मंडळ आभारी आहे !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

माझा यावेळचा भारतदौरा अविस्मरणीय ठरला. इतक्या गावांना जाउन, इतक्या जणांना भेटूनही, मला अजिबात थकवा जाणवला नाही. भारतात गेल्यागेल्या मला माझी पूण्याची भाची भेटायला आली, तिला भेटून मग मी माझ्या बहीणीकडे गेलो.
आणि दुपारच्या विमानाने बंगळुरूला पोहोचलो. तिथल्या रस्त्यावर भटकत असतानाच, मायबोलीकरांचे फ़ोन यायला सुरवात झाली. दुसर्‍या दिवशी सकाळी माझे छोटेसे काम आटपल्यावर मी अश्विनीमामीला फ़ोन केला. (तिला मामी म्हणण्याइतका मी काही लहान नाही. आणि सगळ्यांनी मामी म्हणण्याइतकी ती वयाने मोठी पण नाही ) ती नुकतीच बंगळुरूमधे पोहोचली होती. मग मी टॅक्सी करुन तिला भेटायला गेलो. टॅक्सीवाला रसिक होता, मला तिथल्या अनेक भागांची स्वत:हून ओळख करुन देत
होता. परत ये असे आवर्जून सांगत होता.

मग मी आणि अश्विनी, ठरल्याप्रमाणे तिथल्या लाल्बागेत म्हणजेच बोटॅनिकल गार्डन मधे गेलो. त्या बागेबद्दल मी बरेच ऐकले होते, पण माझा जाण्याचा दिवस चुकला. १५ ऑगष्टच्या निमित्ताने तिथे बहुतेक काहि समारंभ झाला होता. आम्ही गेलो त्यावेळी, त्याची सजावट उतरण्याचे काम चाललेले होते. ती बाग तशी खुपच विस्तीर्ण आहे, बहराचे दिवस नसूनसुद्धा, तिथे बरेच काहि बघण्यासारखे होते. पण आम्ही दोघानी विमानतळापर्यंतच्या प्रवासाचा धसका घेतल्याने, लवकर निघणे भाग होते. तिथे कुठे भेळ खा, कुठे काकडी खा, असे करत वेळ मारत होतो.
माझ्यासारख्या फूलवेड्याला, तिथे अख्खा दिवसही पुरला नसता. आणि या सगळ्या तंगडतोडीत आमच्या अखंड गप्पा मात्र सुरु होत्या. (तिथले काहि फ़ोटो)
bangaluru lalbaug.jpg

हि आहे एका शोभेच्या केळफूलात खाऊ शोधणारी खारुताई
bangaluru lalbaug1.jpg

एक देखणा निळा फूलोरा
bangaluru lalbaug2.jpg

कुठेही कृष्णकमळ बघितले, कि मला त्याचा फोटो घेतल्याशिवाय रहावत नाही

bangaluru lalbaug4.jpg

एक वेगळा झिनियाचा प्रकार

bangaluru lalbaug5.jpg

विमानतळावर तसे लवकरच पोहोचलो. तिथेच मग समोसा आणि कॉफ़ी घेऊन, चेक इन केले. (मी अश्विनीला आणखी काही घेणार का, असे प्रामाणिकपणे विचारले, पण तिला माझ्या सदहेतूबद्दल शंका आली, बहुतेक.)
बोर्डींग अनाउन्समेंट होईपर्यंत आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. माझे विमान होते एअर इंडीयाचे. (बर्‍याच वर्षांनी हे धाडस करत होतो.) मुंबईला नेहमीप्रमाणेच एअर ट्राफ़िक जाम असल्याने, हे विमान घिरट्या घालत घालत, शेवटी एकदाचे मुंबईला उतरले.

घरी येऊन, जेऊन मी लगेच, दादरला आलो. मला तिथून श्रीरामपूरला जाणारी, शिरडी फ़ास्ट पॅसेंजर पकडायची होती. या गाडीची मजाच आहे. मुंबईहून निघताना, ती एक जोडगाडी म्हणून निघते. (विजापूर एक्स्प्रेस बरोबर) आणि मग आकुर्डीला वेगळी होते. मी जी ताणून दिली, ती भल्या पहाटे, पुण्याला चहा प्यायला उठलो.
या गाडीचा स्लीपर डब्बा दोन्हीकडून बंद असल्याने, गाडीत काहि विकायला येत नव्हते. मग मी दारातच उभा राहून नगरच्या हिरवाईचा अनुभव घेत होतो. गाडी तिच्या ठरलेल्या वेळेवर श्रीरामपूरला पोहोचली.
स्टेशनवर नलीनी आणि तिचा कूकू उर्फ़ शांडिल्य आलेच होता. हा कूकू माझा जिगरी दोस्त आहे. स्टेशनपासून तिथून निघेपर्यंत त्याच्याशी मी अखंड खेळत होतो.

