माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.
अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.
'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.
तर, ह्याच विषयाशी संबंधीत माझी ही अवांतर चिडचिड.....
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
चिडचिड क्रमांक एकः गुन्हेगार आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
(१) संजय दत्त हा विविध आरोपांखाली मुंबई बाँबस्फोट खटल्यात अडकला आणि निकालात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वगैरे आरोपांखाली दोषी आढळला. त्यानंतर सामान्य जनतेने त्याच्यावर बहिष्कार घालायचं सोडून संजूबाबा संजुबाबा म्हणून डोक्यावर घेतलं, त्याचे अनेक चित्रपट लोकांनी उचलून धरले. सर्वसामांन्यांकडून देशद्रोह्याला हा असा पाठिंबा?
सायरा बानूला लगेच आपल्या धर्मभगिनीच्या मुलाचा पुळका आला आणि तिने "इस लडके को इतना पर्सिक्युट किया गया है...." असे एका वृत्तवाहिनीवर तारे तोडले ते वेगळंच. शिवाय तो सहा वर्षांसाठी तुरुंगात गेल्यास तो काम करत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच कसं कोट्यावधींच नुकसान होईल वगैरे बकवास हिंदी चित्रपट क्षेत्रातील तथाकथित विद्वानांनी सुरु केलीच. म्हणजे ह्यांनी गुन्हा केला त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल कायद्याप्रमाणे शिक्षा होणं महत्वाचं नाही, पण तुमच्या नसण्यानं किती आर्थिक नुकसान होईल आणि ते टाळता कसं येईल किंवा भरून कसं काढता येईल ते महत्वाचं! बाकी देश, कायदा, वगैरे सटरफटर गोष्टी नका हो सांगू यांना!!
(२) "हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्या महिलांच्या तोंडून हे असले उदगार? हरे राम!
(३) उपरोल्लेखित डॉन महाशयांची ठेवलेली बाई म्हणजेच रखेल म्हणजेच हिंदी चित्रपटातील दुय्यम नटी मोनिका बेदी हिचा एका रिअॅलिटी शो मध्ये सहभाग आणि एका दिवंगत राजकीय नेत्याच्या मुलाने तिच्याबरोबर केलेली सलगी वजा लगट - अनेक लोकांनी हाही कार्यक्रम चवीने बघितला आणि ट्रेन आणि बस मध्ये, नाक्यावर वगैरे कोण कसं दिसलंय याच्या जोरदार चर्चा झडल्या. ह्या कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. मग मालिका निर्मात्यांनी जर "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद केल्यास त्यात चूक काय?
(४) पुढे ह्या आणि अशा अनेक प्रकारे शेण खाल्लेल्या तसंच मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे पहिल्या बायकोने घटस्फोट दिलेल्या या नेतापुत्राचं एका वाहिनीनं चक्क स्वयंवर मांडलं. त्याचा हा इतिहास ठाऊक असूनही देशभरातून मुलींची ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झुंबड उडाली. कार्यक्रम सुरु असतानाही ह्या दिवट्याचे वेडेचाळे सुरुच. कार्यक्रम त्या वाहिनीवर सुरु झाल्यावर चक्क गगनभेदी टी.आर.पी.
या स्वयंवरात 'निवडलेल्या' दुसर्या बायकोलाही मारहाण आणि शिवीगाळ झाल्यावर तर कहर झाला. खेळ, शेती, हवामान, भाववाढ, पाऊस, महागाई, जागतिक घडामोडी वगैरे सारख्या बातम्या तीन-चार दिवस चक्क दुय्यम ठरल्या. पुढे साहेबांनी बायकोबरोबर प्रभादेवीला सिद्धीविनायक दर्शन कसं घेतलं, आम्ही आता सुखाने संसार कसा करू वगैरे टँण टँण टँण पद्धतीने मुलाखती दिल्या. हेही सगळं लोकांनी उत्साहाने पाहिलं.
(५) हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानला एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याची शिकार केल्याबद्दल अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!!
काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं. नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअॅलिटी शो यामधून झळकला आणि लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला.
या सगळ्यात मिडीया कसा पिसाटल्यासारखा करत होता त्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
तुरुंगात असताना सलमानने कुठली भाजी खाल्ली, त्याच्या नेहमीच्या आवडी-निवडी काय ह्याची चवीने अक्षरशः दिवसभर चर्चा सुरू होती. संजय दत्त तुरुंगात कसा सुतारकाम शिकला हेही समजलं. तो तुरुंगात किती शांत असतो वगैरे आवर्जून सांगितलं गेलं.
पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी ह्या घटिंगणांवर बहिष्कार घालायचं सोडून त्यांना एखाद्या महात्म्याप्रमाणे वागणूक द्यावी हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्यांना बहिष्काराच्या मार्गाने धडा शिकवायचा सोडून त्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची ह्याला काय म्हणावे?
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
चिडचिड क्रमांक दोनः लोका सांगे ब्रह्मज्ञान...
