स्वप्न

Submitted by आद्या on 2 September, 2010 - 03:07

कल्पनेतली तुझी आठवण कशी साठवू नयनी
स्वप्नातून ओसंडून आली अशी कुशाशी शयनी

विझलेल्या रातीच्या प्रहरी
गुडूप गाढ झोपली सारी
अशी जाहली गम्मत न्यारी
वाऱ्यावर उडवून बटाना टाकून कटाक्ष जुलमी
आली सुंदर नार सामोरी निखळ रम्य हासुनी

डोळ्यावर विश्वास बसेना
हृदयाचा ठोकाच पडेना
झाले मजला काय कळेना
हात धरुनी माझा हाती मंजुळ आवाजात म्हणाली
तुला भेटण्या आले इथवर सर्व बंध तोडूनी

काय मी वर्णू रूप तिचे
चंद्राला लाजवेल असे
नक्षत्राचे तेज दिसे
आकाशातून शोधून कोणी तिला जशी आणली
तिच्या अभावी जणू तारका व्यथित जाहल्या गगनी

हातामध्ये हात घालूनी
डोळ्यांनी डोळ्यांशी बोलुनी
अनुरागाचे गीत गाउनी
नभदरबारी फुले उधळता चिंब चिंब न्हाइली
हृदयाची कंपने बहकली रूप तिचे पाहुनी

गोळा पूर्वेचा उगवला तशी म्हणाली जाते मी
धुंद चांदण्या रातीला तुला भेटण्या येईन मी
डोळ्यापूढुनी गेली माझ्या स्पर्श इथे सोडूनी
कल्पनेतली तुझी आठवण कशी साठवू नयनी
स्वप्नातून ओसंडून आली अशी कुशाशी शयनी

-- आदित्य
http://amrut-dhaaraa.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: