अभिमानास्पदच बाब... Proud

(जीतम जीतम करायचे सोडुन पुरते थकुन गेलेले मायबोलीवीर नि मागे दिसतेय ती गुहा..)
------------------------------
काहींनी दरवाज्यातून (मोड़कळीत आलेला) प्रवेश करुन तिथेच ठाण मांडला.. तर आम्ही काहीजणांनी गुहेची वाट (दरवाज्यातून प्रवेश केल्यावर उजवीकडे जाणारी) पकडली.. वाढलेल्या गवतामुळे वाट दिसत नव्हतीच पण अंदाज घेत गुहेपर्यंत पोहोचलो.. संपुर्ण कुलंग परिसर हिरवाईने नटला होता..

(कुलंगची पुर्वेकडे झुकलेले बाजू )
-----------------
सभोवतालच हिरवा परिसर बघून फ्रेश वाटले.. पण गुहेत ठिंबक सिंचनाने तुंबलेले पाणी बघून मात्र हिरमोड झाला.. खूपच गैरसोय होणार होती.. पण तेवढ्यावर थांबतील ते मायबोलीवीर कसले.. लगेच आधी गुहेच्या बाहेरील बाजूचे गवत आडवे करुन चुलीसाठी अयशस्वी प्रयत्न केला गेला.. मग शेवटी गुहेतच त्यातल्या त्यात बर्‍यापैंकी कोरड्या जागेत चूलीची सोय केली.. कुलंगवर पाण्याच्या बर्‍याच टाक्या असल्याने पाण्याची गैरसोय नव्हती.. गुहेच्या उजवीकडे समांतर रेषेत पुढे गेल्यावर एक रिकामी टाकी सोडुन दुसरी टाकी लागते.. ते पाणी पिण्यास योग्य ! अगदी थंडगार !
--------

(पाणी भरताना इंद्रा.. नि मागे किल्ल्याचे काहि भग्नावशेष..)
------
पाण्याचा बाटल्या भरुन घेतल्या, चूलीची सोय झाली पण पेटवताना मात्र ज्याम घाम गाळावा लागला.. एकीकडे पोटात कावळे ओरडत होते.. दालखिचडीचे सामान घेउन गिरीपण तयार होता.. फक्त लाकडं पेट घेत नव्हती.. 'क्यूब' च्या गोळ्या पेटवल्या होत्या.. पण लाकडांचा मुड होत नव्हता.. शेवटी बर्‍याचवेळाने मनासारखी चुल पेटली नि डालखिचडी बनवायला घेतली.. यावेळी चुलीचा ताबा मल्ली (कसला फुंकतो.. निखारे पेटलेच समजा.. :P), गिरी, विन्या नि मी घेतला होता.. बाकीच्यांचे मात्र अवसान गळुन पडले होते.. आम्ही तर जेवण करता करता पापड भाजून खात होतो.. Happy

लवकरच फक्कड डालखिचडी तयार झाली.. नि जेवणाचा कार्यक्रम आटपला.. प्रतापने आणलेली गुळपोळी तर खासच.. जेवण आटपेपर्यंत तीन साडेतीन वाजत आले होते.. सगळेजण मग सावलीच्या शोधात विखुरले गेले.. विन्या नि इंद्राने तर कंटाळा करत उनातच आडवे झाले.. सुन्या तर गडावरुन पंधरा-वीस फुट खाली उतरुन गुहेत झोपायला गेला होता.. नि जल्ला त्याला जेवण खाण्यासाठी उठवायला मला पण पंधरा फूट पुन्हा खाली उतरावे लागले..

