गरीबीचा जयजयकार!

Submitted by ह.बा. on 23 August, 2010 - 07:25

गावभर फटाक्याची
जवा होते चढाओढ
कुणा मोठ्या दारी लागे
एका हजाराची लड

बिना बटणाची चड्डी
तवा धरून हातात
तोटा शोधाया लेकरं
माझी गावात जातात

वात चिमणी तोट्याची
तिचा बाँम्बसंग मेळ
शिळी भाकरी घेऊन
लाडू चकलीचा खेळ

लेकरांचा बाप खेळे
देवासंग दिवा-दिवा
केला आसलं देवान
त्याला सदराही नवा

माझ्या कुंकवाच्या धन्या
तुझी सर्गात दिवाळी
एक भिकार पणती
तुझ्या लेकरांच्या भाळी

गोळा केलेल्या तोट्यात
जवा निघतोया बार
पोरं ओरडुनं करी
गरीबीचा जयजयकार!

गुलमोहर: 

छान कविता हबा......
क्षणभर मला बालपण आठवलं.....

एका हजाराची लढ

इथे ''लड'' असं हवं होतं का?

अमित, बेफिकीरजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

अश्विनी के,
तोटा = फटाका. तोट्यांची नावे :- लक्ष्मी तोटा, डबल बारी तोटा, चिमणी तोटा, लवंगी तोटा....

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

माझ्या कुंकवाच्या धन्या
तुझी सर्गात दिवाळी
एक भिकार पणती
तुझ्या लेकरांच्या भाळी
-------------------
याला वा! तरी कसे म्हणु?

फारच सहज आणि चटका लावणारी कविता...

मयुरेश, देवनिनाद

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

Pages