मला काही दिवसांपूर्वी आंतरजालावरून फिरत फिरत एक विपत्र आलं होतं, त्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या त्या गुन्ह्याप्रमाणे होणार्या दंडाची रक्कम किती याची यादी दिली होती. म्हणजे सिग्नल तोडल्यास किती दंड, नो एन्ट्री मध्ये शिरल्यास किती दंड, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास किती दंड, वगैरे. कारण अर्थाच की पोलीस वाट्टेल तो दंड आकारतात आणि पावती देत नाहीत. ते विपत्र कितीही उपयोगी असलं तरी मला अंमळ गंमतच वाटली. कारण तोपर्यंत आणि हा लेख लिहीपर्यंत वाहतूकीच्या नियमांचं पालन कसं करावं यासंदर्भात एकही विपत्र असं आंतरजालावर फिरताना आढळलं नाही किंवा मला कुणी पाठवलं नाही.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
चिडचिड क्रमांक तीनः स्वतःकडे तीन बोटं
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीमधला किस्सा ऐकण्याचा योग आला. कंपनी व्यवस्थापनाने 'ओपन फोरम' सभा आयोजित केली होती. त्यात काही कर्मचारी 'कँटीनमध्ये असणारा स्वच्छतेचा अभाव' या विषयी तावातावाने बोलत होते.
अॅडमिनच्या व्यवस्थापक साहेबांनी प्रश्न केला "नक्की कसली अस्वच्छता असते?"
जी उत्तरं आली त्यात प्रामुख्याने कँटीनमध्ये अर्धवट खाल्लेल्या बिस्किटांचे पुडे, शीतपेयांचे रिकामे कॅन, चॉकलेट वगैरेंचे इतस्ततः पडलेले कागद, सिगरेटची थोटके, इत्यादींचा समावेश होता. अर्थातच कँटीन प्रशासनाकडून हा कचरा कसा वेळेवर साफ केला जात नाही ही मु़ख्य तक्रार होतीच.
"ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो," व्यवस्थापक उत्तरले, "पण मला एक सांगा, हा कचरा कोण करतं?"
उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली. आता कुणीही उत्तर द्यायला पुढे येईना.
"मी सांगतो ना, तुम्हीच," व्यवस्थापकांनी बाँब टाकला.
"कॅंटीनमध्ये कोण खातं? तुम्ही." आता व्यवस्थापक साहेबांचा आवाज किंचित चढला होता.
"कॅंटीनमध्ये योग्य जागी कचर्याचे डबे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करण्याऐवजी टबलांवर, खुर्च्यांवर, आणि जमिनीवर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी कोण टाकतं किंवा तशाच ठेवतं? तुम्ही."
"सगळेच असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत ते इतरांना हे करण्यापासून परावृत्त का करत नाहीत? ऐकलं नाही तक्रार/सुचना करण्यासाठी पत्रपेटी ठेवलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष कोण करतं? तुम्ही."
पुढे काही सुधारणा झाली की नाही ते समजलं नाही, पण स्वच्छतेबद्दल कंपनी व्यवस्थापनाला जाहीर दोष देणार्यांची तोंड निदान तेव्हा तरी बंद झाली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
तर माझी चिडचिड होण्याची ही काही कारणं. समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणार्यांविषयी तुमचा काय अनुभव आहे?
मंदार अगदी माझ्या मनातलं
मंदार अगदी माझ्या मनातलं लिहिलं आहेस.
अरे जरा नगरला येऊन बघ. रस्ते इतके भयानक आहेत की अगदी लाज वाटते...वाटतं ..एकाद्या खेड्यातही यापेक्षा बरे रस्ते असतील.
आमच्या शेजारी एक नगर सेवक रहातो. त्याच्या मुलाचा डॉल्बी सिस्टिम्सचा धंदा आहे. तो मधेच एकदम ढँण ढँण म्यूझिक सुरू करतो....दिवस पहात नाही रात्र पहात नाही. घराच्या काचा अक्षरशः थरथर कापत रहातात. मी चौकशी केली तर उत्तर मिळाले की आम्हाला टेस्टींग करावे लागते. आपण करतो याच कुणाला त्रास होत असेल, किंवा हा आवाज इरिटेटिंग आहे..हे त्यांच्या गावीच नसते.
मला कळत नाही त्याचं कुटुंब आत्तापर्यंत ठार बहिरं कसं झालं नाही?
दिनेशदा, अगदी बरोबर. पण
दिनेशदा, अगदी बरोबर. पण कधीकधी ह्या क्रृतीमुळेही त्रास होतो. एक प्रसंग सांगते. मी माझ्या कुटुंबाबरोबर वाशीच्या एका मॉलमध्ये गेले होते. कधी नव्हे ते मी आणि आई लेडिज वॉशरूममध्ये गेलो. तिथे काही बायका आपल्या मुलांसोबत होत्या पण विचारल्यावर त्या क्यूमध्ये नाहीत असं कळलं. सगळे टॉयलेट्स occupied होते. अगदी समोर उभं रहायला कसंतरी होतं म्हणून मी आणि आई तिथे बाजूला बोलत उभ्या राहिलो.
