मायबोली वरच्या कथाबीज ३ साठी लिहिलेली ही कथा. तिथे ५०० शब्दांचे बन्धन होते त्यामुळे काहि गोष्टी नीट लिहिता आल्या नव्हत्या. म्हणुन परत लिहितेय. अशा प्रकारच्या कथेचा, भाषेचा हा पहिला प्रयत्न आहे. चुका असतील तर दाखवुन द्या.
मुद्दे - लहान मुलगा, बाजाराचा दिवस, कपड्याचे दुकान, आईस्क्रीम
****************************
"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना एवढासा सम्या दमून गेला होता.
"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."
भैरू बाजाराच्या दिवशी आपलं गाठोडं घेऊन जायचा कापडाचं दुकान लावायला.एरवी अशीच इकडची तिकडची, जमलच तर कुणाच्या शेताची कामं करायचा. पोराला बुकं शिकवून लई मोटा करायचं स्वप्न त्याचं. सम्या आता पारावरच्या शाळेत ३रीच्या वर्गात जायचा, पण सुट्टीच्या दिवशी बाबाबरोबर बाजाराला जायला लागायचंच त्याला. मग त्या दिवशी खेळायला मिळायचं नाही म्हणून त्याला अज्जिबात आवडायचं नाही. भैरुलाही ते माहीत होतं पण इलाज नव्हता. तेवढीच मदत होती हाताशी. आणि आजतर तालुक्याचा मोठा बाजार होता.
भराभरा चालत दोघे बाजाराच्या ठिकाणी पोचले तर चांगल्या जागा आधीच सगळ्या ठेल्यावाल्यांनी पटकावल्या होत्या. आता उरलेल्या जागेतली बऱ्यापैकी जागा निवडून भैरूने चादर पसरून कापडं नीट मांडून ठेवायला सुरुवात केली. अजून गिऱ्हाईकं यायला वेळ होता म्हणून सम्या इकडे तिकडे बघत बसला. आजची जागा नेहेमीची नसल्याने समोर सगळे नवीन गाठोडीवाले होते. त्यामुळे सम्याला लई मजा वाटत होती. तेवढ्यात सम्याच्या समोरची जागा एका मोठ्या हातगाडीवाल्याने घेतली. हातगाडीवरची आईसक्रीमची रंगीत चित्र बघून आणि 'थंडगार गारे गार' अशी पाटी वाचून सम्या मनातल्या मनात तो पदार्थ कसा लागतं असेल याचा विचार करायला लागला.
हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली आणि भैरुने सम्याला कामाला लावलं, सम्याचं काम म्हणजे ओरडून ओरडून बाबाच्या दुकानाची जाहिरात करायची. "कापडं घ्या, कापडं! लई भारी कापडं!!" सम्याने आपलं काम चालू केलं तरी त्याचा एक डोळा त्या हातगाडीवरच होता. आजूबाजूची पोरं आईबापा बरोबर येऊन आईसक्रिम खाताना बघून हे लहान मुलांनी खायचं काहीतरी छान आहे हे त्याला कळायला लागलं होतं. येणारा नवीन पोरगा कोणत्या रंगाचं आईसक्रीम खाणार याचा अंदाजही त्याच्या मनाने लावायला सुरुवात केली. "गार म्हंजी कसं आसल? झाडाच्या सावलीवाणी आसल का हिरीच्या पान्यावानी?" सम्याच्या नकळतच त्याचे मन तिथे जात होतं. मध्येच "कापडं घ्या, कापडं! गारे गार कापडं!!" अस ऐकल्यावर भैरुने झापलाच सम्याला.
"काय रं? काय इकतोयास? गारेगार कापडं आणली व्हय तुज्या बान?"
चमकून आपली चूक दुरुस्त करून सम्या परत एकदा ओरडायला लागला. दुपारी आयने बांधून दिलेली भाजीभाकर खातानाही त्याला ते "आईस्क्रीम भाकरीवानी थंड आसल का?" असा प्रश्न पडला होता जो भैरू पर्यंत पोचलाचं नाही.
संध्याकाळ व्हायला लागली तसं जत्रेतली लोकं कमी झाली आणि आपापली गाठोडी बांधून दुकानदारही घरच्या वाटेला लागायला लागले होते. भैरुनेपण आपली कापडं नीट घड्या घालुन गाठोडं बांधायला सुरुवात केली. आज फारसा धंदा झाला नव्हता. आता दुसऱ्या गावातला पुढचा मोठा बाजार महिन्याभराने होता आणि आजची कमाई जेमतेम वीस दिवस जातील एवढीचं होती म्हणून तो जरा चिंतेतच होता. आणि सम्या अजूनही त्या आईसक्रीमच्या गाडीकडेच बघत होता.
गाठोडं डोक्यावर घेऊन मागन भैरू आला तरी त्याला कळलंच नव्हत.
"काय रे सम्या, काय बगतोयास तिथं?"
