वासुदेव बळवंत फडके - चित्रपट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

महाराष्ट्र मंडळाने दि. ३ मे ला Fremont येथे 'वासुदेव बळवंत फडके' हा चित्रपट दाखवला.

साधारण १५ मिनीटे आधी Old Naz या थिएटरमधे गेलो. पण आधी एकदम साधारण अजिंक्य देव सारख्याच दिसणार्‍या एका तरूणाचा एकदम मॉडर्न ड्रेस मधे फोटो पाहून हा चित्रपट राम गोपाल वर्मा करतो तसा नव्या काळासाठी Adapt वगैरे केलेला आहे की काय अशी शंका आली. पण तो Kantri हे नाव असलेला कोणतातरी दाक्षिणात्य चित्रपट होता. मग वा. ब. फ. चे पोस्टर ही दिसले. पोस्टर वरूनच कळत होते की तात्रिकदृष्ट्या चित्रपट चांगला असणार आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली.

१ वाजून गेला तरी चित्रपट चालू होण्याची लक्षणे दिसेनात. मला पुण्यात अलंकार आणि डेक्कन यांच्यात रिळे शेअर करून दाखवलेले चित्रपट आठवले. तेथे ३ चा संपल्याशिवाय येथे ६ चा चालू होत नसे :). पण नंतर कळले की अजिंक्य देव येणार आहे आणि चित्रपट तो आल्यावर चालू होणार. मग थोड्या वेळाने तो आल्यावर सगळे आत गेलो. या आधी इतर काही कार्यक्रम झाले होते त्यातीलच एक लावणी व एक लेझीम पुन्हा सादर करण्यात आले. लावणी करणार्‍या त्या छोट्या मुलीने सुंदर नृत्य केले. लेझीम ही चांगले झाले पण त्याबरोबर चे संगीत अगदीच चुकीचे वाटले.

असे करत शेवटी चित्रपट चालू झाला. आता थोडे त्याबद्दल:

पूर्वी शाळेत 'आद्य क्रांतिकारक' म्हणून वाचलेला धडा आणि त्यातील काही आठवणार्‍या गोष्टी सोडल्या तर वासुदेव बळवंत फडकेंबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यात ते पंजाबी नसल्याने राकेश ओमप्रकाश मेहरा ते गुड्डू धनोआ पर्यंत सगळ्यांनी भगतसिंग सारखे अनेक चित्रपट काढलेले नाहीत. त्यामुळे कथेबद्दल ही कुतूहल होते.

एकूण चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे. अजिंक्य देव या भुमिकेत एकदम शोभून दिसतो. प्रत्यक्षात वासुदेव बळवंत फडके कसे दिसत ते माहीत नाही, पण अजिंक्य देव तशा रोल मधे चपखल वाटतो. सोनाली कुलकर्णी चे ही काम एकदम मस्त झाले आहे. त्यांच्या सहकार्‍यांचा मात्र मिश्र उल्लेख करावा लागेल - काहींचे काम चांगले तर काही नुसतेच फ्रेम भरायला उभे केल्यासारखे वाटतात. हिंदी चित्रपट म्हणून सहज खपेल इतपत तांत्रिक सफाई आहे. पण वासुदेव बळवंत फडकेंबद्दल काही वाचून हा बघणार्‍यांना जास्त आवडेल असे वाटते. म्हणजे ते तुरुंगाचे दार उचकटून पळाले ही माहिती (मी नंतर वाचली) जर नसेल तर तो प्रसंग एखाद्या जीतेंद्रच्या चित्रपटासारखा वाटेल.

दुष्काळामुळे शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासावरची प्रतिक्रिया, रामोशी टोळ्यांना या लढ्याचे महत्त्व पटवून सामील करून घेणे, इंग्रजांशी दिलेला लढा हे सर्व चांगले घेतले आहे. यांना पकडणार्‍यास ४०० रू. चे इनाम इंग्रज सरकारने जाहीर केल्यावर मुंबईच्या गव्हर्नर ला मारणार्‍यास त्यापेक्षा जास्त इनाम यांनी जाहीर करणे वगैरे प्रसंग ही छान आहेत. पण हे तुम्हाला आधीच माहिती असतील तर अतर्क्य वाटणार नाहीत. अशा चित्रपटांना येणार्‍या प्रेक्षकांना बहुधा सर्व कथा माहिती असते, पण या चित्रपटाला तो फायदा मिळत नाही.

