इंद्रधनुष्याचा आठवा रंग

Submitted by डॉ अशोक on 25 September, 2010 - 10:13

इंद्रधनुष्याचा आठवा रंग

काही दिवसांपूर्वी ऑर्कूटवरच्या एका कम्युनिटीवर एक चारोळी टाकली.

या इंद्रधनुष्याचं
मला कौतुक नाही
सात रंग आहेत त्यात
पण गुलाबीच नाही!

एक दोघांनी म्हटलं, "नाही, असतो त्यात गुलाबी" मी म्ह्टलं "आपण लहान असल्या पासून इंद्रधनुष्यातल्या सात रंगांबद्दल ऐकून आहोत. ता (तांबडा), ना (नारंगी), पि (पिवळा), हि (हिरवा), नि (निळा), पा (पारवा) आणि जां (जांभळा). यात गुलाबी कुठय दाखवा. " त्यालाही आश्चर्यच वाटलं. "मी हा विचारच कधी केला नाही" असं त्यानं मोकळेपणी कबूल ही करून टाकलं. हे असंच होतं नेहेमी. बर्याच गोष्टी आपण गृहीत धरून चालतो.

इंद्रधनुष्य़ बघून फुलारून आला नाही असा माणूसच विरळा. ते वातावरणही फूलारून येण्यासारखंच असतं. संध्याकाळची वेळ असते. पाऊस पडून गेलेला असतो. अजून यावं की आवरतं घ्यावं या दुविधेत पाऊस असतो. सूर्यही ऑफिसातून घरी जाणार्या नोकरदारासारखा कामं आवरायच्या गडबडीत असतो. पण एखादी खूप जूनी, महत्वाची फाइल सापडल्यावर नाईलाजान थोडं जास्त थांबावं लागल्या सारखी त्याची स्थिती झालेली असते. आपला उन्हाचा पसारा आवरतांना काही थोड्या तिरीपा राहून गेलेल्या असतात. त्यांनाही पृथ्वीतलावर काही तरी लक्ष्यवेधक दिसल्या सारखे ते किरण रेंगाळलेले असतात. सूर्याच्या भितीने ढगाआडून ते किरण कशाकडे तरी पहाताहेत असा भास होतो. आकाशात ढगांची दाटीवाटी असते आणि अचानक हे इंद्रधनुष्य दिसायला लागतं.

अचानक उगवणार्या पाव्हण्यासारखं हे इंद्रधनुष्य अचानक उगवतं, थोडा वेळ रहातं आणि हूरहूर लावून नाहीसं होतं. कधी कधी दोन इंद्र्धनुष्यं दिसतात. असे प्रसंग अत्यंत दुर्मिळ. इंद्रजाल कॉमिक्सच्या वेताळाच्या कथा मी लहानपणी सपाटून वाचत असे. त्यात आकाशात दोन इंद्र्धनुष्य दिसली की वेताळाचं आगमन होतं असं एका कथेत होतं. योगायोगाने त्याच पावसाळ्यात मी दोन इंद्रधनुष्यं पाहिली. आता वेताळ येणार या कल्पनेनं मी खूप एक्साइट झाल्याचं आठवतं. इंद्रधनुष्याचं हे असं अचानक येणं आणि जाणं चटका लावून जातं. ते बघायला मानेला फारसा त्रासही नाही द्यावा लागत. सरळ नजरेच्या टप्प्यात, पश्चिम क्षितीज रेषेच्या आसपास त्यानं आपली जागा ठरवून घेतलेली असते. पूर्वेला किंवा सकाळी इंद्रधनुष्य दिसल्याचं ऐकिवात नाही. हा संध्याकाळीच येणारा, पाच दहा मिनीटंच फक्त दर्शन देणारा पाहूणा. कधी मधीच येणारा आणि म्हणून हवाहवासा.

निसर्गाच्या या चमत्काराला "इंद्रधनुष्य" हे नाव ज्या कुणाला सुचलं त्याच्यावरून असले दहा इंद्रधनुष्य कुर्बान! इंग्रजीत त्याला रेन-बो म्हणतात हे तर आपण जाणतोच. पण त्याला इंद्राशी जोडून मोठीच कमाल केलीय. इंद्र योद्धा म्हणून फारसा प्रसिद्ध नाहीच. किंबहूना उठ्सूठ कुठल्या तरी राक्षसा कडून पराभव स्विकारून विष्णू, शंकर यांना अडचणीत आणणारा म्हणूनच आपल्याला हा माहित. क्रिकेट मधे भारत ज्याच्याशी हरला नाही असा देश नाही आणि इंद्र ज्याच्याशी हरला नाही असा राक्षसही बहुदा नसावा. मात्र हा देवेंद्र रंभा, उर्वशी, मेनका यांचा "आश्रयदाता" म्हणून आणि अहिल्येला अडचणीत आणणारा महाभाग म्ह्णून आपल्याला जास्त परिचयाचा. माझ्या डोळ्यांपुढे तर इंद्राचा दरबार म्ह्टलं की युद्ध किंवा राजकारणावर चर्चा चालली आहे हे चित्र येतच नाही. हे महाराज सिंहासनावर रेलून बसलेत. नारद, तुंबरू वगैरे मंडळी आब राखून बसली आहेत आणि रंभा, उर्वशी, तिलोत्तमा यांचं नर्तन चालू आहे हेच चित्र डॊळ्यांसमोर येतं. त्यामुळे असल्या "रंगीत" माणसाचं नाव निसर्गाच्या या चमत्काराला दिलंय ते योग्यच.

