हे खेळ संचिताचे .....!

Submitted by अभय आर्वीकर on 29 August, 2010 - 05:06

हे खेळ संचिताचे .....!

काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला

सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला

हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला

तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला

पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
झुंजतांना एकला मी, श्वासही सुस्तावला

साठले कंठात होते, सप्तकाचे सूर मी
साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला

संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती
चालता मी "अभय" रस्ता, काळही भारावला

गंगाधर मुटे
......................................................
(वृत्‍त- देवप्रिया)
......................................................

गुलमोहर: 

पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
झुंजतांना एकला मी, श्वासही सुस्तावला

मुटेजी,
त्रासदायक कविता !
मला तर ही कविता वाचताना यात एक अगतिक,थोडा असहाय्य तरुण शेतकरी दिसला,
कारण शेतकर्‍यांच्या मुलांच्या वाटेला (सुबत्ता असली तरीही) लग्नासाठी मुली न मिळण्याच, आणखी एका दु:खाची मोठी भर पडत आहे ...
Happy