ॐ नमोजी आद्या : प्रिया पाळंदे

Submitted by संयोजक on 25 August, 2010 - 20:15

Om_0.png

उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिंचा नायक, सुखदायक भक्तांसी

कुठुनतरी या गाण्याचे सूर कानावर आले आणि नकळत मन कित्येक वर्षं मागे गेलं. सकाळची शाळा… वय वर्ष सात-आठ… त्यामुळे सकाळी लवकर उठणं अत्यंत जीवावर यायचं. बरं, आईचीही नोकरी - तिचीही शाळा सकाळचीच. त्यामुळे लवकर उठून स्वयंपाक करुन, सगळ्यांचे डबे भरणं, तिचं स्वतःचं आवरणं या सगळ्या धावपळीत सात-आठ वर्षाच्या आपल्या 'मोठ्या' झालेल्या लेकीने पहिल्या हाकेला उठून आपलं आवरलं तर तिला किती मदत झाली असती! पण डोळ्यावरचा गाढ झोपेचा पडदा मुळी जरासुद्धा बाजुला व्हायचा नाही. मग आई म्हणायची 'उठा उठा हो सकळिक'… तेवढ्या झोपेतही तिचं हे गुणगुणणं ऐकू यायचं आणि इतका राग यायचा! आता हसू येतं - गणपतीला उठवण्यासाठी लिहिलेली प्रार्थना आपल्या मुलीला उठवायला म्हणायचं फक्त आईच्याच मनात येऊ शकतं ना? आणि त्यावर चिडचिड फक्त 'त्या' वयातच शक्य आहे!

तसं म्हटलं तर आपल्याकडे जितके देव, तितक्या प्रकारच्या त्यांच्यावर लिहिलेल्या प्रार्थना, आरत्या, गाणी… पण आपल्या भाव-मनात गणपतीचं स्थान जसं आगळं असतं तशीच गणपतीवर लिहिलेली गाणीही आपल्या मनात स्वतःसाठी वेगळी जागा व्यापून असतात. अशीच काही माझ्या मनाच्या खास कप्प्यात राहिलेली गाणी.

कोणत्याही कार्याची सुरुवात करताना देवाचा - विशेषतः श्री गजानानाचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. अगदी संत ज्ञानेश्वरही याला अपवाद नाहीत. भगवद्-गीतेचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ज्ञानेश्वरांनी श्रीज्ञानेश्वरी लिहिली. पण गीतेची सुरुवात जरी रणांगणाच्या वर्णनाने होत असली तरी ज्ञानेश्वरांनी मात्र गणपतीच्या प्रार्थनेने ज्ञानेश्वरीची सुरुवात केली.

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।

देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ।।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।।

अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ।।
मकार महामंडल । मस्तकाकारें ।।

हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।।
ये मी यां श्रीगुरुकृपे नमिले । आदिबीज ।।

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ।।
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मी यां ।।

ज्ञानेश्वरांचे शब्द, पं. हृदयनाथ मंगेशकरांची चाल आणि साक्षात गानसरस्वती लता मंगेशकरांचा स्वर याहून अजरामर संगम तो कुठला! लताबाईंचा आवाज ज्या लिलयेने सर्व सप्तकांत फिरतो त्यानी नुसतं वेड लागतं. आणि पार्श्वभूमीत जो ओंकाराचा नाद घुमतो त्याने तर अंगावर कांटा येतो!