हा आहे कूकू

kuku.jpg

नगरला कुणाकडेही गेलो, कि पुरणपोळी, भजी असा साग्रसंगीत बेत असतो, आणि नलीनीकडे आधी अनेकवेळा पुरणपोळी खाल्ल्याने, यावेळी मात्र मला फ़क्त भाजीभाकरीच हवी असा हट्ट केला होता.तेवढ्यातल्या तेवढ्यात मी कूकूबरोबर एक फ़ेरी मारलीच. केवळ दोन तीन तास तिच्याकडे थांबून, मी नगरला आलो. नगरहून फ़ास्ट एशियाड पकडून पूण्याला निघालो. त्याबरोबर पुणेकरांचे फ़ोन यायला सुरवात झाली. सगळ्यात आधी माझा ताबा घ्यायचा सगळ्यांचा प्लान होता, पण बाजी मारली ती माझ्या नायजेरियाच्या मित्राने, विनायकने. माझी एशियाड शिवाजीनगरला शिरल्याबरोबर तो मला भेटला. मला रात्रीच तिथून निघायचे असल्याने, मी कोंडूस्करचे बुकींग स्वारगेटहून करुन टाकले. विनायक बरोबर थोड्या गप्पा मारल्या, आणि त्याचा निरोप घेतला.

नळ स्टॉपवरच्या समुद्र हॉटेलमधे आमचे भेटायचे ठरले होते. मी तसा नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच पोहोचल्याने,बाकिच्यांची वाट बघत बसलो. मायबोलीकर सचिन दिक्षीत, त्याची वाग्दत्त वधू वृषाली, गिरीराज, त्याची बायको शीतल आणि लेक उर्जा, दक्षिणा, सई, सईचा नवरा योगेश, सईचा छोटा नील, आरती, जीएस, मोनाक्षी, कूल असे सगळे जमलो, आणि आरडाओरडा करत आमच्या गप्पा सुरु झाल्या. बर्‍याच वर्षांनी सगळे एकत्र भेटत होतो.
हा आहे आमचा कंपू (यात सगळेच नाही मावले ! )

kampu.jpg

वृषाली अर्थातच आमचा बकरा होती. पण तिनेही आम्हा सगळ्यांचे हल्ले मस्त परतावून लावले.
अगदी दहा, साडेदहा पर्यंत आमच्या गप्पा चालल्या होत्या. परत कधी भेटायचे, असे प्रश्न विचारतच, आम्ही एकमेकांचे निरोप घेतले. गिर्‍या, शीतल आणि उर्जा मला सोडायला स्वारगेट्पर्यंत आले. तिथून मी कोल्हापूरला निघालो.
रात्री बारानंतर बस सुटली तरी पहाटे चारच्या आधीच कोल्हापूरला पोहोचली. कोल्हापूर एस टी स्टॅंडचा परिसर रात्रभर जागाच असतो. गाड्यांची वर्दळही असते. मला तिथून माझ्या आजोळी जायचे होते, पहिली बस होती सकाळी सहा वाजता. तोपर्यंत तिथे टिपी केला आणि मग, मलकापूरला आलो. हा रस्ता पन्हाळा आणि ज्योतिबा यांच्या मधून जातो.
दुथडी भरलेली पंचगंगा (फोटो धावत्या एस्टी मधून काढलाय !)
panchaganga.jpg

तिथे जाऊन अंघोळ वगैरे आटपली तर रत्नागिरीला माझ्या मावसबहिणीकडे पूजा असल्याचे
कळले. मग लगेच कोल्हापूर गणपतीपूळे बस पकडून रत्नागिरीला निघालो. बसमधे नाणिजला उतरणारे बरेच भाविक असल्याने मला जागाच मिळाली नाही. पण मामाने माझा माणूस आहे असे बजावल्याने, मला चालकाच्या शेजारीच बसायला मिळाले. आणि अंबा घाटातला थरार मी मस्त अनुभवला.
(हे फोटोपण धावत्या एस्टीमधूनच काढलेत.)
ambaghat.jpgambaghat1.jpg

