प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !

Submitted by सेनापती... on 17 August, 2010 - 19:11

गेल्यावर्षी पनवेल जवळ असणाऱ्या प्रबळगड़ - कलावंतीण सूळका येथे गेलो होतो. सवयीप्रमाणे बाइक्स काढल्या आणि सकाळी ६ला ठाण्यावरुन निघालो. मी आणि अभिजितने २००० पासून एकत्रच भ्रमंती सुरु केली. अभि आणि मी एकदम 'बेस्ट ट्रेक बड़ी'. पनवेलनंतर पळस्पे फाटयाला नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपला आणि सुसाट निघालो ते थेट शेडुंग फाटयाला डावीकड़े वळालो, कर्जत - पनवेल रेलवेचा बोगदा लागला त्यापलीकडे प्रबळगड़ दिसत होता. पायथ्याला ठाकुरवाडीला पोचलो. ठाकुरवाडीच्या डाव्या हाताला असलेल्या टेकाडावरुन कलावंतीण सुळक्याकड़े रस्ता वर जातो. त्या टेकाडाच्या पायथ्याला गाडया लावून निघालो. माथ्यावर जाउन झेंडा लावणे आमचे उदिष्ट कधीच नसते. त्यामुळे आम्ही एकदम सावकाश ट्रेक करतो, अर्थात किमान वेळेचे गणित मांडून. प्रत्येक डोंग़रावर एक फोटोस्पॉट असतो. तसा एक मस्त फोटोस्पॉट आम्हाला लगेच मिळाला.


ते बघ.. तिकडे जायचंय...

तिकडे थोडी फोटोग्राफी झाली आणि आम्ही पुढे निघालो. प्रबळगड़माची लागली. साधारण ९ वाजत आले होते. चढ़ सुरु झाला आणि पाणी संपायला लागल. प्रबळगड़ला जाताना नेहमी जास्त पाणी घेउन जावे, एकदा का माची सोडली की कुठे पाणी नाही. गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेला नाही. प्रबळगड़ आणि कलावंतीण सूळक्या मधल्या 'V' आकाराच्या खिंडी मध्ये पोचलो तेंव्हा जवळजवळ ११वाजून गेले होते. तिकडे एक मस्त फ़ूड ब्रेक घेतला आणि मग कलावंतीण सुळक्याच्या त्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या चढायला लागलो. ज्या अपेक्षेने गेलो होतो त्यापेक्षा सोप्या निघाल्या त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ३०मी. मध्ये कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर होतो. तिकडून माथेरान, इर्शाळगड़ आणि धुरकट मलंगगड़ दिसत होता. पावसाळ्यात मात्र एकडे यायला जास्त मज्जा येइल. पुन्हा येऊ अस ठरल आणि आम्ही उतरायला सुरवात केली. माझी तब्येत २ दिवस आधीपासून थोडी ख़राब होती आणि ट्रेक सुरु केल्यापासून जास्तच बिघडत चालली होती. कोणी आठवण काढत होत का माहीत नाही पण उचक्या काही थांबत नव्हत्या.


उतरायला सुरवात केली.. सुळक्याचे फोटो जे प्रबळ गडावरून घेतले आहेत ते शेवटी देतो..

खिंडीमध्ये परत आलो तेंव्हा १ वाजत आला होता आणि आम्ही उन्हाने करपत होतो. पाणी धडाधड संपत होत आणि अजून आख्खा प्रबळगड़ करायचा राहिला होता. खिंडीमध्ये पायथ्याला एक मस्त गुहा आहे. जो कोणी प्रबळगड़ - कलावंतीणला जाइल त्याने ही गुहा चुकवू नये. ५०फुट सरकत सरकत आत जावे. शेवटपर्यंत पुढचा रस्ता कळत नाही. शेवटी डावीकड़े जायला वाट दिसते. डावीकड़े वळून ७-८ फुट गेले की परत उजवीकडे वाट वळते. पुन्हा २-४ फुट आत गेला की एक प्रशस्त गुहा लागते. चांगली १०-१५ फुट लांब आणि १५-२० फुट रुंद. ज्यांना श्वास घायला त्रास होतो अश्यांनी आत जाणे टाळावे. एक वेळेला ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी आत जाऊ नये. टॉर्च न्यायला विसरु नका बरे. नाहीतर आत दिसणार काय आणि तुम्ही बघणार काय...