सुधाताई करमरकरांच्या 'लिटल् थिएटर - बाल रंगभूमी'च्या नाटकांनी ज्यांचं बालपण श्रीमंत केलं अशा भाग्यवान पिढीतली मी. त्यांनी एक 'गणपती बाप्पा मोरया' नावाचं नाटक बालप्रेक्षकांसाठी रंगभूमीवर आणलं होतं आणि माझी आठवण बरोबर असेल तर आशालता वाबगांवकरांनी त्यात एक गाणं म्हटलं होतं. कित्येक वर्षांत ते गाणं कुठे ऐकायलाही मिळालेलं नाही. लेखाच्या निमित्ताने गणपतीवरची गाणी मनात फेर धरत असताना आठवणीच्या खोल कुठल्यातरी कप्प्यातून हे गाणं वर यायचा प्रयत्न करत होतं. आधी तर 'गणपती बाप्पा मोरया' याशिवाय काहीच आठवेना आणि जितका प्रयत्न करायला लागले तितकं ते गाणं माझ्याशी लपंडाव खेळायला लागलं. चैन पडेना… जागेपणीचा प्रत्येक क्षण जणू त्या गाण्याचा पाठलाग करत होता आणि एका रात्री अचानक दीड वाजता उठले, शेजारीच टेबलवर नेहमी असतं ते पॅड आणि पेन घेतलं, नाईटलॅंपच्या उजेडात अक्षरशः झपाटल्यासारखं गाणं लिहायला घेतलं आणि काय आश्चर्य! जसजसं मी लिहित गेले तसतश्या गाण्याच्या ओळी विनासायास आठवायला लागल्या. आता तुम्हांलाही उत्सुकता लागली असेल ना या गाण्याबद्दल?

ganesha_1.jpg
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया ।।

मंगलमूर्ती तू, गणनायक
वक्रतुंड तू, सिद्धीविनायक
पामर मी स्वर उणे भासती, तुझी आरती गाया ।।

तू सकलांचा भाग्यविधाता
तू विद्येचा स्वामी-दाता
ज्ञानदीप उजळुन आमुचा, निमवी नैराश्याला ।।

तू माता, तू पिता जगी या
ज्ञाता तू, सर्वस्व जगी या
तुझिया दारी आज ठाकलो, ये ईप्सित मज द्याया ।।

असंच आणखी एक लहानपणापासून आजता-गायत आवडीचं गाणं आहे 'अन्नपूर्णा' चित्रपटातलं. गाणं तर सुंदर आहेच पण या गाण्याच्या संदर्भात विशेष लक्षात राहिलं आहे ते पडद्यावरचं सुलोचनाबाईंचं अतीव सुंदर आणि सोज्वळ रूप.

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती

महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग, साडे तीन शक्तिपीठं याबरोबरच किंवा कदाचित याहूनही जास्त लोकप्रिय आहेत अष्टविनायक. मोरगांवचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिध्दटेकचा सिध्दीविनायक, रांजणगांवचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरीजात्मज, महडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर -या आठ गणपतींवर अवघ्या महाराष्ट्राचे प्रचंड प्रेम आणि भक्ती आहे.

'अष्टविनायक' या चित्रपटाचा गाभाच मुळी त्यांवर आधारलेला आहे. श्रध्दा आणि अश्रध्दा, आस्तिकता आणि नास्तिकता, यांत्रिकीकरण आणि संस्कृती यांचा संघर्ष चित्रपटात पुढे सरकत राहतो तो एकाहून एक सरस गाण्यांच्या साथीने. नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत साक्षात पं. वसंतराव देशपांडे आणि गणपतीच्या भोवती गुंफलेली गाणी असा संगम झाल्यावर 'प्रथम तुला वंदितो कृपाळा', 'तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता' आणि चित्रपटाचा मुकुटमणी असलेलं अष्टविनायक गीत… कुठलं गाणं सरस हे ठरवणं केवळ अशक्य! पण तरी अष्टविनायक गीत खास लक्षात राहतं ते प्रत्येक गणपतीचं अतिशय सुंदर रीतीने घडवलेलं दर्शन, पडद्यावर ते सादर करायला मराठी चित्रपटसृष्टीतले जुने-नवे मोठे कलाकार, प्रत्येक कडव्यात त्या-त्या गणपतीचं नेमकं वर्णन आणि प्रत्येक कडव्याला वेगळी पण चपखल बसलेली चाल यामुळे.

