हा कुठला बरे आजार/विकार?

Submitted by अभय आर्वीकर on 19 August, 2010 - 13:45

हा कुठला बरे आजार/विकार?

वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे.
पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही.
खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं. कथा,कादंबरी,कविता,गज़ल,लावणी पासून ते हिंदी उपन्यास वगैरे वगैरे.... कशाचे काहीही बंधन नाही.
पण....
कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशिल आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फ़ेकून देतो.

कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते ज्या लेखकाने हे लिहिलेय तो लेखक, त्या लेखकाचे व्यक्तिमत्व आणि आचरण त्या लेखात मांडलेल्या विचांराशी, भुमिकेशी प्रामाणिक किंवा सुसंगत नाही. मग जो विचार,भूमिका स्वत: लेखकाला जगता येत नाही त्या विचाराला, "विचार" तरी कसे म्हणावे? थोडा वेळ उत्तर शोधतो आणि उबग आल्यागत पुस्तक फ़ेकून देतो.

तसे त्याला बालकवींची श्रावणमासी ही कविता आवडते कारण त्यात जे श्रावण महिण्याचे वर्णन आले ना, ती केवळ कवीकल्पना नसून त्या कवितेतला अद्भुत आनंद त्याला श्रावण महिना सूरू झाला की प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो.
"सरसर येते क्षणांत शिरवे, क्षणांत फ़िरूनी ऊन पडे" हे दृष्य केवळ त्याच महिण्यात पहायला मिळते. इतर महिण्यात नाहीच.
कवी, कविता आणि श्रावणमास एवढे एकरूप झालेत की त्यांना वेगवेगळे नाहीच करता येणार.
अजूनही श्रावणमहिना त्याच कवितेचे अनुसरण करतो, तसाच वागतो जसे कवितेत लिहिले आहे.

पण ना.धो.महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्‍तुंग लोकप्रियता लाभलेली पण ग्यानबाला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. समजा नभाने आराधना स्विकारली आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे,सुर्य आणि चंद्र जरी लागलेत तरी कोणतेही सरकार चांदणे,सुर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टीकोनातून बघणार आणि या सुर्य,चंद्र तार्‍यांना "भजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपुर व्यवस्था करणार.
कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानीत किंमतीत सुर्य,चंद्र तारे उपल्ब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, नालीच्या काठावर, कचरापेटीत सुर्य,चंद्र,तार्‍यांचे ढिगारे साचलेले दिसतील.
पण......
ज्या शेतकर्‍यांसाठी दान मागीतले त्याच्या पदरात काय पडणार? शेतात सुर्य,चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर.... त्याची दरिद्री आहे तशीच राहणार. त्या ऐवजी कविने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, जेणेकरून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत विकाससुर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नाही का? कवी बिगर शेतकरी असता तर ग्यानबाची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तुरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभिर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हाताने फ़ेकून देतो.
"काळ्या(काया) मातीत मातीत" ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखिल भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
पण ग्यानबाला भुरळ पडेल तर तो ग्यानबा कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्‍याचे घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्‍यांच्या वेदना विकून मोठ्ठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण.... शेतकर्‍याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफ़ार थांबावे आणि त्याला (कविला देखिल) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे व्हावे यासाठी पुढे मग काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या "शेतकरी विरोधी धोरणांमुळे" ही परिस्थीती उदभवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्‍यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो. आणि असे त्याला वाटले की तो हातातले पुस्तक कपाळावर मारून घेतो आणि दुर भिरकावून देतो.
"बारोमास"कार सदानंद देशमुख असो की आणखी कोणी. त्याचं सदैव एकच तुणतुणं.
नको तसा विचार करणे आणि त्याचा राग पुस्तकावर काढणे.
कुठला आजार/विकार म्हणावे याला?

गंगाधर मुटे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन चुका सुधारु? अभागापेक्षा अभागी हा शब्द योग्य वाटतो आणि अनुलब्ध हा शब्द आहे? उपलब्ध नव्हे का?
बाकी चालू द्या.