मला सगळ्यात आवडलेला शॉट म्हणजे तो दौलती रामोशी पडवीत खाली बसतो म्हंटल्यावर मी ही खाली बसतो म्हणून हे ही खाली बसतात तो. यात आवडले ते तसे करताना आपण काही तरी भारी करतोय याचा आविर्भाव न आणता आपण सर्व सारखेच आहोत हे दाखवणे.

याउलट त्यांचे लहानपण उगाचच दाखवलेले आहे असे वाटले. तसेच लहुजी वस्ताद हे त्यांचे गुरू आणि त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांविरुद्ध लढण्याचे व त्या वेळी समाजा बाहेर असलेल्या लोकांना सामील करून घेण्याबद्दल शिकवले ते फारसे दिसत नाही. फक्त एकदा हे येऊन लहुजी वस्तादांच्या पाया पडतात एवढेच दाखवले आहे. विजय कदम आणि विजय पाटकर यांना विनोद निर्मीतीसाठी घेतले असावे पण त्यांचे विनोद अगदीच सरधोपट आहेत. विजय कदम चे सानुनासिक उच्चार खूप कृत्रिम वाटतात. तसेच तो रोहिला ही आधी फक्त पैशासाठी लढणारा पण नंतर लगेच हिंदुस्थान्साठी निज़ामाविरुद्ध ही लढायला तयार, याने गोंधळ उडतो. काही अनावश्यक प्रसंग ही आहेत.

पण सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे मध्यंतरा च्या थोडे आधी असलेले ते 'आयटेम सॉंग', ते ही चक्क लता च्या आवाजात. एक मलाईका अरोरा छाप डान्स, व आजूबाजूला नाचणारे तरूण हा फॉर्म्युला येथे टाकायची काहीच गरज नव्हती. आणि त्याच्यामुळे लोक येणार असतील तर "चांगला चित्रपट, पण फार चालला नाही" आणि "वासुदेव बळवंत फडके ना? काय डान्स आहे बॉस त्यातला" यातील जास्त वाईट स्थिती कोणती नक्की सांगता येत नाही. (नंतर च्या मुलाखतीत अजिंक्य नेच सांगितले की आता निघणार्‍या हिंदी आवृत्तीत ते नसेल)

संवाद मात्र फार पुस्तकी वाटतात, त्यावेळच्या सहज बोली भाषेतील वाटत नाहीत. एरव्ही मराठीत किंवा गरजे नुसार इंग्रजीत बोलणरे वासुदेव बळवंत फडके शेवटी 'मातृभूमी की जय' असे हिंदीत कशाला म्हणतील वगैरे प्रश्न आपल्या डोक्यात येतात.

अजून एक दाखवायला हवे होते म्हणजे जरी वासुदेव बळवंत फडके पकडले गेले तरी त्यांच्या लढ्याचा क्रांतिकारकांच्या पुढच्या पिढ्यांवर कसा परिणाम झाला ते. ते दिसत नाही.

मराठीत ऐतिहासिक (म्हणजे इतिहासावर आधारलेले. पुराव्या सिद्ध झालेल्या गोष्टीच फक्त दाखवणारे असे नव्हे) चित्रपट खूप चांगले आहेत. पण मागच्या काही वर्षांत एवढे आले नाहीत. हा निदान बर्‍यापैकी आहे. आणि मुख्य म्हणजे तेव्हाचे राजकारण यांनाच फक्त कळत होते आणि पुढच्या ५०-१०० वर्षांत घडणार्‍या घटनांबद्दल चा (लेखकाने त्यांच्या माथ्यावर ठोकून दिलेला) द्रष्टेपणा फक्त त्यांच्याकडे होता आणि बाकीचे महान लोक चुकीचे होते असे दाखवण्याची पद्धत व्यक्तीपूजक पुस्तके, चित्रपटात असते ती येथे अजिबात जाणवली नाही. तेवढ्या बाबतीत तरी श्रेय द्यायलाच पाहिजे.

