गरीबीचा जयजयकार!

Submitted by ह.बा. on 23 August, 2010 - 07:25

गावभर फटाक्याची
जवा होते चढाओढ
कुणा मोठ्या दारी लागे
एका हजाराची लड

बिना बटणाची चड्डी
तवा धरून हातात
तोटा शोधाया लेकरं
माझी गावात जातात

वात चिमणी तोट्याची
तिचा बाँम्बसंग मेळ
शिळी भाकरी घेऊन
लाडू चकलीचा खेळ

लेकरांचा बाप खेळे
देवासंग दिवा-दिवा
केला आसलं देवान
त्याला सदराही नवा

माझ्या कुंकवाच्या धन्या
तुझी सर्गात दिवाळी
एक भिकार पणती
तुझ्या लेकरांच्या भाळी

गोळा केलेल्या तोट्यात
जवा निघतोया बार
पोरं ओरडुनं करी
गरीबीचा जयजयकार!

गुलमोहर: 

Pages