याला "प्रामाणीकपणा, सत्य, यांचा आग्रह धरणे" हा आजार म्हणता येईल. आजकालच्या जगात हा आजार वाईट. यामुळे वित्तप्राप्ती या एकमेव कर्तव्यात अडथळा येतो. दुसर्‍याकडून त्यांची अपेक्षा ठेवू नये, व स्वतःलाहि त्याची बाधा होऊ देऊ नये.

जे लोक आपली संस्कृति, संस्कार यांच्या जुन्यापुराण्या कल्पनांवर विश्वास ठेवतात, त्या सर्वांनाच हा आजार होतो. पूर्वी भारतात सर्वांनाच हा विकार होत असे. जसजसे मुस्लिम, इंग्रज इ. 'शहाणे' लोक भारतात आले, अमेरिकेचा प्रभाव पडू लागला, तसतसे लोक या आजारातून बरे होऊन, उगाच गरीब, कष्टाळू लोकांच्या नादी न लागता, बॉलीवूड, क्रिकेट इ. मधे रमतात, नि आनंदी रहातात नि किती श्रीमंत झाले आहेत बघा!!

याला "प्रामाणीकपणा, सत्य, यांचा आग्रह धरणे" हा आजार म्हणता येईल. आजकालच्या जगात हा आजार वाईट
झक्की .......
खरचं आहे ....या आजाराचा अनुभव मी घेतलाय, घेतोय !

मुटेजी,
याला असंतोष म्हणता येईल का ?
किंवा (गेंड्याच्या कातडीसारखी बनलेली )व्यवस्थेविरुद्ध ची "चीड" म्हणता येईल ....

काही गावाकडचे लोक याला असही म्हणतील ..

अरे ग्यानबा ,तु लेका ! विचार खुप करतो ...
आणि स्व:ताच्या आणि दुसर्‍याच्या डोक्याला पण ताप करतो ....
जगायचं असंल तर आज पासुन आमच्या सारखं "विचार" करणं (खोलात शिरणं) सोडुन दे ...

मुटे,

ग्यानबाला सांगा लढाई सगळ्या रुपांनी खेळता येते. मग ती प्रत्यक्ष "चक्का जाम" असो वा "बारोमास" सारखी कादंबरी असो. प्रत्येक लढाईचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. वाचक जरी शेतकरी नसला (उदा मी) तरी बारोमास मुळे त्याला एक्या अन त्याचा भाउ कुठल्या परिस्थितीत जगत आहे, शेती सोडून जमीन उकरुन गुप्त धनाच्या का पाठीमागे लागतो हे कळत जाते, शहरातल्या तुक्याची काही वेगळी परस्थिती नाही, तो गाडीवरुन जाताना मला ५० लाखाची लॉटरी लागली तर किती बरे होईल असा नेहमी कल्पनेत रमत असतो, तो तुक्या अन गुप्तधन खोदनारा ग्यानबा ह्यात फरक कसा करणार? कारण दोघेही ते स्वप्न पाहत असतात. ते स्वप्न सारखेच आहेत हे तुक्याल्या बारोमास वाचल्यावर कळते, तो कुठेतरी "रिलेट" करतो, एक्याच्या बायको त्याला सारखी सोडून का जाते अन भुईत काहीच कसे उपजत नाही हे कळायला सुरु होते. माझ्यासारखे जे तुक्या आहेत त्यांना थोडेफार का होईना "जागे" करायचे काम अश्या कादंबर्‍या करतात.
गडद जांभळं जेंव्हा हा तुक्या ऐकतो तेंव्हा त्याला शेतीचे महत्व कळते, पैसे असल्यावर माझ्यासारखा तुक्या आपण २५ एकर शेती घेउन वैज्ञानिक पद्धतीने करु, नौकरी सोडू असे स्वप्न पाहायला सुरु करतो आणी गाभ्रीचा पाऊस किंवा पीपली लाईव्ह पाहून हे स्वप्न कदाचित स्वप्नच ठरेल, कारण वस्तुस्थिती "भयान" आहे ह्याची जाणीव करुन देतो म्हणून त्या कविता, ते पिक्चर पण महत्वाचे आहेत.