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धीदम्‌ ।
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणीं थेवरम्‌ ।
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम्‌ ।
ग्रामोरांजण संस्थितो गणपतीः कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ ।।

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्सनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा

(पडद्यावर कृष्णकांत दळवी)
गणपती, पहिला गणपती, आहा,
गणपती, पहिला गणपती, आहा
मोरगांवचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो, अकरा पायरी हो
नंदी-कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो, शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा

(पडद्यावर सूर्यकांत)
गणपती, दुसरा गणपती, आहा,
गणपती दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहानी त्याची लई लई जुनी
काय सांगू? आता काय सांगू?
डाव्या सोंडंचं नवाल केलं सार्‍यांनी, हो सार्‍यांनी
इस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी, हो पेशव्यांनी
रमाबाईला अमर केलं वृंदावनी, हो वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा

(पडद्यावर अशोक सराफ)
गणपती, तिसरा गणपती
शिद्धिविनायका तुजा शिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुज्या भगताला पाव रं
दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर
इस्नुनारायण गाई गणपतीचा मंतर
राकुस मेलं, नवाल झालं, टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्‍याला पितळंचं मखर
चंद्र-सूर्य गरुडाची भवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
ganesha_7.jpg
(पडद्यावर उषा चव्हाण)
गणपती, गणपती ग चौथा गणपती
बाई रांजणगांवचा देव महागणपती
दहा सोंडा इस हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधुन किरण
किती गुणगान गावं, किती करावी गणती
बाई रांजणगावचा देव महागणपती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा

(पडद्यावर आशा काळे)
गणपती पाचवा, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर, बाई ओझरचा इघ्नेश्वर
लांब रुंद हाई मूर्ती
जड जवाहीर त्याचं, काय सांगू शिरीमंती
ओझरचा इघ्नेश्वर
डोळ्यामंदी माणकं हो, हिरा सोबतो कपाळा
तानभूक हरती हो, सारा बघून सोवाळा
चारी बाजू तटबंदी, मधी गणाचं मंदिर
ओझरचा इघ्नेश्वर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा

(पडद्यावर सुधीर दळवी)
गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव
रमती हितं रंका संगती राव, हो जी जी
खडकात केलं खोदकाम, दगडात मंडपी खांब
वाघ शिंव्ह हत्ती लई मोठं, दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरीजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
जी जी रं, जी रं हं जी
जी जी रं, जी रं हं जी
जी जी रं, जी रं हं जी
जी जी रं, जी रं हं जी
दगडमाती रूप द्येवाचं लेण्याद्री जसा

(पडद्यावर रवींद्र महाजनी)
सातवा गणपती राया, सातवा गणपती राया, सातवा गणपती राया
महड गांव अती महासूर, वरदविनायकाचं तितं येक मंदिर
मंदिर लई सादं-सूदं, जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर, कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं हाय तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्येनं बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप शिंव्हासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो, जी जी रं जी
माज्या गणा रं जी जी
माज्या गणा रं जी जी
माज्या गणा रं जी जी
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

(पडद्यावर शाहू मोडक आणि जयश्री गडकर)
आठवा आठवा गणपती आठवा, गणपती आठवा हो गणपती आठवा,
पालीगांवच्या बल्लाळेश्वरा, आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख, सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ, विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती, देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्सनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा

मोरया मोरया मंगलमूर्ती। मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया।।
मोरया मोरया चिंतामणी मोरया। मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया।।
मोरया मोरया महागणपती मोरया। मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया।।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया। मोरया मोरया वरदविनायक मोरया।।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया। मोरया मोरया अष्टविनायक मोरया।।