जेवणानंतर वामकुक्षीचा खेळ संपला नि आम्ही छोट्या कुलंगला जवळून पाहण्यासाठी कुलंगच्या एका टोकाच्या दिशेने गेलो.. गुहेच्या वरुन पश्चिमेकडे उतरत गेल्यास छोट्या कुलंगचे दर्शन होते.. या टोकापर्यंत जायचे म्हटले तरी बरीच पायपीट करावी लागते.. खरेतर कुलंगचा विस्तारच प्रत्यक्षात खूप मोठा आहे.. लांबच्या लांब पसरलेला आहे.. एका टोकावरुन दुसरीकडे जायचे म्हणजे दोनदा विचार करावा लागतो.. केवढी ती पायपीट Proud पण आम्ही संध्याकाळ पश्चिमेच्या बाजूस नि सकाळ पुर्वेकडील बाजूस व्यतित करण्याचे ठरवले..
इथेदेखील टोकापर्यंत फक्त मी, सुन्या, रोहीत नि प्रताप एवढेच जण गेलो होतो.. बाकीच्यांनी दुरुनच न्याहाळण्याचा कार्यक्रम उरकला..

(कुलंगचे पश्चिमेकडचे अंतिम टोक.. छोटा कुलंग ह्यालाच म्हणतात की समोर दिसणर्‍या पहाडाला म्हणतात याबद्दल गोंधळ आहे..)
-------------------------------

-------------------------------

(इथूनच मग कुलंगच्या पाठच्याबाजूचा खडा असलेला कडा न्याहाळला..)
-------------------------------

(सुन्या टोकावरुन छोटा कुलंग ??? बघताना..)
------------------------
त्या टोकाला जाउन मागे वळून पाहिले तर कुलंगचे वेगळेच रुप दिसते.. कुलंगच्या नेहमीच्या आढळ्णार्‍या प्रकाशचित्रांपेक्षा बर्‍यापैंकी वेगळे रुप...

( फोटोत डावीकडे उंचावर दुरवर दिसतोय तो इंद्रा.. नि जवळ उभा आहे तो रोहीत.. यावरुन कळेल एका टो़काकडे येताना किती अंतर कापावे लागले ते.. Happy )
----------------------------

(कुलंगच्या मागच्या बाजूस खाली दिसणारी दरी पण जबरीच.. !! )
----------------------------

(कुलंगची एक बाजू..)
-------------------------------

(यो रॉक्स नि सुन्या.. हा फोटो रोहीतने काढलाय)
-
सूर्य जसा क्षितीजाकडे झुकत होता तसतसा हवेतील गारवा वाढत चालला होता.. साहाजिकच आमची पावले पुन्हा गुहेकडे वळाली.. चहापानाचा कार्यक्रम जो उरकायचा होता... परतताना विन्याची मस्ती सुरू झाली..

-------------
नि लगेच त्याला इतर मायबोलीवीरांची साथ लाभली.. Happy

(प्रताप, मल्ली, गिरी,सुन्या, विन्या, इंद्रा नि रोहीत..)
--------------------
इथेच मग एक ग्रुप फोटो झाला.. तो देखील मायबोलीचे भगवा निशाण घेउनच..

( या फोटोत हा फोटो काढणारा मी नि एकीकडे झोपा काढणारा ह बा मिसींग आहेत.. )
---------------------

(गर्व से कहो के हम शूर मायबोलीवीर है.. Proud प्रणव, विन्या नि भगवा..)
-----------------
फोटोसेशन उरकते न तोच मध्येच रोहीत, गिरी नि विन्याला अंघोळ करण्याचा मूड आला.. नि त्यांनी हौस भागवून घेतली...

--------------------------
तर एकीकडे ह बा अजूनही कोमातच होता.. Proud

------------------------------------------
काही अवधीतच इंद्रा, सुन्या नि मल्ली यांनी मिळुन एकदम सही चहा बनवली.. नि सगळेच चायबिस्कुटावर तुटून पडले.. एकाच कप दोघा-तिघांनी शेअर केला.. त्यात पण आळस केला नि शेवटी टोपच पुढ्यात घेतला.. Lol चहा पोटात गेला नि सगळे एकदम फिट्ट वाटू लागले.. आळसावलेल्या, एकत्रीत न भासणार्‍या मायबोलीवीरांची आता मात्र चांगलीच भट्टी जमली होती.. नि इथूनच खर्‍या गंमतीला सुरवात झाली..