एव्हढ्यात एक बाई आली - पन्नाशीतली असेल. २ मिनिटात एक टॉयलेट फ्री झाला. मागेपुढे न पहाता ही बाई तीरासारखी आत घुसायला लागल्यावर माझं तर डोकंच फिरलं. मी तिला सरळ विचारलं की आम्ही दिसत नाही का तुम्हाला? आम्ही क्यूमध्ये आहोत का असं विचारावंसं वाटलं नाही? आमचा वेळ जात नाही म्हणून थांबलोय का? तर माझ्याशीच भांडायला लागली की मोठ्या लोकांशी कसं बोलायचं माहित नाही का म्हणून.
ज्यात त्यात आपलं वय पुढे करून कसंही वागणारे सिनियर सिटिझन्स हा आणखी एक चिडीचा विषय. (काही न करता आणखी काही वर्षांनी मीही ६० होईन त्यात दुसर्यावर उपकार आहेत का काही?) त्यामुळे मी आणखी चिडले. सरळ म्हटलं तुम्हाला सिव्हिक सेन्स नाहीये त्यामुळे तुमच्याशी असंच बोललं पाहिजे. मग तणतणत बसली. :रागः
तोंडावर हात न घेता रस्त्याने खोकत जाणारे, सिगरेट किंवा विडी फुकून धूर दुसर्याच्या तोंडावर सोडत जाणारे - फार मोठी यादी आहे. कधी कधी वाटतं आपण कधीच सुधारणार नाही. नागरिकशास्त्र शिकवायच्या ऐवजी मुलांना हे असे मॅनर्स शिकवले तर निदान पुढची पिढी सुजाण होईल. नाहीतरी एव्हढं घोकून आमदार आणि खासदार ह्यातला फरक काय तो कुठे आठवतोय आता?
LOL नितिनभाऊ! अगदी मान्य पण
LOL नितिनभाऊ! अगदी मान्य
पण इथे मात्र इथल्या "लोकान्ना" काही एक सान्गताना मी त्यान्ना आधी लोकं समजत नाही, मायबोलीकर समजतो, अन सान्गण्यामागचा उद्देश असा की पटल तर घ्याव, नैतर सोडून द्याव, सोडून दिल तरी आताशा माझी चीडचीड होत नाही!
[नेट सोडून, व्यक्तिगत बाह्य जीवनात मी स्वतःहून कुणालाही काहीही सान्गायला जात नाही! उपयोग होत नाही हे केव्हाच कळून चूकलय, अन दिलेल्या महत्वपूर्ण पण फुकटच्या सल्ल्याची विल्हेवाट टॉयलेटपेपरच्या लायकिनेच लावली जाते हे अनुभवलय! सबब कानाला खडा!]
छान लेख मंदार माझीहि चिडचिड
छान लेख मंदार

माझीहि चिडचिड होते , जेव्हा माणसे सरड्यासारखे रंग बदलतात तेव्हा म्हणजे स्वतःचे काम असताना गोड बोलून वेळ निभवायची , आणि नंतर मात्र सराईतपणे विसरून जायचे
पण हे मात्र खर आहे चिडचिडकरून काहिच उपयोग होत नाही, फक्त आपल्याला मानसिक त्रास मात्र होतो खरा...
कुणाकुणावर आणि किति चिडणार ?
कुणाकुणावर आणि किति चिडणार ? लोकल ट्रेनमध्ये काहिबाहि खाऊन सिटखालि रॅपर टाकणारि माणस जेव्हा मि शेंगदाण्याचि रिकामि प्लॅस्टिकचि पिशवि माझ्या बॅगेत ठेवतो तेव्हा बरेचसे माझ्याकडे बघुन हसतात.आपण शिक्षित आहोत सुशिक्षित नाहि , हे समजल कि चिडचिड होत नाहि.
हिंदी चित्रपटातल्या आयटम
हिंदी चित्रपटातल्या आयटम सॉन्गजवर अचकट-विचकट नाच करणारी छोटी मुलं. ह्यांच्या आईवडिलांना शोधून काढून त्यांच्या कानाखाली आवाज काढावासा वाट्तो.>>>>>>
आयच्यान हे खरंच, अगदी अगदी...
मंदार छान लिहलंत आपण, आवडेश!
चिडचिड क्रमांक एकबद्दल : ते
चिडचिड क्रमांक एकबद्दल : ते गुन्हेगार चीड यायच्या पलीकडचे प्रकार आहेत. पण मीडियाची चीड यायची. यावर उत्तम उपाय शोधून काढलाय्...फक्त दूरदर्शनवरच्या बातम्या पाहायच्या. डीडी न्युज.
समाजातल्या चीड येणार्या अनेक गोष्टी आहेत्...त्याबद्दल लिहिले तर इथेही काही लोकांना चीड येऊ शकते.
आमच्या सोसायटीचा वॉचमन : पाणी वाया घालवण्यासाठीच त्याचा जन्म आहे. सोसायटीतल्या गच्चीवरल्या ६ टाक्या आणि एक भूपातळीवरची एक मुख्य टाकी यात दिवसाआड एक वाहून गेलीच पाहिजे. हे काम करण्यासाठी म्हणून त्याने नोकरी धरलेली आणि त्या जोरावर मोटारी धुणे, लोकांची घरची कामे इ. करून सोसायटी देईल त्याच्या काही पट पैसा तो विनाभांडवल कमवतो.