लहान असला तरी 'आपल्याला असलं काही घेता येणार नाही' हे सम्या ला माहीत होतं म्हणून तो काहीच उत्तर न देता घराच्या दिशेन निघाला.
तसा भैरू खाली बसला आणि म्हणाला "ते थंडगार खायचं नव्हं तुला? सकाळधरनं बगून रायलोय म्या."
सम्या मात्र काहीच न बोलता जमिनीकडे बघत गुमान राहिला.
"चाल, इकडं ये" अस म्हणत भैरुने त्याचा हात धरून त्याला गाडीकडे आणले.
आता दोन रुपयाचं ते थंडगार विकत घेणाऱ्या आपल्या बाबा कडे सम्या अविश्वासाने आणि अभिमानाने बघतच राहिला.
तो छोटासा काडीला लावलेला थंडगार रंगीत गोळा बाबाच्या हातातून घेताना सम्या हरखून गेला होता.आणि तो थंड थंड गोळा चाटणारया आपल्या पोराच्या डोळ्यातला निरागस आनंद भैरूही भान हरपून बघत राहिला.
तेवढ्यात "बाबा तू बी खा कि थोडं. लई गार वाटतं बघ." अस म्हणत सम्याने तो थंडगार गोळा भैरूपुढे धरला.
आणि पुढच्या महिन्याभराच्या चिंता सोडून भैरूसुद्धा सम्या एवढा तिसरीतला पोरगा होऊन पुन्हा एकदा रंगीत लहानपण जगायला लागला.
मस्त आहे कथा..........
मस्त आहे कथा..........
सुंदर
सुंदर
छान लिहिलयस गं सावली..
छान लिहिलयस गं सावली..
मस्त.. आवडली.
मस्त.. आवडली.
छान आहे कथा
छान आहे कथा
सावली, खूप सुरेख कथा आहे.
सावली, खूप सुरेख कथा आहे. अगदी मनाला स्पर्शणारी.
मला काय आवडते माहित आहे तुझ्या गोष्टींमध्ये ..... मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे खरे खुरे नाते. काहीही मसाला नसतानाही तुझ्या गोष्टी वाचाव्याशा वाटतात.
अशीच लिहित रहा
छान लिहिलं आहेस सावली. मी ही
छान लिहिलं आहेस सावली.
मी ही चित्राशी सहमत.
मस्त आहे
मस्त आहे
छान कथा!! चित्राशी सहमत
छान कथा!! चित्राशी सहमत
गोड !! आवडली
गोड !! आवडली
मस्त लिहिलय...
मस्त लिहिलय...
सुरेख कथा..शब्दांचा फापट
सुरेख कथा..शब्दांचा फापट पसारा नसतानाही अगदी स्पर्शून जाते मनाला..
आणि सम्या ला जे हवं होतं ते त्यानं न मागताही भैरु न त्याला दिलं( वास्तविक खुप अडचणी असतानाही) हे कुठतरी खुप सुखावून गेलं...आपल्या मुलाचं मन समजुन घेणं हे खरच आदर्श पालकत्व आहे!
खुप काहि शिकवणारि कथा,
खुप काहि शिकवणारि कथा, मनापासून आवडलि.
सगळ्यांना आभार चित्रा, सायो,
सगळ्यांना आभार
चित्रा, सायो, कुसुमिता मस्त वाटलं वाचुन थॅंक्यु.
>>तेवढ्यात "बाबा तू बी खा कि
>>तेवढ्यात "बाबा तू बी खा कि थोडं. लई गार वाटतं बघ." अस म्हणत सम्याने तो थंडगार गोळा भैरूपुढे धरला.
आणि पुढच्या महिन्याभराच्या चिंता सोडून भैरूसुद्धा सम्या एवढा तिसरीतला पोरगा होऊन पुन्हा एकदा रंगीत लहानपण जगायला लागला.<< क्या बात है!! आवडली कथा
आईसक्रीम सारखी
आईसक्रीम सारखी गोड.....कथा
मस्त ग ...खुप छान...
सावरी
मस्त... आवडली कथा....
मस्त...
आवडली कथा....:)
गारे गार कूल !! मस्त जमलीये
गारे गार कूल !! मस्त जमलीये !! मनापासून आवडली !!
मस्तच कथा आईसक्रीम सारखी
मस्तच कथा
आईसक्रीम सारखी गोड.....कथा>>>>>सावरीला अनुमोदन
"आजूबाजूची पोरं आईबापा बरोबर
"आजूबाजूची पोरं आईबापा बरोबर येऊन आईसक्रिम खाताना बघून हे लहान मुलांनी खायचं काहीतरी छान आहे हे त्याला कळायला लागलं होतं."
गरीबीमुळे असल्या सुखांना मुकलेल्या मुलाचे भावविश्व अचूक टिपले आहे.
मस्त.. खूप आवडली...
मस्त.. खूप आवडली...
मनाला स्पर्श करणारी कथा छान
मनाला स्पर्श करणारी कथा छान
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे आभार