त्यातच सूर्यास्त सोहळा एका ढगामुळे चांगलाच रंगला होता...

---------------------

---------------------

-------------------

(अशा पार्श्वभूमीवर स्वतःचा फोटो काढून घेणारा मी आज मात्र सुकीला उत्तेजन देत होतो.. Happy त्यातलाच एक काढलेला फोटु.. हा.. सोबतीला योगेश२४ असता तर त्याच्याकडून नक्कीच फोटो काढुन घेतला असता..)
--------------------

(गडावरची रम्य ती संध्याकाळ..)
----------------------

----------------------

-----------------------
सूर्य नजरेआड झाला नि आमची जेवणाची तयारी सुरु झाली.. अंधारात शोधाशोध नको म्हणून आधीच जेवणाला लागणारे सामान आमच्या 'किचन' मध्ये आणून ठेवले.. रात्रीच्या जेवणासाठी राजमा चावल नि पनिर मख्खनीचा (ready to eat packets) बेत होता.. पापड, लोणचे, ब्रेड सोबतीला होतेच..

सगळी तयारी करुन आम्ही मग गुहेसमोरच मैफील बसवली... सभोवताली एकदम मस्त वातावरण होते.. काळोखातील मेणबत्तीचा मंद प्रकाश, रातकिड्यांची किरकीर्र, दुरवर गावात लुकलुकणारे दिवे, अधुनमधून अंगावर शहारे आणणारे थंडगार वारे नि आकाशात नटलेले तारांगण ! अशाच मदधुंद वातावरणात गाणी म्हटली गेली.. गप्पागोष्टी सुरु झाल्या.. मग ह बा ने ग्रामीण कवितांची पोतडी उघडली नि सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.. खरच सुंदर ! त्यात ह बा ने ज्याप्रकारे चाल लावून, सुरामध्ये गाउन जे सादरीकरण केले ते खरंच उत्कॄष्ट होते ! इतक्या उंच गडावर असा अनुभव मी तरी पहिल्यांदाच घेत होतो.. प्रगोने देखील मग भाग घेउन ह बा ला साथ दिली.. "वाहवा! वाहवा !" चा गजर सुरु होता.. मग किश्याने देखील त्याचा कथेतील किस्सा ऐकवला.. नि मग जो काय वाद रंगला त्यात हसून हसून वाट लागली...त्यात विन्याच्या अंगात लोकमतचे "श्री.वागळे" संचारले होते.. Lol मग मायबोलीवरील विषयांची, आयडींची चर्चा क्रमाने पुढे आलीच.. नि अशी चर्चा रंगली नाही तर नवलच.. Happy

थोड्याच वेळात जेवणाची वेळ झाल्यावर इंद्रा, सुन्या नि मी किचनकडे वळालो.. रेडी टू इट रेडी झाले.. आमचे खाउन पण झाले.. पण तिथे ह्यांची चर्चा काहि केल्या संपतच नव्हती.. चर्चा म्हटले की मायबोलीकर कसले सुटतात त्याचे उदाहरण दिसुन आले.. Proud त्यातच इतक्या उंचावर येउन आपल्याला नकोश्या झालेल्या आयडीबद्दल राग व्यक्त करण्यात काय मजा असते हे कोणी तरी त्या पर्‍याला समजवावे.. Proud Lol वारंवार हाका देउनसुद्धा त्यांच्या विषयात काही खंड पडत नव्हता.. आता काय सांगावे !