गेल्यावर्षी मुंबईत ३० टक्के पाणीकपात होती, तेव्हा बागेला पाणी घालायचा पाइप वापरून तो मोटारी धूत असे. भर पावसात एका हातात छत्री धरून नळाच्या पाण्याने मोटारी धुतो. जिन्यावरले , आवारातले दिवे लावायला/मालवायला उशीर झाला तरी चालेल पण गाड्यांच्या स्नानाची वेळ टळणार नाही. यातल्या काही सोसायटीबाहेरील लोकांच्या, काही आठवड्यातून एकदाच वापरल्या जाणार्या. बर्याच जणांना यात काहीही वावगे वाटत नाही. ज्यांना वाटते त्यातल्या कुणाचीही उघड बोलायची तयारी/हिंमत नाही याचीही चीड आहे.
या प्रकारावर काय करता येईल याचा नेटवर शोध घेतला तर हे प्रकार (पाण्याच्या टाक्या वाहून जाण्याचे) तुरळक नाहीत, असे दिसले.
मुंबईला पाणी आणि वीज याबाबतीत इतर महाराष्ट्रासारखीच वागणूक मिळायला हवी असे माझे मत झाले आहे.
२) आपल्या दुचाकी/चारचाकी वाहनाच्या हॉर्नचा वापर आपल्या घरच्या मंडळींना खिडकीत बोलावण्यासाठी करणारे, सोसायटीचा गेट कुणी उघडून द्यावा म्हणून करणारे लोक. एक तरुण गल्लीच्या टोकापासून भर दुपारी बाइक्चा हॉर्न बडवत येतो, त्याच्या बाने जमणनो डिब्बो तैयार ठेवावा म्हणून. त्याला एकदा मी गांडाभाई मजा आवे छे केम असे म्हटले. आणि सांगितले की हॉर्नचा हा उपयोग नाही, तर त्याचे उत्तर कोणी सांगितलेय?
छान लिहिलयस मंदार...
छान लिहिलयस मंदार...
प्रत्यक्ष कृतीचा एक
प्रत्यक्ष कृतीचा एक नमुना.
माझ्या सोसायटीजवळ एक मंदीर आहे. त्यांचा वर्धापनाचा कार्येक्रम रात्री सार्वजनिक रस्त्यावर ११ वाजता सुरु झाला. मोठ्या बॉक्स टाईप स्पिकर्स वर वाजवलेला देवांच्या गाण्यांचा ऑर्केस्ट्रा.
झोपायचा प्रयत्न केल्यावर झोप लागली पन रात्री दिड वाजता जाग आली मोठ्ठा गजर झाल्यावर. मोठ्याने घोषणा होत होती हा कार्येक्रम पहाटे ५ वाजेपर्यंत चालेल. लोकांनी घरी जाऊ नये.
बिल्डींग्च्या खाली सुमारे हजार लोक होते. समोरा समोरची टक्कर तर अशक्यच होती.
मी १०० ला फोन लाऊन विचारल तुम्हाला काही ऐकु येतय का ? ड्युटीवरचा पोलीस म्हणाला बॅगराऊंडला मोठठा आवाज येतोय.
मी म्हणालो मला तक्रार नोंदवायची आहे या आवाजा विरुध्द. हायकोर्टाच्या आदेशानुसार हे आधीच बंद व्हायला पाहीजे मग आपण काही विशेष परवानगी दिली आहे का ?
यावर पोलीस म्हणाले तुम्ही कोणत्या एरीयात रहाता त्या पोलीस चौकीत तक्रार करा. मी म्हणालो हीच तक्रार समजा आणि तुम्हीच चौकशी करा. मी माझा पत्ता दिला. मी यावर हेही म्हणलो आपले संभाषण तुमच्या ऑफिसला रेकॉर्ड झालेले आहे. काहिही कृती न झाल्यास मी हायकोर्टात कोर्टाच्या आदेशाचे पालन झाले नाही असा अर्ज करीन.
यानंतर दोन पोलीस आले आणि त्यांनी पुढील कार्येक्रम बंद पाडला.
>>यावर पोलीस म्हणाले तुम्ही
>>यावर पोलीस म्हणाले तुम्ही कोणत्या एरीयात रहाता त्या पोलीस चौकीत तक्रार करा
१०० फिरवला की आपल्या एरियातल्या पोलिस स्टेशनलाच फोन लागतो ना? का असं नाहिये?
खरं तर 'समाजातील खलप्रवृत्ती
खरं तर 'समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया व वागणे' हे मला अभिप्रेत होतं.
पण शेवटच्या वाक्याने (प्रश्नाने) घोळ केला असं वाटतं
मंदार,...... विषय अतिशय
मंदार,...... विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे. अरे रोज जागोजागी असे सात्विक संतापाचे किस्से घडत असतात..अन केवळ तो व्यक्त करण्यापलिकडे आपण काही करु शकत नाही ही देखील आपली शोकांतिकाच आहे..अन परत मग काही करु शकत नाही या गोष्टिंचा अजुन संताप येतो व चिडचिड होते..
