शेत माझं सारं वाहून गेलं

Submitted by पाषाणभेद on 27 September, 2010 - 10:15

शेत माझं सारं वाहून गेलं

औंदाच्याला पानी आसं पडलं पडलं
शेत माझं सारं वाहून गेलं ||धृ||

पानी घेवूनीया आलं
माझ्या डोळा पानी
साचून राहीलं सारं रानी
वाहून गेलं डोळ्यातूनी
हातातलं पीक सारं
त्यात बुडून गेलं ||१||

कशी फुलल आता शेती?
कशी पिकलं आता माती?
नाही चूल आता पेटणार
भुक पोटाची कशी मारणार?
रातंदिस बसतो
पोटाला फडकं बांधून ||२||

कशासाठी देवा तू रे
पाउस इतका पाडतो?
नशीबाने दिले पिक
तु आता का बुडवीतो?
वेळेवर न येवून
अवेळी आभाळं फाटलं ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०९/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान कविता, माझी एक याच विषयावर.

------------------------------------

कालचा पूर

कालच्या पुरात पाणी
पुलावरुन वाहीले
बरेच काही वाहून गेले
पण काही मात्र राहीले

वाहून गेली पिकलेली
सारी हिरवीगार शेते
मागे राहीली ती
भुकेली खिन्न प्रेते

वाहून गेले कुणाच्या
घराचे लाकडी वासे
मात्र मागे राहीले
नशीबाचे उलटे फासे

वाहून गेली कुणाच्या
सरणावरची लाकडे
मागे राहीले सांगाडे
जळके आणि वेडेवाकडे

वाहून गेले कुणाचे
शाकारलेले झोपडे
मोकळ्या आभाळाखाली
उघडे त्याचे खोपडे

वाहून गेली कुणाच्या
दावणीची सारी गुरे
मागे राहीली चिंता
तो मनातच झुरे

वाहून गेला कुणाचा
तोंडी आलेला घास
मागे राहीला तो
छळनारा उपवास

कालचा तो पूर
नदी भरुन वाहीला
बाहेर ओसरला तरी
डोळ्यात भरुन राहीला

-हरीश दांगट

हरिष दांगट साहेब, खरोखर विचार करायला लावणारी कविता आहे. येथे प्रकाशीत करा ना!

तुमचे विचार:

कालचा तो पूर
नदी भरुन वाहीला
बाहेर ओसरला तरी
डोळ्यात भरुन राहीला

अन माझे विचार:
पानी घेवूनीया आलं
माझ्या डोळा पानी
साचून राहीलं सारं रानी
वाहून गेलं डोळ्यातूनी
हातातलं पीक सारं
त्यात बुडून गेलं ||१||

दोन कविंची मने किती जुळतात.