शेवटी ओढुन-खेचून चार चार जणांना जेवायला बोलवले.. म्हटले ह्यांची चर्चा नको थांबायला.. Lol जेवण आटपले नि आता सगळ्यांना लोळायची प्रबळ इच्छा झाली.. पण झोपणार कुठे हा प्रश्ण होता.. शेवटी वेळ न दवडता तिथेच गुहेसमोर सरपटणार्‍या प्राण्यांना न डगमगता झोपण्याचे ठरवले.. जेमतेम पाच जणांच्या जागेत नउ जण आडवे तिडवे झोपलो..!!! नि बाकीचे (सुकी, ह बा, प्रगो नि प्रणव कवळे) त्या 'किचन'मध्येच झोपले.. तिथे झोपताना त्यांना 'गुड नाईट' करायला गोम अवतरली नि मग काय... बिचारीचा मर्डर करुन टाकला त्यांनी.. तरी नशिब त्यांच्या स्वप्नात त्या गोमेचा आत्मा नाही समोर आला.. Wink

बाकी उघड्यावर झोपण्यात मजा काही औरच.. झोपुनच वरील तारांगणात मध्येच एखादा तारा निखळताना बघताना मस्तच वाटत होते.. आकाशगंगेचा धुसर पट्टाही बर्‍यापैंकी उठून दिसत होता.. माझ्या पाठीखालची जमिन ओबडधोबड असल्याने माझ्या झोपेचे खोबरे झाले होते.. त्यात घोरण्याची स्पर्धा जोरात होती.. एखाददुसरी डुलकी लागली.. नंतर जाग आली ती चंद्रोदय झाल्यावरच.. आहाहा.. त्या प्रकाशात गडावरील परिसर मस्तच खुलून गेला होता.. जशी पहाटेची वेळ झाली तसे आम्ही अंधारातच (प्रताप, सुकी, रोहीत, किश्या, प्रगो, विन्या नि मी) सुर्योदय बघण्यास पुर्वेकडे निघालो.. पंधरावीस मिनीटात आम्ही पुर्वेकडील कड्यावर पोहोचलो नि तांबड फुटलेल्या आकाशाकडे टक लावुन बघू लागलो.. अरुणोदय होण्यास बराच वेळ लागला.. पण जो काही सोहळा अनुभवला तो खासच..

तिथेच मग जोरदार फोटोसेशन पार पडले.. त्यात विन्याने आणलेल्या मायबोलीचा झेंडा होताच.. त्यामुळे फोटो काढून घेण्यात आणखीन मजा आली..

(अगदी डावीकडे टेकडीसारखे भासणारे म्हणजेच कळसुबाई नि अगदी समोर पहिला डोंगर दिसतो तो मदन नि मागे अलंग..)
------------------------------------

-----------------------------------

(वरील फोटो झूम करुन घेतला असता असे अजबच दिसून आले..)
------------------------------------

(प्रगो ने घेतलेली पोझ खासच..)
------------------------------------

(नि हा प्रगोचा योगाप्रकार..)
--------------------------------------
इथेच मग मायबोलीवीर फोटोसाठी उडू लागले..
सुर्योदय सोहळा पाहून आम्ही लगबगीने गुहेची वाट धरली.. उशीरा पोहोचलो तर बाकी मंडळी आमच्यासाठी नाश्ता ठेवणार नाहीत यावर पुरेपुर विश्वास होता.. Proud नशिब फक्त चहाच उरकला होता.. नि आमच्यासाठी थोडाफार शिल्लक होता.. लगेच मॅगी बनवण्यास घेतली.. चवीला म्हणून बेडेकर मसाला पण टाकला !!! पुन्हा असा प्रयोग होणे नाही.. आमचे खाणे सुरु होते पण सुन्या मात्र अजुन झोपलाच होता.. भलताच तापला होता.. शेवटी त्याला कोमट पाण्यात मिठाच्या घड्या ठेवल्या.. बाकीच्यांना आवरायला सांगितले.. ह बा ला कुठेतरी खेकडे दिसले नि खेकडे खाण्याचा मोह झाला.. म्हटले आण पकडून पण हात हलवतच परत आला.. पुढे वेळ न दवडता मी, ह बा नि प्रणव ने भांडी घासण्याची जबाबदारी इंद्राकडून घेतली.. तर बाकीच्यांनी आवराआवर सुरु केली..