तिथून निघालो ते थेट प्रबळगडाच्या कड्याखालून सरकत सरकत मुळ वाटेवर येउन पोचलो. एकडे मध्ये अमृता धडपडली. जास्त काही झाल नाही. ह्या वाटेने आमचा थोडा वेळ वाचला होता. आता खरी चढाई सुरु होणार होती. किती वाजले, पाणी किती बाकी आहे हे सगळ पाहील आणि फटाफट पल्ला मारायचा अस ठरवून सुटलो. पुढे जाउन पुन्हा एक क्षणभर विश्रांती झाली. माझी तब्येत आता टोटल डाउन होत चालली होती. पण आता थांबायचे नाही असे ठरवून आम्ही निघालो ते थेट प्रबळगड़चा ढासळलेला दरवाजा आणि तटबंदी ओलांडून माथ्यावर पोचलो. आमच्याकडचे पाणी संपले होते. तितक्यात वरती एका दगडावर 'पाणी' अस खडूच निशाण आणि मार्ग दाख़वणारा बाण दिसला. खर तर गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही पण त्या वेळी आम्ही ते पाणी प्यालो.

अभि आणि ऐश्वर्या पाणी आणायला गेले तर मी आणि अमृताने चक्क सुक्या गवतावर मस्त लोळण घेतली. हा.. हा.. मी बरेच दिवसांनी असा पहुडलो होतो. बिछान्यात लागणार नाही अशी झोप मला त्या ५-१० मी. मध्ये लागली होती. दोघे परत आले आणि मग आम्ही प्रबळगडाच्या टोकाशी जायला निघालो. तिकडून कलावंतीण सूळका एकदम जबरी दिसतो. त्यासाठी तर इतकी पायपिट केली होती. अखेर टोकाला पोचलो. ते दृश्य बघून भरून पावलो. सगळे श्रम एक क्षणात विसरलो.

'ह्याच त्या कलावंतीण सुळक्याच्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या'

पुन्हा तिकडून पाण्याकड़े गेलो आणि आमचा लेट लंच उरकला. आता ४:३० वाजून गेले होते आणि अंधार व्हायच्या आत आम्हाला किमान खाली गाडयांपर्यंत पोचयचे होते. पुन्हा सुसाट निघालो ते कुठेही न थांबता उतरायला सुरवात केली. माचीवर पोचलो आणि तिकडून खाली ठाकुरवाडीला. दिवसभर सुरु असलेली अमृताची फोटोग्राफी सुरूच होती.


मावळत्या सुर्याचे काही मस्त फोटो तिने टिपले. खाली गाडयांपर्यंत पोचलो तोपर्यंत कोणीतरी गाड़ीचा स्पार्कप्लग काढून टाकला होता. नशीब तो नीट लागला आणि गाड़ी सुरु झाली. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. हा माझा ह्या सुट्टीमधला शेवटचा ट्रेक होता. बरेच दिवसांपासून डोक्यात असलेला एक ट्रेक एकदम मस्तपैकी पार पडला होता. कलावंतीण सुळक्याच्या कोरीव पायऱ्या आणि खिंडीमध्ये पायथ्याला असलेली गुहा हे ह्या ट्रेकचे मुळ उदिष्ट होते. पुढच्या महिन्यात करायचे ट्रेक्सचे प्लान बनवत बनवत परतीच्या वाटेला लागलो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

सहि रे...
मि आणि माझा एक मित्र असे दोघच गेलो होतो कलावंतिन दुर्ग ला. त्या आठवणिंना ऊजाळा मिळाला. तु आणि तुझा ग्रुप खरच जिगरबाज आहे.
Happy