आज्जीच्या कविता -२

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ही अजून एक कविता बाईंनी लिहिलेली. मी लहान असल्यापासून त्यांच्या तोंडी ऐकतेय ही कविता. छान चालीत गातात त्या. Happy

नको नको हा वेणीचा गाडा
बरा हा तो सैल अंबाडा
अरे अरे देश बुडाला
स्त्रियांचा शिनगार पुढे आला

खोवती कंबरी आकडा
पिन खोवती केसाला
नको नको इरकलचे लुगडे
पांढरे पातळ, खडी काढा त्याला
अरे अरे देश बुडाला
स्त्रियांचा शिनगार पुढे आला

हातात बांगडी एक
घड्याळाची टिक टिक
तिच्या चालण्याचा झोक
बरेच पहातात सभेचे लोक
कोण्या हिंदुची सुन
कपाळी कुंकवाची खुण
हिंदु माझे बंधु, पांगळे नका राहु
बिगी बिगी चाला
अरे अरे देश बुडाला
स्त्रियांचा शिनगार पुढे आला

ही सामाजिक विषयावरची, पर्यावरणासंबंधीची म्हणायला हरकत नाही. Happy

नविन राज्य निघाले, धर्म बुडाला
पंचपुढारी झाले थोर थोर, पंच नेमले घरोघर
मानवाने शोध काढिला नवा नवा, मानव जातो चंद्राच्या गावा

किती मानवा शोध लावितो ढाई ढाई, जलाचा पत्ता नाही
चंद्रावरी जावून केले काय, लाविले निशाण; वाढवले भुषाण
जगात म्हणतो देव नाही, वाढले मीपण
शोध लाविला नवा नवा, मानव जातो चंद्राच्या गावा

पाण्यावाचून हळहळते, अन्नावाचून तळमळते
हातात घेवून नोटा, हिंडतो पेठा पेठा
पाणी मिळेना कश्यात, वाटीत - पेल्यात -चमच्यात
धान्य-पाण्याचा आला तोटा, झाडाझुडपांना लागल्या नोटा
शोध लाविला नवा नवा, मानव जातो चंद्राच्या गावा

पायात बुट-सुट, अंगात कोट- जाकिट
खिशात भरले नोटांचे पाकिट
मानवा तुझा रे नेम नाही खरा, नष्ट झाल्या जलधारा
जुने दैवत, जुने स्वयंवर; मानवा हे धर बरोबर
सुखी होतिल गाय-वासरे, अन्नधान्याने भरतिल घरे
शोध लाविला नवा नवा, मानव जातो चंद्राच्या गावा

या दोन्ही कविता वाचताना, मला बर्‍याच गोष्टी, त्यांची मतं पटत नाहीत. लहानपणी बर्‍याचदा त्यांच्याशी वाद घालायचो आम्ही. पण आता त्यांचं वय, जिथे वाढल्या, वावरल्या ते वातावरण लक्षात घेतलं की त्यांची मतं अशी असु शकतात हे कळतं. त्यामूळेच हल्ली त्यांच्याशी मी वाद घालत नाही. (आता ते काम माझ्या धाकट्या बहिणी करतात. Happy )
मला दोन्ही कवितांमध्ये काही शब्द का वापरले आहेत ते कळलं नाही. कदाचित त्या कविता गातात, त्यावेळी चालीत बसतात, दुसरे शब्द सापडले नाहीत म्हणून वापरले असावेत.
उदा. : जुने दैवत, जुने स्वयंवर; मानवा हे धर बरोबर - यात स्वयंवर शब्द

प्रकार: