अवघी विठाई माझी (२०) - अवाकाडो

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

avacado.jpg

अवाकाडो ला भाजी म्हणता येणार नाही. अगदी क्वचितच ते शिजवले जाते, तेही अगदी
काहि क्षणांपुरतेच. जास्त शिजवल्यास ते कडवट बनते.
पण त्याला फळही म्हणता येणे कठीण आहे, कारण त्यातले साखरेचे प्रमाण नगण्य (
१०० ग्रॅम गरात केवळ ०.६६ ग्रॅम ) असल्याने ते चवीला अजिबात गोड लागत नाही.

मी अवाकाडो पहिल्यांदा खाल्ले ते साधारण ३५ वर्षांपूर्वी. त्यावेळी ते मुंबईला बाजारात
मिळत नव्हते. आमच्या शेजारच्या कुर्गी आंटीने ते मला दिले होते. तिने त्याचा एक
गोड प्रकार मला करुन दिला होता. त्याची बी आम्ही पेरली होती आणि तिचे झाडही
उगवले होते. साधारण फ़ूटभर वाढल्यावर मात्र ते तग धरु शकले नाही.
त्यावेळी अवाकाडो नावही माहीत नव्हते. ते लोक त्याला बटर फ़्रुट म्हणत असत.
पुढे गल्फ मधे असताना बाजारात ते एक एक्सॉटिक फळ म्हणून विकायला ठेवलेले
बघितले, पण इतर फळांच्या तूलनेत ते खुपच महाग असायचे.

केनया आणि नायजेरीयात मात्र ते भरपूर दिसायचे. त्याची झाडेही जागोजाग दिसत.
(नायजेरियात त्याला पेअर म्हणतात, आणि ते अवाकाडोचे एक नावही आहे.) गोव्यातही
काहि झाडे दिसली, पण तिथे बाजारात ते क्वचितच दिसायचे. न्य़ू झीलंडमधे त्याची
एक अगदी छोटी जात बघितली. झाडही आकाराने छोटे आणि आणि फळही.
आफ़्रिकेत मात्र फळाचा आकार सोललेल्या नारळाएवढा असतो. आक्राराने ते पेअरसारखे
किंवा गोलही असते. याचे झाड सदाहरित दिसते. २०/२५ मीटर्स वाढलेले दिसते. बारिक
हिरवा मोहोर जास्त नजरेत भरत नाही, पण फळे मात्र भरपूर लागतात.

avacado tree.jpg

या फळांची एक खोड आहे. ही फळे झाडावर पिकायला बराच वेळ घेतात. माझ्या
रोजच्या बघण्यातल्या या झाडाची हि फळे झाडावर ४ महिने बघतोय ! झाडावर त्याची
वाढ पूर्ण झाल्यावर ते खूडतात. मग ते साधारण आठवडाभरात पिकते.
पण विकत घेताना ते नेमके कधी पिकेल, ते सांगता येत नाही. विक्रेताही नीट
सांगू शकत नाही. ताबडतोब वापरायचे असेल तर हाताला मऊसर लागणारे व
रंगाने पूर्ण किरमिजी रंगाचे झालेले घ्यावे. हिरवे किंवा हाताला घट्ट लागणारे
फळ पिकेपर्यंत, एखाद्या कागदात गुंडाळून ठेवावे लागते. पिकल्यावर मात्र ते
लगेच खावे. कच्चे फ़ळ मात्र खाता येण्याजोग्या चवीचे नसते.
हे फळ कापताना आतल्या बीचा अंदाज घेत, अलगद कापावे लागते. साल
किरमीजी. सालीलगतचा गर फिक्कट हिरवा, आतला गर अगदी फिक्कट पिवळा असतो.
(हिरव्या आणि पिवळ्या रंगांच्या या छटा, अवाकाडो च्या नावाने ओळखल्या जातात.)
मी वर लिहिलेच आहे, कि या फळाला तशी अजिबात चव नसते. पण याचा लोण्यासारखा
असणारा पोत, याला लोकप्रिय करतो. याला अगदी तीव्र नाही पण सुखद असा स्वाद
असतो. (या स्वादाची तूलना एकवेळ आक्रोडाशी होऊ शकेल.)

avacado sweet.jpg

या वरच्या प्रकारासाठी, मी थोडे दुध आणि साखर वापरली आहे. पूर्व आफ़्रिकेत
साधारणपणे याच प्रकारे ते खाल्ले जाते. बी काढल्यानंतर जी पोकळी राहते, त्यात
थोडी साखर व थोडे दूध घालून, गर चमच्याने हळू हळू मऊ करत त्यात मिसळायचा.
अवाकाडोच्या सालीतच हे सगळे छान करता येते. तो तसाच खाताही येतो, पण
फोटोसाठी म्हणून मी ते ब्लेंड करुन घेतले आहे. वर थोडेसे मार्मलेड टाकून
बदाम लावले आहेत. आणि थोडे चॉकलेट किसून टाकले आहे.

