मंगलवार्ता कळेल आता

Submitted by स्वानंद on 30 August, 2010 - 08:48

मंगलवार्ता कळेल आता
भाग्य रेशमी मिळेल आता

एकटेपणा जेथे थिजला
एकरुपता रुळेल आता

या ह्रदयीचा त्या ह्रदयीला
स्नेह आपसुक जुळेल आता

दुडुदुडु धावत अंगणातुनी
बाळमुकुंदा पळेल आता

रंगामधुनी रांगोळीच्या
हात चिमुकला मळेल आता

कल्पतरुंची बने दावण्या
वाट सुखाने वळेल आता

अमृतधारा भिजवतील मन
वषार्वच तो छळेल आता

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गोंडस! व लोभस!

सगळेच शेर वेगळे काढून स्वतंत्र वाटतात की नाही हे मला जाणवले नाही.

काही र्‍हस्व दीर्घ वेगळे वाटले. आप'सु'क, अंगणा'तु'नी, रंगाम'धु'नी वगैरे! (वगैरे नाही.)

भिजवतील आहे का ?

२, ६ व ७ हे शेर आवडले स्वानंद!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,

इतक्या बारकाईने कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार.
आपण सुचवलेल्या दुरुस्ती केल्या आहेत.

माझ्या मते, प्रत्येक शेर वेगळा काढला तरी स्वतंत्र अर्थ निघतो आहे.
यापेक्षा वेगळे काही आपेक्षित असल्यास सांगावे.

स्वानंद,

सीमारेषा जराशी धुसर! खालील शेर!

दुडुदुडु धावत अंगणातुनी
बाळमुकुंदा पळेल आता

रंगामधुनी रांगोळीच्या
हात चिमुकला मळेल आता

या दोन्ही द्विपदींवरून अंदाज बांधावा लागत आहे की कुण्या प्रेमी जीवांच्या मीलनाचा हा परिणाम आहे. अन्यथा स्वतंत्र रीत्या हे शेर कवितेसारखे आहेत असे 'माझे' मत!

(अवांतर - माझी मते ही बहुतांशी इंप्रेस करण्याच्या हेतूने दिलेली व 'पाळली नाहीत तरी चालतील' अशी असतात हे आपल्या माहितीसाठी!)

धन्यवाद!

(कंसातील वाक्य उपरोधिक नसून सत्य आहे याचा विश्वास बाळगावात.)

-'बेफिकीर'!

सुंदर..

जागोमोहनप्यारे,
प्रतिसादासाठी आभारी आहे Happy

बेफिकीर,
सविस्तर प्रतिसादासाठी आभारी आहे.
पुढिल रचनां आपल्या सुचना ध्यानात ठेउन करायचा प्रयत्न करेन.