भारतात नेहमीसारखाच प्रदर्शित झाला असेल. पण इतर ठिकाणी महाराष्ट्र मंडळ किंवा अशाच इतर संस्थांनी दाखवला तर जरूर पाहा. एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे.

प्रकार: 

खूपच छान परीक्षण अमोल Happy
खरच हा चित्रपट बघायलाच हवा Happy

अमोल, तुझ परिक्षण वाचुन एकदा तरी पहावा अस वाटतय. नेहमी सारखच मोजक्या शब्दांत छान लिहलय.

फारेंड. एका चांगल्या चित्रपटाबद्दल लिहिले, म्हणुन आनंद झाला. अश्या चित्रपटाना प्रसिद्धी मिळालीच पाहिजे. सगळ्याच पत्रकारानी त्या गाण्याची निर्भत्सना केली आहे, अनेकानी सोनालीच्या भुमिकेलाही नावे ठेवली आहेत.
पण तरिही या विषयावर चित्रपट काढण्यासाठी देव मंडळींचे कौतूक व्हायलाच पाहिजे. या चित्रपटाचे कलादिग्दर्शनही चांगले आहे, असे वाचले होते.
भाषेचा घोळ नेहमीचाच. मला तर चित्रपट नाटकातील शिवाजीच्या तोंडची भाषा पण पटत नाही. अश्या दरबारी भाषेत बोलून महाराजाना, मावळ्यांचा विश्वास मिळवता आला असेल, हे शक्य वाटत नाही.

मीपण हा चित्रपट पाहिला, अजिंक्यची मुलाखतही ऐकली.

मला जरा documentary type वाटला. एखाद-दुसरा वगळता (तो गव्हर्नरला पकडण्याबद्दल इनाम जाहीर करण्याचा प्रवेश चांगला जमलाय) बाकीचे प्रसंग अजूनही खुलवायला हवे होते असं जाणवलं. कदाचित खूप माहिती उपलब्धच नसल्याने दोन पुस्तकांतून जी माहिती मिळाली (अजिंक्यनेच सांगितलं की वासुदेव बळवंत फडक्यांवर दोन पुस्तकं भारतातून नाही तर न्यूयॉर्कच्या Barnes & Noble मधून मिळाली) त्यावरच चित्रपट बनवावा लागला असेल. पटकथाही अजिंक्यनेच लिहीली आहे. त्यामुळे भाषा त्याचीच. तांत्रिकदृष्ट्या चांगला असला तरी चित्रपट फार अंधारात आहे. ते item song type गाणे तर अजिबात नको होते. अजिंक्यने मुलाखतीत सांगितलं की लताबाईंनी आग्रहाने गाणे गायल्याने ते ठेवावेच लागले जरी ते या चित्रपटात कुठेच बसत नाही. पण गाणं जरी ठेवलं असलं तरी वेगळ्या रितीने दाखवता आलं असतं की. वासुदेव बळवंत फडकेंनी रामोशांबरोबर राहून लढा दिला. पण सोनालीचं character खरंच अस्तित्वात होतं का? तसेच रामोशांव्यतिरिक्त त्यांचे बाकीचे दाखवलेले सहकारीही कोण, कुठून आले हे काहीच कळलं नाही.

ती इनामाची रक्कम ४००० दाखवलेय ना?

मीही चित्रपट बघितल्यावरच आंतर्जालावरून थोडी जास्त माहिती मिळवली. ती आधीच माहिती असेल तर चित्रपट बघण्यात अजून रस वाटेल.

एवढं असूनही सशस्त्र क्रांतीच्या या आद्य क्रांतिकारकावर चित्रपट काढल्याबद्दल त्याच्याशी संबंधित सर्वांचं अभिनंदन करायलाच हवं. हा चित्रपट बनवण्यात महाराष्ट्र सरकारचं सहाय्य (आर्थिक सहाय्य साधारणपणे खर्चाच्या ३०% आहे) फारसं लाल फितीत न अडकता मिळालं हे अजिंक्यनी आवर्जून सांगितलं. तसंच शिरढोण या फडक्यांच्या मूळ गावी असलेल्या त्यांच्या वाड्याचा जीर्णोद्धार होण्याचीही शक्यता आहे.