या चित्रपटानंतर अगदी थोड्या कालावधीत कविवर्य वसंत बापटांनी अष्टविनायकांवर आठ वेगवेगळी गीतं लिहिली. मराठी साहित्य-रसिक कवी आणि गीतकार ही दोन वेगळी व्यक्तित्वं मानतात. दुर्दैवाने पुष्कळ वेळा गीतकारांना कवीइतका दर्जा मिळातोच असं नाही. गदिमा, शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर यांसारख्या अनेक गीतकारांच्या लेखणीतून उतरलेली कित्येक गीतं कविता म्हणूनही अतिशय दर्जेदार आहेत. वसंत बापटांची आपल्याला ओळख मुख्यतः कवी म्हणूनच आहे. अगदी मोजकी गीतं त्यांनी लिहिली. त्यांत सर्वांत लक्षणीय प्रयोग म्हणावा लागेल या आठ गीतांचा. प्रत्येक गीत हे त्या त्या गणपतीचे वर्णन, त्यामागचा इतिहास/ कथा अशा ताकदीने सादर करते की आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन ही गीतं आपल्यासमोर येतात. अशा अनवट प्रयोगाला संगीत द्यायला संगीतकारही तितक्याच ताकदीचा हवा. आणि यशवंत देवांसारखा शब्दप्रधान गायकीचा पुरस्कर्ता आणि विचारवंत संगीतकार या गीतांना लाभला हे त्या गीतांचं आणि आपलं भाग्य म्हणावं लागेल. देवसाहेब स्वतः कवीही असल्याने कुठल्याही गीताचं संगीत तयार करताना चाल, संगीत आणि स्वर यांत शब्द हरवणार नाहीत याची अतिशय जाणिवपूर्वक काळजी घेतात. किंबहुना 'मी ज्या गीतांना चाली लावतो त्या चाली त्या मूळ काव्यातच दडलेल्या असतात, मी फक्त त्या शोधून काढतो.' असं स्वतः देवसाहेबच आग्रहाने सांगतात. त्यामुळे हा अनोखा प्रयोग अतिशय सुरेल, प्रसादिक पण शब्द- आणि भावप्रधान झाला आहे. उषाताई मंगेशकरांनी आपल्या स्वरांनी सजवलेल्या त्या आठ गाण्यांची ही झलक.

१. सा रे ग म प, म प ध नि सां
मंद्र, मध्य अन् तार
झणाणत उसळे स्वरझंकार
फुलांतून दरवळला गंधार
मयुरेश या वनी प्रकटला मावळला अंधार

२. रमा-माधवांचे जिथे चित्त लागे
जिथे सत्य-चिंतामणी नित्य जागे
तया थेऊराला चला जाऊया
गणेशाप्रती आरती गाऊया

३. चल साधका, चल यात्रिका
चल श्रीगजानन पूजका
चल पाहू त्या वरदायका
चल पाहू सिध्दीविनायका

४. रांजणगांवाला, गांवाला
महागणपती नांदला
चला पहाटे, पहाटे
देव केव्हाचा जागला

५. झुळझुळ वाहे पुण्यजळाचा निर्झर हो
श्रीविघ्नेश्वर-सदन-शुभंकर ओझर हो

६. गणनायका, शुभदायका
यावे तुम्ही गिरीकंदरा
सह्याद्रीच्या हृदयामध्ये
लेण्याद्रीच्या या मंदिरा

७. रचिल्या ऋषि-मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे, झडतो तुझा दिगंत

८. बालभक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा
पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा
जय देव, जय देव

ganesha_2.jpg
लेखाच्या शेवटी लताबाईंनी अमर केलेल्या या गाण्यांचा उल्लेख केला नाही तर लेख अपूर्ण राहिल्यासारखा वाटेल. शांताबाई शेळक्यांनी लिहिलेली आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी चाल दिलेली ही गाणी. गेली कितीतरी दशकं घरोघरचे कौटुंबिक गणपती आणि गावोगावचे सार्वजनिक गणपती ही गाणी ऐकल्याशिवाय कधी साजरे झाले नाहीत. ती गाणी म्हणजे 'गजानना श्री गणराया, आधी वंदु तुज मोरया' आणि 'गणराज रंगि नाचतो-नाचतो, पायी घागऱ्या करिती रुणुझुणु, नाद स्वर्गी पोचतो'.

'सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची' ही श्रीगजाननाची पारंपारिक आरतीही अशीच लताबाईंनी आपल्या स्वर्गीय सुरांनी अमर केली आहे. आरतीनंतर यशवंत देवांनी ज्या धीरगंभीर सुरांत मंत्रपुष्पांजली म्हटली आहे त्याने तर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. अर्थात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लहान वयापासूनच देवसाहेबांच्या वाणीवर वैदिक संस्कृत उच्चारांचे संस्कार झाले होते. त्यामुळे ही आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकली की, विशेषतः गणेशोत्सवाच्या या दिवसांत तर मन झपकन् अनेक वर्षं मागे जातं, मुंबईच्या आमच्या सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात! सार्वजनिक गणेशोत्सव असला तरी अत्यंत विधीपूर्वक, साग्रसंगीत, पंचागात दिलेल्या वेळा पाळून, सोवळ्यांत अशी रोज सकाळ-संध्याकाळ पूजा होत असे. दर वेळेस दहा आरत्या, नंतर 'घालीन लोटांगण' आणि मग मंत्रपुष्पांजली. त्यात जास्तीत जास्त वेळ कोण स्वर लावू शकतो याची जणू स्पर्धाच असे! लहान असताना प्रसाद घेण्यासाठी रांगेत पुढे नंबर लागावा म्हणून पळापळ, थोडी मोठी झाल्यावर स्वयंसेविका म्हणून उत्साहानी उचलेला खारीचा वाटा, निरनिराळ्या स्पर्धांत आणि कार्यक्रमांत घेतलेला भाग आणि दहा दिवस पाहिलेले असंख्य दर्जेदार कार्यक्रम! कालचक्र पुढे सरकतच राहतं, त्याप्रमाणे कदाचित यांत आता काळाप्रमाणे बदल झालेही असतील… पण गणपती म्हटला की मला मात्र आठवतो तो जुना गणेशोत्सव आणि माझ्या मनाच्या खास कप्प्यात राहिलेली ही गाणी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे हि पुर्ण कॅसेट होती(माझ्याकडे पेक्षा आईकडे. आम्ही लहानपणी लावायचो दर गणपतीत).
मला ते रमा माधवांचे जिथे चित्त लागे ते खूप आवडायचे.

छान लिहिले आहे. जगदिश खेबुडकरांनी अष्टविनायका लिहले ह्यावर कधीकधी विश्वास बसत नाही. माझही ते एक अत्यंत आवडतं गाणं आहे.

खेबुडकरांनी अष्टविनायकांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले नसतानाही केवळ पुस्तके वाचून ती गीत लिहिली, तीही अगदी आयत्या वेळी. एका गाण्याला त्यांनी आवाजही दिला आहे.
त्या चित्रपटातली अन्य गीते शांताराम नांदगावकरांची आहेत.
आणखी एक गाणे :
गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या !
इवले इवले डोळे तुमचे
मोठे मोठे कान
येवढे थोरले डोके कसे
पेलते तरी मान
गोरा गोरा पान रंग
मऊ नितळ छान अंग
मोठ्या तुमच्या पोटामधे मोठी माया!
गरगरीत पोटावरी
वाकडी वळे सोंड
सोंडेखाली लपुन बसे
देवा तुमचे तोंड
दोनावरी दोन हात
एकच कसा तुमचा दात?
अजब वाटे रूप असे बघावया!
उंदरावरी बसुन देवा
येते तुमची स्वारी
गोड गोड मोदकांची
आवड तुम्हा भारी
शोभिवंत मखर त्यात
पूजेचाही थाटमाट
आरतीला झांज टाळ्या वाजवाया!
घरी तुम्ही येता तेव्हा
मौज होते मोठी
खिरापत खाऊ मिळे
शाळेलाही सुट्टी
पुन्हा पुन्हा तुम्ही यावे
खेळ सुट्टी आम्हा द्यावे
मागतो मी हेच तुम्हा गणराया
(शांताबाई/गीता दत्त/ संगीतकार माहित नाही)
सुमन कल्याणपुर यांनी गायिलेले 'ॐ कार प्रधान रूप गणेशाचे' शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत हटकून असायचे.