रत्नागिरीला मावशीकडे गेलो, आणि मग लगेच मावसबहिणीकडे गेलो, तिथे देवरुखची मावशी पण भेटली. या दोन्ही मावश्यांचा मी लाडका. आईने काय केले असतील, एवढे लाड या दोघींनी केले आहेत माझे. अजूनही करतात. पूजेचे पुरणपोळीचे जेवण करुन, संध्याकाळी परत मलकापूरला.
शाळेत असताना सगळ्या मे महिन्याच्या सुट्ट्या मी मलकापूरला काढलेल्या आहेत. त्या गावाचे मला वेगळेच आकर्षण आहे. छोट्या मामेभावांना घेऊन मी तिथल्या बाजारपेठेत, आडरस्त्याला भटकलो. एका शेतात, मोर बघत बराच वेळ काढला. अंधार पडल्यावर घरी आलो तर मामीने सांज्याच्या पोळ्यांचा बेत केला होता. माझे आजोळ म्हणजे गोकुळ आहे. आजी आजोबा गेल्यानंतर मामा मामीने, आमच्या कौतूकात कसलीच कसर ठेवली नाही. रात्री उशीरापर्यंत गप्पा मारून दमून झोपलो.
पहाटे साडेतीन वाजल्यापासूनच माझे आजोळ जागे होते. मी पण लवकरच उठलो. सकाळची गाडी पकडून कोल्हापूरला आलो. तिथे मायबोलीकर कुलुच्या मामाकडे, त्यानी मागवलेल्या बिया ठेवल्या. आणि माझ्या आवडत्या, महावीर उद्यानात गेलो. (हे उद्यान, अंबाबाईचे देउळ, रंकाळा, लकी बाजार, होता तोपर्यंत शेतकरी बाजार, नवा आणि जूना राजवाडा, ही सगळी माझी आवडती ठिकाणे.) या उद्यानाकडे जाणार्‍या रस्त्यावर पूर्वी एक मस्त वेगळ्या प्रकारच्या,गडद गुलाबी रंगाच्या कॅशियाचे झाड होते (दिप्ती इमारतीचा बाहेर, कुमठेकर फ़र्निचरच्या समोर) बहरले म्हणजे या झाडावर नजर ठरत नसे. पण आता मात्र त्या झाडाची कत्तल झालेली आहे. तशी त्याला नवी पालवी फ़ुटलेली
आहे, पण पुर्वीचा डोलारा तयार व्हायला बरीच वर्षे जातील. तोपर्यंत त्याचा जीव तगेल का, ते सांगता येत नाही.
महावीर उद्यान मात्र अजूनही श्रीमंत आहे. सीतेचा अशोक, कैलाशपति, टॅबेबुया, तामण, करमळ, बॉटलब्रश, कमळ, अशी अनेक फ़ुले दिसतात तिथे.
तिथल्या "पुरुषांसाठी" इमारतीवरची हि वेल.
mahaveer.jpg

तिथलेच एक मस्त रंगाचे कमळ
mahaveer1.jpg

आपला राज्यवृक्ष तामण
mahaveer3.jpg

तिथून परत स्टेशनसमोरच्या राजपुरुषमधे जेवायला आलो. पुर्वी तिथे छान जेवण मिळायचे, यावेळी मात्र दर्जा घसरल्यासारखा वाटला. स्टेशनसमोरच एका दुकानात फ़ायबरग्लासच्या मस्त मुर्ती मिळतात. तिथे गणपतिच्या काहि खास मुर्ती घेतल्या.
कोल्हापूरहून माझ्या मामाचा एक मित्र मला सावंतवाडीला सोडणार होता, त्याच्या बरोबर निघालो. मी त्याच्याकडे फ़ोंडा घाटातून जायचा आग्रह धरला. (आता बहुतेक गाड्या वैभववाडी, गगनबावडा करुळ मार्गे जातात, पण माझ्या लहानपणी कोल्हापूरहून मालवणला जाताना, याच घाटातून प्रवास होत असे.)
राधानगरीच्या स्टॅंडजवळ हिरड्याची दोन झाडे मी अगदी लहानपणापासून बघतोय. ती अजूनही तशीच फ़ळावतात ते बघून खुप छान वाटले.
राधानगरी धरणापासून, दाजीपूरपर्यंतच्या रस्त्यात सहसा कुणीही गाडी थांबवत नाही. सध्या तिथे काहि वाड्या दिसल्या, पण पुर्वी या रस्त्यावर गाडी थांबवत नसत. अनेकदा गवे आडवे येत. या जलाशयाच्या बाजूबाजूने रस्ता पुढे जातो, त्यावेळी आपल्याला उंचीचा अंदाजच येत नाही. पण जिथे कोल्हापुर जिल्ह्याची हद्द संपते, तिथून प्रचंड खोल दरी दिसते. लहानपणी मी तिथे बघायचेहि टाळायचो. यावेळी तिथे दाट धुके होते.
तिथून फ़ोंडाघाटाची उतरण सुरु होते. अत्यंत थरारक असा हा उतार आहे.