सुन्याची हालत बघून इतरांना पुढे निघण्यास सांगितले.. ती जबाबदारी रोहीत, इंद्रा नि मल्ली ने घेतली.. खरेतर ह बा ने उतरताना तू हवास म्हणून विनवले होते.. पण सुन्याला सांभाळत नेणे नि त्याच्याबरोबर अनुभवी माणूस असणे गरजेचे होते म्हणून मी, विन्या नि गिरी मागेच राहिलो.. ( सॉरी रे ह बा.. तू समजुन घेतले असशील म्हणा..) सगळ्यांना एकदम सावकाश, आरामात उतरा इतकाच सल्ला दिला..

पंधरावीस मिनीटांनी आम्ही पण मग उतरायला लागलो.. तर उर्वरीत मायबोलीवीर बर्‍यापैंकी खाली उतरले होते.. ते पाहून खरेच हायसे वाटले.. कारण पायर्‍यांचा पॅचच थोडाफार धोकादायक होते... उतरताना ह्यांच्या मनात काय आले असेल ते सांगतिलच सगळे म्हणा.. Wink सुन्या तर थोडे अंतर कापत होता नि तसाच वाटेत झोपत होता.. ताप तर चांगलाच भरला होता.. तरी बरे कडाक्याचे उन नव्हते.. जोरदार वार सुटला होता.. आम्ही पंधरा वीस मिनीटे मध्येच थांबत होतो.. नि पुन्हा चालत पुढे गेलेल्या मायबोलीवीरांना सहज गाठत होतो.. काय करणार.. बर्‍याच कसरती करत उतरत होते सगळे.. Proud

मला सुन्याचे जास्तच टेंशन आले.. कारण आम्ही अर्धेच अंतर कापले होते.. नि अजून दिडेक तास लागणार होता खाली पोचायला.. कधी एकदा खाली उतरतोय नि गावात पोहोचतोय असे झाले होते.. त्याला अधुनमधून मारी बिस्कीट आणि इलेक्ट्रॉल देत होतो.. तापाची गोळी देखील दिली.. पण थंडी नि अशक्तपणा फार आला होता.. त्यातही तो आमच्याबरोबर अंतर कापत होता हेच खूप होते.. त्याचे मनोधैर्य नि सहनशक्ती वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच होते.. त्याची सॅक प्रणवने घेतली होती.. तर प्रणवची सॅक सुन्याला न देता मीच घेतली.. पायर्‍यांचा कठीण पॅच मी दोन बॅग्ज घेउनच उतरलो नि मग पुढे प्रणवने दोन दोन बॅग कॅरी करण्याची जबाबदारी घेतली.. (प्रणव.. थँक्स रे Happy )

उतरताना एक थरारनाट्य घडले.. सुन्या नि विन्या थोडे पुढे गेले.. नि मागून मी नि गिरी चालत होतो.. वाट उतरणीची होती.. पण ओल्या मातीवरुन गिरीचा पाय घसरला नि तो लोटांगण घालत थेट कारवीचे दाट जंगल असलेल्या दरीत कोसळला.. !!! मलाही क्षणात सुचले नाही नि थेट उडी मारुन त्याला सावरले.. कारवीची दाट झाडीच्या आधारामुळे गिरी अडकला गेला.. नाहितर... Happy एकदा पडला की आत्मविश्वासाची बोंब लागते.. नि गिरीबाबत तेच झाले.. बुट सारखे घसरु लागले नि तो उभ्या उभ्या पण धडपडू लागला.. Proud

काही अवधीतच आम्ही पुन्हा सगळे विश्रांतीसाठी एकत्र जमलो.. तब्बाल दिडेक तासानंतर विखुरलेले मायबोलीवीर एकत्र आले होते..