प्रिया, अतिशय सुंदर लेख आणि चांगल्या गाण्यांची आठवण करून दिलीस. गणपतीच्या दिवसांत ही गाणी नेहमीच आठवतात.

ते वरती लिहीलेले 'संकटी रक्षी...' मला आशा भोसलेचे वाटायचे, फारसे ऐकलेले नाही पण लक्षात आहे. खरे म्हणजे गदिमा, आशा, सुधीर फडके यांची गणपतीवरची गाणी माहीतच नाहीत - हे एकच आहे असे वाटायचे. लता आणि उषाची एवढी असताना आशाची कशी नाहीत कोणास ठाउक. कदाचित असतील पण लोकप्रिय झाली नसतील, माहीत नाही.

सुमन कल्याणपूर ची मात्र तेवढीच सुंदर आहेत. वरती तू व भरत ने दोन लिहीली आहेतच, पण आणखी, 'देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावला" आणि "गणाधिपा हो उठा लवकरी..." ही दोनही मला प्रचंड आवडतात.

धन्यवाद या लेखाबद्दल!

प्रिया, माझ्यापण या गाण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.

अजून मोठा पायजे होता लेख.

प्रिया, बरेच दिवसांनी.
ही गाणी ऐकल्याशिवाय गणपति आल्यासारखेच वाटत नाहीत. ते आशालताचे गाणे, सोप्या चालीमुळे लहान मूलांनाही म्हणता येत असे.
पुर्वी फक्त हिच गाणी होती. मग दरवर्षी अनेक कॅसेट्स निघत. पण त्याही गर्दीत, लता, आशा, उषा आणि राधा चा एक संच छान होता. लताचे, हंसध्वनि रागातले, दाता तू गणपति गजानन (मूळ तामिळ रचना, वातामि गणपति) आणि राधाचे, मालकंस मधले, आले रे गणपति आमच्या दारी रे (मूळ रचना, ना मानोगे तो दूंगी तूम्हे गाली रे ) मस्तच होती. आशाचे सुर ताल लय, असे शब्द असलेले गाणे होते.

लताचे, अथर्वशीर्ष पण आवर्जून संग्रही ठेवण्यासारखे आहे.

छान लिहिले आहे. खरंच ही सगळी गाणी खूप सुंदर आहेत आणि कित्येक वर्षे आपल्या गणेशोत्सवाचा एक अविभाज्य भाग आहेत.

सुंदर लिहीलंयस प्रिया Happy
लेख वाचताना ही सगळीच गाणी माझ्या मनात वाजली आणि मीही मनाने माझ्या माहेरच्या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात जाऊन पोचले.

एक सुचवलं तर चालेल का? अष्टविनायकाच्या गाण्यात 'स्वस्ति श्री' ह्या श्लोकानंतर पुढच्या ओळी लिही म्हणजे गाणं पूर्ण होईल;
जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना

सर्वांना लेख वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

मंजूडी, वर लिहिलेले गाणे चित्रपटात जसे आहे तसे लिहिले आहे. तुम्ही लिहिल्या आहेत त्या ओळी ध्वनिफितीवर आहेत, आणखी दोन कडव्यांतही जास्तीच्या ओळी आहेत. पण पडद्यावर कोण आहे ते लिहायचे होते म्हणून मग चित्रपटात जसे आहे तेवढेच घेतले.

धन्यवाद. मी कितीतरी वर्षं शोधत होतो मंत्रपुष्पांजली कुणी म्हटली असेल. मंत्रपुष्पांजली म्हटलं की दोनच आठवणी ... हरीतात्या आणि ही. शेवटी ही म्हणणारे 'वसंतराव देशपांडे' च असतील असा गैरसमज करून घेतला. ह्या केवळ एका माहितीकरता आभार मानावे तितके थोडेच, बाकी सर्व अत्युत्तम आहेच.