कालचा पूर

Submitted by harish_dangat on 6 December, 2009 - 21:34

कालच्या पुरात पाणी
पुलावरुन वाहीले
बरेच काही वाहून गेले
पण काही मात्र राहीले

वाहून गेली पिकलेली
सारी हिरवीगार शेते
मागे राहीली ती
भुकेली खिन्न प्रेते

वाहून गेले कुणाच्या
घराचे लाकडी वासे
मात्र मागे राहीले
नशीबाचे उलटे फासे

वाहून गेली कुणाच्या
सरणावरची लाकडे
मागे राहीले सांगाडे
जळके आणि वेडेवाकडे

वाहून गेले कुणाचे
शाकारलेले झोपडे
मोकळ्या आभाळाखाली
उघडे त्याचे खोपडे

वाहून गेली कुणाच्या
दावणीची सारी गुरे
मागे राहीली चिंता
तो मनातच झुरे

वाहून गेला कुणाचा
तोंडी आलेला घास
मागे राहीला तो
छळनारा उपवास

कालचा तो पूर
नदी भरुन वाहीला
बाहेर ओसरला तरी
डोळ्यात भरुन राहीला

-हरीश दांगट

गुलमोहर: 

कालचा तो पूर
नदी भरुन वाहीला
बाहेर ओसरला तरी
डोळ्यात भरुन राहीला........... भन्नाट्..आवडली !!!