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)
--------------------
प्रत्येकजण आपली पँट घासून घासून किती मळलीय ते चेक करत होते.. Lol ग्रुपफोटो काढून पुन्हा मार्गी लागलो.. आतापर्यंत घसरगुंडीची वाट होती.. कारवीच्या जंगलातून वेडीवाकडी वळणे घेत घसरत घसरत खाली उतरले होते.. नि पुढील वाटही तशीच थेट उतरणीची होती.. पुन्हा तंगडतोड करत आम्ही दिडदोन तासात पायथा गाठला...

प्रत्येकजण वरती बघून च्याट पडत होता.. एवढे अंतर उतरुन आलो पण !!! इथे खरे तर ट्रेक संपत नव्हता.. कारण आता सरळ जमिनीवरची भर उन्हातून करावी लागणारी पायपीट बाकी होती.. पायथ्याशी हिरवेगार रान लागले... मग तिथे पुन्हा एक कुलंगला पार्श्वभूमीला ठेवुन ग्रुप फोटो काढण्यात आला नि पुढची वाट धरली..

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)

वाटेतच पुढे एक ओढा लागला.. नि थकल्याभागल्या मायबोलीवीरांना डुबकी मारण्याची उचकी लागली.. सुन्याची तब्येत खालावत चालल्याने मी आणि मल्ली सुन्याला घेउन तसेच पुढे गावात गेलो.. मल्ली नि माझ्या गप्पा सुरुच होत्या तर सुन्या शांतपणे मार्गाक्रमण करत होता.. लवकरची एसटी मिळाली तर आम्ही पुढे रवाना होण्याचे ठरवले होते.. चालताना मध्येच मागे वळून पाहिले तर एक विरळ दृश्य नजरेस पडले.. ते म्हणजे कुलंगवर ढगांमधून पडलेला टॉर्च !!!


(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)

आम्ही एकदाचे गाव गाठले.. मी सुटकेचा निश्वास सोडला.. चौकशी केली असता कळले संध्या. ४ ची एसटी आहे.. टेम्पोची सोय होईल असे माहित पडले.. जिथे आम्ही जेवायला थांबलो तिथेच कळले की गावात डॉक्टर आहे.. तेव्हा आम्ही पटकन दवाखाना गाठला.. तापाचे इंजेकशन नि गोळ्या घेउन आम्ही परतलो.. आमचे जेवण होईस्तोवर आधी पाण्यात डुंबलेले नि मग घामाने भिजललेले थकलेभागलेले मायबोलीवीर येउन धडकले.. पटापट जेवण आटपले.. तिकडे मग विन्या नि मल्ली टेंपोशी बोलणे करुन आले.. नि मग लेटस गो !

निघताना आम्हा ग्रुपला उत्सुकतेने बघायला बच्चा कंपनी जमली होती.. त्यांच्या हातात चाकलिटा ठेवून आम्ही आंबेवाडीचा निरोप घेतला.. Happy

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)

टेंपोतसुद्धा धमालगप्पा नॉनस्टॉप चालूच होत्या.. आमच्या टेंपोत तेथील एक गावकरी चढला होता.. विचारपुस केली असता त्याने सांगितले की आम्ही हा कुलंग अर्ध्या तासात चढतो !!!! (अतिशयोक्तीकी भी हद होती है !!) हे ऐकताच चार तास तंगडतोड करुन दमलेल्या ह बा चा जो काय चेहरा झाला ते काय विचारु नका.. Lol 'इथ बोललास पण बाहेर कुठं बोलू नकोस' असा इंद्रा,ह बा ने दम पण भरला... Proud बाकी ह बा ने त्या गावकर्‍याला '५० रुपये द्या नि अर्ध्या तासात कुलंग' असा धंदा सुरू करण्याचा मौलिक सल्ला दिला.. Proud