साधनाने मला अंबोलीचे आमंत्रण दिले होते. तसा अंबोलीला अनेकवेळा गेलोय, पण श्रावणात कधी जमले नव्हते जायला. अंबोली घाटात दरड कोसळ्याने, सावंतवाडीशी संपर्क तूटलेला होता. पण दोनच दिवसांपूर्वी, छोटी वहाने जाण्याइतपत रस्ता मोकळा केलाय, असे कोल्हापूरला कळले होते. तो नसता झाला तर मला आजर्‍याहून जावे लागले असते, पण आजर्‍याला मी यापुर्वी एस्टीने वा गाडीने गेलो होतो. तिथे कधी थांबलो नव्हतो. त्या भागाची तशी काही माहितीही नव्हती. म्हणून मी सावंतवाडीचा पर्याय निवडला.
तिथून एक रिक्षावाला सहज तयार झाला. भल्या सकाळी तो प्रवास निखळ आनंददायी होता. रिक्षावाल्याने सांगितल्याप्रमाणे ७२ वळणे पार करत तिथे पोहोचलो. वाटेत बरेच धबधबे दिसतात.
साधनाने अगदी नकाशा वगैरे पाठवल्याने, घर सहजच सापडले. तिथे ती पंकज उभयता आणि सुनील
भेटले. तेवढ्या गडबडीत साधनाने बटाटेवडे केले. मग आम्ही धबधब्यावर गेलो. नेहमीच्या मानाने गर्दी
फ़ारच कमी होती. माझ्या हातातले एक कणीस माकडाने जवळजवळ हिसकावूनच घेतले. (त्याआधी
सनसेट पॉइंटवरच्या देवळाजवळ, मी आणि पंकज घसरुन पडल्याने, प्रत्येक पाऊल जपूनच टाकत
होतो.) मी मात्र तिथे भिजणे टाळले.
तिथे एक नवपरिणीत जोडपे आले होते. त्यातली नवरी शालू वगैरे नेसूनच धबधब्यात गेली. तिथेच
आम्हाला दोन मोठी फ़ुलपाखरे दिसली. (पुढे प्रत्येक ठिकाणी ती दिसत राहिली.) महादेवगड पॉइंटवर
पण डोकावलो.
परत घरी येऊन थोडेफ़ार खाऊन आम्ही कावळेसाद पॉइंटवर गेलो. तिथे जायला रस्ता नव्हता, तिथे
संरक्षक कठडे नव्हते, त्यावेळेपासून मी तिथे जातोय. आता बर्‍याच पुढे रस्त्याने जाता येते.
तिथे मेंढीगवत म्हणून एक अनोखा प्रकार साधनाने दाखवला. आता तिथे कठडा झाल्याने सुरक्षित
वाटते. तिथे धुक्याचा अनोखा खेळ अनुभवला. आता होता, गेला कुठे, असा खेळ, प्रत्येक धबधबा
खेळत होता. वारा नसल्याने, उलटा उडणारा धबधबा मात्र अनुभवता आला नाही. तिथे बराच वेळ
आम्ही काढला. मग हिरण्यकेशीच्या उगमाकडे गेलो.
या ठिकाणी जायचा रस्ता चांगला चढउताराचा आहे. या रस्त्याने मी अनेकवेळा पायी गेलो आहे,
पण यावेळी मात्र गाडीने गेलो. मधेच मला एक मोठे फ़ूलपाखरु दिसले. मी पंकजला गाडी थांबवायला
लावली. त्या फ़ूलपाखराने, आम्हाला बराच वेळ मनसोक्त फ़ोटो काढू दिले. प्रत्यक्ष उगमाकडे
जाणारा रस्ता, आता बराच नेटका आहे. उगमाजवळच्या कुंडातही पुर्वी डुंबलो आहे, पण आता
गाडीची वेळ होत आल्याने, आमची घाई घाई होत होती. साधनाच्या काकांकडे थोडावेळ टेकलो.
त्यांचे गणपतिच्या मुर्ती करण्याचे काम जोरात चालू होते. इतक्या जवळून मुर्ती घडवताना
पहिल्यांदाचा बघत होतो.
अंबोलीचे काही फोटो, प्रतिसादात टाकतोय.