आपल्या भावनांशी (निदान मी तरी) सहमत आहे. ( हे केवळ इथे, मस्त पोस्ट असे अभिप्राय घेण्यासाठी लिहले नाही) पण त्या भावना मला बारोमास, गाभ्रीचा पाउस, इतर अनेक शेतकरी साहित्य (शेती न करणार्‍याने लिहले असले तरी) ह्यावरुनच कळाल्या. कारण मी शेती तर करत नाही. अनुमान काढून शकतो, प्रमाण देऊ शकत नाही, म्हणून ह्या बाकी सर्वांची पण जरुरी आहे.

ही गोलाची लढाई आहे मुटे. गोलाच्या लढाईत प्रत्येकाने आपला भाग पूर्ण करणे जरुरी आहे. प्रत्येक बाजूने लढाई खेळली तरच लढाई जिंकता येईल, अन्यथा मल्हार होळकर पळाला व बाजू तुटली, मराठे हारले तशी शेतकर्‍यांची हार निश्चित आहे.

चोला माटी के राम!

धन्यवाद केदार.

पण इतरांनी अशी पुस्तके का लीहिली? अशी पुस्तके लिहायला नकोत? असे ग्यानबा म्हणत नाहीये.
फक्त त्याला ते वाचावेसे वाटत नाही, ही त्याची बिमारी आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

हो ते लक्षात घेतलं मुटे.
फक्त त्या साहित्यामुळे आम्ही पण थोडेफार जागे होतो असेच सुचवायचे होते, बाकी काही नाही.

Art is moral passion married to entertainment. Moral passion without entertainment is propaganda, and entertainment without moral passion is television.

- Rita Mae Brown

तुमच्या ग्यानबाला कलेचा आस्वाद घेतांना त्यातील उपयुक्ततेचा शोध घेण्याची सवय आहे असे दिसते. कलेचा पैस किती मोठा असू शकतो याचा अंदाज ग्यानबाला आलेला नाही. कलेच्या प्रांतात एकच निकष/फुटपट्टी सगळीकडे चालत नाही आणि ग्यानबाने तर फुटपट्टीही घरातच बनवलेली असल्याने ती निर्दोष आहे याचीही खात्री नाही.

ग्यानबाने आपले मन मोठे करण्याची गरज आहे !

ज्ञानेशजी, मी तुमच्याशी सहमत आहे पण ग्यानबाचे वकिलपत्र स्विकारल्याने त्याचे विचार तुमच्यासमोर ठेवावेच लागेल.

कलेचा पैस किती मोठा असू शकतो याचा अंदाज ग्यानबाला आलेला नाही,असे मोघमपणे म्हणता येणार नाही. तसे असते तर त्याने पुस्तकाला हात लावलाच नसता. त्याचे मुळ दु:ख, त्याचे प्रतिबिंब, त्याच्या समस्याची सोडवणुक, त्याच्या समस्यांकडे इतरांनी पाहण्याचा दुषित दृष्टीकोन, त्यात आढळणारा बेगडीपणा यात दडलेले असावे.

आता माझ्या मते दोन मार्ग आहेत.

१) लिहिणार्‍याने वाटेल तसे लिहित राहायचे, ते ग्यानबावर लादत राहायचे आणि त्याने जर नाराजीचा, नावडल्याचा सूर काढला तर त्याला "कलेची कदर नाही" अशी त्याची संभावना करायची.

किंवा

२) लिहिणार्‍यांनी आत्मपरिक्षण करून तळागाळातल्या ग्यानबासारख्यांचे जीवन कसे सुकर होईल, याचा वेध घेवून लिहिण्याचे कसब अंगी बाणण्याचा प्रयत्न करणे. जे काही लिहायचे, ते लिहितांना त्या लिखानाचे समाजावर काय बरे वाईट परिणाम होतील याचाही थोडाफार विचार करायचा. ज्वलंत विषय हाताळायचे असेल तर शक्य तेवढा त्या विषयाच्या आतखोलवर शिरायचा प्रयत्न करायचा.

