मिकी माऊस ,उनो आणि एक संध्याकाळ....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तसा ऐतिहासिक क्षणच म्हणायचा तो! तेव्हा भाईंकडून सुवर्णक्षरात लिहिण्याचं गुपित कळेपर्यंत काळ्याशाईत चालवून घ्यायला हवं! तर ती रोमहर्षक कहाणी येणेप्रमाणे....
बरोब्बर दोन महिन्यांपूर्वी मायबोलीच्या त्यंत हत्वाच्या बा. फ. वर एक तीतकीच महत्वाची घोषणा एका नामवंत मायबोलीकरांनी केली. "मे महीन्याच्या सातव्या दिवशी आमचं आगमन उत्तर अमेरिकेच्या पूर्व-दक्षीण टोकाला होणार आहे. स्थानिक मायबोलीकरांनी भेटीस हजर व्हावं. अन्यथा अमबाचं सदस्यत्व काढून घेतल्या जाईल." कर्मधर्मसंयोगानं आम्ही देहानं तिथलेच (त्याच टोकाचे) आणि मनानं अमबाचे रहिवासी असल्यामुळे ही घोषणा मनावर घेणं भागच होतं. मधे फक्त ८ अठवड्यांचा कालावधी असल्यामुळे इथल्या इतर मायबोलीकरांशी संपर्क साधून भेटीचा दिवस, स्थान मुक्रर करण्याची तयारी सुरु करायला हवी असं ठरवलं. हार तुरे, खाणं पिणं ..स्वागतात कसलीही कमतरता रहायला नको ह्याची खबरदारी घ्यायला हवी....
सर्वप्रथम स्थनिक मा.बो.करांना शोधणं आलं! काही मा.बो.कर आपल्या रहाण्याच्या जागेबद्दल नितांत गुप्तता पाळून असतात. त्यामुळे मायबोलीवर कुणी पूर्वदक्षीणटोकवासी गावेना. शेवटी एका जवळच्या देवळाबाहेर खुर्ची टाकून बसले. "तरी म्हणंत होते ईतक्या बकाबका ईडल्या खाऊ नका. चला आता वॉल्ग्रीन्समधून टम्स घेऊन देते.." किंवा "यु सिलिपुटिअन, गणपतीबाप्पासमोरचा मनी बाप्पासाठी असतो, तुझ्या पिग्गीबँकेसाठी नाई काई!" अशी वाक्य ऐकली की मी ताडकन उठून "मायबोलीवर येता का हो?" असं विचारायला लागले. तोवर नवर्‍यानी आणि मुलानी मला देवळात ओळख दाखवणं बंद केलं होतं. शेवटी ४-५ आठवड्यानंतर लोकांनी मला "ओ! द महाराष्ट्रिअन लेडी विथ सम मेंटल प्रॉब्लेम!" असं ओळखायला सुरुवात केल्यावर मी तो नाद सोडला! स्वागत, भोजन आणि समारोप अश्या सगळ्या समित्यांची मी एकमेव सदस्य हे नक्की झालं.
ह्यानंतर त्या नामवंत मायबोलीकरांशी संपर्क साधून त्यांच्या सोयीचा दिवस आणि वेळ नक्की करण्यात आली. त्यांचं सह'कुटुंब' सहपरिवार आगमन होणार होतं. सगळ्यांना घरीच जेवायला बोलवून खास आदरातिथ्य करण्याचा बेत ठरवला. आगमनाच्या एक दिवस आधी उत्तम शिराझ आणून ठेवली. पुडाच्या वड्या, मटण, भरली वांगी आणि इतर पदार्थांची तयारी करणार होते तेव्हड्यात नामांचा "घरी येणं जरा कठीण आहे. बर्‍याच ठिकाणी भेटी द्यायच्या आहेत." असा फोन आला. अखेरीस पाहुणचार आमच्या घरी न होता मिकि माऊस चा घराशेजारी उनो नामक हॉटेलात करायचा असं ठरलं. शुक्रवार ९ मे ची संध्याकाळची साडेसहाची वेळ ठरली. (ह्याच उनो मधे वर्षभरापूर्वी मायबोलीकरीण, हिलरी समर्थीका सौ. लालु ह्यांच्याशी सहकुटुंब भेट झाली असल्यामुळे हॉटेलाच्या स्टाफला मायबोलीकरांची तशी सवय झाली होती. त्यामुळे जास्त अचरट्पणा केला तरी बाहेर काढणार नाहीत ही खात्री होती.)
"आपण कोणाला भेटतोय?" अनिरुध्द (नवरा) नी विचारलं.
"झक्कींना"
"मॉम, इज ही इटलिअन?" चिरंजीवांनी चौकशी केली. झक्की हे नाव 'ईटालिअन' का वाटलं हे तोच जाणे!
"मराठीच आहेत."
"हाऊ डु यु नो हिम?"
ह्या प्रश्णाला मी बरीच घाबरत होते. 'इंटर्नेटवर भेटलेल्या व्यक्तीला भेटायचं नस्तं' असं त्याला शाळेत शिकवतात. त्याहीपेक्षा ओळख करून द्यायची तर 'खरं नाव काय' हा प्रश्ण होता. मायबोलीचे अर्काइव्ह्ज चाळायला बसले.