संध्याकाळी ५ च्या सुमारास कसारा गाठले.. मग धावपळ सुरु झाली रेल्वे तिकीट काढण्याची.. आधीच रविवार त्यात तोबा गर्दी.. सो तिकीटांचे कुपन बुक विकत घेतले.. नि मग पंचिंग करुन घेण्यासाठी मायबोलीवीर आपआपसांतच भांडू लागले.. Proud तिकडे ट्रेन फलाटावर आली नि मायबोलीवीरांनी मालडब्याचा कब्जाच घेतला..
अगदी मॅट घालुन सगळे बसले.. !

(सौजन्य : विन्याचा कॅमेरा, फोटोग्राफर - विन्या)

इथे तर सुतारफेणीचे सामान घेउन ह बा नि प्रगो विक्रेते बनले.. Proud ट्रेन सुटली नि मायबोलीवीरांनी धमाल गाण्यांचा कार्यक्रम सुरु केल्या.. त्यात माझा अप्सरा डान्स पण होताच ! (जल्ला हे मायबोलीकर अप्सराच्या ड्यान्सवर पुरते फिदा झालेत.. कुठं पण नाचवत्यात.. नि आपण पण कुणालाबी निराश नाही करत :P) बाकी विन्या, गिरी, ह बा ने म्हटलेली धमालगाणी नि त्याला सगळ्या मायबोलीवीरांनी दिलेला कोरस मस्तच ! एव्हाना ग्लानीमध्ये असलेला सुन्या पण औषधामुळे थोडा का होईना आमच्यात आला होता.. Wink नि मायबोलीवीरांनी चालवलेल्या धमालगाणीची डब्यातील इतरजणही मजा लुटत होते हे सांगणे नकोच...

लवकरच कल्याण स्टेशन आले.. नि गेले दिडदोन दिवसांत मायबोलीवीरांचा जो काय मस्त ग्रुप झाला होता त्याची फाळणी व्हायची वेळ झाली.. 'पुन्हा एकदा ट्रेक होउन जाउदे तेव्हा भेटूच !' म्हणत प्रत्येकाने एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला..

समाप्त Happy

# जिथे विन्याने काढलेले फोटो वापरले आहेत तिथे तसे नमुद केले आहे.. Happy

आभारप्रदर्शन : ट्रेक म्हटले की नुसते लिडर कामाचे नसतात.. तर 'एकमेकां सहाय्य करु' चा फंडा नि ग्रुपमधील एकी महत्त्वाची असते.. प्रत्येकाने थोडी जरी जबाबदारी घेतली की सगळेचजण ट्रेकचा आनंद मनमुराद लुटू शकतात.. हीच बाब ह्या ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या मायबोलीवीरांमध्ये होती Happy त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद ! Happy बाकी हा ट्रेक ज्यांना कठीण वाटला असेल त्यांना 'सॉरी' रे ! सुन्या जर पुर्ण फिट असता तर त्याच्या मदतीने नवख्या मायबोलीवीरांना हा कुलंग ट्रेक नक्कीच सोप्पा करुन दाखवला असता.. Happy बाकी म्हणाल तर थरार अनुभवल्याशिवाय ट्रेकला सर नाही.. Proud मग पुन्हा कधी जायचे.. ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्या जानेवारीत ठरव... >>>>>>>शक्यतो >>>>>> "राजगड" >>> तोरणा-राजगड Happy

सुन्या तुझी कमाल आहे Happy

जल्ला.. ती पँन्ट, तो चमचा, ते पातलं याचं संग्रालय व्हायलाच हवं.. Proud पँट दर्शनीस्थानी लावा Proud

नाहीतर.. लिलावास ठेवावी.. बोली लावून आणखी चमकूदेत पँट.. Proud

या फोटूत सगळे कसे भिजल्यामान्जरागत थरथरताना दिस्ताहेत! Lol
पण लय भारी ट्रेक! Happy
(मिसला अस म्हणणार नाही कारण मला सध्या आमच्या पुण्याच्या पर्वतीचा "ट्रेक" देखिल जमु शकत नाहीये Proud )

सुन्या जानेवारीत ठरव... >>>>>>>शक्यतो >>>>>> "राजगड" >>> तोरणा-राजगड

>>> रायगड प्रदक्षिणा ??? दुर्गभ्रमणगाथा मधे गोनिदांनी उल्लेख केलाय याचा .!!!!