दोनपैकी तुलनेत पहिलाच पर्याय सोयीचा वाटतो, कदाचित त्यामुळेच अनादीकाळापासून हाच मार्ग अवलंबीला जात असावा.

दोनपैकी तुलनेत पहिलाच पर्याय सोयीचा वाटतो, कदाचित त्यामुळेच अनादीकाळापासून हाच मार्ग अवलंबीला जात असावा.
मुटेजी,
नक्कीच ...!
या सोप्या मार्गावरुन धावणार्‍यांच्या संख्येत दिवसें दिवस वाढ मात्र होत आहे ,याच वाईट वाटतं !

अनिलजी, काळजी करू नका.

आता ग्यानबा कमीत कमी स्वतःची आवडनिवड जाणायला लागलाय.
शेतकर्‍यांची नविन पिढी स्वतःच लिहायला लागेल.
तेंव्हा बरेचशे प्रश्न आपोआप सुटतील. Happy

यातल्या ग्यानबाला असे सुचवायचे आहे का की शेतकर्‍यांचे दु:ख फक्त त्यालाच जाणवते? फक्त त्याला वाटणारी शेतकर्‍यांबद्दलची चिंता खरी आणि इतर जे जे काही करतात ते बेगडी आणि खोटे?
ही इतर शेतकर्‍याना मिळालेल्या यशाबद्दल असूया तर नाही?

बरे इतर शेतकरी साहित्यीकानी (क्षणभर समजा की स्वार्थासाठी) लिहिले पण त्यानी त्यातही आपल्या ग्रामीण आयुष्याशी संबंध जपण्याचा प्रयत्न केला. हे जीवन समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला.
जे वर्षानुवर्षे राजकारणात आहेत आणि ज्यानी शेतकर्‍यासाठी काही केले नाही (आज आपला कृषीमंत्री एक मराठी माणुस आहे) त्याना जबाबदार धरण्याऐवजी या साहित्यीकानी काही केले नाही असे म्हणणे योग्य वाटत नाही.
या साहित्यीकांवर राग काढण्यापेक्षा ग्यानबाने या परिस्थिती सुधारण्याची क्षमता असणार्‍यांविरुद्ध मोहीमेत आपली उर्जा खर्च केली तर त्यालाही समाधान मिळेल.

<<यातल्या ग्यानबाला असे सुचवायचे आहे का की शेतकर्‍यांचे दु:ख फक्त त्यालाच जाणवते?>>

शेतकर्‍यांचे जे दु:ख त्याला जाणवते ते त्याने मांडू नये काय? त्याला जे वाटते ते त्याने मांडावे की आपल्याला कोण काय म्हणेल याचा विचार करीत बसावे? तुम्हीच सांगावे.

<< फक्त त्याला वाटणारी शेतकर्‍यांबद्दलची चिंता खरी आणि इतर जे जे काही करतात ते बेगडी आणि खोटे? >>

ग्यानबाची चिंता बेगडी असू शकते. पण इतरांची खरी की खोटी की बेगडी हे काहीतरी निकषावरच ठरवावे लागेल ना?
ग्यानबाची खोटी म्हणुन इतरांची खरी असे समिकरण कसे मान्य करता येईल?

ही इतर शेतकर्‍याना मिळालेल्या यशाबद्दल असूया तर नाही?

इतरांनी असूया बाळगावी असा, शेतीच्या बळावर वैभवसंपन्न झालेला (अर्थात ग्यानबापेक्षा) किंवा शेतीत यशस्वी होऊन किमान क्लास वन श्रेणीचे जीवन जगणारा किंवा टाटा/बिर्लाच्या समकक्ष जीवन जगत आहे असा एखादा शेतकरी दाखवाल का? किंवा येथे पत्ता लिहिता का? नंतरच ग्यानबाची असूया तपासून पाहता येईल.

