टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ३ - स्वरूप

Submitted by संयोजक on 14 September, 2010 - 15:24

मायबोली आयडी: स्वरुप
वस्तूचे नाव: दीपमाळ/पणतीचे स्टँड
प्रेरणा: घराच्या रिनोव्हेशनचे काम नुकतेच झाल्यामुळे पडुन असलेले खुप सारे मटेरिअल, इंजिनीअरींग संपुन नोकरी लागेपर्यंतच्या कालावधीत मिळणारा निवांत वेळ आणि जवळ आलेली दिवाळी Happy

स्पर्धा माहित व्हायच्या खूप आधीच (म्हणजे ७ वर्षे आधी :फिदी:) हा उपद्व्याप केल्याने स्टेप बाय स्टेप फोटो काढले नव्हते. आता जे मिळाले तेच फोटो टाकतोय.

TT_Swaroop_drawing.jpg

साहित्य :

कोटींग गेलेले नॉन-स्टीक भांडे, प्लंबिंग कामातुन उरलेला पीव्हीसी पाइपचा तुकडा, बांधकामातुन उरलेली खडी किंवा वाळू, जुन्या लाकडी फुटपट्ट्या (पर्यायी), सजावटीसाठी चकचकीत वेष्टनकागद.

TT_Swaroop_pic1.jpg

कृती:

पर्याय १:

१) प्लंबिंग कामातुन उरलेला ३-४ फुटाचा पीव्हीसी पाइपचा तुकडा घ्यावा. त्याला एकेक वीत अंतर सोडुन ज्यातुन फूटपट्टी सरकू शकेल असे आरपार छेद पाडावेत.

२) घरातल्या जुन्या फुटपट्ट्या घेउन त्या चकचकीत वेष्टनकागदात गुंडाळाव्यात.

३) नंतर त्या पीव्हीसी पाइपच्या तुकड्यालाही (छेद दिलेला भाग सोडुन) व्यवस्थित वेष्टनकागद चिकटवावा.

४) आता त्या फुटपट्ट्या चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या छेदात नीट बसवुन घ्याव्यात.

TT_Swaroop_pic2.JPG

पर्याय २ (फुटपट्ट्या किंवा लांब पाइप उपलब्ध नसेल तर):

१) प्लंबिंग कामातुन उरलेला २ फुटाचा पीव्हीसी पाइपचा तुकडा घ्यावा.

२) त्या पीव्हीसी पाइपच्या तुकड्याला व्यवस्थित वेष्टनकागद चिकटवावा.

आता कोटींग गेलेले नॉन-स्टीक भांडे (किंवा जुनी गळकी बादली किंवा चीर गेलेला प्लॅस्टीकचा डबा सुद्धा चालेल) घेउन त्याला बाहेरुन आकर्षक वेष्टनकागद चिकटवा.

सजवलेला पीव्हीसी पाइप त्या भांड्यात मधोमध उभा करुन बाजुने बांधकामातुन उरलेली खडी भरुन घ्या जेणेकरुन त्या पाइपला अधार मिळेल (ती खडी वेगवेगळ्या रंगात रंगवुन घेतली तर अधिक आकर्षक दिसेल किंवा वाळूत चकमक मिसळुन ती सुद्धा वापरु शकता)

आता त्या पीव्हीसी पाइपच्या वरच्या टोकावर एक मस्त पणती ठेवुन द्या आणि जर फूटपट्ट्या वापरल्या असतील तर त्या एकेका पट्टीच्या दोन्ही टोकांवर कमी वजनाच्या पणत्या चिकटवा. आणि त्याचा एक छानसा फोटो काढुन मायबोलीवर अपलोड करा Happy