मग स्टॅंडवर आल्यावर कळले कि गाडीला थोडा उशीर आहे. मग तिथेच जेवायला गेलो.
काळ्या वाटाण्याची उसळ, सोलकढी, खोबरे घातलेले वरण, भेंडीची भाजी असा खास
अंबोली मेनू होता. अपेक्षा नसताना एसटी वेळेवर आली. (कंडक्टर साहेबांनी आम्हाला
खास गप्पा मारण्यासाठी वेळ दिला.) उत्तूर, आजरा, निपाणि कागल मार्गे कोल्हापूरला
आलो. आजर्‍याचे जंगल अजून तसेच आहे, हे बघून खुप छान वाटले.

कोल्हापूरला आलो, तर गाडी सुटायला जरा वेळ होता. मग लकी बाजारमधे गेलो.
तिथे गेलो कि, काहि खास प्रकारचा तांदूळ मी नेहमीच घेतो. मग घरी नेण्यासाठी
कंदी पेढे घेतले. आणि एक महत्वाचे काम म्हणजे सोळंकी कडचे स्पेशल कॉकटेल
आईसक्रीम खाल्ले. ( हे मी जेवणाला पर्याय म्हणुन खाल्ले !)

रात्री बारा वाजता निघालो ते भल्या पहाटे मुंबईला आलो. योगेश चे अंबोलीला येणे
काहि कारणांसाठी रद्द झाले होते, त्यामूळे त्याला भेटायचे राहिलेच होते. माझा राणीच्या
बागेत जायचा प्लान होता. तिथली काहि दुर्मिळ झाडे बघितल्याशिवाय मला चैन पडत
नाही. लोकांचा झाडांना होणारा त्रास वाचावा, म्हणुन तिथल्या अनेक झाडांवरच्या पाट्या
आता काढून टाकल्या आहेत. पण मला असलेली माहिती, कुणातरी जबाबदार माणसाला
द्यावी म्हणून मी योगेशला तिथे बोलावले होते.

तिथल्या कलाबाशच्या दुर्मिळ झाडावर आता गदा आलीय, पण गोरखचिंच, गायत्री,
विषवल्ली, मणिमोहोर, कनकचंपा, नागचाफ़ा, सुवर्णपत्र, नोनी, कॅशिया, उर्वशी अशा
अनेक झाडांची त्याला ओळख करुन दिली. आता दुरदेशी असलो, तर त्याच्या प्रचिमधून
त्या फ़ूलांचे दर्शन होत राहील.

मग आम्ही चौपाटीवरच्या न्य़ू यॉर्करमधे खास फ़लाफ़ल आणि छोले भटुरा खायला गेलो,
मग चौपाटीवरची प्रसिद्ध कुल्फ़ी खाल्ली. आणि मग चर्चगेट ते व्हीटी करत घरी.
आता भारतातला शेवटचा दिवस हातात होता. लॅमिंग्टन रोडवर काही वस्तू घ्यायच्या
होत्या, त्या घेण्यासाठी गेलो. आता तिथपर्यंत गेलोच होतो, तर मेरवानजीचे मावा केक
सोडीन का ? (हा केक ४० पैश्याला मिळत होता तेव्हापासून खातोय. आता तो ७
रुपयाला मिळतो, आणि आकारपण बराच छोटा झालाय.)

यावेळेची ट्रिप, माझ्या थॉमस कूक मधल्या मैत्रिणीने सगळे बुकिंग करुन ठेवल्याने,
अगदी मस्त पार पडली. माझ्या बॅटर्‍या चार्ज करण्याचे काम, नेहमीच मायबोलीकर
करत आलेत. ते यापुढेही करणार आहेतच.