<< बरे इतर शेतकरी साहित्यीकानी (क्षणभर समजा की स्वार्थासाठी) लिहिले पण त्यानी त्यातही आपल्या ग्रामीण आयुष्याशी संबंध जपण्याचा प्रयत्न केला. हे जीवन समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला.>>

यावर ग्यानबाचा आक्षेप नाहीये.
फक्त त्याला ते वाचावेसे वाटत नाही, ही त्याची बिमारी आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

<< जे वर्षानुवर्षे राजकारणात आहेत आणि ज्यानी शेतकर्‍यासाठी काही केले नाही (आज आपला कृषीमंत्री एक मराठी माणुस आहे) त्याना जबाबदार धरण्याऐवजी या साहित्यीकानी काही केले नाही असे म्हणणे योग्य वाटत नाही.
या साहित्यीकांवर राग काढण्यापेक्षा ग्यानबाने या परिस्थिती सुधारण्याची क्षमता असणार्‍यांविरुद्ध मोहीमेत आपली उर्जा खर्च केली तर त्यालाही समाधान मिळेल.>>

राजकारणी तर शंभर टक्के जबाबदार आहेतच पण
साहित्यीकांना ग्यानबाच्या समस्यांची जाण नसने, हे चित्रही फारसे शोभादायक नाही.

फक्त त्याला ते वाचावेसे वाटत नाही, ही त्याची बिमारी आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.<<<<
कशासाठी? ग्यानबाच्या या तथाकथित 'आजाराचा' इतका उदोउदो का चाललाय? नाही वाचायला आवडत तर नका वाचू. ग्यानबाला आपले लेखन आवडायलाच हवे, असा कुठल्याही साहित्यिकाने आग्रह धरल्याचे ऐकिवात नाही. आणि हे जे लिहिले आहे;
'त्याने जर नाराजीचा, नावडल्याचा सूर काढला तर त्याला "कलेची कदर नाही" अशी त्याची संभावना करायची.' <<< हे तर बळंच आहे. 'मी वाचलेले पुस्तक' बाफावर जाऊन बघा. तिथे लोक आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहितात, आवडले तर आवडले लिहितात, नावडले तर नावडले लिहितात. त्यामुळे कुणी त्यांच्यावर टीका करत बसत नाही.

वर कुणीतरी 'बारोमास' कादंबरीबद्दल लिहिले आहे, आनंद यादवांच्याही काही कादंबर्‍या आहेत, ग्रामीण जीवन केंद्रस्थानी ठेवून लिहिणारे अनेक लेखक आहेत. परंतु, याही बाफावर आपल्याला सोयीस्कर पोस्टांचा तेवढा उल्लेख करायचा आणि इतर गोष्टींवर उगीचच काहीही टीका करायची, हे धोरण स्वीकारलेले दिसते. Happy

ते 'आता माझ्या मते दोन मार्ग आहेत.' वाले पोस्ट तेवढ्याचसाठी किमान चार-पाचवेळा संपादित झाले असावे. ('नवीन' म्हटल्यावर दरवेळी येऊन पाहावे की तेच पोस्ट पुन्हा संपादित झालेले. :फिदी:)

<< कशासाठी? ग्यानबाच्या या तथाकथित 'आजाराचा' इतका उदोउदो का चाललाय? नाही वाचायला आवडत तर नका वाचू. >>

मुलाने आईला म्हटले की त्याला चवळीच्या शेंगाची भाजी आवडत नाही तर..

तर आई काय अशी म्हणेल? - "खायचे असेल तर खा नाही तर पाणी पिऊन झोप."
नाही म्हणणार ना? कारण तिचे मुलावर प्रेम (बेगडी नव्हे अस्सल..!) असते.

तसेच समाजात काही माणसे असतात की ज्यांचे समाजावर निस्सिम प्रेम असते. आणि ते अस्सल असते.
आणि म्हणुन ते जीवन जगतांना आपल्या बरोबर इतरांचाही विचार करत चालतात.
कारण त्यांची मानवतेवर श्रद्धा असते.

म्हणुन तुम्हाला ज्या बाफचा वैताग येतो, तेथेही काही लोकांना चर्चा कराविशी वाटते.