एक बोच नेहमी जाणवते ती म्हणजे ह्या क्रांतिकारकांच्या बायका-मुलांचं काय होत असेल? चित्रपटात फडके त्यांच्या बायकोला मामांकडे जायला सांगतात. पण पुढे काय झालं असेल त्यांचं? त्यांच्या मुलांचं?

अवांतर - फारेंड मी खूपच लिहिलं तुमच्या रंगीबेरंगी वर. क्षमस्व. मला तुमची चित्रपट परीक्षणं आवडतात. अचाट आणि अतर्क्य तर फारच.

अमोल, नेहेमीप्रमाणेच नेमकं आणि नेटकं लिहीलं आहेस. Happy

आमच्या मिरजेत एक नाना फडके म्हणुन होते. ते वासुदेव बळवंत फडक्यांचे वंशज (वंशज म्हणजे कुठुनतरी नाते.. एकदम मुलाच्या मुलाचा मुलगा वगैरे नसावे) होते असे ऐकले आहे. खरे खोटे माहिती नाही..

""""तसंच शिरढोण या फडक्यांच्या मूळ गावी असलेल्या त्यांच्या वाड्याचा जीर्णोद्धार होण्याचीही शक्यता आहे."""
हे मिरजेहून ३० किमी अंतरावरचे शिरढोण काय?

ह्म्म.. चांगलं परीक्षण केलंयस. बघायला पाहिजे. त्यांच्याबद्दल फार माहिती नाही हे दुर्दैवच, म्हणजे आपल्याला तर जुजबीच माहिती आहे.
मी शेगाव/अक्कलकोट/शिर्डी यांपैकी एका महाराजांच्या चरित्रात असे वाचले होते की फडके त्या स्वामींकडे गेले होते, उद्देश हा की त्यांच्या लढ्याला आशीर्वाद मिळावा. तेव्हा त्या स्वामींनी त्यांना असे सांगितले की, तुमचा लढा वेळेपूर्वी आहे, अशा लढ्याला यश येण्याचा काळ अजून यायचा आहे. असा काही प्रसंग आहे का या चित्रपटात ? नसेल तर कोणी जाणकार ते स्वामी नक्की कोणते ते सांगू शकतील का?

*** And on the 8th day God said: "Ok Murphy, you take over." ***

..."हे मिरजेहून ३० किमी अंतरावरचे शिरढोण काय?"...
नाही, मला वाटतं हे शिरढोण रायगड जिल्ह्यात पनवेलजवळ आहे.

..."मी शेगाव/अक्कलकोट/शिर्डी यांपैकी एका महाराजांच्या चरित्रात असे वाचले होते की फडके त्या स्वामींकडे गेले होते, उद्देश हा की त्यांच्या लढ्याला आशीर्वाद मिळावा. तेव्हा त्या स्वामींनी त्यांना असे सांगितले की, तुमचा लढा वेळेपूर्वी आहे, अशा लढ्याला यश येण्याचा काळ अजून यायचा आहे. असा काही प्रसंग आहे का या चित्रपटात ? नसेल तर कोणी जाणकार ते स्वामी नक्की कोणते ते सांगू शकतील का?" ...

हो, असा प्रसंग दाखवलाय. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आणि गोंदवलेकर महाराजांकडे गेले होते असा उल्लेख आहे.

धन्यवाद झेलम. ते म्हणे तलवार वगैरे घेऊन गेले होते आणि स्वामींनी त्या तलवारीला स्पर्श करून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती.

*** And on the 8th day God said: "Ok Murphy, you take over." ***

अमोल'
छान लिहिल आहेस रे.
हा चित्रपट भारतात येवुन देखील गेला.
खरच काहीच माहिती नाहिये आपल्याला इतिहासात फक्त त्यानी काय केले ह्याची जुजबी माहिती असते.
.............................................................
** गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो, तिसर्‍या अवस्थेत पोचल्यावरच तो लक्षात येतो **
आणि बहुतेक वेळा माणसामधल मेतकुट बिघडवतोच.