वेगवेगळ्या फळांच्या गराचे ग्लासात थरावर थर दिल्यास ते दिसतातही छान आणि
लागतातही छान. (आंबा, मेलन, स्ट्रॉबेरी वगैरेंचे गर वापरता येतात. विमटो सारख्या
एखाद्या पेयाबरोबरही अवाकाडोचा संयोग चांगला लागतो. कोकोबरोबरही हे ब्लेंड करता
येते. हे सगळे प्रकार पूर्व आफ़्रिकेत लोकप्रिय आहेत.)
मी वर लिहिल्याप्रमाणे या अवाकाडोला स्वत:ची अशी चव नसल्याने, याचे गोड आणि
तिखट असे दोन्ही प्रकार करता येतात. मेक्सिको मधे ग्वाकमोले म्हणून अवाकाडोचे
झणझणीत तिखट डिप करतात. मेक्सिकोबाहेरचे ग्वाकमोले, तितके तिखट नसते
असे मी ऐकलेय.
अवाकाडो कुस्करून त्यात आवडीप्रमाणे वाटलेल्या मिरच्या, बारिक चिरलेला कांदा,
कोथिंबीर, मीठ, व लिंबूरस टाकून ते थंड करतात. यात टोमॅटो पण टाकता येतो.
आपल्या आवडीप्रमाणे यातले घटक, बदलता येतात.

avacado salad.jpg

या वरच्या प्रकारासाठी मी अवाकाडोचे तूकडे, पपईचे तूकडे, मिरपुड, लिंबूरस,
मिंट, मीठ व साखर वापरले आहे. (सफरचंदाप्रमाणे अवाकाडोही कापल्यानंतर
हवेने काळे पडते. म्हणून त्यासोबत लिंबू वापरणे गरजेचे असते) थोडी हिरवी
मिरची पण आहे. याच प्रकारात कांदा व कोथिंबीरही वापरता येईल. थंडगार करुन
हा प्रकार, न्याहारीसाठी वा जेवणासोबतही खाता येतो.

अवाकाडोचा उगम दक्षिण अमेरिकेतला. (शास्त्रीय नाव Persea americana.) खास करुन मेक्सिको मधला. गेल्या शतकात त्याचा जगभरात प्रसार झाला.
आफ़्रिकेत तर ते लोकप्रिय आहेच, पण आग्नेय आशियात पण ते आवडीने खाल्ले जाते.
गोव्यातली झाडे छान वाढलेली मी बघितली आहेत.
याची लागवड फ़ायदेशीर व्हायला हरकत नाही. अगदी थंड हवामान सोडले तर हे झाड
सगळीकडे छान वाढते. थोड्य़ा प्रयत्नाने बी रुजू शकते. (पण बीपासून उगवलेले झाड
फळांचा दर्जा राखत नाही. आफ़्रिकेत आकाराचे, अनेक प्रकार दिसतात ते यामुळेच.)
झाडावर पूर्ण वाढलेले फळ बाजारपेठेसाठी खुडता येते, पण बाजारपेठेची खात्री नसेल
तर हे फळ झाडावर सहज २/३ महिने टिकवता येते, आणि हि याची खासियत आहे.
कुठलाही पक्षी सहसा या फळाला चोच लावत नाही. (हे अवाकाडो कुत्र्यामांजरांसारख्या
प्राण्यांसाठी, घोडे गायीगुरांसाठी घातक ठरू शकते.)

याच्या गरात मेदाचे प्रमाण जवळ जवळ १५ टक्के असते आणि त्यापैकी १० टक्के
मोनोअनसॅचूरेटेड मेद असतात. बाकीची जीवनस्त्वांपैकी ब गटातली अनेक आणि क
जीवनसत्वांनी हे अवाकाडो समृद्ध असते. इतर खनिजांचे प्रमाणही, समाधानकारक
असते.
माश्यांबरोबर याचा संयोग करतात. प्रॉन्सबरोबर याचे सलाद लोकप्रिय आहे. अंडी,
चिकन बरोबर पण हे खातात.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्त माहिती!!!

सलमा हायेकला तिच्या सौंदर्याच रहस्य विचारलेल, एका मुलाखतीत, तेंव्हा ती म्हणली "रोज तळलेल्या मुंग्या ग्वाकामोल सोबत खाते, it tastes good..."