ठरल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी साडेपाचाला मुलगा, नवरा आणि मी असं लटांबर डिस्नेकडे निघालो. "झक्कीकाकांच्या मुलांशी मी खेळू का" असं निषादनी गाडित विचारलं. ह्यापूर्वी भेट झालेला लालुचा मानस त्याला आठवत होता.
दरम्यान अनिरुध्दनी फोन करून झक्किंना हॉटेलला येण्याच्या डायरेक्शन्स दिल्या होत्या. (मी दिल्या असत्या तर ते कदाचित टँपाला पोचले असते.) जरा वेळानी त्यांचा फोन आला,'आम्हाला आणि काही जणांना भेटायचय. तेव्हा फार थांबु शकत नाही.' मनात म्हंटलं, 'जमेल तसं आणि जमतील तेव्हड्या मायबोलीकरांबद्दलच्या प्रेमळ गप्पा थोडक्या वेळात उरकून घेऊ!'
तसं अंतर १० मिनिटांचं होतं, पण वीस मिनिटं होऊन गेली पण झक्की दिसले नाहीत तेव्हा अनिरुध्दला पुन्हा फोन करायला सांगीतलं.
"मी अगदी जवळच आहे उनोच्या. पण तुमच्या फ्लोरिडाची ट्रॅफिक!!! न्यु जर्सी असतं तर घुसवली असती गाडी.." असं काहिसं पलीकडून ऐकु आलं.
कुठल्यातरी प्रचंड फुग्याच्या, त्यानंतरच्या चौकाच्या खाणाखुणा शोधत योग्य ठिकाणी श्री आणि सौ झक्की, त्यांचे नातेवाईक योग्य वेळी येऊन पोचले. (हार तुरे, तुतारी हे सगळं राहून गेलं ह्या दु:खात मी असतानाच आमच्या ओळख देण्याचा सोहळा आटोपला. टेबल आधीच बुक करून ठेवलं होतं. सगळी मंडळी स्थानापन्न झाली.
'झक्कींकडे फारसा वेळ नाही' हे ठाउक असल्यामुळे लागलीच 'मुद्द्याचं' बोलणं सुरु झालं. पहिला अर्धा मिनिट ऐकण्याचा उत्साह दाखवून पतीदेव आणी सौ. झक्कींनी गप्पातून काढता पाय घेऊन आपली स्वतंत्र आघाडी उघडली. मिकि, मिनि माऊसच्या सहवासात आणि फ्लोरिडाच्या 'सुहान्या मौसम' मुळे मंडळी बरीच थकली होती. कुणालाच भुक नव्हती. बाहेर उन्हाळातली मुंबापुरी असल्यासारखं होतं. त्यामुळे कुणी चहा कॉफीला सुध्दा तयार झालं नाही. शेवटी गार पाणी आणि सटरफटर काहीतरी खायला मागवायचं ठरलं. फ्रेंच फ्राईज, चीझस्टिक्स, चिकन विंग्ज, कांद्याच्या तळलेल्या चकत्या, केसडिये असलं सगळं टेबलावर आलं. त्याच्या इतक्याच खमंग गप्पा सुरु झाल्या होत्या. झक्कींनी त्यांच्या आजवरच्या ए. वे. ए. ठींचा थोडक्यात आढावा घेतला. तो त्याहीपेक्षा खमंग होता हे आवर्जून सान्गावसं वाटतंय.अधूनमधून सौ. झक्की आणि अनिरुध्द आमच्या गप्पांमधे रस असल्याचं दाखवायचा प्रयत्न करत होते. मधेच एक फोन आला. झक्कींना आणि त्यांच्या पाहुण्यांना ज्यांना भेटायला जायची घाई होती, त्या सद्ग्रुहस्थांना तीथेच बोलवायचं ठरलं. मग आणखी आरामात बोलणं झालं. अमबा , अर्थात बाराबाफकरांच्या ए. वे. ए. ठी. ला येण्याचं (७जुन्च्या) झक्कींनी जोरदार आमंत्रण केलं. (विनय ऐकता आहात?) (पण तिकिटाचं मात्र गुलदस्त्यात ठेवलंय.) मी देखिल '१० जुलै च्या वीकएंडला डि.सी. ला जमतंय का बघा' असं सांगीतलंय. (लालू!)
पुन्हा एक घडामोड झाली. येऊ घातलेले गृहस्थ डायरेक्ट झक्कींच्या घरी (डिस्ने कोव्ह) ला येणार असं कळल्यामुळे एकदम (खुर्चीतून) उठाउठ सुरु झाली. निरोप घेतले जाऊ लागले. सौ. झक्कींनी खूप आगत्यानी बारात येण्याचं आमंत्रण दिलंय. तेव्हा नक्की येणार!
जाताना "पुडाच्या वड्या काही दिसल्या नाहीत. भेटीला लाडु तरी असावेच लागतात." अशी आठवण झक्कींनी दिली. (मी त्या आणणार असल्याचा लेखी पुरावा त्यांच्याकडे बहुतेक उपलब्ध आहे.) 'पुढल्या वेळी नक्की' असं अश्वासन मी दिलंय.' तेव्हा कधी जमतंय पुन्हा येण्याचं ते बघा. घरी येण्यासाठी वेळ काढा. शिराझ तोवर आणखी मुरेल! पुडाच्या वड्या उधार आहेतच!

