अन्वयाची फांदी....(२)

Submitted by कमलाकर देसले on 22 August, 2010 - 10:30

" जीवावर बेतेल तेव्हा शेपटी सोडावी "
डास,माश्या,उंदीर,घुशी या मंडळीला आपण केव्हा न केव्हा मारत असतो. त्यात एकाची भर टाकावी लागेल. 'पालीची'. पाल मारण्याचा अयशस्वी प्रयत्न बहोतेकांनी करून पाहिलेला असतो.
घरात पाली खूप झाल्यात म्हणून मीही एकेदिवशी पाल मारण्याचा उद्योग करून पहिला. पसरट केरसुणी पालीच्या अंगावर मारली; आणि पाल मारल्याचा आसुरी आनंद घ्यावा म्हणून जमिनीकडे पाहिलं. वळवळतांना दिसली.वाटलं तडफडतेय. म्हणजे मरेलच. पण कसलं काय ! ती पाल नव्हतीच. माझा अपेक्षा भंग झाला. नीट पाहिलं तेव्हा लक्षात आलं; खाली पडून वळवळत होती ती पालीची शेपूट होती. आणि पाल ? ती तर केव्हाच गायब झालेली. एरवी जे विचार यापूर्वी पाल मारल्यावर डोक्यात आले नाही ते विचार आता येऊ लागले.
नक्कीच पालीच्या मेंदूत जन्मतः अशी सूचना फीड असावी की; जीवावर बेतेल तेव्हा शेपटी सोडून द्यावी, पापणी लवते न लवते तोवर शेपटी सोडून गायब व्हावे. आणि खरंच,मारू पाहणाऱ्याला पाल मारल्याचा भ्रम देऊन निसटून जावे.
पाल शेपटीच का सोडते? साधी गोष्ट आहे. शेपटी पुन्हा फुटत असावी म्हणून.शेपटी सोडली तरच वाचू हे निश्चित माहिती असल्यानेच पाल शेपटी सोडत असावी. शेपटीसकट वाचण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाली हमखास मरतात. जी शेपटी पुन्हा फुटू शकते ती सांभाळताना फुकट मारण्यापेक्षा शेपटी सोडण्यात खरे बुद्धीवैभव हे नक्कीच पालीला ठाऊक असावं. पालीला मारण्याच्या निमित्ताने डोक्यात प्रश्नांचे अंकुर फुटले. माणूस म्हणवणाऱ्या आपल्यालाही देवाने अशी काही शेपटी दिली असावी का? गाय,बैल,कुत्रा,पाल यांच्या प्रमाणे दिसणारी शेपटी तर आपल्याला नाहीच. पण न दिसणारी तरीही सोडता येईल, अशी एखादी शेपटी असेल का देवाने आपल्याला दिलेली.
आपण पाळीवर झडप घालतो तसं मृत्यूही केव्हातरी प्रत्येकावर झडप घालतो. केव्हात्तारी सर्वच मारतात. देह मी नाही,किंवा देह माझा नाही हे सत्य स्वीकारून " तुका म्हणे आता, उरलो उपकार पुरता " असं आनंदाने म्हणत आपल्याला खरंच जगता येत नाही.
आपम सामान्यच. आशा पुरुषार्थापासून आपण कोसो दूरच नाही का ? मारणारा प्रत्येकजण - पती-पत्नी, आपत्य,प्रियजन,पैसा,पद,प्रतिष्ठा कशात तरी नक्कीच अडकत असावा. आपण अडकतो कशात हे महत्वाचं नाही.आपण अडकतो हे महत्वाचं या अडकण्याचे नाव बहुदा " आसक्ती" असावे.
या आसक्तीचीच तर शेपटी नाही ना देवाने आपल्याला दिलेली? न दिसणारी. ही शेपटी सोडणारे तुकोबांसारखे सत्पुरुष सदासर्वकाळ "मुक्त"असतात.
आपण सामान्य सदासर्वकाळ मात्र बद्ध असतो. आसक्तीची ही शेपटी सोडण्याच उपजत भान आपल्याला नसेल असे नाही;पण हे भान मात्र आपण ठेवतोच असे नाही. हे भान कसं सांभाळावं हे श्रीगुरुकृपेशिवाय, विद्याभ्यासाशिवाय कसं कळेल ?

"जीवनाचा ताठ कणा,फक्त आसक्ती मोडते
जीवावर बेताले की पाल शेपटी सोडते........

विंचवाच्या नांगीसम मोह आसक्ती मोडावी
केव्हातरी पाल व्हावे आणि आसक्ती सोडावी....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान...

केव्हातरी पाल व्हावे आणि आसक्ती सोडावी....>>> हे मात्र अजिबात आवडल नाही, कारण पालीची मला प्रचंड किळस आणि भिती वाटते... Happy

चिमुरि, अगं पाल होणे याचा अर्थ "पाल" होणे असा नाही होत. पाल हा शब्द "आसक्ति" सोडण्यासाठीची "इमेज" ( प्रतिमा) म्हणून वापरला आहे. मला तरी कुठे पाल आवडते.वाचण्यासाठी का होईना पाल शेपटी सोडते. जिवावर बेतलं तरी आपण आसक्ती सोडत नाही. म्हणून मी कवीतेत पालीला "गुरुपद" दिलं. तुला एक गम्मत सांगतो. आपण कसे आहोत माहीतीए? ज्ञानेश्वरीत माउली आसक्तीचं उदाहरण देतांना एक द्रुष्टांत (दाखला)देतात. म्हणजे बघ, एका अजगराच्या तोंडात बेडूक असतो. अजगर त्याला आता मटकावणार. तरी पठ्ठ्या ( बेडूक) मरणाची फिकिर सोडून जीभ लांबवून समोर बसलेली माशी पकडण्याचा प्रयत्न करतो. आता मला सांग बेड्कात अन आपल्यात काय फरक? म्हणून आसक्ती सोड्ण्यासाठी मी पालीची प्रतिमा वापरली. are you clear .
आणि तुला ही धन्यवाद "हसरी".

पार्थ, कमलाकर हा तुमचाच आय्डी आहे का? तुम्ही हसरीला धन्यवाद दिलात म्हनुन विचारलं..

पालीची प्रतिमा का वापरली ते मला आधीही कळलं होतं.. पण मी जे लिहिलं ते मजेत होतं, त्यानंतर स्मायलीही टाकली होती.. असो.. बेडकाच उदाहरण आवडलं..

बरं झालं पालीची फोटो काढुन टाकला ते.. Happy

पार्थ माझा मुलगा आहे म्हणुन प्रतिक्रिया त्याच्या आयडी वरुन दिली . पण आनंद वाटला की चिमुरी तुला हा लेख समजला.

संस्कॄतमध्ये पालीला पालिका म्हणतात. आणि आपल्या नगराचे पालन करण्यार्‍या संस्थेला आपण म्हणतो नगरपालिका.