अर्थात मी सविस्तर परत पोस्ट टाकेल ..पण एक चांगला विषय हाताळल्या बद्दल धन्यवाद
नितीन, उत्तम
नितीन, उत्तम कृती.
स्वप्ना_राज, १०० ला फोन लावला की तो कंट्रोल रूमला जातो. (पुण्यात कंट्रोल रूम - फरासखाना येथे) तुम्ही तिथे तुमचा पत्ता, एरिया, फोन नं इत्यादी तपशील दिलेत की ते त्या एरियातील पोलिस चौकीला फोन करून किंवा पोलिसांची गस्तीची गाडी फिरत असेल तर त्यांना वॉकी टॉकीवरून त्या त्या ठिकाणी जायच्या सूचना देतात.
मी हे प्रकार अनंत वेळा केले आहेत. पण आमच्या येथील कार्यकर्ते ''पोचलेले'' असल्यामुळे उपयोग नाही. पोलिसांची गस्तीची गाडी जवळपास आल्याची वर्दी त्यांना अगोदरच मिळते. तेवढ्यापुरता आवाज बंद / कमी केला जातो. १५ - २० मिनिटे थांबून पोलिस जातात. त्यानंतर पुन्हा धांदडधिंगा!
मंदार, मग लेखातलं शेवटचं
मंदार, मग लेखातलं शेवटचं वाक्य बदल! तिथे समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया व वागणे ह्याबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे, असे विचार!
अरे वा छान विषय मंदार. ते
अरे वा छान विषय मंदार.
ते सलमान खान चे लिहिलेस ना..त्यावरुन आठवले. त्याला ठाणे तुरुंगात ठेवल होत अस ऐकल होतं तेव्हा तुरुंगासमोर प्रचंड गर्दी त्याला बघण्यासाठी म्हणे.
मी त्याचा एकही सिनेमा नंतर पाहिलेला नाही. एवढे तरी प्रत्येकजण करु शकतो ना? कोणिच नाही बघितला तर त्याला पुढच्या सिनेमामधे कोणि घेणारही नाहित. पण लोकांनाच हे कळत नाही.
माझ्या चिडचिडीची बाकिची कारणे
१. कुठल्याही रांगेत सरळ उभे न रहाता पुढे घुसण्याचा प्रयत्न करणारी माणसं. हे अगदी देवळात सुद्धा! देव कुठे पळुन जाणार अस्तो तेच जाणे. मी बहुतेक वेळा लोकांना रांगेत उभे रहायला सांगते. तरी काहि महाभाग असतातच न ऐकणारे.
२. कुठेही थुंकणारे लोक. मी रागवुन बघते नाहीतर काहितरि सुनावुन पुढे जाते. पण पर्सनली काही सांगता येत नाही.
३. रस्त्यात/ कुठेही सिगारेट पिणारे लोक. यांना स्वताच्या व्यसनापायी किति इतर लोकांचा जीव वेठीस धरतोय याचा विचार करायचीही बुद्धी देव देत नाही का?
४. रस्त्यात, बागेत कुठेही कचरा टाकणारे लोक. यातलेच बरेचजण दुसर्या देशात गेले तर तिथे टाकणार नाहित कचरा पण आपल्या देशात असतील तेव्हा काय वाट्टेल ते करतील.
५. मोठ्या आवाजात गाणी लावणारे लोक. दुसर्यांना होणारा त्रास यांच्या गावीही नसतो.
६. सिग्नल ला हॉर्न वाजवणारे लोक. अतिशय राग येतो मला. सिग्नल सुटला कि सगळ्यांचे हॉर्नही सुटतात!! समोरच्या गाडितला माणुस टाईमपास होत नाही म्हणुन तिथे थांबलेला नसतो. अजुन काही सेकंदाच्या डिले नी काय जीव जाणार असतो का?
७. पब्लिक प्लेस मधे मोबाईल सायलेंटवर न ठेवणारे लोक. ट्रेनमधल्या १०० जणांचा मोबाईल सेकंदा सेकंदाला वाजल्यावर काय वाटत? आपला मोबाईल सायलेंट वर ठेवण्यासाठी सुद्धा लोकांना कायदे हवे का?
८. पब्लिक प्लेस मधे मोबाईल वर जोरजोरात बोलणारे लोक - अगदी दुकानात वस्तु बांधुन देणारा दुकानदार सुद्धा ग्राहकाच तोंड देखिल न बघता आपल्या मोबाईल वर बोलत बाकी व्यवहार करतात. अरे काय हे!! नाही बोललात तर मरणार आहे का पलिकडचा माणुस? आणि बाकिचे इतक्या जोरात बोलतात की त्यांनी आज काय खाल्ल, संध्याकाळि कुठे जाणारेत, शेजारी कसा भांडतो असले सगळे डिटेल लोकांना कळावे.
.........
असे अनेक आहेत. उपाय???
आपण आपल्या मुलांना घडवायचे. त्यांना चांगल्या वाईटाची जाणिव करुन द्यायची. किमान पुढची पिढी तरी सुसंस्कृत व्हावी.