इंद्रधनुष्याच्या टोकाशी खजीना असतो असं म्हणतात. "Pot at the end of rainbow!" काही नशिबवानांनाच तो दिसतो अशी वदंता आहे! आम्ही या कल्पनेचा मागोवा घ्यायचाच असं ठरवलं आणि पोहोचलो ते थेट प्रसिद्ध आयरीश संत St. Patricks यांच्यापाशी! एक उल्लेख आढळला तो असा:

Most of the "fairy tales" about St. Paddy's Day involve a leprechaun. A leprechaun is said to be a short fellow with a red beard and a pot of gold. Supposedly, this pot of gold is hidden at the end of a rainbow. Because you can never find the "end" of a rainbow, you can't get the pot of gold. To get the gold, you've first got to catch the little Leprechaun.

माहितीचे आणखी काही सुवर्णकण माहितीच्या जालातून पदरी पडले ते असे:
The idea that a pot of gold can be found at the rainbow's end originated somewhere in old Europe. In Silesia, an obscure area of eastern Europe, it was said that the angels put the gold there and that only a nude man could obtain the prize.
The legends of many cultures see the rainbow as a kind of bridge between heaven and earth. One of the most beautiful sights in nature, the rainbow has become in western culture a symbol of renewed hope; something lucky to look upon. To Iranian Moslems, even the brilliance of the colors in a rainbow have significance. A prominent green means abundance, red means war, and yellow brings death. The Arawak Indians of South America recognize the rainbow as a fortunate sign if it seen over the ocean, while tribes in northeastern Siberia see it as the tongue of the sun. The North American Catawba Indians of the Southeast and the Tlingit of the Northwest both regard it as the bridge between the living and the dead

गजबजलेल्या महानगरात जिथं स्कायलाइनच दिसत नाही, तिथं क्षितीजावर दिसणारा हा निसर्गाचा चमत्कार दिसणंही दुरापास्त झालंय. त्यामुळे इंद्रधनुष्य दिसलं तरी पूरे, त्या खजिन्याचं नंतर बघू असं म्हणायची वेळ आलीय.

आमचे ऑर्कूट-स्नेही सूर्यकांत डोळसे इंद्रधनुष्याला "धरतीने आकाशाच्या गळ्यात टाकलेले हात" असं म्हणतात. इंद्रधनुष्य बघून मग अशा कविताही सुचायला लागतात. कुणाला "ति"च्या डॊळ्यातही ते दिसायला लागतं आणि मग "तो" म्हणून जातो:

इंद्रधनुष्य तर मला
तुझ्या डोळ्यातच दिसलं
आसवांचा पाऊस
ओसरल्यावर पाह्यलं

आमचे दुसरे ऑर्कूट स्नेही अभिजित यांना तर इंद्रधनुष्य बघितल्यावर "पूर्ण झाले आयुष्याचे कोलाज" ही भावना व्यक्त करावीशी वाटते. ते म्हणतात:

ती एक श्रावणसर, चिंब रंगवून गेली,
पहिल्या पावसातले इंद्रधनुष्य,
पूर्ण झाले आयुष्याचे कोलाज
आठवणींच्या रेखीव नक्षीला चढला नवा साज

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आपल्या "अंधाराला छेदण्याची गरज आहे" या कवितेत (हो, कवितेत!) म्हणतात:
.................
मी असा का झालो ? असुरक्षित ?
कधी निघणार मी बाहेर ? मीच बांधलेल्या थड़ग्यातुन ?
खरंतर हा आभाळाचा मंडप माझ्यासाठीच आहे ना ?
कधी चिमटणार मी आकाशाला ?
कधी लिंपणार या चांदण्या मी माझ्या केसात ?
क्षितिजवरील सूर्याकडे मान वर करून पहाताना,
कधी फुलणार इंद्रधनुष्य माझ्या डोळ्यात ?
मला या चार भिंतीच्या बाहेर पडायला हवं........

इंद्रधनुष्यावर अशा विविधरंगी कविता वाचल्या की वाटतं हाच तो इंद्रधनुष्याचा आठवा रंग ! कधी तो गुलाबी असेल नसेल पण पहाणार्याच्या डोळ्यात असेल तो रंग म्हणजेच इंद्रधनुष्याचा आठवा रंग. इंद्रधनुष्यात हा गुलाबी रंग नाही. पण तो त्यानं आपल्याला दिलाय आणि देणाराची थोडी तरी मालकी आपण मानू या की!

- डॉ. अशोक कुलकर्णी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच आहे राव, लेख आवडला. Happy

>>इंद्रधनुष्य तर मला
तुझ्या डोळ्यातच दिसलं
आसवांचा पाऊस
ओसरल्यावर पाह्यलं<< जबरी.

>>क्रिकेट मधे भारत ज्याच्याशी हरला नाही असा देश नाही आणि इंद्र ज्याच्याशी हरला नाही असा राक्षसही बहुदा नसावा. << Lol

फारच सुंदर लेख - इंद्रधनुष्यासारखाच विविधरंगी, विलोभनीय ...

>>क्रिकेट मधे भारत ज्याच्याशी हरला नाही असा देश नाही आणि इंद्र ज्याच्याशी हरला नाही असा राक्षसही बहुदा नसावा. << Rofl