हत्तीशी दांडू....

Submitted by ह.बा. on 20 August, 2010 - 09:22

कळत नव्हतं आधी
पाऊस मलाच का भिजवतोय
माझ्या अंगणात लिहीलेलं
तिचं नाव मुजवतोय...

आता उत्तर जुळतं आहे
कळायच ते कळतं आहे
पावसाच्या प्रत्येक थेंबात
काहीतरी जळत आहे...

पाऊस मला मारतो आहे
दादागीरी करतो आहे
माझ्यासारखाच होऊन वेडा
तिच्यासाठी झुरतो आहे

मी तिला विचारलं
'पाऊस तुला कसा वाटतो?'
ती म्हणाली
'जसा तू पाऊस मला तसा वाटतो'

'सखे मी घाबरलोय
तू मला विसरशील
तो थोडा चिखल करेल
आणि तू घसरशील'

मोठ्यानं हसून म्हणाली
'तुला कशी सोडीन रे?
चार महिन्यांच्या फकीराशी
जन्म कसा जोडीन रे?

तुझी माझी जोड आहे
मना-मनाची ओढ आहे
ढवळा ढवळ करण्याची
पावसाची खोड... गोड आहे

पावसावरती चिडू नको
त्याचा काहीच स्वार्थ नसतो
आणि हत्तीशी दांडू खेळण्यात
वेड्या काहीच अर्थ नसतो'

-ह बा

गुलमोहर: 

>> मोठ्यानं हसून म्हणाली
'तुला कशी सोडीन रे?
चार महिन्यांच्या फकीराशी
जन्म कसा जोडीन रे?>>

ओहोहो!!! क्या बात है!

Pages