या इथे परदेशात रहाणारे कुणि
या इथे परदेशात रहाणारे कुणि असतील नि त्यांना भारतात गेल्यावर अशी चिडचिड होत असेल, तर त्यांच्यासाठी एक गोष्ट. अनेक वर्षांपूर्वी माबो करांनी मला एकच प्रश्न विचारून माझी चिडचिड कायमची घालवली. आता कधी गेलो तरी चिडचिड होत नाही, बीपी वाढत नाही, काही नाही.
तो प्रश्नः '
एव्हढे नखरे असतील तर काय आमच्यावर उपकार करायला येता का आमच्या इंड्यात?
थोडक्यात भारताबद्दल काSहीहि बोलायचे नाही. चांगले बोलले तरी त्यांना वाटते उपहासाने बोलतात.
अपवाद फक्त माबो करांचा. मी भारतात गेलो की माबोकरांचे फक्त निरपेक्ष निव्वळ प्रेम अनुभवतो.
पण तरीहि वरील प्रश्न ध्यानात ठेवून मगच बोलावे.
पुर्ण सहमत आहे. ही अशी
पुर्ण सहमत आहे. ही अशी चिडचिड, खरे तर संताप होतोच!
मंदार जोशी,
अत्यंत चांगला लेख.
१. आपली शैली आवडली.
२. आश्चर्यकारकरीत्या सलमान व संजय दत्त या बाबतीत माझ्या जुन्या मतांप्रमाणेच मते असलेली एक व्यक्ती आहे याचा अतिशय आनंद झाला.
३. आपल्याला आणखीन काही कारणे यात अॅड करता येतीलच!
शुभेच्छा व धन्यवाद!
-'बेफिकीर;!
आमच्या आधीच्या घराच्या
आमच्या आधीच्या घराच्या सोसायटीत घडलेला प्रसंग :
आमच्या इमारतीत बिल्डरने इमारत बांधायचे वेळी तळमजल्यावरचा एक मोकळा चौक बंदिस्त केला होता. तिथे यायला-जायला वाव नाही, परंतु वरून कोणी काही टाकले की ते त्या छोट्याशा चौकात जाऊन पडायचे. परिणाम असा झाला की अनेक वर्षे तिथे कचरा साठतच गेला. त्या कचर्याची दुर्गंधी, डास इ. इ.
माझी आई जेव्हा त्या सोसायटीची पदाधिकारी झाली तेव्हा तिने सर्वात आधी तो चौक साफ करवून घेण्याचे काम हाती घेतले. एरवी कोणताही खर्च म्हटला की कुरबूर करणार्या बहुतेक सर्व सदस्यांनी चक्क चक्क निधी उभा केला व त्यातून तो चौक साफ करवून घेणे, तिथे येण्याजाण्यासाठी भिंत फोडून मार्ग निर्माण करणे, त्या मार्गाला दार करून त्याला कडी-कुलूप घालणे, साफ केलेल्या भागात चौथरा बांधून तुळशी वृंदावन उभारणे (जेणे करून लोक कचरा टाकणार नाहीत इ. इ.) असे प्रकार केले. सोसायटीत झाडू-सफाई करण्यासाठी येणार्या बाईला रोज तो चौक झाडायच्या सूचनाही दिल्या.
जेमतेम आठवडा गेला असेल, पुन्हा लोकांनी आपापल्या खिडक्यांमधून चौकात कचरा टाकणे सुरु केले. (केसांचे गुंतवळ, उरलेले शिळे अन्न, टरफले, साले, कागदाचे कपटे इ.इ.) मग मात्र त्या त्या लोकांना साक्षीपुराव्यासकट पकडले! ताणाताणीही झाली. पण त्याला इलाज नव्हता. जे कचरा टाकणारे होते त्यांना सांगितले की एकतर तुम्ही कचरा साफ करा, किंवा तो साफ करणार्या बाईचा पगार ह्यापुढे सोसायटी देणार नाही, तुम्हाला द्यावा लागेल. पांढरपेशे लोक असल्यामुळे असेल कदाचित, पण सर्व सदस्यांनी ते मान्य केले.
आता सोसायटीचे व्यवस्थापक दर दिवसाआड त्या चौकात जाऊन तेथील स्वच्छतेची खातरजमा करून घेतात.
चौकात कचरा टाकायचे प्रमाण आता लोकांना बोलून बोलून खूपच घटले आहे. तरी मधूनच कोणीतरी टाकतेच कचरा!! परंतु पूर्वीसारखी घाण तरी होत नाही हेच नशीब!
लोक काही फक्त भारतातलेच वाईट
लोक काही फक्त भारतातलेच वाईट वागतात असे नाही. आम्ही शाळेजवळ रहातो. बी एम डब्ल्यू, आवडी असल्या गाड्या घेऊन शाळेत येतात नि पेयांचे रिकामे कॅन्स, खाल्लेल्या सँडविचेसवरचे कागद, सिगारेटची थोटके, आणि इतर कचरा चक्क रस्त्यावर टाकतात. कधी कधी आमच्या लॉनवर पण! मग मी त्या शाळेत फोन करून धमकी देतो की पोलीसकडे तक्रार करीन. मग काही दिवस तो प्रकार बंद होतो.