मुद्दाम लिहायची गरज अजिबात नाही, तरीपण लिहितोच.
मंडळ आभारी आहे.

विषय: 
प्रकार: 

वा! मस्त फ्रेश फ्रेश करणारा वृत्तान्त व प्रचि! दिनेशदा, तुमची पुण्याची भेट मिसली मी..... असो! खूप फिरलेले दिसता..... तुमच्या उत्साहाला दंडवत! Happy वर्णने नेहमीप्रमाणेच मस्त!

अरे वा मस्त वृतांत आणि भारी फोटो.
पण तुम्ही पुण्याला येणार हे माहितीच नव्हतं. मी मिसली तुमची भेट . आता पुढच्या वेळेस नक्की .
फोटोबरीक फारच मस्त ! ते पिवळे कमळ कसलं सुंदर आहे !
धन्यवाद दिनेशदा !

किती कमी वेळात सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न.... कमाल आहे तुमची Happy
फोटो एकदम मस्त , पिवळ्या रंगाचे कमळ खासच Happy
कुकुपण एकदम गोड Happy

तुमचा ऊत्साह नुसताच वाखाणण्यासारखा नाहि तर घेण्यासारखा आहे. वर्णन व फोटो मस्तच.

सगळ्यांना आवडला का ? छान.
ज्यांना भेटू शकलो नाही, त्यांना भेटायला मला पण आवडले असते, पण ..
माझे प्लानींग असे होते (आणि ते व्यवस्थित पारही पडले.)
१५- दुपारी २ वाजता मुंबईला आलो. पूण्याची भाची आणि जावई, ५ वाजता भेटायला आले
मग डोळे तपासून घेतले आणि बहिणीकडे कालिनाला गेलो.
१६-सकाळि बॅंकेची कामे, दुपारच्या विमानाने बंगळुरुला. तिथे रात्री थोडे भटकलो, हॉटेलमधे मुक्काम
१७- सकाळी एक मिटींग, मग लालबागेचा दौरा, संध्याकाळच्या विमानाने परत मुंबईला, रात्री अकराची गाडि, पकडून श्रीरामपूरला.
१८- साडेनऊ ला श्रीरामपूरला उतरलो, तिथुन १ वाजता निघून, ३ वाजता नगर, साडेसहाला पुणे, तिथून रात्री अकराच्या बसने कोल्हापूरला
१९- सकाळि ४ ला पोहोचलो, साडेसात मलकापूर, साडेअकरा रत्नागिरी, संध्याकाळो ६ ला मलकापूर. रात्री तिथे मुक्काम
२०-सकाळी ९ ला कोल्हापूर, दुपारी ३ वाजता निघून ७ वाजता सावंतवाडी, तिथे मुक्काम
२१-सकाळी सावंतवाडीहून निघून साडेनऊला अंबोली, दुपारी साडेचारच्या एस्टीने निघून, साडेआठला कोल्हापूरला, रात्री अकराच्या बसने मुंबईला
२२-दुपारि राणीची बाग, संध्याकाळी, सिडीज वगैरे खरेदी
२३-लॅमिंग्टन रोडला खरेदी, दादर माटूंगा येथे खरेदी, संध्याकाळ घरीच
२४-सकाळी पावणे दहाचे एमिरेट्स पकडले.
बहुतेक सर्व बुकींग्ज आधीच केली होती. सगळ्यांना भेटायचे दिवस आणि वेळाही आधीच ठरवल्या होत्या.
आर्च, भारतात रेष्टरुम्सची वानवाच आहे, पण आता व्होल्वो बसेस आणि चांगले रस्ते यामुळे प्रवासाचा त्रास होत नाही. शिवाय हा ऋतू पण योग्य ना, प्रवासाला.

खरे तर अंबोलीसाठी रिक्षा फ़िरवणार होतो, पण दरड कोसळल्याने आणि पावसामूळे ते टाळले, पण आणखी कुणी आले असते तर साधनाला आणि मलाही आनंद झाला असता.

आरती२१, अरुंधती पुढच्या वर्षी नक्की भेटू.

मामी, हो माहेरपणच हो, किती लाड करतात माझे, हे सगळे.