चित्रपटात item song? तेही लता मंगेशकरांनी आग्रहाने गायलं म्हणून घातलंय? कमालच आहे लताबाईंचीही आणि दिग्दर्शकाचीही .. Sad

baby sitting चा problem आणि ते old naaz चं पार्कींग विचित्र म्हणून जायचा प्लॅन कँसल केला ते बरंच झालं ..

फार माहिती नाही हे दुर्दैवच >>> खरय. आपल्याकडे जेवढ्या ऐतीहासिक कांदबर्या खपतात तेवढे चरित्र खपत नाहीत त्यामुळे स्वत शोध करुन पैसे ऊभे करुन पुस्तक छापने हा लेखकाच्या दॄष्टीने आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. मुळात आपल्याच ईतिहास संशोधना बद्दल सरकारने जास्त मदत द्यायला हवी ती मिळत नाही तसेच आपल्या ईतिहासाबद्दल असलेल्या अनास्थे मुळे जर कोणी फडक्यांना दरोडेखोर ठरविले तरी आपल्याला काही वाटत नाही. ( ते दरोडेखोर आहेत अशीच नोंद स्वातंत्र्यांनंतर गॅझेट मध्ये होती) नंतर महाराष्ट सरकारने ती काही वर्षांनी बदलुन पुण्यात त्यांचा जन्म ठिकानी आद्य क्रांतीकारक अशी पाटी लावली.
पण त्यांचावर मराठी निदान दोन पुस्तके मी वाचलेली आहेत म्हनजे कदाचित जास्त असु शकतील पण ती चरित्र्यात्मक नसुन ऐतीहासीकच जास्त आहेत त्यामूळे कदाचित पिक्चर काढायला त्याची मदत झाली नसेल.

आयटम साँग त्या पिक्चर मध्ये असने म्हणजे केवळ दुर्देव आहे.

छान लिहिले आहेस अमोल.
>>> चित्रपटात item song? तेही लता मंगेशकरांनी आग्रहाने गायलं म्हणून घातलंय? कमालच आहे लताबाईंचीही आणि दिग्दर्शकाचीही ..

खरच!! अनुमोदन अगदी Sad
गालबोटच म्हणायच हे सिनेमाला लागलेलं....

केदार, पुस्तकांची नावं देऊ शकशील का??

छान परीक्षण अमोल.

फारेंड, समिक्षण आवडले.
शेवटच्या उतार्‍यात तू जे स्पष्ट केले आहे ते महत्वाचे आहे. बर्‍याचदा असे चित्रपट व्यक्तिपुजक असतात व त्यामुळे ऐतिहासिक वास्तवतेपासून दुर गेल्याने निरस ठरतात. हा चित्रपट तसा नाही हे वाचून बरे वाटले. हा अगदी जरुर मिळवून बघेन. (अधिकृत सीडी आल्यावर).
आयटम साँग.. त्याऐवजी वास्तूपुरुष मध्ये जशी 'रातीच्या पोटामध्ये' ही लावणी घेतली आहे तशा पद्धतीने एखादी लावणी घेता आली असती.
अशा चित्रपटाबद्दल आम्हाला सांगितलेस त्याबद्दल धन्यवाद!

शैलजा पुस्तकाची नावे माझ्या आत्ता लक्षात नाहीत पण मी शोधुन सांगेन. (बरीच वर्ष झाली वाचुन).

ते शिरढोण गाव पनवेल पेण रस्त्यावर कर्नाळ्याच्या आधीच लागते. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यानी गावोगावी तिथल्या नेत्यांची स्मारके उभारली होती, तसे एक स्मारक तिथेही आहे, पण देखभाल न झाल्याने त्याची पार रया गेलेली आहे.

मिरज- कुरुन्दवाड या भागात असणारे शिरढोण वेगळे आहे. ते फडकेन्चे शिरढोण नव्हे. हा चित्रपट आता बघायचा कुठे?

***********************************************************************************************************************

*** And on the 8th day Murphy said: "Ok God, you take over." ...God is still thinking!!! ***