त्यामानाने भारतातल्या पोलिसांची दया येते! कुणिच त्यांना मान देत नाहीत. इथे पोलीस नुसता लांबून हात दाखवतो तरी लोक मुकाट्याने गाडी थांबवतात. हिंमत नाही कुणाची! पुष्कळ लोक रहदारीचे नियम आपणहून पाळतात, कारण चुकून पोलीसने पकडले तर दंड. तिथे पाच दहा डॉ. पोलीसला देऊन काम भागत नाही.
अनेक वर्षांपूर्वी माबो करांनी
अनेक वर्षांपूर्वी माबो करांनी मला एकच प्रश्न विचारून माझी चिडचिड कायमची घालवली. आता कधी गेलो तरी चिडचिड होत नाही, बीपी वाढत नाही, काही नाही.
तो प्रश्नः '
एव्हढे नखरे असतील तर काय आमच्यावर उपकार करायला येता का आमच्या इंड्यात?
>>>>>>>
अपवाद फक्त माबो करांचा. मी भारतात गेलो की माबोकरांचे फक्त निरपेक्ष निव्वळ प्रेम अनुभवतो
>>>>>>>
या दोघांपैकी नक्की काय हो झक्की? तुम पयले समस्या नक्की करो.
बाकी, भारतात आल्यावर तुम्हाला फक्त एक बटाटेवडा नि एक चहा मिळाला- हे समस्येत गणले जाणार नाही, हे लक्षात ठेवा.
आणि आता इतकी वर्षे झाल्यावर भारता बद्दल काय चिडचिड करावी? चिडचिड आरोग्याला वाईट. तेव्हा इथे लिहिले तर आम्हाला तुमची काळजी वाटणार बघा.
चांगला लेख आहे रे! रिअॅलिटी
चांगला लेख आहे रे! रिअॅलिटी शोज आणि स्वयंवरांचा उगम म्हणशील तर अमेरिकेतील काही वाहिन्यांवर असे शो नेहेमी असतात आणि भलतेच प्रसिद्ध असतात. सगळी व्यवस्था एखाद्या राजाच्या अंतःपुरात शोभेल अशी असते...फक्त कपड्यांचा तुटवडा भासतो.....त्याबाबतीत अगदीच दारिद्र्य रेषेखाली असतात हे लोक....चिडचिड तेव्हा होतेच!
लेख चांगला आहे आणि सगळेच
लेख चांगला आहे आणि सगळेच प्रतिसाद पटले.
<<? आमचा वेळ जात नाही म्हणून थांबलोय का? तर माझ्याशीच भांडायला लागली की मोठ्या लोकांशी कसं बोलायचं माहित नाही का म्हणून. >>
स्वप्ना राज अनुमोदन !! केवळ मोठ्यांशी आदराने वागणे व देवासमोर हात जोडणे हेच सुसंस्कृत पणाचे लक्षण आहे. बाकी उर्मटपणा , माजोरडेपणा ,नियम मोडणे, सार्वजनिक ठीकाणी असभ्यपणे वागणे, अस्वच्छता, हेच बहुसंख्य भारतीयांचे कल्चर ( संस्कृती ??) आहे , याची खात्री पटेल अशी परीस्थिती आहे. सध्याच्या लहान मुलांना देखिल असेच वागण्याचे धडे मिळत असल्याने पुढे जाऊन काही बदलेल असे वाटत नाही.
मला आलेले २ अतिशय वाईट अनुभव ,
१. टिळक रोड ला बादशाहीच्या रेड सिग्नल ला थांबलेले असताना , समोर पोलिस असूनही मागून येउन एका कारवाल्याने जोरदार धक्का दिला. गाडी आणि मी दोन्हीही उडुन लांब पडलो. पण नशिबाने मला काही लागले नाही.
२. वडील रस्त्याच्या कडेने चालत जात असताना एकाने रस्त्याला गर्दी नसुनही त्यांच्या अंगावरच बाईक घातली. नंतर कळले की तो पिलेला होता. वडीलांच्या पायाचे ऑपरेशन करावे लागले. ३-४ महिने चालता येत नव्हते. नशिब एव्हढ्यावरच भागले.
<< तुमची होते का हो अशी चिडचिड कध<<>>
चिडचिडीच्या फार पुढे परिस्थिती पोचली आहे , एक तर याविरुद्ध मोठा लढा उभारावासा वाटतो ( फारच स्वप्नील विचार ! ) नाहीतर इथून पळून जावेसे वाटते.
प्रत्यक्षात दोन्हीही जमत नाही , जमणारही नाहीये. त्यामुळे 'आलीया भोगासी असावे सादर' म्हणुन गप्प बसायचे एव्हढेच.
छान लिहीले आहे, आवडले. ते
छान लिहीले आहे, आवडले. ते परवा अझर आणि ज्वाला गुप्ता चे कौतुक चालले होते तेव्हा असेच वाटले होते. आधी मुळात अझर ला खासदार म्हणून निवडून कोणी दिले याचेच आश्चर्य वाटते.
मंदार छान मांडले आहेत
मंदार छान मांडले आहेत विचार.