सुकी Biggrin
लिंबूदा..:हाहा:
रायगड प्रदक्षिणा ??? >>. तु घाल आम्ही गडावर जाउन येतो..:फिदी:

विन्या, तुझ्या त्या पाण्याच्या पट्ट्यानी खुप फरक पडला त्यादिवशी....

योग्याशी बोललोय आत्ताच. तो राजगड-तोरणा म्हणतोय....

वरच्या फोटोत सुकी आणि हबा ने त्या दगडाला पकडून ठेवलेय म्हणून तर बाकीचे बाजूने चालत जावू शकले Happy

कुलंग गडाचा लिहिलेला माझा लेख लवकरच तुमचा भेटिसाठी येत आहे हो ...तयार रहा << घसरगुंडीसाठी पुन्हा तयार आहोत रे रोहित.. येऊदेत.

तो राजगड-तोरणा म्हणतोय....
हो रे... राजगड-तोरणाच करुयात. (माझं दोन वेळा प्लॅन फिस्कटलाय या ट्रेकचा... :रागः या वेळेस करुतच ! )

कुलंग गडाचा लिहिलेला माझा लेख लवकरच तुमचा भेटिसाठी येत आहे हो ...तयार रहा
अरे या वेळेस तु तरी 'मागचे' फोटो टाक.. Proud सगळ्यांनी दर्शनी भागाचेच टाकलेत....

>>>> राजगड-तोरणाच करुयात
राजगड ते तोरणा करण्यापेक्षा, तोरणा ते राजगड करावा Happy

ह्म्म.. सुन्या इज बॅक !
राजगड ते तोरणा करण्यापेक्षा, तोरणा ते राजगड करावा >> डन डना डन !! जानेवारीत वेळ/सुट्टी राखून ठेवा रे.. Happy बाकी त्याआधी नोव्हें/डिसें. मध्ये सटर-फटर ट्रेक असतीलच.. Proud

बाकी त्याआधी नोव्हें/डिसें. मध्ये सटर-फटर ट्रेक असतीलच.. << नोव्हेंबर आलाच बघ .. ! ह्यावेळेस पिक-अप व्हॅन पाठवा पुणेकरांसाठी.. त्या मल्ल्यासाठी तर चार्टड रेडा पाठव.. म्हणजे उशिर होणार नाही.:फिदी: बाकी ते चैन खेचायचं राहूद्यात.. उगाच रात्रीची लोकं घाबरायची. Proud

या मल्ल्यासाठी तर चार्टड रेडा पाठव.. म्हणजे उशिर होणार नाही.
Rofl

बाकी ते चैन खेचायचं राहूद्यात.. उगाच रात्रीची लोकं घाबरायची.
असं कसं असं कसं.... Proud

सुक्या... विन्या,
घे आता मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री दोघेही पश्चीम महाराष्ट्राचे आहेत. दोघे मिळुन विकास अन समतोल साधु असं म्हणतायत. कोणत्या दिशेने विकास सधनार कुणास ठाउक Wink

किश्याच्या प्रोजेक्टला आता हात्भार लागेल मग.

(बाकी माबोकरांना जरी पोस्ट असंबंध वाटत असली तरी कृपया पोस्टी वाया घालु नये.)

घे आता मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री दोघेही पश्चीम महाराष्ट्राचे आहेत. >>
त्यात सुधारणेला वाव नाही रे ...

Pages