डॉ. ऋयाम, कदाचित त्या दिवशी ग्राहक नसतील म्हणून, साधे जेवण असेल राजपुरुषमधे.

चिंगी, कष्टर्ड ला अंड्याचा वास येतो, म्हणून आईने घरात आणू पण नसते दिले, श्रावणात.

धनश्री, बंगळुरुमधे आपली माणसे आहेत, हे लक्षातच आले नव्हते. एक संध्याकाळ मोकळी होती.

जागू, खोबर्‍याचे झाड वेगळे. त्याची पाने लहान असतात. तामणीची खुप मोठी असतात. असला तर टाकतो फ़ोटो. बाकि अंबोलीला खुप आठवण काढली. कुठलेही नवीन झाड दिसले, कि याची भाजी कशी करतात, ते जागूला विचारायला पाहिजे असे म्हणायचो.

माझ्या आठवणीतली काही झाडे आता तिथे नाहीत, हे फ़ारच लागते मनाला. योगेश आता तिथली प्रचि काढेल, याचा खुप आनंद झाला.

अंबोलीत यावेळी खुप फ़ूलपाखरे दिसली, पण नेहमीची फ़ूले मात्र नाही दिसली.

ते पिवळे कमळ महावीर उद्यानातले. तिथे वसंत ऋतूमधे, टॅबेबुयाचा पिवळा, अशोकाचा लाल नारिंगी, बॉटलब्रशचा लाल, कैलाशपतीचा मोतिया, गुलमोहोराचा लालभडक, तामणीचा गुलाबी जांभळा, कॅशियाचा पांढरट गुलाबी अशी रंगपंचमी असते. पावसाळा सुरू होता होता, करमळीचे झाड, ओंजळीएवढ्या शुभ्र फ़ुलांनी भरुन जाते. (पाच भल्यामोठ्या शुभ्र पाकळ्या, त्यात बदामी रंगाचे शेवंतीसारखे फ़ूल, आणि त्याच्या आतमधे भलेमोठे जाईचे फ़ूल असे याचे रुप असते. हा सगळा पसारा चांगला आठदहा सेमी व्यासाचा, पण फूलण्याचा काळ अगदी थोडा.)

बाकी बस्के, प्रिती, वत्सला, वर्षू, सावली, पक्का भटक्या, श्री, योगमहे, जयश्री, इंद्रा,
नीलू, सचिन, अश्विनी के, रैना, मंजूडी, आशुतोष, प्रसिक, वर्षा_म, जुयी, सुनिल आणि तमाम रोमवासी ...
वेगळे काय लिहू ? मंडळ आभारी आहे.

चांगली भटकंती झालेली दिसते. कोल्हापूरला एवढा कमी वेळ? लकी बझार मात्र वेळ घालवायला (आणि पैसे) एकदम छान आहे.
सईबाई बरेच दिवसांनी दिसली.

दिनेशदा, मानलं हो तुम्हाला!! पीएमच्या वरताण बिझी शेड्युल होतं तुमचं. एवढ्या ठिकाणी फिरलात, आणि एवढ्या लोकांना भेटलात!! वृत्तांत मस्त आणि फोटो पण नेहमीप्रमाणे छान. देवरुखला तुमचं कोण असतं? माझं आजोळ देवरुखचं आहे.

आर्या, राणीच्या बागेतली झाडे बघण्यासाठी मार्च एप्रिल, म्हणजे आपल्याकडचा वसंत ऋतू चांगला. सगळी झाडे बहरात असतात.
यो रॉक्स, योगेशकडून सगळ्यांची खबरबात कळली. प्रत्यक्ष भेटायची इच्छा मलाही आहेच.
धनूडी, विपूत लिहितो.

मस्त फोटो. खरं तर यावर्षी आंबोली घाटाचं ठरत होतं. कोकणात होतो १० दिवस. पण घाट कोसळला.
तेव्हा असे दर्शन तरी झाले... Happy

मुंबईहून निघताना, ती एक जोडगाडी म्हणून निघते. (विजापूर एक्स्प्रेस बरोबर) आणि मग आकुर्डीला वेगळी होते. मी जी ताणून दिली, ती भल्या पहाटे, पुण्याला चहा प्यायला उठलो. दिनेशदा हे आकुर्डी कुठे आहे ? जंक्शन आहे का?