चिडचिड कमी करायला रिअॅलिटी शोज पहायचे नाहीत. ते तर आपल्या हातात आहे न. दुसर्यावर मतं लादू शकत नाही आपण.
मी आणि नवर्याने संजय दत्तचे सिनेमे पहाणं बंद केल होत त्याच्यावर केस झाली तेंव्हा.
माझी बहिण मुंबईत पिडियॅट्रिक सर्जन आहे. दिवाळी आली की ती कॉलनीमधल्या लोकांच्या घरी जाऊन दिवाळितल्या फटाक्यांनी भाजलेल्या मुलांचे फोटो दाखवते निदान त्याने तरी लोकांना फटाके वाजवताना काळजी घ्यायची जाणीव होईल आणि वरच्या मजल्यावरून पेटते फटाके टाकले जाणार नाहीत. पण सुशिक्षीत लोकंसुध्दा त्याकडे दुर्लक्ष करतात.
एकदा ती बसने जाताना तिच्या शेजारी बसलेला माणूस सारखा थुंकत होता. " अहो थुंकू नका" सांगूनही काही उपयोग झाला नाही. तो तिच्या आधीच्या स्टॉपवर उतरला तेंव्हा त्याला ती म्हणाली, " तुम्ही उतरलात की मी तुमच्या अंगावर बसमधून थुंकीन म्हणजे तुम्हाला कळेल." बसमधून उतरल्यावर इतक्या पटकन रस्ता क्रॉस करून पळाला न. म्हणजे लोकांना कळत पण वळत नाही.
ज्यात त्यात आपलं वय पुढे करून
ज्यात त्यात आपलं वय पुढे करून कसंही वागणारे सिनियर सिटिझन्स हा आणखी एक चिडीचा विषय. (काही न करता आणखी काही वर्षांनी मीही ६० होईन त्यात दुसर्यावर उपकार आहेत का काही?) <<<
याचा प्रत्यय तर मायबोलीवर इतकेवेळा येत असतो. वय जास्त म्हणून सगळे गप्प रहातात त्यामुळे आपल्याला वाटेल त्याला आणि वाटेल ते बोलायचं लायसन्स मिळाल्यासारखं बोलतात.
असो. चिडचिडी योग्य आहेत. आणि आपण हतबल आहोत ही भावना दिवसेंदिवस वाढतेय.
छान लेख मंदार, अगदी योग्य
छान लेख मंदार, अगदी योग्य मुद्दे मांडलेस,
तुझ्या प्रत्येक मुद्द्यला १००% अनुमोदन
@ अरुंधती धन्स गं! तू
@ अरुंधती
धन्स गं! तू सांगितल्याप्रमाणे शेवटचं वाक्य बदललं आहे.
अरुंधती धन्स
अरुंधती धन्स
<<<मी त्याचा एकही सिनेमा नंतर
<<<मी त्याचा एकही सिनेमा नंतर पाहिलेला नाही. एवढे तरी प्रत्येकजण करु शकतो ना? कोणिच नाही बघितला तर त्याला पुढच्या सिनेमामधे कोणि घेणारही नाहित. पण लोकांनाच हे कळत नाही.>>>
बॉलिवुड्चे ओव्हर्सीज मार्केट एवढे आहे की आपण सर्व जणानी जरी त्यांचे चित्रपट पाहणे बंद केले तरी त्याना चित्रपटात कोणी घेणार नाही हे घडणे जरा कठिणच आहे.....
लेख अप्रतिम रे मंदार.

प्रतिसादावरुन अंदाज आलाच असेल किती चिडचिड होते जळीस्थळी सर्वांची. पण दुर्दैवाने यावर संघटित होऊन उपाय होतच नाहीत. कारण एकच की य प्रकारांमुळे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे सहाजिकच चिडचिड होण्यापुरते हे मर्यादित राहाते. आपण बरे आपले बरे असे वाटते प्रत्येकाला.
जेव्हा डोक्यावरुन (आपल्या नाकातोंडात) पाणी जायला लागेल तेव्हाच जर आपण सगळे एकत्र येऊन काही करु शकलो तर, अन्यथा "लोकशाही"ला सलाम ठोकुन "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असु द्यावे समाधान" असेच वाटणार प्रत्येकाला..........:राग:
'वुई गेट द गव्हर्नमेंट वुई
'वुई गेट द गव्हर्नमेंट वुई डिझर्व' हेच खरे.
ट्राफिकमधे पूर्वी चिडचिड व्हायची आता होत नाही, कारण त्याने आपणही नकळत रॅश गाडी चालवतो असे लक्षात आले. नोकरशाहीसमोर चिडचिड करुन काही उपयोग नसतो हेही आत कळले आहे,ते पोचलेले लोक आहेत. (फारा वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठात मिळालेला, 'प्रत्येक्ष व्हि.शिं.ना आनलेत तरी तुमचे काम करनार नाही' असा रोकडा जवाब अजून आठवतोय!)
मिडीआबद्द्लची चिडचिड मात्र मधेच उफाळून येते.अर्थात माबोसारखी 'कॅथार्सिस'ची जागा असणे हे भाग्याचेच आहे.
Pages