(दुसर्‍यांदा संपादित- :फिदी:)

शंभरवेळा पोस्ट संपादित करणे चालूच राहणार तुमचे, त्यात आता विशेष काय? उगीचच चमकदार काहीतरी वाक्ये त्यात घालायची, असलेली बदलायची, जास्तीत जास्त भावनाप्रधान पोस्ट होईलसे बघायचे. चालू द्या.

बाकी कुठलीही आई ही केवळ आंधळेपणाने आपल्या मुलाचे लाड करत बसत नाही, मूल उगीचच नखरे करायला लागले तर प्रसंगी फटकावतेदेखील, हे तुम्हाला ठाऊक असेलच पण उगीच उदात्त उदाहरणे देण्याच्या नादात तुम्ही ते विसरला आहात असे दिसते.

असो. तुमचे चालू द्या. तुम्ही इतक्यातच चालू केलेल्या दोन-तीन बीबींच्या वाचनावरून तुमच्या लिखाणातला एकंदरीत बेगडीपणा, कांगावा करण्याची प्रवृत्ती पुरेशी स्पष्ट होतेय. त्यामुळे त्याबद्दल अजून काही लिहायची गरज नाही.

कारण त्यांची मानवतेवर श्रद्धा असते.>>>>
नव्याने घातलेल्या या वाक्यातले उपरोल्लेखित दोन शब्द ठळक करण्यामागचे तर्कशास्त्र कळले नाही. जर माझ्या नावावर कोटी करण्याचा प्रयत्न असेल आणि हे पुन्हा झालेले आढळले तर मी अ‍ॅडमिनांकडे तक्रार करेनच. माझ्या पोस्टातल्या मजकुरावरच प्रतिवाद करा. नाव, गाव, आयडी वगैरे माहिती फालतू कोट्या करण्यासाठी वापरू नका.

श्रद्धाजी,
दोन-तीन बीबींच्या वाचनावरून माझ्या लिखाणातला एकंदरीत बेगडीपणा, कांगावा करण्याची प्रवृत्ती पुरेशी स्पष्ट होतेय. असे तुमचे मत आहे. यात विशेष काही नाही. प्रत्येकाला एक मत असते आणि ते जोपासण्याचे पुर्ण स्वातंत्र्यही.
तुम्ही फक्त दोन-तिन बीबी वाचलेत. परंतू मायबोलीवरील माझे इतर लेखन आणि माझे ब्लॉग यावरील लेखन यातूनही मी शेतकर्‍यांसाठी, त्यांचे शल्य समाजासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करतो आहे,
याला कुणी तळमळ म्हणतात तर कुणी कांगावा म्हणतात. प्रश्न ज्याच्या त्याच्या आकलनाचा आहे.
आणि यामुळे माझ्यावर फारसा फरकही पडत नाही.

समाजाकडे पाहण्याची दृष्टी मानवतेवरील श्रद्धेच्या अंगिकारातूनच व्यापक वा संकुचित होत असते. एवढेच मला म्हणायचे होते. यात तुमचे नामसाधर्म्य केवळ योगायोग आहे.

शेतकर्‍यांच्या दुर्दशेसाठी कोणतीही आयडी किंवा व्यक्ती जबाबदार नाही, त्यामुळे व्यक्तीगत पातळीवर कुणाचा राग,व्देष बाळगण्यात मला अजिबात रस नाही.

शेतकर्‍यांच्या दुर्दशेसाठी केवळ आणि केवळ प्रचलित व्यवस्थाच कारणीभूत आहे.
आणि तिच्यावर घाव घालणे माझा धर्म आहे.