विषय: 
प्रकार: 

सुंदर लिहिला आहे भेटीचा वृत्तांत. ऐतिहासिक क्षणच म्हणायचा भेटीचा. <<अशी वाक्य ऐकली की मी ताडकन उठून "मायबोलीवर येता का हो?">> ह.ह.पु.वा.

परवा मी ललिताताईंशी इथे सिंगापूरमधे भेटलो. एक तास आम्ही दोघे अखंड बोलत होतो.

मृ, छान लिहिलास वृत्तांत.

मृण, Happy

'मॉम, इज ही इटालीयन?' हा प्रश्न भेटायच्या आधी? नंतर कदाचित 'नो ही वॉज मार्शियन'.. असं झालं असेल...
.
>>>>पण तिकिटाचं मात्र गुलदस्त्यात ठेवलंय <<<<<<
'झक्कींकडे तिकिट पाठवलं होतं, विसरले वाटतं.. (की शिराझ नाही तिकिट नाही...) एकदा बडबडायला लागले, की मूळ मुद्याचं विसरतात ते... आता स्वाती आली की पाठवतो'
.
.
>>> जवळच्या देवळाबाहेर खुर्ची टाकून <<<<
.
मॄ, जागा चुकली... मराठी माणसं 'देव आहे की नाही' यावर चर्चा करताना 'नाट्यगॄहात भेटली असती'....
.
विनय

चला मृ तुझ जिवन आता खर सुफळ आणि संपुर्ण झाल Wink मस्त लिहिलयस.

आणि बॅग पण... (सही आहे).
.
(कोणाला काय वाटेल ते समजा)...

अरारा! पुडाच्या वड्या, भरली वांगी! आधी का नाहि सांगितलेत? मी सगळ्यांना आमच्या रहायच्या जागी सोडून एकटा तुमच्या घरी आलो असतो.
असो. पुनः केंव्हा तरी. पण एव्हढे कष्ट करून मला भेटायला आलात! धन्य झालो.

नाहीतरी डिस्ने म्हणजे एक प्रचंड फसवणूक आहे. स्वतःचेच (भरपूर) पैसे देऊन, स्वतःच्याच शरीराचे हाल करून घ्यायचे (आठवा, space mountain) नि वर म्हणायचे, वा: मजा आली! म्हणजे मारुतीच्या बेंबीत बोट घातल्याची गोष्ट आठवते!

"तरी म्हणंत होते ईतक्या बकाबका ईडल्या खाऊ नका. चला आता वॉल्ग्रीन्समधून टम्स घेऊन देते.." किंवा "यु सिलिपुटिअन, गणपतीबाप्पासमोरचा मनी बाप्पासाठी असतो, तुझ्या पिग्गीबँकेसाठी नाई काई!" अशी वाक्य ऐकली की मी ताडकन उठून "मायबोलीवर येता का हो?" असं विचारायला लागले. तोवर नवर्‍यानी आणि मुलानी मला देवळात ओळख दाखवणं बंद केलं होतं. Lol

पूर्वकिनारावाल्यांची एकूण बरीच जीटीजी होतात असे दिसते. अपूर्वकिनारावाले कोणी वाचत आहेत का? Happy

>>>एकदा बडबडायला लागले, की मूळ मुद्याचं विसरतात ते<<< झक्की, बघा काय बोलतात हे लोक!!! सगळ्यांची प्रशस्तीपत्रकं जप्त करा! Proud
पुढल्या भेटिचा हाच मेन्यु असणार आहे. नाहीच जमलं घरी येण्याचं तर डबे भरून आणेन. मग हॉटेलाच्या पायर्‍यांवर बसून खाता येईल. (उनोवाला आत घेणार नाही. पदार्थांच्या वासानीच चक्कर येऊन पडेल. Happy )
पूर्व किनार्‍यावरची मंडळी टोपी पडताच ए. वे. ए. ठी. करतात.
बी, तुमच्या ए. वे. ए. ठी.चा वृत्तांत टाक तुझ्या पानावर.
बाय द वे, ते तिकिटाचं फरसं मनावर घेऊ नका विनय. तेव्हडे ते फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स माझ्या नावावर सरकवले तरी चालेल!