खूपच आवडते आहे. आमच्याकडे सुद्धा लहानपणी गोव्याला ह्याचे झाड होते. कसे व कुठून आबांना (आईचे बाबा)मिळाले माहीत नाही. त्यांना एकदम वेगळी अशी झाडे लावायचा शौक होता. आबा बाहेर परदेशात पण राहिले होते त्यामूळे तिथून आणले काय माहीत नाही.ते झाड वाढल्यावर २-३ वर्षे फळे वगैरे आली होती. आजूबाजूला लोक घाबरून बघत ते खाताना.(हो खरे आहे ते). कित्येक लोकानी हे चांगले नाही. ह्या म्हातार्‍याने (आबांनी) बाहेरून कुठलेसे झाड आणले व काहीतरी करतोय असे शेजारी म्हणायचे. Happy मग ते असेच मेले.. अचानक सुकून... का आता आठवत नाही(इती आई). असो.

सकाळचे एक आक्खे नुसते अवाकडो खाल्ले की मस्त पोट भरते व शांत रहाते, अ‍ॅसीडीटी वर एकदम गुणकारी. on digestion अल्कालाईन ईफे़क्ट असतो पोटावर म्हणून अल्सर वगैरे वर उत्तम आहे.

केसाला व चेहर्‍याला लावून मस्त होतात केस व चेहरा.

दिनेश, सॉरी खूपच विषयांतर झाले.

मनःस्विनी, सगळे रिलेटेड तर आहे. विषयांतर कुठेय ?
अनेकजणांनी हे फळ कच्चे खाल्लेले असते त्यामुळे त्यांना शिसारी आलेली असते. आणि पिकलेले नुसते खाल्ले तरी बेचवच लागते की.

फेशियलसाठी मी पण वापरतो. माझ्या नाही मित्रांच्या !

माझ्या ओळखीतलं कोणीतरी कोकणातल्या केळशीचं आहे त्यांनीं सांगितलं की तिकडे भरपूर होतात avocado .. त्यांनां लोणीफळ असं म्हणतात ..

चव मात्र खरंच अप्रतिम! Happy

वा पुन्हा एकदा मस्त माहिती! मी पण ग्वाकामोले बर्‍याच वेळा बनवते. बेबीकॉर्न बरोबर ही मस्त लागते, नाचो पेक्षा. इथे बंगलोर मध्ये त्याचा मिल्कशेक पण अगदी सर्रास मिळतो, एका ब्राझिलियन कडे प्यायला होता सगळ्यात पहिले.

मला पण नुसते खायला आवडत नाही.पण ग्वाकामोले एकदम आवडते.
गोड पदार्थ कधी खाऊन पाहिले नाहित.पण आवडेल असे वाटत नाहिये Sad

दिनेशनी वर लिहिलेच आहे की हे फळ कापताना आतल्या बीचा अंदाज घेत, अलगद कापावे लागते.
पण ते कापयची एक युक्ती आहे.बघा:

http://www.youtube.com/watch?v=E3GdC2cBqZI

जपान मधे पण याल कधी कधी मोरी नो बाता(森のバター) म्हणजे जंगलातील बटर असे म्हणतात.

दिनेश दा मि खाल्लेय हे फळ ..मला इथलि ऑस्ट्रेलियन लेडी म्हट्लि होति हे फळ खाल्याने स्किन छान होते म्हनून त्यामुळे मि खाल्ले Happy पन नाहि आवड्ले मला, मग मि त्याचे सॅडविच बनवून खाल्ले Happy

माझ्या एका जपानच्या मैत्रिणीने मागे अवोकॅडोची खीर केली होती. छान लागते म्हणाली होती. माहिती छान.

आजच घरी आवाकाडो कापलं .. मस्त पिकलं होतं. मला नुस्तं खायला आवडतं. माझा एक मित्र पिकलेल्या आवाकाडोचा गर चमच्याने स्कूप करून काढून ब्रेडवर स्प्रेड करून खातो.

ह्म्म्म्म्..मस्त माहिती. इन्डोनेशियाला अवाकाडोची स्मूदी बनवतात्..खूप टेस्टी लागते.. त्यात अवाकाडो च्या गरा बरोबर,गोड कंडेन्स्ड मिल्क्,लिंबाचा रस,बर्फाचे तुकडे,कोको पावडर किंवा चॉकोलेट सिरप,पाम शुगर सिरप टाकून ब्लेन्ड करतात्..वरून थोडसं चॉकोलेट सिरप डेकोरेशन साठीही वापरतात. सॉल्लिड हाय कॅलरी फूड Happy

Resize of Resize of avakado2.jpg

ग्वाकमोली हा सगळ्यात सराईत पदार्थ असावा अवाकाडोचा. पण त्यात थोडा मालमसाला (कच्चा कांदा, लसूण, लिंबाचा रस वगैरे) आणि वरून फोडणी घातली की त्याचं भरीत होतं झकास. Happy

दिनेश लेखमाना मस्तच !

Avocado-Banana चाट एका restaurant मध्ये खाल्ले, मस्त लागले.
दोन्हीचे काप (केळे अति पिकलेले नको) वर लिंबूरस-मीठ आणि चाट मसाला भुरभुरलेला..