श्र आणि मनस्मी,
वेळ वाया घालवू नका.
बिगरशेतकरी लोक कसे वाईट आणि निर्ढावलेले, शेतकरी हा सर्वज्ञानी असतो अशी यांची मते (वारंवार हेच दिसत रहाते) यांच्याच तळमळीच्या(खर्‍या खोट्या देवजाणे!) विषयापासून लोकांना तोडत रहातात.
शेतकरी काय आणि कुणीही काय कलेचा पैस जाणून घ्यायला खूप तपश्चर्या असते. आयुष्य संपतात त्यातच. आणि या समजेच्या मामल्यात शेतकरी म्हणून की अजून कोणी म्हणून सवलत मिळत नाही हे ह्यांना कधीही मान्य होणार नाही.
ग्यानबा हा आकाशातून पडलाय आणि तो सर्वगुणसंपन्न, सर्वज्ञानसंपन्नच आहे जन्मतः त्याला शिकायची, समज वाढवायची काहीच गरज नाही. त्याला जे आवडत नाही ते वाईटच असते. हा त्यांचा दृष्टीकोन आहे.

केवळ सतत तक्रार आणि दु:खाचे गार्‍हाणे. कुणी काही पॉझिटीव्ह मतं मांडायचा प्रयत्न केला की ठरवलंच त्या माणसाला व्हिलन, संकुचित इत्यादी....

त्यांना अपेक्षा आहे ती केवळ यांच्या हो ला हो म्हणण्याची. इतर मतांना थारा नाही.

पटत नसेल तरी वाहवा करू शकतो का आपण या प्रकाराची? नाही. मग आपल्या नशिबात दगडावर डोके आपटून घेणे, आपल्याला दुष्ट इत्यादी ठरवले जाणे लिहिलेले आहे...

कुठे वेळ वाया घालवता.

बिगरशेतकरी लोक वाईट व निर्ढावलेले, आणि शेतकरी हा सर्वज्ञानी असतो

मी असहमत आहे.

शेतकरी हा सर्वज्ञानी असतो अशी यांची मते>. नाही नाही , फक्त हेच तेव्हडे सर्वज्ञानी. जे शेतकरी प्राप्त परीस्थितीत कुणालाही नावे न ठेवता ,मार्ग काढतात,पैसे कमावुन दखवतात, तेही मुर्खच.कारण आपल्याला फायदा होउनही आपण तोट्यात आहोत अशी रडारड त्यांना करता येत नाही ना.

मुटेजी,

आपण कधी बी. बी. ठोंबरे, आनंद कर्वे, फुकुओका, विद्या मुरकुंबी, अशोक देशपांडे, बी. एम. कापसे, आनंदवनातले शेतकरी यांबद्दल का लिहीत नाही?

ते लिहिणं चुकीचं असतं क्सा!
ए आर सी ने कारण सांगितलंय ना.

मी असहमत आहे.<< केवढा तो विनोद. तुमच्या प्रत्येक लेखात, मांडलेल्या मतांच्यात, केलेल्या एकांगी चर्चेत हाच दृष्टीकोन दिसून येतो केवळ. आता असहमती दर्शवण्याने काय होणार.

आपण कधी बी. बी. ठोंबरे, आनंद कर्वे, फुकुओका, विद्या मुरकुंबी, अशोक देशपांडे, बी. एम. कापसे, आनंदवनातले शेतकरी यांबद्दल का लिहीत नाही?
>>छे छे कदापी नाही, ही माणसे, "मी अन्यायग्रस्त आहे,मी अन्यायग्रस्त आहे....अशी ओरड करत नाहीत , मग मुटेंना काय फायदा त्याचा...", उलट कर्व्यांसारखी माणसे तर त्या कवी लेखकांसरखीच की, जी शेतकर्‍यांसाठी संशोधन करण्याची नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करुन घेणारी ,आंतरराष्ट्रिय पारीतोषकांच्या रकमा लाटणारी,अप्पलपोटी.
खरा शेतकरी म्हणजे कसा, काम धाम न करता,शेततळे न बांधता,म्रुदु संवर्धन न करता,कुठलाही जोडधंदा न करता,आपल्या शेतासाठी वारस म्हणुन ४ मुलींच्या पाठीवर पाचवा मुलगा जन्माला घलाणारा,शासनावर टीका करणारा ,पुढारीपणा करणारा,गुटखा खाणारा ,बायको चार गायी म्हशी, गेला बाजार बकर्‍या-कोंबड्या पाळु असा सल्ला देत असेल तर 'तु गप ग तुला काय कळतय' असे म्हणुन स्वतःचा पुरुषी अहंकार दाखवणारा हवा.मुटेंना काळजी त्यांची, कीतीही झाले तर माणसेच ती, त्यांचीही बाजु आहेच की.कुणीतरी कैवार घघ्यायलाच हवा त्यांचा मानवतेच्या नात्याने.
आनंद कर्वे,आनंदवन ह्याबद्दल लिहायला तुमच्यासारखे लोक आहेतच की

