आदिबंध : परीक्षण

Submitted by pkarandikar50 on 2 October, 2010 - 05:48

आयटी विश्वाचे दर्शन
२६ सप्टे. २०१० महाराष्ट्र टाइम्स

हर्षल मळेकर

कोणतीही कादंबरी म्हटली की त्याला विशिष्ट पार्श्वभूमी, त्यातली पात्रे, त्यानुसार प्रसंग, संवाद या गोष्टी येतात. आताचे युग आयटीचे आहे. जिथे-तिथे आयटीचा उदो उदो होतोय. हजारो तरुण-तरुणी आयटी कंपन्यांत जीव ओतून काम करत आहेत. 'आदिबंध'मध्ये आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांची कार्यपद्धती, त्यातली पात्रे, त्यांची भाषा पाहायला मिळते. त्यामुळे तरुण वाचकांना वाचायला आवडेल, त्यांना आपलीशी वाटेल अशा पद्धतीने त्याची मांडणी झाली आहे. कॉपोर्रेट जगतातल्या अनेक घडामोडींना ही कादंबरी स्पर्श करते. कॉपोर्रेट कंपन्यांमधलं वॉर, शह-काटशहाचं राजकारण, पार्टी कल्चर, तिथली कार्यसंस्कृती हे सारे सर्वसामान्य वाचकांना ठाऊक असण्याचे कारण नाही. तिथली माणसे वेळप्रसंगी अत्यंत क्रूरही होऊ शकतात. आपल्या स्पर्धकांचे पत्ते कापण्यासाठी वाट्टेल त्या थरापर्यंत जाण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या मिटिंग्ज, त्यांचे कोडवर्ड्स हे सारे विश्व या कादंबरीतून अनुभवता येते. तसेच, संगीतक्षेत्रही सर्वसामान्यांच्या दृष्टीने काहीसे अपरिचित. संगीतक्षेत्रामध्ये होणारे कार्यक्रम, त्यांचे रियाझ, गुरू या सर्व गोष्टींचे प्रभावी चित्रणही यात करण्यात आले आहे.

आयटी क्षेत्रातील वातावरणामुळे तरुणाईपैकी अनेकांना ही कादंबरी आपलीशी वाटण्याचा संभव आहे. मुळात मराठी पुस्तकांत कॉपोर्रेट युगाचे चित्रण यापूर्वी फारसे पाहायला मिळालेले नाही. ते यातून अनुभवता येऊ शकते. पण तितकेच या कादंबरीचे विश्व नाही. ही कादंबरी मानवी आयुष्यातील स्त्री-पुरुषांच्या संबंधांचे काही पदर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करते. मानवी नातेसंबंधांतील प्रगल्भता यातून डोकावते. कादंबरीची भाषा प्रवाही आहे. त्यातले संवाद आपल्या आसपास सहज कानांवर पडतील असे आहेत. लेखकानेच म्हटल्यानुसार जीवन म्हणजे एक न सपंणारा डोंबार्‍याच्या खेळासारखा असतो, याचे भान ठेवून जगायचे. याबाबतचे निरीक्षण म्हणजे या कादंबरीची 'थीम' आहे. ती मांडण्यासाठी आवश्यक असे सर्व विषय या कादंबरीत आले आहेत. यातली एम. डी., रोहित खन्ना, सौम्या, भाईजी, भूषण, पंडितजी, दातारसाहेब ही सारी पात्रे म्हणजे जिवंत हाडामांसाची माणसे वाटतात आणि त्यांची व्यक्तिचित्रे सहज डोळ्यांसमोर तरळून जातात, हे या कादंबरीचे यश म्हणावे लागेल. मराठी कादंबरीच्या प्रवाहात प्रभाकर म्हणजेच बापू करंदीकर यांच्या या पुस्तकाने मोलाची भर पडली आहे.

........................................

आदिबंध (कादंबरी)

लेखक : बापू करंदीकर

प्रफुल्लता प्रकाशन, पुणे

पाने : ४१०, किंमत : ३४० रुपये

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व मा.बो. करांचे आभार.
या प्रतिक्रिया परीक्षणावरच्या आहेत. पुस्तकावरच्या प्रतिक्रियांची खरी प्रतीक्षा!
बापू.