लालू, सई हल्ली रोमात असते. तिला निरोप दिला आहे.
विनय, दरड कोसळल्याने अंबोलीतील लोकांच्या व्यवसायावर फारच परिणाम झाला. हेच दिवस त्यांच्या कमाईचे असतात. तो भाग जरा धोकादायक झालाय खरा, पण छोट्या गाड्या जाऊ शकत होत्या. पण आजर्‍याहून रस्ता चांगला आहे.
नितीन, बहुतेक पुणे आणि नगर च्या मधे आहे. मुंबईहून निघालेली शिरडी फास्ट पॅसेंजर एकदम उलट्या दिशेने चालू लागली, तेव्हा लक्षात आले !!

मस्त रे तुझ्या पायाचा एक फोटो टाक, पायाला भिंगर्‍या असणे म्हणजे काय ते बघायचे आहे. बंगळूरात आलास अरे भेट झाली असती ना कित्येक वर्षांनी, Sad

दिनेशदा किति भटकंति केलित तुम्हि, तुमच्या उत्साहाला काहि तोड नाहि .
राणीच्या बागेतली झाडे खरच खूप छान आहेत तुमच्या सोबत आलो होतो तेव्हा मजा आलि होति :)(त्या दिवसांचि आठवन आलि )
आता निमिष ला घेऊन जायचि इच्छा आहे तिथे पन सोबत तुम्हि असायला हवेत.... Happy

अहो langimgton रोड वर एक खूप जुना सामोसेवला आहे...त्यासारखे सामोसे मी कधीही कुठेही खाल्ले नाहीत...जगातील उत्तम सामोसे...v .p .रोड च्या अलीकडे कृष्णा हाटेलच्या जवळ आहे हे दुकान..
आणि हो राव डॉक्टरच्या दवाखान्याकडे जा एका संध्याकाळी...त्याजवळ मेट्रो शूज चे दुकान आहे...त्या गल्लीत असेच छान डोसे मिळतात...जाच एकदा..

मुंबईत गेले कि हि दोन माझी आवडती ठिकाणे आहेत.

सत्या, भारतात आलो कि भटकंती, नाहीतर घर न हापिस अन हापिस न घर !!
चंपक ते फोटो आहेत अजून माझ्याकडे, या परत तिघांनी.
शिल्पा, आता हुरहुर लागली !!

यावेळेस घरच्या पीसी मधले जूने फोटो घेऊन आलो.

डाव्या कोपर्‍यात माझ्या आजोळच्या एका टेकडीवर दिसलेला वेगळा सरडा (त्याच्या गळ्याला मोरपिशी आयाळ होती. पावनखिंड (हि माझ्या अजोळपासून जवळच आहे ) खास कॅशिया (कोल्हापूरचा, ज्याची आता कत्तल झाली आहे. दूरचा फोटो आणि फुलांचा क्लोजपही ) आणि काहि वर्षांपूर्वीची अंबोली. त्यावेळी कावळेसादला संरंक्षक कठडा नव्हता. (तिथे कड्याच्या कडेला झोपलेला दिसतोय तो मायबोलीकर गिरीराज.)

aaThavaNee.jpg

असा जर प्रवास असेल तर बाहेरचे खाणे मी टाळतेच पण पाणी पिणे मस्ट.. ..
हे वाचल्यावर माझ्या डोक्यात एकच प्रश्ण सर्वात आधी आला, तोच जो आर्च ने वर विचारला.. भारतामध्ये इतका प्रवास करताना हा एक त्रास आहे.
बाकी असा प्रवास करायला मज्जाच. मला तर आवडेल. एखादी बॅग काखोटीला मारून प्रत्येक ठिकाणी कोणाच्या ना कोणाच्या घरी भेटून मस्त घरगुती जेवण जेवून.. आजूबाजूला फिरायचे. Happy

हो मनःस्विनी, तेवढी एक गैरसोय वगळली, तर मायबोलीकरांच्या अगत्याला तोड नाही. गावोगाव मुक्काम करायला हक्काची घरे आहेत, आपल्याला.

भारतात जाऊन ठरल्याप्रमाणे भेटी होणे हे खरच भारी.

मी तसा नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच पोहोचल्याने,बाकिच्यांची वाट बघत बसलो. >>> ते कस्काय बॉ ? तुमचा ताबा घ्यायला आतुर असलेले लोक भलतीकडेच गेले की काय Uhoh

Pages