<< केवढा तो विनोद. तुमच्या प्रत्येक लेखात, मांडलेल्या मतांच्यात, केलेल्या एकांगी चर्चेत हाच दृष्टीकोन दिसून येतो केवळ. आता असहमती दर्शवण्याने काय होणार.>>

निधपा,
बिगरशेतकरी लोक वाईट व निर्ढावलेले, आणि शेतकरी हा सर्वज्ञानी असतो, अशा तर्‍हेचे बिनबुडाचे मत मी कोणत्या पोष्टमध्ये मांडले जरा त्याची लिंक देता का?
........................................
चिनुक्सजी,

बी. बी. ठोंबरे, आनंद कर्वे, फुकुओका, विद्या मुरकुंबी, अशोक देशपांडे, बी. एम. कापसे,
यांच्याबद्दल मला काहीच माहीती नाही.
निव्वळ शेतीच्या बळावर क्लासवन,सुप्पर क्लासवन, किंवा अनिल अंबानीसारखे जीवन जगण्याची किमया साध्य केलीय का त्यांनी?

हाच दृष्टीकोन दिसून येतो केवळ. <<<
तुमचा दृष्टीकोन दिसून येण्यासाठी तुम्ही तेच शब्द वापरायची गरज नाही. तुमच्या ग्यानबासारखे सर्वज्ञानी नसलो आम्ही तरी अ‍ॅप्रोच न कळण्याइतके मूर्ख नाही आम्ही.

बी. बी. ठोंबरे, आनंद कर्वे, फुकुओका, विद्या मुरकुंबी, अशोक देशपांडे, बी. एम. कापसे,
यांच्याबद्दल मला काहीच माहीती नाही.<<<
बरोबरे तुम्हाला माहिती नसणारच.... कारण ए आर सी ने म्हणल्याप्रमाणे!
>>ही माणसे, "मी अन्यायग्रस्त आहे,मी अन्यायग्रस्त आहे....अशी ओरड करत नाहीत , मग मुटेंना काय फायदा त्याचा...", उलट कर्व्यांसारखी माणसे तर त्या कवी लेखकांसरखीच की, जी शेतकर्‍यांसाठी संशोधन करण्याची नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करुन घेणारी ,आंतरराष्ट्रिय पारीतोषकांच्या रकमा लाटणारी,अप्पलपोटी.
खरा शेतकरी म्हणजे कसा, काम धाम न करता,शेततळे न बांधता,म्रुदु संवर्धन न करता,कुठलाही जोडधंदा न करता,आपल्या शेतासाठी वारस म्हणुन ४ मुलींच्या पाठीवर पाचवा मुलगा जन्माला घलाणारा,शासनावर टीका करणारा ,पुढारीपणा करणारा,गुटखा खाणारा ,बायको चार गायी म्हशी, गेला बाजार बकर्‍या-कोंबड्या पाळु असा सल्ला देत असेल तर 'तु गप ग तुला काय कळतय' असे म्हणुन स्वतःचा पुरुषी अहंकार दाखवणारा हवा.<<<

जाउदे परत दगडावर डोकं आपटतेय मी....

तुम्हाला रडण्यात इंटरेस्ट आहे रडत बसा. दुनियेला नावं ठेवत बसा.

तुमचा दृष्टीकोन दिसून येण्यासाठी तुम्ही तेच शब्द वापरायची गरज नाही.

मग ठीक आहे. तुम्हाला वाटेल तसे अर्थ काढण्यापासून कोण रोखू शकणार आहे. चालू द्या.

लेखात मांडलेल्या मुद्यापेक्षा अवांतर चर्चाच भरपूर झाली.

Pages