TT_Swaroop_pic3.JPG

(टीप: मी आधी पर्याय एक नुसार दीपमाळ तयार केली होती (ज्याचे फोटो काढले नव्हते) नंतर दोनेक वर्षाने त्या दीपमाळेचा कंटाळा आल्यामुळे तोच पाइप मधोमध कापुन पर्याय दोन प्रमाणे त्याचे पणतीसाठी स्टँड तयार केले)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. आयडीया चांगली आहे.
पण जरा कठीण आहे. प्लंबिंगचा पाईप एकदाच कापलाय शिकताना. आता परत कापायची हिंमत नाही Proud

>प्लंबिंग कामातुन उरलेला पीव्हीसी पाइपचा तुकडा

अहो आधी नाही का सांगायचं? परवा घरी पाईप फुटला होता म्हणून किती शोधत होतो. अर्थात मला वापरता आला असता त्यापेक्षा हा कितीतरी चांगला उपयोग आहे म्हणा Happy !

स्वरूप, मस्त. Happy
तुझे कौतुक आहेच, पण ही कृती माझ्या नवर्‍याच्या हातास लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याची सध्याची अ‍ॅम्बिशन ड्रिलिंग मशीन घेणे ही आहे. Proud

अगदी योग्य वेळी मिळाली ही आयडीया....
गेल्या वीकेंडलाच माळा आवरताना असली एक पाइप सापडलीय....
आणि दिवाळी पण आलीय जवळ.... करुनच बघते आता Happy

धन्यवाद सगळ्यांना.....

सावली, पीव्हीसी पाईप कापणे फारसे कठीण नसते मात्र आधी पेन्सिलने आखुन घे आणि हेक्सा ब्लेड नविन वापर!

त्याची सध्याची अ‍ॅम्बिशन ड्रिलिंग मशीन घेणे ही आहे. >> मलाही घ्यायचय Happy

मानसी, नक्की करुन बघा... आणि फोटो पाठवुन द्या Happy

मस्त आहे Happy (पण कठीण वाटतय माझ्यासारखीला करायला)

सध्याची अ‍ॅम्बिशन ड्रिलिंग मशीन घेणे ही आहे.>>अग मग घेऊदे की. माझ्या घरी पण आहे, उपयोग होतो अधून मधून (तसही वर्षातून एखाद दोन वेळाच लागणार्‍या काही वस्तू असतात की आपल्या घरात आपल्याला हव्यात म्हणून त्यात एक त्याच्या वस्तूची भर इतकच Wink )

स्वरूप, छान कल्पना. Happy

त्याची सध्याची अ‍ॅम्बिशन ड्रिलिंग मशीन घेणे ही आहे. >> मलाही घ्यायचय >>> माझ्या नवर्‍याकडे २ आहेत. दुसरं तर त्यानं थेट लंडनहून आणलंय. (त्याची ड्रिल बिट्स आधीच्यापेक्षा वेगळी होती म्हणे. Proud आता बोला.)

छान कल्पना Happy

आमच्याकडेही एक पाईप आहे पडलेला, पीव्हिसी की कसलाय कोण जाणे.

लले, आता तुझ्याकडे कापायला घेऊन येते, लंडनच्या ब्लेडने कापून दे Wink

मस्त !

ललिता, तुझा नवरा पक्का इंजिनिअर दिसतोय >>> अगदी! त्यानं जमवलेला विविध हत्यारांचा, स्पेअर पार्ट्सचा लोखंडी संसार प्रदर्शन भरवण्याच्या लायकीचा आहे. Lol
माझ्या स्वयंपाकघरातल्या मिसळणाच्या डब्यासारखा पण त्याच्या दीडपट मोठा तसलाच प्लॅस्टिकचा डबा भरून तर त्याच्याकडे नुसते विविध आकार-उकारांचे स्क्रू-खिळे- वॉशर्स भरलेले आहेत. भंगारात सगळं विकलं ना तर भरपूर पैसे मिळतील... पण मग माझी सगळी पुस्तकंही तो रद्दीत विकेल आणि त्याचे मात्र त्याला तेवढे पैसे काही मिळणार नाहीत, म्हणून मी गप्प बसलेय... त्याच्या फायद्यासाठी Proud